आपला चेहरा गोरा आणि तजेलदार दिसावा, आपण सुंदर दिसावे असे सर्वांनाच वाटते.
फक्त गोरा रंग असणे महत्वाचे नसून त्वचा तजेलदार असणे हे जास्त महत्त्वाचे आहे. तजेलदार त्वचा असेल तर ती व्यक्ती आपोआप सुंदर दिसते, त्वचेचा रंग सावळा किंवा शामल असला तरीही.
आज आपण उन्हामुळे किंवा प्रदूषणामुळे काळवंडलेली त्वचा पूर्ववत कशी करायची, तजेलदार कशी करायची ह्यासाठीचे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
चेहरा काळवंडला असेल तर त्या व्यक्तीचा आत्मविश्वास नक्कीच कमी होतो. खालील उपाय जरूर वापरून पहावेत.
त्वचा काळवंडते म्हणजे नक्की काय?
त्वचेचा रंग गोरा, सावळा अथवा शाम वर्ण असा कुठलाही असला तरी त्यावरील तजेलदारपणा आणि चमक कमी होणे, त्वचेवर काळसर रंगाचे चट्टे दिसणे, मान, गळा, हाताची कोपरे येथील त्वचा काळी पडणे असे झाले असेल तर त्वचा काळवंडली आहे असे दिसून येते. तसेच त्वचा कोरडी पडते.
त्वचा काळी पडण्याची कारणे
१. ऊन
उन्हामध्ये जाण्यामुळे त्वचा काळवंडते. सूर्याची हानीकारक किरणे त्वचेचे वरील आवरण भाजून काढतात. त्यामुळे त्वचेचा रंग काळा पडतो. त्यालाच ‘सन टॅन’ असे देखील म्हणतात.
२. प्रदूषण
हवेतील प्रदूषणामुळे शरीराच्या उघड्या भागातील त्वचेवर परिणाम होतो. त्यामुळे चेहरा, मान, गळा, हात येथील त्वचा काळी पडते.
३. वात, कफ आणि पित्तदोष
आपल्या शरीरातील वात, कफ आणि पित्त ह्यांचे संतुलन बिघडले की निरनिराळे आजार होतात. त्यामुळे त्वचा निस्तेज होऊन काळवंडते. कोरडी पडते.
४. वाढते वय
वाढत्या वयाबरोबर त्वचेवरील चमक कमी होऊन तजेलदारपणा नाहीसा होऊ लागतो.
५. कॉस्मेटिकचा अतिवापर
चेहरा आणि त्वचेसाठी कॉस्मेटिक्सचा अति वापर केल्यास तात्पुरती तजेलदार कांती मिळते परंतु त्याचे कायमस्वरूपी परिणाम म्हणून त्वचा काळवंडू शकते.
६. स्थूलपणा
आवश्यकतेपेक्षा जास्त वजन असेल तर चेहरा, मान आणि गळा येथील त्वचा काळी पडू लागते. त्वचेचा पोत बदलून ती जाड होऊ लागते.
त्वचेचा काळेपणा दूर करण्याचे घरगुती उपाय
काळवंडलेली त्वचा पुन्हा चमकदार होण्यासाठी खालील उपायांचा अवलंब करावा.
१. केळे
पिकलेले केळ दुधात कुस्करून त्याची पेस्ट तयार करून चेहरा अथवा त्वचेच्या काळवंडलेल्या भागावर लावावी. १५ ते २० मिनिटे ठेवून त्यानंतर साध्या पाण्याने धुऊन टाकावी. टॅनिंग कमी होण्यास मदत होते.
२. तांदूळ अथवा तांदळाचे पीठ
तांदूळ वाटून घेऊन किंवा तांदुळाचे पीठ घेऊन त्यात दूध आणि मध घालून पेस्ट बनवून घ्यावी. ही पेस्ट त्वचेवर चोळून लावावी. १५ मिनिटांनी साध्या पाण्याने धुऊन टाकावी. हा उपाय आठवड्यातून २ ते ३ वेळा करावा.
३. टोमॅटोचा रस
टोमॅटोचा रस चेहऱ्यावर लावावा. वाळला की साध्या गार पाण्याने चेहरा धुवावा. चेहऱ्यावरील काळसरपणा कमी होतो.
४. पपई
पिकलेल्या पपईचा गर मध मिसळून चेहऱ्यावर लावावा. त्यामुळे चेहर्याची कांती तजेलदार बनते.
५. चंदन पावडर
चंदनाची पावडर गुलाब पाणी अथवा नारळ पाणी वापरून भिजवून घ्यावी. त्यामध्ये बदामाच्या तेलाचे दोन-तीन थेंब घालावेत. ही पेस्ट चेहर्यावर २० मिनिटे लावून ठेवावी. नंतर साध्या गार पाण्याने चेहरा धुऊन टाकावा.
६. काकडी
१०० ग्रॅम काकडीचे तुकडे करून ते अर्धा लिटर पाण्यात उकळून घ्यावेत. ते पाणी गाळून घेऊन त्याने चेहरा धुवावा. असे दररोज केल्यास चेहऱ्याचा काळेपणा कमी होतो.
७. कच्चे दूध
उन्हामुळे भाजलेल्या त्वचेवर कच्चे, निरसे दूध दूध चोळून लावावे. १० मिनिटे ठेवून चेहरा धुवुन टाकावा. हा उपाय सनबर्नमुळे काळवंडलेल्या त्वचेवर फार लाभदायक आहे.
८. बटाटा
बटाट्यामध्ये असलेल्या स्टार्च मुळे त्वचेचा काळसरपणा कमी होतो. बटाट्याच्या रसात कापूस बुडवून तो रस त्वचेवर लावावा. सुकेपर्यंत ठेवून नंतर साध्या पाण्याने धुऊन टाकावा. जास्त काळवंडलेल्या त्वचेवर बटाटा कापून त्याचे काप ठेवावेत.
९. लिंबाचा रस
लिंबाच्या रसामुळे त्वचेचा काळसरपणा कमी होतो. लिंबाचा रस, काकडीचा रस आणि मध यांची पेस्ट चेहऱ्याला लावावी. तसेच लिंबाचा रस, काकडीचा रस आणि चिमूटभर हळद एकत्र करून चेहऱ्याला लावावी.
१०. केशर
केशरा मुळे रंग गोरा होतो हे तर सर्वश्रुत आहेच. दुधामध्ये केशराच्या तीन चार काड्या घालून त्या दुधाने चेहऱ्याला मालिश करावी. रंग उजळण्यास मदत होते.
११. दही आणि बेसन
दही आणि बेसन यांची पेस्ट बनवून त्यात चिमूटभर हळद आणि थोडी साय घालून हे मिश्रण चेहरा आणि हातापायांना लावावे. त्वचेचा काळसरपणा कमी होतो. दररोज अंघोळ करताना देखील या मिश्रणाचा वापर करता येतो.
आहार काय असावा
त्वचा नेहमीच उजळ आणि तजेलदार दिसावी यासाठी पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे.
१. भरपूर फळे आणि भाज्या, पालेभाज्या नियमित स्वरूपात खाव्यात.
२. दररोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे. भरपूर पाणी पिण्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही.
३. तेलकट, मसालेदार पदार्थ कमी प्रमाणात खावेत.
जीवनशैली कशी असावी
१. तजेलदार, निरोगी कांतीसाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.
२. स्थूलपणामुळे त्वचा काळवंडू शकते. त्यामुळे वजन आटोक्यात ठेवणे आवश्यक आहे.
३. रात्री पुरेशी झोप झाली नाही तर डोळ्याभोवती काळी वर्तुळे दिसून चेहरा काळवंडतो. दररोज किमान आठ तास झोप घ्यावी. जागरणे करू नयेत.
४. उन्हात बाहेर जाताना चेहरा झाकला जाईल असा स्कार्फ बांधावा. तसेच डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी गॉगल वापरावा. हात पाय झाकले जातील असे कपडे वापरावे.
५. बाहेरून आल्यावर गार पाण्याने चेहरा धुऊन टाकावा. त्यामुळे ऊन आणि प्रदूषणामुळे चेहऱ्यावर झालेले परिणाम कमी होतात.
६. नियमित प्राणायाम आणि योगासने करावीत. त्यामुळे चेहरा निकोप होऊन तजेलदार दिसतो.
७. शक्यतो नैसर्गिक उत्पादनांचा वापर करावा. कृत्रिम कॉस्मेटिकचा वापर टाळावा.
८. ताण तणाव आणि चिंता दूर होण्यासाठी खास प्रयत्न करावेत.
तर हे आहेत त्वचेचा काळसरपणा कमी करून गोरी आणि तजेलदार त्वचा मिळवण्याचे घरगुती उपाय. ह्या उपायांचा निश्चित पणे वापर करा आणि सतेज कांती मिळवा. तुमच्याकडे इतर उपाय असतील तर ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.