सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: गुडघेदुखीवर रामबाण उपाय | गुडघे दुखण्याचे कारण | गुडघेदुखीवर आयुर्वेदिक उपचार | गुडघे दुखी साठी व्यायाम | सांधेदुखीवर घरगुती उपाय | गुडघ्यावर सूज येणे
तुम्ही गुडघेदुखी मुळे हैराण झाले आहात का? जाणून घ्या गुडघे दुखण्याची विविध कारणे आणि त्यावरचे उपाय. तसेच गुडघे दुखत असतील तर त्यावर आराम मिळण्यासाठी करण्याचे सोपे व्यायाम देखील समजून घेण्यासाठी लेख शेवटपर्यंत वाचा.
सर्वांनाच थोड्याफार प्रमाणात केव्हा ना केव्हा गुडघेदुखीचा अनुभव येतोच. परंतु वारंवार गुडघे दुखत असतील किंवा सतत गुडघे दुखत असतील तर त्यामागे निश्चितच काही कारणे असतात.
आपण उभे असताना किंवा चालताना शरीराचा संपूर्ण भार आपल्या गुडघ्यांवर पडतो त्यामुळे गुडघे हा सांधा शरीरातील सर्वात महत्त्वाचा असतो असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
आपल्या शरीराचा संपूर्ण भार आपल्या गुडघ्यांवर पडत असल्यामुळे गुडघ्यांचा सर्वात जास्त वापर होतो हे तर सहाजिकच आहे. ज्यांचे वजन जास्त असते असे लोक किंवा खेळाडू आणि व्यायाम करणारे लोक यांच्या गुडघ्याच्या सांध्याचा वापर जास्त प्रमाणात होतो आणि त्यामुळे त्यांना काही वेळा गुडघेदुखीचा सामना करावा लागतो.
जसजसे वय वाढते तसतसे गुडघेदुखीची समस्या जास्त प्रमाणात आढळून येते. बहुतांश ज्येष्ठ नागरिकांना उठता बसताना गुडघे दुखतात असा अनुभव येतो.
गुडघेदुखीचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे संधिवात हा आजार. या आजारामुळे गुडघ्यांवरील संरक्षक कवचाची झीज होऊ लागते आणि त्यामुळे गुडघे दुखतात. गुडघ्यातील स्नायू आणि कार्टीलेज यांची झीज हळूहळू सुरू होते त्यामुळे गुडघेदुखीचा आजार हळूहळू बळावत जातो.
आपले गुडघे नेमके कशामुळे दुखतात हे कसे शोधून काढायचे? | गुडघे दुखण्याचे कारण
१. दुखापतीमुळे होणारी तात्पुरती गुडघेदुखी.
गुडघेदुखीचे नेमके कारण शोधण्यासाठी आपले गुडघे अचानक कुठल्या दुखापतीमुळे दुखत आहेत का हे बघायला हवे. जर एखादी दुखापत झाल्यामुळे गुडघे दुखत असतील तर ती तात्पुरती गुडघेदुखी असते. झालेली दुखापत बरी झाली की गुडघे दुखायचे थांबतात.
२. दुखापती मुळे होणारी परंतु बराच काळ राहणारी गुडघेदुखी.
काही वेळा गुडघेदुखीचे कारण जरी दुखापत हे असले तरी दुखापत बरी झाल्यानंतर सुद्धा गुडघे दुखत राहतात. कारण त्यांच्या स्नायूंना धक्का पोहोचलेला असतो. अशावेळी गुडघेदुखीवर योग्य ते औषधोपचार करणे अतिशय आवश्यक असते.
३. संधिवात.
संधिवात हे गुडघेदुखीचे सर्वात प्रमुख कारण आहे. संधिवातामुळे होणाऱ्या गुडघेदुखी मध्ये खालील लक्षणे आढळून येतात.
१. गुडघ्यांच्या हालचालीमुळे दुखणे वाढते आणि आराम केला की बरे वाटते.
२. काही वेळा गुडघे लॉक झाल्यासारखे वाटते.
३. गुडघ्यांच्या मागच्या बाजूला सूज आल्यासारखे वाटते.
४. गुडघ्यांमध्ये ताठरपणा येतो आणि सहजपणे हालचाली करणे शक्य होत नाही.
५. सांधेदुखी किंवा संधिवात हा आजार फक्त ज्येष्ठ नागरिकांनाच होतो असे नाही तर तरुणांमध्ये देखील हा आजार दिसून येतो. विशेषतः वजन जास्त असणाऱ्या तरुणांमध्ये हा आजार आढळून येतो.
गुडघेदुखी असेल तर काय करावे आणि काय करू नये.
A) गुडघेदुखी असेल तर खालील गोष्टी आवर्जून कराव्यात.
१. शरीराची शक्य तितकी हालचाल करावी. सहज होतील असे व्यायाम करावेत. फक्त आराम करण्याने लवकर बरे वाटणार नाही.
२. शारीरिक व्यायाम आणि सुयोग्य दिनचर्या यांचा बरे होण्यास खूप उपयोग होतो.
३. उंच टाचेचे चपला अथवा बूट न वापरता सपाट पादत्राणे वापरावीत.
४. तज्ञ फिजिओथेरपिस्ट कडून योग्य ते व्यायाम शिकून घेऊन ते नियमितपणे करावेत.
५. आपले वजन आटोक्यात ठेवावे. शक्य तितके वजन कमी करावे. शरीराचे वजन जेवढे कमी तेवढा गुडघ्यांवरील ताण कमी.
६. चालणे, सायकल चालवणे, पोहणे असे व्यायामाचे प्रकार आवर्जून करावेत.
७. गुडघे फारच दुखत असतील तर चालताना काठी अथवा वॉकरचा उपयोग करावा. त्यामुळे गुडघ्यांवरचा भार हलका होण्यास मदत होते.
८. गुडघेदुखी असेल तर जिन्याचा वापर मात्र करू नये. जिने चढण्यामुळे गुडघेदुखी बळावते. लिफ्ट किंवा सरकत्या जिन्याचा वापर करावा.
B) गुडघेदुखी असेल तर खालील गोष्टी टाळाव्यात.
१. squat सारखे उकिडवे बसून करण्याचे व्यायाम करू नयेत.
२. भारतीय शौचालयाचा वापर न करता टॉयलेट चेअर किंवा कमोड चा वापर करावा.
३. उकिडवे अथवा मांडी घालून बसणे टाळावे.
४. गुडघ्यावर गुडघे टाकून देखील बसू नये.
५. खूप जास्त काळ गुडघ्यांचा वापर होईल अशा पद्धतीचे व्यायाम किंवा कोणतीही ऍक्टिव्हिटी करू नये.
६. धुम्रपान अजिबात करू नये. धुम्रपान करण्यामुळे सांध्यांमधील स्नायूंची झीज होण्याचे प्रमाण खूप वाढते.
७. खूप जास्त वेळ बसून राहणे किंवा झोपून राहणे टाळावे. थोड्या थोड्या वेळाने शरीराची हालचाल करत राहावी.
C) गुडघे दुखी असताना करायचे सोपे व्यायाम.
हे व्यायाम अक्षरशः पाच मिनिटात करून होऊ शकतात. आणि या व्यायामांचा गुडघेदुखीवर खूप चांगला परिणाम होतो.
१. पाय लांब करून दोन्ही गुडघ्यां खाली टॉवेलची गुंडाळी घेऊन बसा अथवा झोपा. गुडघ्याचे स्नायू टॉवेलवर दाबण्याचा प्रयत्न करा. दहा आकडे मोजा. त्यानंतर दाब कमी करा. असे दहा वेळा करा.
२. पाय लांब करून घोट्याखाली टॉवेलची गुंडाळी घेऊन बसा अथवा झोपा. घोट्याचे स्नायू टॉवेलच्या गुंडाळी वर दाबा. दहा आकडे मोजा त्यानंतर दाब सोडून द्या. असे प्रत्येक पायासाठी दहा वेळा करा.
३. खुर्चीवर बसून जमिनीवर पाय टेकवा. पाय गुडघ्यातून सरळ करून जमिनीला समांतर आणा आणि परत खाली जमिनीवर टेकवा. असे दोन्ही पायांसाठी प्रत्येकी दहा वेळा करा.
४. जमिनीवर पालथे झोपा. पाय दुमडून गुडघात नव्वद अंशाच्या कोनात स्थिर करा. काही सेकंदा नंतर पाय पुन्हा सरळ करा. असे दोन्ही पायांसाठी प्रत्येकी दहा वेळा करा.
या सर्व एक्सरसाईजने गुडघेदुखीवर निश्चितपणे चांगला परिणाम होतो. गुडघेदुखीचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी होते.
चांगल्या पद्धतीने व्यायाम केल्याने गुडघ्याचे ऑपरेशन टळल्याची देखील उदाहरणे आहेत.
परंतु हे सर्व व्यायाम अर्थातच आपल्या शरीराची काळजी घेऊन आणि आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे. खूप जास्त त्रास होत असेल तरीही तसेच रेटून व्यायाम करू नयेत त्यामुळे जास्त हानी होऊ शकते.
तर मित्र-मैत्रिणींनो, ही आहेत गुडघेदुखीची काही कारणे आणि त्यावरचे सोपे उपाय. हे उपाय तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.
जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचावी म्हणून हा लेख शेअर करायला विसरू नका. स्वस्थ रहा आनंदी राहा.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
1 thought on “गुडघेदुखीची कारणे आणि त्यावरील उपाय.”