यशस्वी माणसांच्या या दहा सवयी त्यांना असामान्य बनवतात!!

काही लोकांमध्ये चिकाटी ओतप्रोत भरलेली असते.

कितीही बिकट परिस्थिती आली तरी खचून न जाता ते आलेल्या संकटाशी दोन हात करून त्यातून नुसतेच बाहेर पडत नाहीत तर त्यातून काहीतरी चांगलं करून, स्वतःला सिद्ध करून बाहेर पडतात.

अशा लोकांच्या नेमक्या काय सवयी असतात? वाचा या लेखात.

आयुष्यात नेहमी बिकट परिस्थितीवर मात करून त्यातून बाहेर पडून स्वतःला वारंवार सिद्ध करणारी काही लोकं असतात.

अपयशामुळे निराश न होता ही लोकं सतत प्रयत्न करत राहतात आणि करतील त्या कामात यश प्राप्त करतात.

या लोकांच्या अशा काही सवयी असतात ज्यामुळे त्यांच्या सगळ्याच प्रयत्नांना यश मिळतं.

आणि ते जे काही म्हणून करायला घेतील त्यात यशस्वीच होतात.

वरवर बघता बऱ्याचदा त्यांच्या या सवयींची कल्पना येत नाही.

बहुतेकवेळा तर त्यांचं नशीबच चांगलं असेल असं सुद्धा काहींना वाटतं पण मित्रांनो, असं अजिबात नसतं.

आपल्या प्रत्येक कामात यशस्वी होणाऱ्या लोकांच्या काही सवयी असतात, काही नैसर्गिक असतील काही त्यांनी लावून घेतलेल्या सुद्धा असतील.

पण या शिस्तीमुळेच त्यांना ते करतील त्या कामात यश मिळतं.

आज या लेखात आपण या यशस्वी माणसांच्या सवयी कोणत्या आहेत तेच जाणून घेणार आहोत.

१. ही माणसं सगळी कामं वेळेत करतात

वेळच्या वेळी सगळी कामं करण्याकडे यांचा कल असतो.

एखादं काम करायचं असेल तर ते आजचं उद्यावर, उद्याचं परवावर असं ढकलत न बसता त्या त्या वेळी करून टाकतात.

जरी ते काम पुढे ढकलण्यासारखं असेल, ते न केल्याने फार काही पडणार असेल तरी ही लोकं तसं करत नाहीत.

आज करायलाच हवं का? उद्या केलं तर नाही का चालणार?

असे प्रश्न त्यांच्या मनात येत नाहीत. जी कामं समोर असतील ती वेळेत करणं एवढंच त्यांना माहीत असतं.

जरी एखाद्या कामात त्यांना काही अडचण आली तरी त्यासाठी योग्य तो वेळ देऊन आणि गरज पडल्यास योग्य ती मदत घेऊन ते काम पार पाडतात.

आजचं काम आज केल्याने उद्यासाठी आपल्याकडे जास्त वेळ मिळतो आणि त्यामुळे आपली प्रॉडक्टिव्हिटी वाढते.

हे सूत्र त्यांच्या ध्यानी-मनी पक्क झालेलं असतं…

२. त्यांची विचारसरणी सकारात्मक असते

त्यांना सकारात्मक विचार करण्यासाठी फार कष्ट लागत नाहीत.

असलेल्या परिस्थितीत कितीही संकटं असूदेत, मार्गात कितीही अडथळे असूदेत त्यांना कायम त्यात काहीतरी सकारात्मक गवसतंच.

आणि त्यातूनच त्यांना पुढे जायची प्रेरणा मिळते.

कोणत्याही संकटात किंवा अडचणीत आपण कितीही रुतत जात असलो तरी त्यात चांगलं असं काहीतरी असतंच, ज्यामुळे आपण त्या संकटावर मात करू शकतो.

यशस्वी लोकं फक्त या चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतात आणि त्यावर काम करतात त्यामुळे समोर असलेल्या संकटावर ते अगदी सहज मात करू शकतात.

३. त्यांना दूरदृष्टी असते

कोणताही यशस्वी माणूस फक्त उद्यापुरतं नियोजन कधीच करत नाही.

त्यांच्या नियोजनात कायम पुढच्या किमान दहा वर्षांचा विचार असतो.

यामुळे आपल्या आजूबाजूला होत असलेल्या बदलांची त्यांना आधीच कल्पना असते, त्यांच्या तल्लख बुद्धीने हे बदल आधीच ओळखलेले असतात.

आणि त्यानुसार त्यांनी नियोजन केलंलं असतं.

आज एक प्लॅन तर उद्या दुसरा असं ते करत नाहीत.

वेळ गेला तरी चालेल पण कामात त्यांना असा हलगर्जीपणा खपत नाही.

योग्य वेळी, सगळा विचार करून ते कामाची आखणी करतात त्यामुळे त्यांचं नियोजन फसत नाही.

आणि त्यात सारखे बदल करायला लागून वेळ सुद्धा फुकट जात नाही.

४. व्यवस्थित नियोजनाबाबत ते आग्रही असतात

कोणतही काम करताना त्यांना नियोजन महत्वाचं वाटतं.

नवीन काम करायच्या आधी त्याबद्दल नीट माहिती मिळवून, त्यातून त्यांना किती फायदा होणार आहे, त्यासाठी त्यांना किती वेळ, पैसे आणि शक्ती खर्च करावी लागणार आहे, याचं ते नीट नियोजन करतात.

त्यातून एखादं काम करायचं का नाही हे त्यांना ठरवता येतं.

जर एखाद्या कामासाठी लागणारा वेळ आणि पैसा जास्त असेल आणि त्या मानाने त्यातून मिळणार नफा किंवा त्यांना अपेक्षित असलेलं समाधान कमी असेल तर अशा कामांसाठी त्यांना आपला वेळ घालवायचा नसतो.

एखादं काम हातात घेऊन नंतर सोडून देण्यापेक्षा ते काम हातात घ्यायच्या आधीच त्यातून त्यांना काय मिळणार आहे.

आणि त्यासाठी त्यांना काय खर्च करायला लागणार आहे याचा हिशोब मांडतात आणि आपला वेळ वाचवतात.

५. त्यांना पसारा आवडत नाही

घर असुदे किंवा डोकं.. यशस्वी माणसांना पसारा कुठेच खपत नाही.

मनात विचारांचं जाळं असेल तर लक्ष केंद्रित करायला अवघड जातं त्यामुळे कामं मनासारखी आणि वेळच्या वेळी होत नाहीत.

म्हणून खूप गोष्टींचा एकत्र विचार ते करत नाहीत तसंच एखाद्या गोष्टीचा अति विचार करून मनात विचारांची गर्दी सुद्धा करत नाहीत.

यशस्वी लोकांची कामाची जागा सुद्धा नीट आवरलेली असते. आजूबाजूला पसारा असेल तर लक्ष विचलित होतं.

आणि त्याचा आपल्या प्रॉडक्टिव्हिटीवर परिणाम होतो.

हेच जर आपण एखाद्या साफ, व्यवस्थित आवरलेल्या जागेत काम करत असू तर आपल्याला प्रसन्न वाटतं आणि आपली प्रॉडक्टिव्हिटी वाढते.

म्हणूनच यशस्वी लोकांच्या काम करण्याच्या पद्धतीत एक शिस्त असते.

शिवाय घेतलेली गोष्ट जागेवर ठेवली की ती परत शोधायला सुद्धा सोपी जाते ज्यामुळे वेळ वाचतो.

६. ते कोणत्याच बदलाला घाबरत नाहीत

आयुष्यात चढउतार असतातच. कोणाचंच आयुष्य एका लयीत व्यतीत होत नसतं.

बदल हे सगळ्यांच्याच आयुष्यात होत असतात, काही हवेहवेसे तर काही अगदी विनाकारण.

पण हे बदल अपिरिहार्य असतात. अशा बदलांचा स्वीकार केला नाही तर त्रास आपल्यालाच होणार असतो.

परिस्थिती एकसारखी राहू शकत नाही आणि त्यामुळे आपण ही आपल्याच जुन्या कल्पनांमध्ये अडकून पडता कामा नये.

त्यात आपलंच नुकसान असतं याची यशस्वी लोकांना जाणीव असते.

म्हणूनच ते बदलेल्या काळाचा आणि परिस्थितीचा मोकळ्या मनाने स्वीकार करून त्यानुसार त्यांच्या कामाच्या पद्धतीत बदल करतात.

काही वेळा त्यांच्या जुन्या सवयी आणि जुन्या पद्धती सोडून काळानुसार नवीन सवयी लावून घेतात आणि नवीन पद्धतींचं स्वागत करून कामाची पद्धत सुद्धा बदलतात.

७. ते सतत स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करतात

आपण आपल्या कामात कितीही चांगले असलो तरी परिपूर्ण असू शकत नाही. हे यशस्वी लोकांना माहीत असतं.

नवीन गोष्टी शिकून त्या आचरणात आणायला त्यांची कधीच ना नसते.

उलट सतत नवीन गोष्टी शिकून त्यांना स्वतःमध्ये सुधारणा करायची इच्छा असते.

आणि तशी ते करतात सुद्धा. कोणाची त्यासाठी मदत मागायला, कोणाचा सल्ला ऐकण्यात त्यांना अजिबात कमीपणा वाटत नाही.

उलट येणाऱ्या प्रत्येक संकटातून आणि भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून ते काय शिकता येईल हे बघून त्यानुसार स्वतःमध्ये सुधारणा करत असतात.

८. त्यांची स्पर्धा स्वतःशीच असते

आपल्यापेक्षा कोण यशस्वी आहे, आपल्या पुढे कोण आहे.

किंवा आपण कोणाला मागे टाकलं आहे असा विचार करण्यात ते वेळ वाया घालवत नाहीत.

कोणी किती प्रगती केली किंवा कोणाची किती अधोगती झाली याच्यात त्यांना रस नसतो.

या पेक्षा त्यांचं लक्ष त्यांच्या स्वतःच्या प्रगतीवर असतं.

कालच्यापेक्षा आज आपल्या कामात सुधारणा आहे का? मागच्या वर्षीपेक्षा आता आपली परिस्थिती सुधारली आहे का?

असा विचार करत ते स्वतःमध्ये बदल घडवून आणत असतात.

इतरांशी तुलना करण्यापेक्षा त्यांना स्वतःमध्ये बदल घडवून, स्वतःला कालच्या पेक्षा आज सक्षम करणं महत्वाचं वाटतं.

९. ते नेहमी दुसऱ्याला मदत करतात

यशस्वी माणसं आत्मकेंद्रित असतात किंवा त्यांना ज्यात त्यात फक्त स्वतःचाच फायदा दिसतो असं अनेकांना वाटत असतं पण ते चूक आहे.

उलट आपल्या आयुष्यात यशस्वी असणारी माणसं नेहमी इतरांना मदत करण्यासाठी पुढे असतात.

यामुळेच त्यांचा संबंध अनेक लोकांशी येऊन त्यांच्याबरोबर त्यांचं नातं जुळतं आणि अडीअडचणीच्या वेळेस ते एकमेकांच्या कमी येतात.

यशस्वी माणसं दुसऱ्याचा पाय खेचून कधीच वर जायला बघत नाही, उलट ते इतर लोकांना सुद्धा हात धरून आपल्या बरोबर नेतात.

म्हणूनच त्यांच्याबद्दल सगळ्यांना आदर वाटतो.

१०.  ते नेहमी उत्साही असतात

कोणत्याही कामाचा कंटाळा या लोकांना नसतो.

आपल्या कामात ते उत्साही असतातच पण त्याचबरोबर चार नवीन गोष्टी शिकण्यात, नवीन माहिती मिळवण्यात आणि त्याचा आपल्याला नेमका काय उपयोग आहे याचा विचार करण्याचा उत्साह त्यांच्यात ओतप्रोत भरलेला असतो.

मरगळ, कंटाळा हे शब्द त्यांच्या गावीही नसतात.

यामुळे त्यांच्याकडून एखादं काम झालं नाही असं होत नाही.

उत्साही वातावरणामुळे ते चार माणसं सुद्धा जोडतात ज्यामुळे परत त्यांचाच फायदा होतो.

मनात उत्साह असेल तर आपोआप प्रॉडक्टिव्हिटी सुद्धा वाढते.

मित्रांनो, या सगळ्या सवयी काही एका दिवसात लावून घेणं शक्य नाही पण प्रयत्न करून आपण आपल्यात योग्य ते बदल करून, काही जुन्या सवयी सोडून द्यायची तयारी दाखवून या नवीन सवयी लावून घेऊ शकतो.

यामुळे आपली काम करायची पद्धत सुधारेल, आपल्याला कामात उत्साह वाटेल, आपलं मन फ्रेश राहील आपले नातेसंबंध सुधारतील…

थोडक्यात आपण आपल्या आयुष्याच्या प्रत्येक कसोटीत यशस्वी होऊ.. आपल्याला हेच तर हवं आहे ना?

चला तर मग, लवकर कामाला लागा आणि या नवीन सवयी लावून घ्यायचा प्रयत्न करा..

आणि हो, दुसऱ्यांना मदत करायचा मुद्दा लक्षात आहे ना? मग हा लेख शेयर करून लगेचच सुरुवात करा!

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “यशस्वी माणसांच्या या दहा सवयी त्यांना असामान्य बनवतात!!”

  1. यशस्वी माणसांच्या या दहा सवयी त्यांना असामान्य बनवतात!!
    अतिशय उपयुक्त व महत्वाची माहिती आहे ज्यांना स्वतःला बदलायचं आहे, प्रगती करायची आहे, यशस्वी व्हायचं आहे त्याच्या साठी.
    मनाचे talks चा खूप चांगला उपक्रम राबवत आहे त्याबद्दल त्यांचे व फेसबुक टीम चे मनापासून आभार.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।