वांगी खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

भारतीय आहारात भाज्यांचं स्थान फार महत्वाचं असतं.

आपल्या रोजच्या जेवणात कोणत्या ना कोणत्या प्रकारची भाजी असावीच लागते आणि ती असतेच.

भाजीशिवाय आपलं जेवण पूर्ण होत नाही. आपल्याकडे तर सगळ्या सणांच्या दिवशी एक भाजी करून भागत नाही, सुकी भाजी, रस्सा भाजी किंवा उसळ, पातळ भाजी अशा दोन तीन प्रकारच्या भाज्या पानात वाढल्या जातात.

काही सणांची तर ठरलेली भाजी सुद्धा असते. वर्षभरात सगळ्या भाज्या खाल्ल्या जाव्यात हे त्यामागचं कारण असावं.

आपल्या महाराष्ट्रात एक भाजी जास्त वापरली जाते ती म्हणजे वांग्याची भाजी.

महाराष्ट्रात तर अनेक भागात लग्नाचा जेवणाचा बेत वांग्याच्या भाजीशिवाय पूर्णच होत नाही.

वांग्याची भाजी करायची पद्धत सुद्धा महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागात वेगवेगळी आहे.

काहीजणांना तर चुलीवर केलेली वांग्याची भाजी आणि भाकरी म्हणजे एकदम फक्कड बेत वाटतो.

काही मोजकी माणसं वगळता वांग्याची भाजी सगळ्यांना आवडते.

आज आपण ह्याच वांग्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

ज्यामुळे वांगी जेवणात का असावीत हे आपल्याला समजेल.

चला तर मग वांगी खाल्यामुळे होणारे फायदे आता आपण जाणून घेऊया .

१. कॅन्सरपासून बचाव होतो

आश्चर्यचकित होऊ नका! आपल्या रोजच्या जेवणात साधी वांग्याची भाजी किंवा भरीत खाल्यामुळे आपण कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारापासून वाचू शकतो.

वांग्यात फायबर आणि अँटीऑक्सिडंट हे जास्त प्रमाणात आढळतात.

हे दोन असे घटक असतात ज्यामुळे आपण कॅन्सर पासून दूर राहू शकतो.

आपल्या पोटात पचन झाल्यावर अनेक विषारी घटक शिल्लक राहतात.

हे विषारी घटक जर तसेच आपल्या पोटात राहिले तर त्यामुळे आतड्याचा कॅन्सर, पोटाचा कॅन्सर होऊ शकतो. फायबर हे आपल्या आतड्यात असणारे सगळे विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते.

अँटीऑक्सिडंट हे शरीराच्या पेशींची झीज थांबवण्याचे काम करतात.

तसेच ते कॅन्सरच्या पेशींशी लढा देण्याचे सुद्धा काम करतात. वांग्यातल्या या दोन घटकांमुळे आपण कॅन्सर पासून लांब राहू शकतो.

२. वांग वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे

वांग्याच्या सेवनामुळे आपले वजन कमी राहण्यास मदत होते.

वांग्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण अत्यल्प असते. साधारण १०० ग्रॅम वांग्यात फक्त २५ कॅलरीज असतात.

हे प्रमाण इतर पदार्थांपेक्षा फारच कमी आहे. त्यामुळे जर तुम्हाला वांग्याची भाजी किंवा भरीत आवडत असेल तर ते हवं तेवढं खाताना वजन वाढण्याची चिंता करायची गरज नाही.

तसेच वांग्यात असणाऱ्या फायबरमुळे आपल्याला पोट भरल्याची भावना लगेच होते.

त्यामुळे आपोआप जेवण कमी जाऊन वजन कमी होण्यास अजूनच मदत होते.

३. हदयविकाराचा धोका टळतो

बाकी अनेक भाज्यांप्रमाणेच वांग सुद्धा आपल्याला हदयविकारापासून दूर ठेवते.

वांग्यात फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी -6 जास्त प्रमाणात आढळतात.

हे घटक आपल्याला हदयविकारापासून दूर ठेवतात.

त्याचबरोबर वांग्यात जास्त प्रमाणात आढळणाऱ्या अँटीऑक्सिडन्ट मुळे आपल्या हदयाच्या रक्तवाहिन्या साफ राहतात. त्यामुळे हदयविकाराचा धोका कमी होतो.

४. उच्चरक्तदाबापासून दूर ठेवते

वांग्यात असणाऱ्या पोषणघटकांमध्ये एक महत्वाचा घटक आहे पोटॅशियम.

पोटॅशियम हे आपल्या शरीराचा समतोल राखण्यासाठी आवश्यक मूलद्रव्य आहे.

शरीरात सोडियम आणि पोटॅशियमचा समतोल असणे फार गरजेचे असतं.

मिठामुळे आपल्या रोजच्या आहारात सोडियम पुरेशा प्रमाणात जाते.

पण पोटॅशियम मात्र जास्त प्रमाणात जात नाही. यामुळे शरीराचा समतोल बिघडतो आणि उच्चरक्तदाबाचा धोका संभवतो.

त्यामुळे आहारात वांग्याचा समावेश करणं गरजेचं आहे. वांग्यातून शरीरात आवश्यक असणारे पोटॅशिअम जाते आणि आपण उच्चरक्तदाबापासून दूर राहू शकतो.

५. मधुमेहग्रस्त लोकांसाठी उपयुक्त 

वांग्यात कार्बोहायड्रेट्स कमी प्रमाणात असून आणि फायबर जास्त प्रमाणात आढळतात त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वांग्याच्या सेवनामुळे वाढत नाही.

मधुमेहग्रस्त रुग्ण सुद्धा वांग्याचं सेवन नियमित करू शकतात.

वांग्यात जास्त प्रमाणात असणारे फायबर अन्नातील ग्लुकोजच्या रक्तात शोषण होण्यावर नियंत्रण ठेवते.

आणि त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.

मधुमेहग्रस्त रुग्णांना त्यामुळे वांग्याच्या रूपाने जेवणासाठी एक पौष्टिक आणि रुचकर भाजीचा पर्याय उपलब्ध होतो.

तसेच सामान्य लोकांना सुद्धा वांग्याच्या नियमित सेवनामुळे मधुमेह होण्याचा धोका कमी होतो.

६. शरीरातील कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी

वांग्यात असणाऱ्या अनेक औषधी घटकांमधील एक आहे क्लोरोजेनिक ऍसिड.

क्लोरोजेनिक ऍसिड हे एक अत्यंत प्रभावी अँटीऑक्सिडंट आहे.

ह्याच्या आहारातील समावेशमुळे शरीरातील कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण कमी होते.

त्याच प्रमाणे वांग्यात मोठ्या प्रमाणावर असलेल्या फायबरमुळे कोलेस्ट्रेरॉल आतड्यात शोषून घेतलं जाण्याचं प्रमाण सुद्धा वाढतं.

एकूणच वांग्याच्या आहारातील समावेशामुळे शरीरातील कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण कमी होते पण यासाठी वांग्याचे पदार्थ करताना मात्र कोलेस्ट्रेरॉल वाढवणाऱ्या घटकांचा समावेश करणं टाळावं लागेल.

७. वांग्यामुळे त्वचा तजेलदार होते

आपल्या त्वचेवर सगळ्यांचेच फार प्रेम असतं. मात्र जसजसं आपलं वय वाढतं जातं तसतसं आपल्या त्वचेवर सुरकुत्या पडतात, त्वचा निस्तेज होते आणि आपण वयस्कर दिसू लागतो.

पण वांग्यामुळे आपली ही सुद्धा समस्या संपुष्टात येते, आश्चर्य वाटलं ना?

वांग्यात भरपूर प्रमाणात असणाऱ्या अँटीऑक्सिडन्ट आणि व्हिटॅमिन्समुळे आपली त्वचा तजेलदार होते, तसेच त्वचेतील मृत पेशी जाऊन नवीन पेशी तयार होतात.

याचबरोबर वांग्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे आपल्या शरीरातील हानिकारक घटक बाहेर टाकण्यास मदत होते आणि त्यामुळे आपल्या त्वचेला नैसर्गिक तजेला येतो.

८. मेंदूच्या विकासासाठी उपयुक्त ठरतं

वांग्यात असणाऱ्या फायटो न्यूट्रिइंट्स मुळे आपल्या मेंदूच्या विविध पेशींची झीज भरून येते.

तसेच यामुळे आपली स्मरणशक्ती वाढते आणि मेंदूपासून शरीराच्या विविध भागांपर्यंत संदेश पोचवण्याचा वेग वाढतो. यामुळे आपल्या मेंदूची क्षमता वाढते.

९. धूम्रपान सोडण्यात मदतगार आहे

वांग्यात असणाऱ्या अनेक घटकांपैकी एक घटक निकोटिन हा आहे.

निकोटिन मुख्यत्वे तंबाखू मध्ये आढळतो. त्यामुळे धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना वांग्याचे सेवन लाभदायक ठरू शकते.

मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वांग्यात असणारे निकोटिनचे प्रमाण नगण्य असते.

म्हणजे एका सिगरेटमध्ये असणारे निकोटिन मिळवण्यासाठी दहा किलो वांगी खावी लागतील!

तर हे आहेत वांगी खाण्याचे फायदे. त्याचबरोबर आम्ही आज तुम्हाला वांग्याचे पदार्थ करताना वापरायचा काही युक्त्या सुद्धा सांगणार आहोत ज्यामुळे हे बहुगुणी आणि औषधी वांग तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे जेवणात वापरू शकाल.

१. वांगी कापण्यासाठी नेहमी स्टेनलेस स्टीलचीच सूरी वापरा.

धातूची सूरी वापरली असता वांग्यात असणाऱ्या विविध फायटोकेमिकल्स बरोबर त्या धातूची प्रक्रिया होऊन वांग्याची चव आणि रंग बदलण्याची शक्यता असते.

२. वांगी कापल्यानंतर ती मिठाच्या पाण्यात बुडवून काढा किंवा त्यावर मीठ शिंपडा. मिठामुळे वांग्याला कडवट चव देणारे केमिकल तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि आपला पदार्थ दिसायला आणि चवीला जास्त चांगला होतो.

३. वांगी ही कोणत्याही जेवणाच्या प्रकारात सहज वापरली जाऊ शकतात.

भारतात तसेच जगभरात अनेक जेवण बनवण्याच्या पद्धती आहेत मात्र वांग ह्यातल्या सगळ्यात वापरलं जाऊ शकतं जस की सांबार , पिझ्झा, पास्ता ह्या तिन्ही जगाच्या वेगवेगळ्या भागात तयार होणाऱ्या पदार्थात वांग्याचा वापर केला जाऊ शकतो.

किंवा आपल्या लाडक्या खिचडीत सुद्धा वांगं टाकलं तर चव अप्रतिम होते..

वांग शिजवून, भाजून, वाफवून कशाही प्रकारे खाल्ली जाऊ शकतात.

तर अशा ह्या अनेक गुण असणाऱ्या वांग्याचे आपल्या आरोग्याचा दृष्टीने असलेले फायदे आपण आज बघितले.

ज्यांना वांगी आवडतात त्यांना तर हा लेख वाचून आनंद झालाच असेल.

पण ज्यांना वांगी आवडत नाहीत त्यांना सुद्धा वांगी खाण्याचं महत्व पटलं असेलच.

आता अगदी निर्धास्त होऊन वांग्याचे पदार्थ जेवणात वापरा पण असं करताना एक मात्र लक्षात राहुद्या की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. वांग्यामुळे आपल्याला हे फायदे होतात म्हणून त्याचा अतिरेक करणं सुद्धा योग्य नाही.

तुम्हाला हा लेख वाचून फायदा झाला ना? मग चला पटापट हा लेख जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना सुद्धा वांग्याचं महत्व कळू द्या.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।