तुमच्या मनात असा विचार कधी येतो का की जगातील काही मोजकेच लोक अतिशय यशस्वी आणि श्रीमंत कसे काय असतात? असे काय वेगळेपण त्यांच्यात असते की ते इतरांपेक्षा जास्त यशस्वी आणि श्रीमंत होऊ शकतात?
नक्कीच असे काहीतरी त्यांच्यामध्ये असणार ज्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात. आज आपण श्रीमंत असणाऱ्या व्यक्तींच्या अशा ७ सवयी जाणून घेणार आहोत ज्या स्वीकारल्या तर सर्वसामान्य लोक देखील त्यांच्या इतकेच यशस्वी आणि श्रीमंत होऊ शकतात.
तुम्हाला असे वाटू शकेल की श्रीमंत लोकांच्या सवयी स्वीकारणे सोपे नसेल. परंतु खरेतर आपल्या विचारांमध्ये थोडी सकारात्मकता आणि जीवनशैली मध्ये थोडासा बदल करून आपण पण ह्या सवयी सहज स्वीकारू शकतो.
१. सकाळी लवकर उठणे अत्यंत आवश्यक आहे
जीवनात अतिशय यशस्वी आणि श्रीमंत असणारे सगळेच लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात लवकर करतात. त्यांच्या प्रमुख सवयीपैकी एक म्हणजे सकाळी लवकर उठणे. भारतातील आणि परदेशातील प्रमुख उद्योगपती, राष्ट्रप्रमुख आणि निरनिराळ्या सॉफ्टवेअर कंपन्यांचे प्रमुख या सर्वांनाच सकाळी लवकर उठण्याची सवय आहे. सकाळी लवकर उठले की काम करण्यासाठी जास्त तास मिळतात. सकाळच्या वेळी लक्ष इकडे तिकडे न जाता कॉन्सन्ट्रेशनने काम करता येते. मन एकाग्र असल्यामुळे काम जास्त चांगल्या प्रकारे आणि लवकर पूर्ण होऊ शकते. सकाळी लवकर संपूर्ण दिवसाचे प्लॅनिंग अधिक चांगल्या प्रकारे करता येते. आणि दिवस ठरवल्याप्रमाणे घालवुन सगळी कामे पूर्ण करता येतात.
२. समविचारी लोकांच्या सहवासात राहा
श्रीमंत आणि यशस्वी लोक नेहमीच त्यांच्या विचारांशी सहमत असणाऱ्या लोकांच्या सहवासात राहणे पसंत करतात. त्यांना पुढे जाण्यास, प्रगती करण्यास प्रेरित करणाऱ्या लोकांचीच ते संपर्क ठेवतात. आपले मित्र, सहकारी हे नेहमीच आपल्याला प्रोत्साहन देणारे असले पाहिजे. त्यांचे विचार आपल्या विचारांशी जुळत असले पाहिजे. त्यामुळे आपल्या कामात प्रगती करणे आपल्याला शक्य होते. चांगली संगत माणसाच्या आयुष्यात सकारात्मकता घेऊन येते. समविचारी आणि उत्साही लोकांच्या संगतीत राहिल्यामुळे काम करण्यासाठी नवीन ऊर्जा प्राप्त होते.
३. जवळच्या पैशाची योग्य गुंतवणूक करा
श्रीमंत लोक यांच्या जवळ असणाऱ्या पैशाकडे भावनात्मक दृष्टीने न पाहता केवळ गुंतवणूक म्हणून पाहतात. ते त्यांच्या जवळ असणारा पैसा योग्यरीतीने गुंतवून कसा वाढेल याचाच विचार करतात.
जवळचा पैसाअडका, संपत्ती कशाप्रकारे गुंतवली म्हणजे ती आणखी वाढेल असा ते विचार करतात. त्यांचे स्वतःच्या संपत्ती बद्दलचे विचार वेगळेच असतात. आपल्या व्यवसायामध्ये कशा प्रकारे वाढ करता येईल आणि त्यामुळे आपल्याकडील पैसा कसा वाढेल याचाच ते सतत विचार करत असतात. अशा पद्धतीचा विचार केल्यामुळेच माणूस अधिकाधिक श्रीमंत होऊ शकतो.
४. अपयशातून धडे घेऊन यश मिळवा
सर्वसामान्य लोक आलेल्या अपयशाने खचून जाऊन प्रयत्न करणे सोडून देतात. परंतु असे न करता आपल्याला अपयश का आले, आपले नक्की काय चुकले याचा विचार करून त्यातून झालेल्या चुका सुधारून यश मिळवणे हेच यशस्वी आणि श्रीमंत व्यक्तीचे लक्षण आहे. श्रीमंत लोक कोणतेही काम करताना त्यात कॅलक्युलेटेड रिस्क घेतात. त्यामुळे यश मिळण्याचे प्रमाण अधिक असते तसेच अपयश आले तरी ते पचवून पुढे जाण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. सर्वसामान्य लोक अशा प्रकारची रिस्क घेताना खचून जातात. परंतु असे खचून न जाता जे निर्धाराने पुढे वाटचाल करतात तेच श्रीमंत बनू शकतात. प्रत्येक एक श्रीमंत आणि यशस्वी व्यक्तीने आयुष्यात कधी ना कधी अपयशाचा आणि संकटाचा सामना केलेला असतो. त्यातून तावून सुलाखून बाहेर पडून ते स्वतःला सिद्ध करतात.
५. संपूर्ण डेडिकेशनने काम करा
युट्युबच्या सीईओ असणाऱ्या सुझॅन वोजसिक्स म्हणतात की ज्यांना जीवनात अतिशय यशस्वी व्हायचे असते त्यांना प्रचंड डेडिकेशनने काम करणे अतिशय आवश्यक आहे. संपूर्ण क्षमतेने परिश्रम आणि मेहनत केल्याशिवाय यश मिळू शकत नाही. श्रीमंत लोक त्यांचे संपूर्ण आयुष्य कामासाठी वाहून घेतात. इलॉन मस्क आठवड्याला ८० ते १०० तास काम करू शकतात. ते म्हणतात की प्रत्येक व्यावसायिकाने अशाच पद्धतीने काम केले पाहिजे. आपले १०० % प्रयत्न व्यवसायाला दिले तरच यशस्वी होता येते.
६. तात्काळ परिणामांची अपेक्षा न करता परिश्रम करत राहा
कोणत्याही व्यवसाय अथवा कामाची सुरुवात करताना ताबडतोब कधीही यश मिळत नाही. त्यासाठी कठोर मेहनत आणि परिश्रम करून यश मिळण्याची वाट पाहणे आवश्यक असते. श्रीमंत आणि यशस्वी लोक योग्य त्या कामात आणि योग्य लोकांवर गुंतवणूक करून यश मिळण्याची वाट पाहतात. ते कधीही परिणामांची घाई करत नाहीत. श्रीमंत लोक हे जाणून असतात की कोणतीही नवीन आयडिया, कल्पना यशस्वी आणि प्रसिद्ध होण्यासाठी काही काळ जाणे आवश्यक असते आणि त्यासाठी सुरुवातीला काही गुंतवणूक करणे आवश्यक असते. असे करताना ते मुळीच मागेपुढे पहात नाहीत. ताबडतोब यश मिळण्याची अपेक्षा न ठेवता ते योग्य ठिकाणी गुंतवणूक करत राहतात.
७. चतुर आणि बलवान बना
आपल्याला श्रीमंत व्हायचे असेल तर चतुराईने वागणे फार आवश्यक आहे. सतत स्वतःचा उत्कर्ष कसा होईल आणि इतरांवर आपल्याला कशी मात करता येईल याचा विचार श्रीमंत लोक करतात. त्यांचा मेंदू अतिशय तल्लख असून ते सतत परिस्थितीचे मूल्यमापन करून निर्णय घेत असतात. तसेच आजूबाजूच्या परिस्थितीवर मात करण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये असते. तितके बलवान ते बनलेले असतात. जर श्रीमंत बनायचे असेल तर कोल्हयासारखे चतुर आणि सिंहासारखे बलवान असणे आवश्यक आहे.
सर्वसामान्य माणसे सरधोपट मार्गाने आपली कामे करत राहतात परंतु श्रीमंत लोक मात्र चतुराईने आपले काम यशस्वी कसे होईल आणि आपण इतरांपेक्षा चांगल्या पद्धतीने ते कसे करू शकतो ह्याचा विचार करून वागतात.
तर या आहेत श्रीमंत लोकांच्या अशा ७ सवयी ज्या स्वीकारल्या तर सर्वसामान्य माणसे देखील खास बनू शकतात. अशा पद्धतीने वागल्यास सर्व सामान्य माणूस देखील श्रीमंत बनू शकतो. तर मित्र मैत्रिणींनो, आपणही आजपासून ह्या सवयी स्वीकारण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्या कामात यशस्वी होऊन श्रीमंत बनण्याकडे वाटचाल करूया.
श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला कोणते प्रयत्न करायला आवडतील हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, आपल्या मित्रांना टॅग करून त्यांच्यापर्यंत हा लेख पोहोचवायला विसरू नका.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.