हसणे ही एक अशी क्रिया आहे जी दोन अनोळखी लोकांना सुद्धा चटकन एकत्र आणू शकते.
रस्त्यावरून चालताना एखाद्या अनोळखी व्यक्तीकडे बघून आपण साधे गालातल्या गालात जरी हसलो तरी त्या साध्या हसण्यामुळे आपला व त्या अनोळखी व्यक्तीचा ही अख्खा दिवस चांगला जातो.
यावरूनच हसण्यात किती ताकद आहे हे लक्षात येते.
दिवसाची सुरुवात सुद्धा छान, स्वतःकडे आरशात हसून बघून केली तर दिवस पूर्ण छान जातो, आपला आत्मविश्वास वाढतो आणि दिवसभर चेहऱ्यावर हसू राहते.
ज्यामुळे आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे बघून छान वाटते.
प्रसन्न, हसऱ्या चेहऱ्याच्या माणसांचा सहवास सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो.
एखाद्या विनोदावर मनापसून खळखळून हसणारी व्यक्ती सगळ्यांच्या लक्षात राहते.
तसेच आपल्या विनोदबुद्धीने इतरांना हसवणारी व्यक्ती सुद्धा सगळ्यांची लाडकी असते.
दिवसभराची आपापली सगळी कामे करून सुद्धा संध्याकाळी हसऱ्या चेहऱ्याने एकत्र जेवायला बसणारे कुटुंब सुखी असते.
इतकेच काय हसणे ही अशी क्रिया आहे जी फक्त डोळ्यांने सुद्धा केली जाऊ शकते, ते ओळखायची दृष्टी मात्र हवी.
एखादा सुह्रद आपल्याला शुभेच्छा देताना सुद्धा ‘नेहमी हसत राहा’ असेच सांगतो.
म्हणजेच लोकांना जसे स्वतः हसरे राहायला आवडते तसेच इतरांनाही हसरे बघायला आवडते.
या सगळ्या उदाहरणांमध्ये आपल्या आयुष्यातले हसण्याचे महत्व अधोरेखित होते.
आपल्या आजूबाजूच्या हसऱ्या लोकांचा आपल्यावर इतका परिणाम होतो तर या हसण्याचे आपल्या आरोग्यासाठी किती फायदे आहेत याचा विचार केला आहे का?
आजकालच्या बिझी आयुष्यात मात्र आपण हे सहज, सोपे हसणे काही प्रमाणात विसरलो आहोत.
पण कितीही त्रास असला तरी आपण हसणे विसरता कामा नये.
कारण हसण्यामुळे आपले टेंशन, स्ट्रेस कमी होतो आणि आपले आरोग्य सुधारते.. कसे?
तुम्ही सुद्धा हे वाचायला उत्सुक असालच, त्यामुळे पुढे जाण्याआधी चेहऱ्यावर एक छानसे स्माईल आणा आणि हे फायदे जाणून घ्या.
१. हसण्यामुळे आपला स्ट्रेस कमी होतो
आपल्या शरीरातल्या काही हार्मोन्समुळे आपल्याला टेन्शन, स्ट्रेस येतो तर काही हार्मोन्समुळे आपल्याला आनंदी वाटते.
कॉर्टिसॉल, एपिनेफ्रिन, डोपामाईन हे आपल्या शरीरात असलेले स्ट्रेस हार्मोन्स आहेत.
तर एंडोर्फिन्स या हार्मोन्समुळे आपल्याला आनंदी वाटते.
मित्रांनो, हसण्याचा असा एक महत्वाचा फायदा आहे की त्यामुळे आपल्या शरीरातल्या या स्ट्रेस हार्मोन्सचे प्रमाण कमी होते व एंडोर्फिन्सचे प्रमाण वाढते.
म्हणजेच हसण्यामुळे आपला स्ट्रेस, टेन्शन कमी होण्यासाठी मदत होते.
तुम्ही सुद्धा याचा अनुभव घेतला असलेच. एखाद्या खूप बिझी दिवसानंतर, मित्रांना भेटून, गप्पा गोष्टी करताना खळखळून हसणे झाले की मनावरचा सगळा ताण उतरल्यासारखा वाटतो आणि मन एकदम हलके वाटते, हो ना?
२. अवयवांसाठी उत्तम व्यायाम
आपले हात पाय हलवून आपण आपल्या अवयवांना व्यायाम देऊ शकतो. पण आपल्या पोटांच्या स्नायूंना, बारगड्यांना, खांद्यांना व्यायाम कसा द्यायचा?
सोपे आहे! हसून!
‘पोट धरून हसणे’ हा वाक्यप्रचार आपण वापरतो तो किती खरा आहे हे तुमच्या लक्षात येईल.
खूप जोरात, मनापसून हसल्यावर आपल्या पोटातल्या स्नायूंना, बारगड्यांना व्यायाम मिळतो.
हसण्यानंतर हे स्नायू मोकळे होतात. जोरजोरात, मनापासून हसणे हा आपल्या ह्रदयासाठी सुद्धा महत्वाचा आणि उपयोगी असा व्यायाम आहे.
३. आपले प्रॉब्लेम्स नाहीसे होतात
मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या घोळक्यात बसून, गप्पा मारत, हसल्याने आपल्या मनात असलेले नकारात्मक विचार आणि टेन्शन नाहीसे होतात.
यामुळे मनावरचे ओझे खूप प्रमाणात हलके होते.
आपल्या समस्यांवरून आपले लक्ष थोडा वेळासाठी का होईना विचलित होते.
आणि यामुळे मन एकदम ताजेतवाने होऊ शकते.
हसण्याने काही आपल्या समस्या सुटणार नसतात किंवा आपले प्रॉब्लेम्स एकाएकी नाहीसे होणार नसतात.
आपल्या समस्या आपल्यालाच सोडवाव्या लागणार आणि प्रॉब्लेम्स सुद्धा आपल्यालाच निस्तरावे लागणार असतात.
पण हसण्याने आपले मन शांत होते आणि या शांत मनामुळेच आपल्या आयुष्यात जी काही समस्या असेल, त्यावर शांतपणे विचार करून तोडगा काढायला सोपे जाते.
४. दृष्टिकोन बदलतो
हसण्यामुळे एखाद्या संकटाकडे बघायचा आपला दृष्टिकोन बदलतो.
म्हणजेच आपण हसरे असू तर आपोआप आपला मूड चांगला होतो त्यामळे एखादी अवघड वाटणारी, कठीण गोष्ट असलीच तर त्याच्याकडे संकट म्हणून न बघता आपण एखादे चॅलेंज म्हणून बघू शकतो.
एखाद्या अवघड गोष्टीला घाबरून न जाता तिला सामोरे जायचे बळ आपल्याला मिळते.
हेच दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, आपण थोडक्यात असे म्हणून शकतो की हसण्यामुळे आपण काहीसे आशावादी होतो आणि यामुळे एखादी खरंच अवघड असणारी गोष्ट सुद्धा लिलया पार पडतो.
५. सामाजिक जीवन सुधारते
हसऱ्या चेहऱ्याची, हसणारी माणसे सगळ्यांची लाडकी असतात.
आपण जर हसरे असू तर अनेक माणसे जोडण्यात यशस्वी होतो.
लोकांचा गोतावळा जमवला की साहजिकच एकटेपणा जाणवत नाही.
लोकांना हसवून, त्यांच्याबरोबर चार विरंगुळ्याचे क्षण घालवले तर आपल्याला ही छान वाटते.
आपल्या हसऱ्या चेहऱ्याने आपण कोणा एका माणसाच्या मनावरचा ताण हलका केला या भावनेने आपल्याला देखील हलके वाटते.
आणि आपल्या मनावर जर काही ताण असेलच तर तो सुद्धा हलका होतो.
अनेकांना आपला सहवास हवाहवासा वाटणे ही सुद्धा एक अत्यंत सुखद भावना सगळ्या हसऱ्या लोकांना अनुभवायला मिळते.
हे झाले हसण्याचे फायदे.
पण आपण आपल्या आयुष्यात अधिकाधिक हसरे होण्यासाठी काय काय उपाय करू शकतो?
कोणते कोणते प्रसंग आपल्याला हसवू शकतात तेच आता आपण बघणार आहोत.
१. मित्रांबरोबर वेळ घालवा
मित्रमैत्रिणींचा ग्रुप जमला की सगळ्यात महत्वाची गोष्ट जी घडते, ती म्हणजे हसणे आणि हसवणे.
कितीही व्यस्त आयुष्य असले तरी मित्रमैत्रिणींना आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून दोनदा भेटलेच पाहिजे.
जुन्या गमतीजमती आठवून हसणे, एकमेकांची चेष्टा मस्करी करणे हे आपले आयुष्य स्ट्रेस फ्री ठेवायला फार गरजेचे असते.
२. कॉमेडी सिनेमे बघा हसवणारी पुस्तके वाचा
हसण्याचे आणि हसवण्याचे अनेक मार्ग असतात. आपण फक्त ते शोधले पाहिजेत.
आपल्याला कंटाळा आलेला असताना एखादा हलका, कॉमेडी सिनेमा बघून हसल्याने मूड एकदम बदलतो.
याचप्रमाणे वाचन करताना सुद्धा एखादे गमतीशीर पुस्तक निवडले तर आपली हसून हसून पुरेवाट होऊ शकते.
३. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला
आयुष्यात त्रास कोणालाच चुकले नाहीत. त्यामुळे त्रासाबद्दल रडत बसण्यात काहीच हशील होत नाही.
उलट त्यामुळे त्रासात भरच पडते. त्यामुळे नेहमी चेहऱ्यावर हसू ठेऊन आयुष्यातल्या प्रत्येक समस्येला तोंड दिले तर ती समस्या सुद्धा पटकन निस्तरता येते.
आणि आपण हसरे राहून, स्ट्रेस कमीतकमी करून आपले आरोग्य सुद्धा नकळत सुधारत असतो.
हसण्याचे महत्व तुम्हाला पटलेच असेल पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की साधारण मध्यमवयीन माणूस दिवसाला फक्त १५ वेळा हसतो.
पण एखादे लहान बाळ दिवसाला जवळजवळ ४०० वेळा हसू शकतो..
म्हणजेच आपल्यामध्ये हसायची तेवढी क्षमता असते पण मानसिकता नसते.
म्हणूनच या नैसर्गिक क्षमतेचा आपण जास्तीतजास्त वापर करून आपल्या आरोग्याला त्याचा फायदा करून घेतला पाहिजे..
मग आजपासून घेताय ना वसा हसण्याचा आणि हसवण्याचा?
तर मग हा लेख तुमच्या प्रिजनांना शेयर करून सुरुवात करायला हरकत नाही, हो ना?
तर मग, आता काय बघा करायचं…
हा लेख आपल्या जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करायचा… आणि एक ऑनलाइन मिट-अप ठेवायची हसण्याची आणि हसवण्याची….
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Very very nice subject Thank you so mach…..
Very
nice subject Thank you