गर्भपात करण्यासाठी गोळी घेताय? थांबा, आधी ह्या लेखात गर्भपाताच्या गोळीबद्दलची सविस्तर माहिती वाचा.
गर्भपातासाठी गोळी घ्यावी का? ती कोणती घ्यावी? कशा पद्धतीने घ्यावी? त्याचे फायदे आणि नुकसान काय आहे हे आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
आपल्या जीवनात एक नवा, छोटा जीव येणार आहे हे कोणत्याही स्त्रीसाठी आनंद देणारेच असते.
परंतु काही वेळा मात्र नको असताना गर्भधारणा होते, अनेक कारणे असतात, स्त्रीची तब्येत बरी नसते, आधीचे मूल लहान असते, करियरचा महत्वाचा टप्पा असतो किंवा आर्थिक अडचण असते.
कारणे काहीही असोत पण चुकून झालेली गर्भधारणा नको असते. मग अशा वेळी शोध सुरु होतो तो गर्भपात करण्याच्या उपायांचा.
त्या महिलेच्या मनात अनेक प्रश्न उठतात. गर्भपातासाठी मिळणारी गोळी घेणे योग्य आहे का?
मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी म्हणजेच डॉक्टरांकरवी करायची प्रोसिजर करणे आवश्यक आहे का? गोळी घेतली तर तिचे साइड इफेक्ट्स काय असतील?
अशा अनेक प्रश्नांचं काहूर मनात उठतं. बरेचदा महिलांना ह्या बाबतीत असणाऱ्या कायद्याची देखील माहिती नसते. म्हणून आपण आज ह्या विषयाची सविस्तर माहिती घेऊया.
एम. टि. पी. म्हणजे नक्की काय?
भारतात मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट ह्या कायद्याअंतर्गत महिलांना नको असलेला गर्भ पाडून टाकण्याचा अधिकार आहे.
असा गर्भपात करण्यासाठी जी गोळी वापरली जाते ती गर्भपाताची गोळी. ही गोळी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन नुसार मेडिकल स्टोअर मध्ये मिळते.
त्यावर लिहिलेल्या सुचनांचे पालन करून तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने तिचे सेवन करावे.
कोणत्या महिला अशा प्रकारे गर्भपात करून घेऊ शकतात
भारतात कायद्याने महिलांना गर्भपात करवून घेण्याचा अधिकार आहे. त्यासाठीचे नियम खालीलप्रमाणे
१. जर एखादी महिला कोणत्याही आजाराने ग्रस्त असेल आणि गर्भ धारण करण्याची तिच्या शरीराची क्षमता नसेल तर
२. गर्भ धारण करण्यासाठी महिला शारीरिक किंवा मानसिक रूपाने तयार नसेल तर
३. जर गर्भ निरोगी नसेल, गर्भामध्ये काही व्यंग किंवा कमतरता असेल तर
४. एखादी महिला बलात्कारामुळे गर्भवती झाली असेल तर
५. जर गर्भनिरोधक साधन अयशस्वी झाल्यामुळे गर्भधारणा झाली असेल तर
६. जर गर्भपात महिलेच्या संमतीने होत असेल तर
वरील सर्व परिस्थितीत महिला गर्भपात करवून घेऊ शकतात.
गर्भपात कोणत्या प्रकारे केला जातो
गर्भपात करण्याचे दोन प्रकार आहेत.
१. मेडिकल अबॉर्शन – ह्या मध्ये वैद्यकीय सल्ल्याने गोळ्या घेऊन गर्भपात केला जातो.
२. सर्जिकल अबॉर्शन – ह्या मध्ये तज्ञ डॉक्टर लहानशी सर्जिकल प्रोसिजर करून गर्भपात करतात.
गर्भपात करायचा असेल तर तो गर्भधारणेपासून ७ आठवड्यांच्या आत करणे अत्यावश्यक आहे. ह्या बाबतीत अगदी कडक नियम आणि कायदे आहेत.
कारण त्यानंतर गर्भपात करणे हे महिलेच्या जीवाला धोकादायक असू शकते.
गोळी घेऊन गर्भपात नक्की कसा होतो
गर्भपात करणारी गोळी ही स्वतःच्या मनाने न घेता डॉक्टरांच्या सल्ल्याने च घेतली पाहिजे. आपण जाणून घेऊया की ही गोळी नक्की कसे काम करते?
१. ही गोळी घेतल्यानंतर शरीरात प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन बनणे आणि त्याचे काम हे दोन्ही कमी करते.
२. मायोमेट्रीयम म्हणजेच गर्भाशयाच्या आतील भाग संकुचित करते.
३. ट्रॉफोब्लास्ट जे गर्भाचे पोषण करते त्याची निर्मिती थांबवते.
ही गोळी नक्की कशा प्रकारे घ्यावी
गर्भपातासाठी २ गोळ्या घ्याव्या लागतात. पहिली गोळी घेऊन झाल्यावर ३६ ते ४८ तासांनी दुसरी गोळी घ्यावी लागते.
हे सर्व डॉक्टरांच्या सल्ल्याने करणे योग्य ठरते.
अगदी सुरुवातीच्या काळात गर्भपात करायचा असेल तर गोळी घेणे उपयुक्त ठरते परंतु त्यानंतर मात्र सर्जिकल अबॉर्शन करण्याचा सल्ला दिला जातो.
गर्भपाताच्या गोळ्यांचे साइड इफेक्ट कोणते
होय, ह्या गोळ्यांचे साइड इफेक्ट होऊ शकतात आणि त्याची माहिती असणे अत्यावश्यक आहे. प्रमुख साइड इफेक्ट खालीलप्रमाणे आहेत.
- मळमळणे आणि उलट्या होणे
- थकवा
- जुलाब
- थंडी वाजून येणे
- ताप येणे
- चक्कर येणे
- ओटीपोटात तीव्र वेदना होणे किंवा क्रॅम्प येणे
हे साइड इफेक्ट अबॉर्शन नंतर काही काळासाठी दिसतात. जर त्यानंतरही बरे वाटले नाही तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
अशा प्रकारे गर्भपात करण्याचे दुष्परिणाम काय असू शकतात
१. अबॉर्शन अयशस्वी होणे – काही वेळा ह्या गोळ्यांमुळे पूर्णपणे गर्भपात होत नाही आणि गर्भधारणा सुरु राहते.
परंतु अशा वेळी ती गर्भधारणा पुढे सुरु ठेवली तर होणारे बाळ व्यंग असणारे असू शकते. त्यामुळे गोळीमुळे गर्भपात अयशस्वी झाला तर सर्जिकल अबॉर्शन करून घेणे योग्य ठरते.
२. एलर्जि – काही महिलांना गर्भपाताच्या गोळ्यांची एलर्जि असू शकते. त्यामुळे गर्भपात अयशस्वी होण्याबरोबरच स्त्रीच्या तब्येतीला एलर्जि मुळे धोका उत्पन्न होऊ शकतो.
गर्भपात केल्यावर काय काळजी घ्यावी
१. गर्भपात केल्यावर २ आठवड्यांनी तो गर्भपात यशस्वी झाला असल्याची खात्री सोनोग्राफी द्वारे करून घ्यावी.
२. जर गर्भपाताची गोळी फेल झाली असेल आणि जास्त प्रमाणात ब्लीडिंग होत असेल तर त्वरित दवाखान्यात जावे. वेळ घालवू नये.
३. खूप जास्त प्रमाणात ब्लीडिंग होऊन शिवाय ताप येणे किंवा पोटात क्रॅम्प येत असतील तर त्वरित डॉक्टरांना दाखवावे.
४. जर ताप बरा होत नसेल तर इन्फेक्शन झाले आहे असे लक्षात घेऊन त्यानुसार औषधे घ्यावी.
५. जोपर्यंत ब्लीडिंग थांबत नाही तोवर संभोग करू नये.
६. एकदा गर्भपात झाल्याचे निश्चित झाले की योग्य आणि सुरक्षित गर्भनिरोधक वापरुन च संभोग करावा.
काही महत्वाचे मुद्दे
१. गर्भपाताची गोळी नामांकित आणि मान्यताप्राप्त औषधाच्या दुकानातूनच खरेदी करावी. कोणत्याही जडी बुटी, घरगुती औषधे इत्यादीचा वापर करू नये. आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
२. तांबी बसवलेली असताना चुकून गर्भधारणा झाली तर गर्भपाताची गोळी घेण्याआधी डॉक्टरांकरवी तांबी काढून घ्यावी.
३. गर्भधारणा गर्भाशयातच झालेली आहे ना हे आधी तपासून पहावे. ट्यूब मधील गर्भधारणा असेल तर गोळी घेऊन गर्भपात करण्यात धोका असतो.
४. जर योग्य प्रकारे गर्भपात केला गेला तर पुढे हवी असताना गर्भधारणा होण्यात काही अडचण येत नाही. परंतु तसे झाले नाही तर पुढे अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सर्व काही स्त्रीरोगतज्ञांच्या सल्ल्यानेच करावे.
तर ही आहे गर्भपात आणि त्यासाठीच्या गोळीची शास्त्रीय माहिती. ह्या लेखातील माहितीचा लाभ घ्या. आपली आरोग्यविषयी जागरूक रहा. स्वस्थ रहा आनंदी रहा.
स्त्रीभ्रूणहत्या हा कायद्याने गुन्हा आहे, लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.