तुमचे होम लोनचे हप्ते थकले आहेत का? घाबरून जाऊ नका, जाणून घ्या अशा परिस्थितीत काय आहेत तुमचे अधिकार?
सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस सहसा नवीन घर घेताना होम लोन घेतोच. बँकेकडून घेतलेले होम लोन दरमहा ई. एम. आय. भरून फेडले जाते. हे दर महिन्याला भरायचे हप्ते म्हणजे नोकरदार माणसाच्या डोक्यावरची टांगती तलवार असते.
दर महिन्याला नियमितपणे होम लोनचे हप्ते भरणे कर्जदाराच्या दृष्टीने आवश्यक असते. आपण जर हप्ता भरायला चुकलो तर बँक आपल्यावर काय कारवाई करेल ही भीती सगळ्या कर्जदारांच्या मनात असते. बँकेकडून घेतलेले लोन योग्य प्रकारे फेडले पाहिजे हे तर निश्चितच.
परंतु काही कारणाने जर तुम्ही होम लोनचा हप्ता भरू शकत नसाल तर कारवाईच्या भीतीने घाबरून जाऊ नका. प्रत्येक बँक त्यांच्या अधिकारात असणाऱ्या आणि नियमानुसार कारवाई करू शकते. हप्ता भरू शकला नाही म्हणून कर्जदाराला कोणत्याही प्रकारचे शारीरिक किंवा मानसिक नुकसान पोहोचवण्याचा बँकेला काहीही अधिकार नसतो.
बहुतेक वेळा कर्जाचे हप्ते फेडता न आल्यामुळे लोक अतिशय घाबरून जातात आणि तणावाखाली येऊन काही चुकीची पावले उचलतात. परंतु आपले होम लोन योग्य वेळी योग्य हप्ते भरून बँकेला परत करणे हे आपले कर्तव्य आहे हे मान्य केले तरीही, जर कोणत्या अडचणीमुळे, आपल्यासमोर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे होम लोनचा हप्ता फेडणे आपल्याला शक्य नसेल तर, त्याही परिस्थितीत अशा व्यक्तीला काही अधिकार असतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी घाबरून जाऊन आणि तणावाखाली चुकीची पावले उचलता कामा नये.
यासाठीच आज आपण लोनचे हप्ते फेडता न आल्यास नेमकी काय कारवाई केली जाऊ शकते आणि हप्ते न फेडू शकणाऱ्या व्यक्तीचे नक्की कोणते अधिकार असतात हे जाणून घेणार आहोत.
कोणतीही बँक हप्ता न फेडू शकणाऱ्या व्यक्तीवर नियमांच्या चौकटीत राहूनच कारवाई करू शकते.
१. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की बँक अशा व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे शारीरिक अथवा मानसिक नुकसान पोहोचवू शकत नाही.
२. जर तुम्ही लोनचा हप्ता भरलेला नसेल तरीही बँकेचा कोणताही कर्मचारी तुम्हाला धमकी देऊ शकत नाही. शारीरिक नुकसान पोहोचवू शकत नाही. तसेच सार्वजनिक ठिकाणी या गोष्टीचा उल्लेख करून तुम्हाला अपमानित देखील करू शकत नाही.
काहीवेळा बँकेने एखाद्या तिसर्या संस्थेला लोन रिकवरी साठी नेमलेले असू शकते. परंतु ते लोक देखील तुम्हाला केवळ तोंडी सूचना देऊ शकतात. तसेच असे वसुली अधिकारी तुम्हाला कोणत्याही प्रकारची शारीरिक इजा पोहोचवू शकत नाहीत. वसुली अधिकाऱ्यांना सूचना देण्याकरता दिवसा येणे बंधनकारक आहे. ते तुम्हाला रात्रीच्या वेळी भेटू शकत नाहीत. धमकावू शकत नाहीत. त्यांना त्यांच्या नियमानुसार काम करणे बंधनकारक असते.
३. होमलोन घेताना जरी आपले घर बँकेकडे गहाण असले तरी असे कधीच नसते की एखादा हप्ता चुकला म्हणून बँकेने लगेच घराचा लिलाव केला. बँकेला हप्ते चुकल्यानंतर असणारी संपूर्ण प्रोसिजर फॉलो करावी लागते. त्यानुसार सुरुवातीला कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला नोटीस पिरियड दिला जातो. कर्जाचे हफ्ते फेडण्याची संपूर्ण संधी बँकेकडून तुम्हाला मिळते.
नोटीस पिरियडच्या कालावधीत देखील तुम्ही हप्ते भरू शकला नाही तरच बँक तुमच्या घराचा लिलाव करून कर्जाची वसुली करू शकते. सदर कालावधीत जर तुम्ही काही हप्ते भरले तर बँकेकडून तुम्हाला पुन्हा काही काळ मुदत वाढवून मिळू शकते. त्यामुळे कर्जाचे हप्ते थकले असतील तर या सर्व पर्यायांचा जरूर विचार करा. कोणतेही आतातायी पाऊल उचलू नका.
४. जर तुम्ही नोटीस पिरियडमध्ये देखील हप्ते भरण्यात अपयशी ठरलात आणि बँकेने तुमच्या घराचा लीलाव करायचे ठरवले तरी त्यासाठी देखील बँकेकडून तुम्हाला कमीत कमी साठ दिवसांची मुदत दिली जाते.
या मुदती अखेर एक नोटीस दिली जाते आणि त्यानंतरच लिलावाची प्रोसेस सुरू केली जाते. तसेच तुमच्या घराचा लिलाव करताना घराची योग्य ती किंमत लावणे बँकेला बंधनकारक असते. केवळ लोनची रक्कम फिटण्याएवढी किंमत लावून घर विकणे असे बँक करू शकत नाही.
५. बँकेने नोटीस दिल्यानंतरही जर दुर्दैवाने तुम्ही लोनचे हप्ते भरू शकला नाहीत तर बँकेकडून तुमच्या घराचा लिलाव करून घर विकून लोनचे मुद्दल फेडून घेतले जाते. परंतु त्याही परिस्थितीत लोनची रक्कम फेडून घेऊन उर्वरित रक्कम तुम्हाला परत करणे बँकेला बंधनकारक असते.
उदाहरणार्थ तुमच्या घराची किंमत जर 80 लाख रुपये असेल आणि तुमच्या वरील कर्जाची रक्कम पन्नास लाख रुपये असेल तर ऐंशी लाखाला घर विकून पन्नास लाख रुपये लोन फेडण्यासाठी वापरून तसेच काही रक्कम दंड आणि प्रोसीजर चार्जेस म्हणून वजा करून उर्वरित रक्कम तुम्हाला परत करणे बँकेवर बंधनकारक असते.
असे मुळीच नाही की घराचा लीलाव झाला म्हणजे घर आणि संपूर्ण रक्कम तुमच्या हातातून गेली. त्यामुळे घराचा लिलाव होत असेल तरीही अगदी हताश होऊन प्रयत्न सोडू नयेत.
तर मित्र मैत्रिणींनो अशाप्रकारे आज आपण जाणून घेतले की जरी आपण होम लोनचे हप्ते भरू शकलो नाही तरीदेखील आपल्याला काही अधिकार असतात. बँक आपल्यावर त्यांच्या मनाप्रमाणे नव्हे तर नियमात बसेल अशा पद्धतीनेच कारवाई करू शकते. तसेच वसुली अधिकारी किंवा बाउन्सर यांची जी भीती आपल्या मनात असते ती अनाठाई असून बँक आपल्याला कोणत्याही प्रकारची शारीरिक इजा पोहोचवू शकत नाही.
जर तुम्ही कोणत्याही प्रकारे आर्थिक अडचणीत आल्यामुळे तुमच्या कर्जाचे हप्ते फेडू शकत नसाल तर हताश न होता बँकेला ह्या गोष्टीची पूर्ण कल्पना द्या. लोन फेडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा तसेच बँकेकडून पुढील कारवाई झाल्यास ती तुमच्या अधिकारांच्या कक्षेतच होत आहे ना याची खात्री करून घ्या.
याबाबतची पूर्ण माहिती नसल्यामुळे घाबरून जावून अनेक लोक चुकीची पावले उचलतात. तसे होऊ न देण्यासाठी आणि हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा लेख जरुर शेअर करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.