भारत अनेक रंगांनी नटलेला देश. देशासोबत प्रत्येक १० किलोमीटर मागे बदलणारी संस्कृती आणि त्याची विविधता मला नेहमीच भुरळ पाडत आली आहे. वेगवेगळे धर्म, जाती, भाषा घेऊन सुद्धा आपली ओळख भारत देश म्हणून ठेवणारी लोक जेव्हा कधी कधी भेटतात. तेव्हा ह्या देशात खूप काही बघायचं आहे हे मला पदोपदी जाणवत राहते. इतकी वेगवेगळी रूपं हा देश दाखवतो की आपण नक्की एकाच देशात ना!! असा प्रश्न पडावा. पण असा अनुभव आपलेच भारतीय लोक किती घेतात हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा.
उत्तरेत सियाचीन, लेह – लडाख पासून सुरु झालेला भारत हिंदी महासागरात अंदमान निकोबार बेटांनपर्यंत आपल अस्तित्व टिकवून आहे. तर पूर्वेकडे गुजरात सारख्या राज्यांनी सुरु होऊन मिझोरम पर्यंत पसरलेला आहे. पण सामान्य माणसाचा भारत मात्र पूर्वेकडे संपतो तो जास्तीत जास्त सिक्कीम पर्यंत. कारण त्यापलीकडे चिंचोळा होऊन अरुणाचल प्रदेश ते मिझोरम पर्यंत आपल अस्तित्व ठेवणारा भारत बघणारे आणि त्याला जाणून घेणारे भारतीय कमीच. निवडणुका ते देशात घडणाऱ्या घटना असो. आपण कधी अरुणाचलप्रदेश किंवा मिझोरम मध्ये लागलेल्या आगीची बातमी ऐकतो का? तिथल्या संपाची बातमी येते का? मिडियामधील एक तरी जण तिथल्या लोकप्रतिनिधी ची बाईट घेतो का? किंवा तिथल्या लोकांना काय वाटते हे कधी समोर येत पण नाही. नशीब कि पुस्तकात ते देश भारताच्या सीमेत आहेत म्हणून आपण त्यांना भारताच अंग तरी मानतो. नाहीतर इथल्या लोकांना चीनी म्हणून त्याची लेबल आपल्या डोक्यात तयार असतात नाही का?
सध्या कामाच्या निमिताने भारताच्या पूर्वेकडील राज्याच्या दौऱ्यावर आहे. इथलं लोकजीवन अनुभवतो आहे. कुठेतरी अजून हि ते भारताच्या ५० वर्ष मागे आहेत असच मी म्हणेन. इथला प्रांत म्हणजे निसर्गाने मुक्त उधळण केलेला पण त्याच वेळी दुर्लक्ष केलेला. शुद्ध हवा, अतिसुंदर वातावरण आणि त्यात निसर्गातील पक्ष्यांची रेलचेल. पण आजही इथे प्राथमिक सोई सुविधा नाहीत असच खेदाने म्हणावं लागते. ज्या रस्त्यांनी दोन प्रदेश जोडतात. त्या रस्त्यांची इथे इतकी दुर्दश आहे की डांबर नसलेले मातीचे कच्चे रस्ते आणि धुळीने भरलेल्या गाड्या आपल्याला त्याची पदोपदी जाणीव करून देतात. भारतीय आणि स्पेशली मुंबई, पुणे च्या लोकांच्या शोर्ट ब्रेक ते विकेंड आणि वार्षिक सुट्यात स्थान न मिळवलेला हा प्रदेश म्हणून अजून तितकाच सुंदर आहे. नाहीतर ह्याच रिसोर्ट गार्डन व्हायला वेळ लागला नसता.
इथली लोकं तशी शांत वाटली तरी इथे होणारे सतत बंद, आंदोलन आणि स्थानीय लोकांची दादागिरी ह्या प्रदेशाला डाग लावते हे नक्की. भारतियांच दुर्लक्ष आणि चीन च्या सीमांना जोडणारा भाग म्हणून इकडे हि छुपा दशहतवाद पोसला जातो. स्थानिक लोकांना भारताच्या दुर्लक्षाची जाणीव करून देऊन स्वतन्त्र प्रदेश निर्माण करण्यात अनेक देशांच्या कारवाया इकडे चालू असतात. अर्थात त्याला आपल्याच लोकांची साथ असते हे सत्य ही नाकारता येत नाही. राजकारण न आणता भारताच्या एका वेगळ्या संस्कृतीचं वैभव जपणाऱ्या ह्या प्रदेशाला आपल मानायची आता वेळ येऊन आली आहे. कुठेतरी उशिरा का होईना सरकारला जाग आली आहे. सरकार त्याचं काम करेल पण ह्यापुढे तरी चीनी लोकांप्रमाणे दिसणारी प्रत्येक व्यक्ती चिनी किंवा नेपाळी नसते ही जाणीव आपल्यात निर्माण करूयात. भारत माझा देश आहे. तर ह्या देशातील आणि विविध प्रदेशात राहणारे सगळेच आपले बांधव आहेत हे आपण लक्षात ठेवायला हवं. कुठेतरी भारता बद्दल सांगताना ताजमहाल बद्दल सांगताना एकशिंगी गेंडा पण आमच्याच आसाम मध्ये मिळतो. हे जेव्हा आपल्या तोंडातून बाहेर येईल तेव्हाच कुठेतरी आपण ह्या प्रदेशाला आपल्याशी कनेक्ट केल अस मी म्हणेन.
चीन आपल्या महत्त्वाकांक्षेला पूर्ण करण्यासाठी, पूर्वेकडील प्रदेशात आपल अस्तित्व वाढवतो आहे. आपल्या ताकदीने पूर्वेकडील राष्ट्रांना दबावाखाली आणत आहे. अश्या वेळी चीनला तोडीस तोड प्रतिकार करणारा एकमेव देश हा भारत आहे. गो इस्ट ह्या आपल्या तत्वाला जागून येत्या २६ जानेवारी ला भारताने सगळ्या हेड ऑफ स्टेट एसियन नेत्यांना आपल्याकडे आमंत्रित केल आहे. ब्रूनई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपाइन्स, सिंगापूर, थाईलंड आणि मलेशिया चा समावेश आहे. तब्बल १० देशांचे स्टेट हेड एकाच वेळेस आपल्या देशात २६ जानेवारी च्या कार्यक्रमासाठी हजर असणार आहेत. त्यावर वेगळ लिहेनच. पण जर सरकार आपल्या परीने गो इस्ट करत आहे तर आपण मागे का रहाव. पुढल्या वेळेस आपल्या सुट्टीच्या संकल्पनेत आपणही “गो इस्ट” करूयात. त्यासाठी भारताच्या बाहेर जायची गरज नाही. फक्त आपल्या उजवीकडे असलेल्या प्रदेशाकडे जाण्याची गरज आहे.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.