लिखित ध्येयाची जादु – Goals that are not written down are just wishes

अमेरीकेच्या कॅलिफोर्निया राज्यामध्ये डॉमिनिकन नावाची एक सुप्रसिद्ध युनिव्हर्सिटी आहे. या विश्वविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका गेल मॅथ्युज यांनी एक शोधनिबंध प्रसिद्ध केला.

मानसशास्त्रात डॉक्टरेट मिळवलेल्या या प्रोफेसरने मनातले गुज कागदावर ध्येय बनून उतरवण्याच्या सवयीने खरचं माणसाच्या प्रगतीमध्ये फरक पडतो का यावर काही वर्ष अत्यंत सखोल अभ्यास केला. वेगवेगळ्या वयोगटाच्या एकूण दोनशे सदुसष्ट तरुणतरुणींवर हा रिसर्च करण्यात आला.

या विद्यार्थ्यांना दोन गटात विभागले गेले. पहिल्या गटात असे लोक होते, ज्यांना नियमितपणे आपले ध्येय कागदावर लिहण्याची सवय होती. दुसऱ्या गटातील लोक आपल्या इच्छांचे मनोरे मनामध्येच रचत असत पण कागदावर ध्येय उतरवण्याचा त्यांना कंटाळा होता. प्राध्यापिकेने पहिल्या गटातील लोकांना त्यांचे ध्येय लिहलेला कागद त्यांच्या कामाच्या डेस्कवर नजरेसमोर राहील अशा पद्धतीने चिटकवायला सांगितला.

दुसऱ्या गटातील लोकांना मनातल्या मनात आपल्या इच्छांची उजळणी करत राहावी असे सांगण्यात आले. हा प्रयोग काही वर्ष चालू राहीला.

सखोल परीक्षणाअंती हे सिद्ध झाले की ज्या तरुणतरुणींनी कागदावर आपले ध्येय पुन्हा पुन्हा लिहून काढले आणि त्याचे सतत वाचन केले त्यांच्या बहूतांश इच्छा अत्यंत कमी कालावधीत पूर्ण होत झाल्या आहेत. याउलट ज्या गटातील लोकांना कागदावर ध्येय उतरवण्याची तसदी घेतली नव्हती त्यांची विशेष प्रगती झाली नव्हती. असे लोक कित्येक वर्षापासून जिथल्या तिथे रखडत होते. या प्रयोगाचा निष्कर्ष जगभर गाजला. जे लोक नियमितपणे कागदावर आपले ध्येय उतरवतात आणि पुन्हा पुन्हा त्याची उजळणी करतात, त्या लोकांच्या ध्येय पुर्ण होण्याच्या शक्यतांमध्ये बेचाळीस टक्के वाढ होते.

केवळ कागदावर ध्येय लिहून काढल्याने आपण थक्क करणारी प्रगती करु शकतो. पण तरीही खूपच कमी लोक या रहस्याचा स्वतःच्या जीवनात वापर करतात.

कारणे दोन – ‘अज्ञान आणि आळशीपणा’

एखादा गोष्ट लिहताना आपल्याला काही क्षणांसाठी त्यावर एकाग्र व्हावे लागते. आपण कागदावर ध्येय लिहतो तेव्हा आपल्या अबोध मेंदुला संदेश मिळतो की तुम्ही त्या ध्येयाप्रति बांधील आहात. अंतर्मनात ध्येय रुजले की ते पुर्ण करण्यासाठी त्याकडून
आवश्यक ते मार्गदर्शन केले जाते. आवश्यक तो पुढाकार घेतला जातो.

कागदावर वारंवार ध्येय लिहल्याने आपल्या आतमध्ये एक अखंड उर्जेचा अदृश्य झरा निर्माण होतो. ही उर्जा आपल्याला एकाग्र होण्यास मदत करते आणि कामामध्ये एकाग्र व्हायला लागलं की अवघड वाटणारी ध्येयसुद्धा सहज साध्य होतात.

विखुरलेली सुर्यकिरणे विशेष जादु करु शकत नाहीत, मात्र एका भिंगाखाली त्यांना एकाग्र केले तर कागद जाळण्याइतकी शक्ती त्यांच्यामध्ये निर्माण होते. वाफेला एका छोट्या पिस्टनमध्ये एकाग्र केल्यावर अवजड बोजड अशा वजनदार लोखंडी बोगीसुद्धा सुसाट वेगाने धावु लागतात. हवेतलं दव जेव्हा एका जागी एकवटतं तेव्हा ढग तयार होतात आणि पाऊस पडतो. ही सगळी एकाग्रतेची कमाल आहे.

आपल्याला आकर्षणाचा सिद्धांत वापरुन जर खरोखर आश्चर्यकारक वेगाने प्रगती करायची असेल तर आपण एकाग्र होण्याची कला अवगत केली पाहिजे. हे करण्यामध्ये ध्येयाचे बारीकसारीक वर्णन करणारे लिखाण मोलाची मदत करते.

कागदावर न लिहताच नुसताच विचार करणाऱ्या लोकांना हवं ते यश का मिळत नाही याचं एक वैज्ञानिक कारणसुद्धा आहे. आपल्या मेंदुचे दोन भाग आहेत. डावा मेंदु आणि उजवा मेंदु. एखादी गोष्ट अंतर्मनात खोलवर रुजवायची असेल तर डाव्या-उजव्या दोन्ही मेंदुच्या भागांमध्ये ताळमेळ असणे आवश्यक आहे.

माणूस फक्त विचार करतो तेव्हा त्याचा फक्त उजवा मेंदु सक्रिय होतो. नुसत्याच उजव्या मेंदुच्या उत्तेजित होण्याने कार्यभाग पुर्ण होत नाही. त्यासाठी डाव्या मेंदुच्या सहकार्याचीही आवश्यकता असते. कागदावर ध्येय लिहण्याची क्रिया केल्याने डावा मेंदु उद्दीपित होतो. एकदा मेंदुचे डावे आणि उजवे असे दोन्ही भाग उत्साहित आणि प्रेरित झाले की कोणत्याही व्यक्तीमध्ये सुप्त पातळीवर बदल घडतो. त्याची एकाग्रता वाढते. असाध्य आणि अवघड कामगिरी पार पाडण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण होते.

आकर्षणाच्या सिद्धांताचा यशस्वी वापर करण्याची दोन महत्वाची सुत्रं आज तुम्हाला सांगतो.

१) ध्येय लिहा. – या प्रक्रियेमूळे तुम्हाला या ब्रम्हांडाकडुन नेमके काय हवे आहे याचे उत्तर मिळते. एकदा तुमचे ध्येय
निश्चित झाले की त्याकडे घेऊन जाणारा मार्गही डोळ्यांपुढे प्रकट होतो.

आतापर्यंत कोपऱ्यात दडून बसलेल्या संधी आता स्पष्ट दिसायला लागतात. कागदावर ध्येय लिहल्यामूळे आणखी एक गोष्ट घडते. ध्येय पुर्ण करण्यासाठी मी काहीही करेन, अगदी आकाशपाताळ एक करेन पण मला हवे ते मिळवीनच, असा संदेश अंतर्मनात रुजला जाते.

आपण प्रत्येकाने दोन प्रकारची ध्येय लिहून काढावीत. लॉन्ग टर्म आणि शॉर्ट टर्म. पुढील दहा वर्षानंतर तुम्ही स्वतःला कोणत्या ठिकाणी बघता?

२०२६ साली तुमच्याकडे किती पैसे असतील? २०३० मध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारच्या घरामध्ये रहायला आवडेल? आपल्या प्रिय व्यक्तींसोबत कोणकोणत्या जगप्रसिद्ध ठिकाणी भेटी द्यायला आवडतील?

एक वर्षाची ध्येय लिहा. एक महिन्याची ध्येय लिहा. एका दिवसाची ध्येय लिहा आणि कठोरपणे अंमलबजावणी करा. एवढे साधे काम प्रामाणिकपणे केले तरी दहा वर्षानंतरची तुमची सगळी स्वप्नं त्याअगोदरच पुर्ण होतील.

२) आपली ध्येय कोणालाही सांगू नका. – तुमच्या आजुबाजुला तुम्ही बऱ्याच व्यक्ती पाहिल्या असतील ज्या फक्त बडबड करतात, मोठ्या वल्गना करतात पण त्या दिशेने त्यांची किंचितही प्रगती होत नाहीत. कारण हे लोक स्वतःच्याच सापळ्यात अडकलेले असतात.

इतर लोकांना ध्येय का सांगू नये याचे एक शास्त्रीय कारण आहे. आपल्या मनातले ध्येय इतरांपाशी बोलून दाखवल्यामुळे आपल्या मेंदुमध्ये डोपामिन नावाचे संप्रेरक निर्माण होते. त्यामुळे आपल्याला अल्पकाळ संतुष्टी मिळते. जणू काही आपले ध्येय पुर्ण झाले आहे अशी भावना मनात निर्माण होते.

पण तुम्ही फक्त बोलण्याची कृती केली आहे. त्या दिशेने पाऊल उचलले नाही. मात्र संतुष्टी आणि तृप्तीची भावना निर्माण झाल्यामुळे प्रत्यक्ष कृती करण्याकडे चालढकल होते. असे लोक नकळत फक्त बोलून बोलूनच स्वतःला संतुष्ट करण्याचा सोपा मार्ग निवडतात.

याउलट जो व्यक्ती आपली ध्येय चालू वर्तमानकाळात लिहून काढतो आणि सकाळी उठल्यावर व रात्री झोपण्याआधी आपल्या ध्येयांचं मनोभावे वाचन करतो त्याच्या अंतर्मनाला कृती करण्याचा प्रखर संदेश दिला जातो. आपोआपच आळस व क्षणिक तृप्ती हद्द्पार होतात आणि माणूस मोठ्या तडफेने संकल्प पुर्ण करण्याच्या मागे लागलो.

आपली ध्येय इतरांना सांगणे योग्य की अयोग्य हे तपासण्यासाठी प्रोफेसर पीटर यांनी एक शोधनिबंध प्रसिद्ध केला. या प्रयोगामध्ये पन्नास माणसांना निवडले गेले आणि पंचवीस-पंचवीस चे दोन गट बनवले गेले. पहिल्या पंचवीस लोकांना त्यांचे ध्येय लिहायचे होते पण त्यांनी ते इतर कोणाशीही ते शेअर करायचे नाही अशी सुचना त्यांना दिली गेली.

दुसऱ्या गटातील पंचवीस लोकांना त्यांचे ठरवलेले ध्येय इतर लोकांशी शेअर करण्याची मुभा होती. दुसऱ्या समुहातील पंचवीस जणांनी आपल्या ध्येयाविषयी इतर लोकांशी मनसोक्त चर्चा केली. सुरुवातीला या समुहातील लोकांचा आत्मविश्वास कमालीचा वाढल्याचे दिसून आले. आता त्यांना स्वतःच्या कर्तुत्वाबद्दल खात्री वाटायला लागली होती.

त्यानंतर दोन्ही समुहातील लोकांना ध्येय पुर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले का`म करण्याची सुचना दिली गेली. वर्गात पहिले येण्याचे ध्येय असेल त्याने अभ्यास करावा. गायनाचे बक्षीस मिळवायचे असेल त्याने रियाज करावा. प्रत्येक व्यक्तीला कंटाळा आल्यावर तर काम थांबवण्याची परवानगी होती. बडबड्या समुहातील लोक आपल्या कामावर एकाग्र होऊ शकले नाहीत. सरासरी तेवीस मिनिटे प्रयत्न करुन त्यांनी खोलीच्या बाहेर जाणे पसंत केले.

याउलट ज्या पहिल्या समुहातील लोकांनी मौन धारण करुन आपले ध्येय मनाशी बाळगले होते, त्यांनी संपुर्ण पंचेचाळीस मिनिटे एकाग्र होऊन सराव केला.

सकाळी चार वाजता ब्रम्हमुहुर्तावर उठून कामाला लागल्याने आपली कार्यक्षमता कमालीची वाढते. सकाळी उशीरापर्यंत झोपून राहणारी माणसं आळशी, चिडचिडी आणि लवकर निराश का होतात? सकाळी लवकर उठण्याचा आकर्षणाच्या नियमाशी कसा अतूट संबंध आहे, हे पुढील लेखात जाणून घेऊया.

आभार आणि शुभेच्छा!

 

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।