मित्रांनो, असं कधी झालंय का? कि एखादी गोष्ट तुमच्याच्याने कधीही होणार नाही… हे तुम्ही अगदी मनाशी पक्क केलेलं असतं…
होत असेल ना असं… मग हि छोटीशी गोष्ट तुमच्यासाठी!!
एकदा एका गावात एक सर्कस आली. अर्थातच सर्कशीचा मोठा तंबू होता. तिथे वेगवेगळे प्राणी, त्यांची काळजी घेणारे लोक, सर्कशीत काम करणारे लोक, विदूषक अशी सगळी खूप गर्दी होती.
अनेक लहान मुले कुतुहलाने तो तंबू, प्राणी देखील पाहायला जात होते. त्यातच त्यांच्याबरोबर एक माणुसही गेला होता.
त्या माणसाने पाहिले की सगळीकडे इतकी गर्दी, इतका माणसांचा वावर आहे. परंतु तिथे असणारे महाकाय हत्ती मात्र साध्या जाड दोरीने बांधले आहेत.
ती दोरी देखील त्यांच्या केवळ एका पायात बांधली आहे. त्यांना ना साखळीने बांधले, ना पिंजऱ्यात ठेवले आहे.
त्या माणसाला आश्चर्य वाटले. इतका महाकाय प्राणी, त्याचे वजन सहज १०००, २००० किलो असते. त्याला काय ती दोरी तोडणे शक्य नाही, पण एकही हत्ती तसे करत नव्हता.
सगळे शांतपणे जागच्याजागी झुलत होते. सहज शक्य असूनही एकानेही ती दोरी तोडून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला नाही.
हे असे का होत असेल हा विचार काही त्या माणसाला स्वस्थ बसू देईना. शेवटी त्याने ठरवले की ह्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचाच.
तो त्या हत्तींच्या माहुताकडे गेला. त्याने माहुताला विचारले की सहज शक्य असूनही हे हत्ती ही दोरी का तोडत नाहीत?
त्यावर माहुताने जे उत्तर दिले ते विचार करायला लावणारे आहे. माहूत म्हणाला,”मी ह्या हत्तींना लहानपणापासून सांभाळले आहे. ते अगदी लहान असल्यापासून आता मोठे होईपर्यंत आम्ही त्यांना ह्याच मापाच्या दोऱ्यांनी बांधतो. तेव्हा लहान असल्यामुळे हत्ती ह्या दोऱ्या तोडू शकत नव्हते. आणि मोठे होत असताना त्यांच्या मनाची अशी समजूत होत जाते की ही दोरी तोडणे त्यांना शक्य नाही. मग मोठे झाल्यावर ते तसा प्रयत्नदेखील करत नाहीत. त्यांच्या वाढलेल्या शक्तीचा त्यांना अंदाज येत नाही. आपण हे करूच शकणार नाही असेच त्यांना वाटत असते.”
माहुताकडून हे ऐकल्यावर तो माणूस विचारात पडला. इतका शक्तिशाली प्राणी. मोठमोठे ओंडके उचलू शकणारा, प्रसंगी मोठमोठी झाडे मुळासकट उपटून फेकणारा पण तो एवढ्याश्या दोरीला घाबरतो.
का, तर त्याच्या मनावर लहानपणापासून तसं बिंबवलं गेलेलं असतं. आपण मोठे होत असताना आपली शक्तीदेखील वाढते आहे ह्याची त्यांना कल्पनाच नसते, म्हणून मग दोरी तोडण्याचा प्रयत्न करणे ते सोडूनच देतात.
तर अशी ही हत्तींची गोष्ट. ह्यातले हत्ती हे ‘लर्नेड हेल्पलेसनेस’ म्हणजेच ‘जाणूनबुजून मनावर बिंबवलेली असहायता’ ह्याची शिकार झाले आहेत.
असे माणसांच्या बाबतीतही घडते. वारंवार एका विविक्षित परिस्थितीचा सामना करावा लागला की आता ही परिस्थिती कधीच बदलू शकणार नाही अशी एक प्रकारची हतबलता माणसात येते.
त्यालाच मानसशास्त्रीय भाषेत ‘लर्नेड हेल्पलेसनेस’ असे म्हणतात. मग ह्या गोष्टीतल्या हत्तींप्रमाणेच माणसालाही आपल्या बदललेल्या शक्तीचा, आजूबाजूच्या सुधारलेल्या परिस्थितीचा अंदाज येत नाही आणि माणूस निराश, हतबल होऊन प्रयत्न करणे सोडून देतो.
मित्रांनो, आपणही आपल्या रोजच्या आयुष्यात अशा अनेक प्रसंगांना सामोरे जात असतो. कितीतरी गोष्टींची भीती आपण मनात बाळगलेली असते.
जसे की गर्दीत जाण्याची भीती, रस्ता क्रॉस करण्याची भीती, पाण्यात पोहण्याची भीती, एकट्याने बँक किंवा तत्सम आर्थिक व्यवहार करण्याची भीती.
यादी करायला गेलो तर संपणारच नाही. आपण अशी भीती उराशी धरून बसतो.
पण ती भीती जावी म्हणून काही प्रयत्न मात्र करत नाही. एकदा जमले नाही तर पुन्हा करून पाहणे टाळतो. काही छोट्या छोट्या गैरसमजुतींमुळे आपला आपल्या क्षमतांवर विश्वास उरत नाही.
कधी कोणी सांगितले म्हणून, कधी सतत अपयश आले म्हणून आपल्याला एखादे काम जमणारच नाही अशी आपण आपली समजूत करून घेतो.
एकदा का आपल्याला हे जमणार नाही अशी आपल्या मनाची समजूत झाली की सहज शक्य असणाऱ्या गोष्टी देखील आपल्याला जमणार नाहीत, अगदी ह्या गोष्टीतल्या हत्तींसारख्या.
तेव्हा मित्रांनो, अशी वेळ स्वतःवर येऊ देऊ नका. आत्मविश्वासाने आलेल्या प्रत्येक संकटाला, परिस्थितीला सामोरे जा. ‘लर्नेड हेल्पलेसनेस’ वर मात करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
लर्नेड हेल्पलेसनेस वर मात करा हे सांगण्यासाठी हत्तीचे गोष्टी चे उदहारण देऊन खुप सुरेख पद्धतीने आपणही आपल्या मनावर कधी स्वतः तर कधी वडीलधाऱ्या मंडळींकडून, शिक्षका जवळून, मित्र, नातेवाईक अशा अनेकांकडून आपल्या मनावर काही समजुती लहानपणापासून बिंबवल्या आहेत त्यामुळे कधी कधी एखाद्या कामाची भीती वाटत राहते, दडपण येतं अशा प्रसंगांना भविष्यात सामना करताना आपल्या या लेखाचा खुप फायदा होईल.
मनाचे talks टीम चे मनापासून धन्यवाद. व अशा अनेक नव नविन उपक्रमाला मनापासून खुप खुप शुभेच्छा