परंतु अशा मेडिक्लेम पॉलिसीचा आपण केलेला क्लेम जर रिजेक्ट झाला तर मात्र आपल्याला फार दुःख होते.
एकतर आधीच आपले अथवा कुटुंबातील व्यक्तींचे आजारपण, त्यातून उद्भवलेला आर्थिक ताण आणि अशा वेळी उपयोगी पडावी म्हणून काढलेल्या मेडिक्लेम पॉलिसीच्या क्लेमचे रिजेक्शन.
अशा परिस्थितीत कोणीही व्यक्ती त्रासणे अगदी साहजिक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मेडिक्लेम पॉलिसीचा क्लेम रिजेक्ट होऊ नये म्हणून काय करावे हे सविस्तरपणे सांगणार आहोत.
Covid-19 पॅनडेमिकमुळे आरोग्याच्या बाबतीत अनेकांचे डोळे उघडले आहेत. त्यामुळेच मेडिकल इन्शुरन्स म्हणजेच वैद्यकीय विमा याचे महत्त्व देखील अधोरेखित झाले आहे. जर आपण आधीपासूनच चांगल्या रकमेचा वैद्यकीय विमा काढलेला असेल तर कोणत्याही आजारपणा दरम्यान त्याचा खूप उपयोग होतो.
परंतु हा वैद्यकीय विमा काढताना अतिशय डोळसपणे काढला पाहिजे, अन्यथा ऐन उपचारांच्या वेळी क्लेम रिजेक्शन किंवा उपचारांची संपूर्ण रक्कम न मिळणे अशा परिस्थितीला सामोरे जावे लागते.
या परिस्थितीला काहीवेळा आपले अज्ञान, आपल्याला इन्शुरन्स पॉलिसी देणाऱ्या व्यक्तीचे अज्ञान किंवा अशा व्यक्तीने जाणून बुजून आपल्याला चुकीची पॉलिसी देणे या गोष्टी कारणीभूत असतात.
असे होऊ नये यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे खालील प्रमाणे
१. प्री-एक्झीस्टींग डिसीजेस (आधीपासुन असणारे आजार)
ज्या व्यक्तीचा वैद्यकीय विमा काढायचा आहे या व्यक्तीला जर आधीपासूनच काही आजार असतील तर त्यांची पूर्ण कल्पना विमा कंपनीला देणे आवश्यक असते.
उदाहरणार्थ, समजा एखाद्या व्यक्तीला मधुमेह आणि/ किंवा उच्च रक्तदाब असे आजार असतील तर अशा व्यक्तीला मिळणारी इन्शुरन्स पॉलिसी असे आजार नसणाऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळी असू शकते.
असे अजिबात नाही की आधीपासून काही आजार असणाऱ्या व्यक्तींना वैद्यकीय विमा मिळतच नाही, परंतु कदाचित त्यांना भरावा लागणारा प्रीमियम जास्त असू शकेल किंवा त्यांना सगळ्या आजारांवर मिळणारे इन्शुरन्स कव्हर पॉलिसी काढल्यापासून दोन अथवा चार वर्षांनंतर मिळू लागेल. हे नियम विमा कंपनीच्या धोरणांवर अवलंबून असतात आणि त्याची नियमावली कंपनीने जाहीर केलेली असते.
परंतु कदाचित जास्त प्रीमियम भरावा लागेल या भीतीने विमा काढणारे लोक किंवा विमा काढण्याचा सल्ला देणारे इन्शुरन्स एजंट असे आधीपासून असलेले आजार लपवण्याचा सल्ला देतात.
परंतु असे करण्यामुळे पुढे पॉलिसी धारकाने केलेला क्लेम प्री-एक्झीस्टींग डिसीजेसमुळे रिजेक्ट होतो आणि त्याचे नुकसान होते. त्यासाठी वैद्यकीय विमा काढताना आपली आरोग्य विषयक सर्व खरीखुरी माहिती विमा कंपनीला देणे हेच योग्य ठरते.
२. काढलेल्या पॉलिसीमध्ये नक्की कोणत्या आजाराचा समावेश आहे आणि कोणत्या आजाराचा समावेश नाही याची आधी माहिती करून घ्या
कोणतीही मेडिक्लेम पॉलिसी काढताना ती पॉलिसी देणाऱ्या विमा कंपनीची संपूर्ण नियमावली नीट माहिती करून घेणे अतिशय आवश्यक आहे. सदर पॉलिसीमध्ये उपचारांसाठी कोणकोणत्या आजारांचा समावेश आहे आणि कोणकोणत्या आजारांचा समावेश नाही, हे आधीच माहीत करून घेतले पाहिजे. काही विमा कंपन्या दातांवरील उपचार, प्रदीर्घकाळ चालणारे कॅन्सरसारख्या आजारावरचे उपचार, प्लास्टिक सर्जरी अशा सारख्या आजारांवर इन्शुरन्स कव्हर देत नाहीत.
अशावेळी विमाधारकाने केलेला क्लेम रिजेक्ट होऊ शकतो. हे टाळण्यासाठी आपल्या मेडिक्लेम पॉलिसीची संपूर्ण माहिती विमा कंपनीकडून आधी जाणून घ्या आणि मगच पॉलिसीचा प्रीमियम भरा.
३. तुम्ही काढलेल्या पॉलिसीच्या मर्यादा जाणून घ्या
मेडिक्लेम पॉलिसी काढण्यापूर्वी पॉलिसीची संपूर्ण माहिती करून घेणे आवश्यक आहे हे आपण पाहिले.
यामध्ये आजारांच्या समावेशाबरोबरच विम्याच्या रकमेपैकी किती रक्कम कोणत्या गोष्टीसाठी विभागली गेली आहे, हे आधीपासून माहित असणे आवश्यक आहे. ही गोष्ट आपण एक उदाहरण घेऊन समजून घेऊया.
समजा एखाद्या विमाधारकाने रुपये पाच लाखाची वैद्यकीय विमा पॉलिसी घेतली. तर याचा अर्थ असा नव्हे की ते संपूर्ण पाच लाख रुपये कोणत्याही गोष्टीसाठी वापरले जाऊ शकतात. पॉलिसीच्या नियमांनुसार त्यातील काही रक्कम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले असता वापरली जाऊ शकते आणि काही रक्कम ओपीडी म्हणजे केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यासाठी देखील वापरली जाऊ शकते.
हॉस्पिटलायझेशन साठी वापरली गेलेली रक्कम ही ठराविक असते. जसे की पॉलिसीच्या नियमांप्रमाणे तुम्हाला हॉस्पिटल मधल्या रूम साठी जर दर दिवसाला रुपये ५००० ठरवून दिले गेले असले आणि तुम्ही त्या पेक्षा जास्त दर असणाऱ्या रूममध्ये राहिलात तर ५००० रुपयांव्यतीरिक्त वरची रक्कम पॉलिसीधारकाला स्वतः भरावी लागते. असेच इतर सर्व खर्चाबाबत होते. उदा. नर्सिंग, ऑपरेशन चार्जेस इत्यादि.
परंतु यासारखे नियम जर आधी माहीत करून घेतले नाहीत तर संपूर्ण पैसे मिळत नाहीत आणि आपला क्लेम रिजेक्ट झाला आहे किंवा संपूर्ण पैसे मिळू शकले नाहीत असा पॉलिसी धारकाचा समज होतो. यासाठीच सर्व नियमांची आधी माहीती करुन घेणे आवश्यक असते.
याचाच अर्थ कोणतीही वैद्यकीय विमा पॉलिसी काढण्यापूर्वी त्या विमा कंपनीच्या आणि पॉलिसीच्या सर्व नियमांची संपूर्ण माहिती करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.
त्याचप्रमाणे ज्या इन्शुरन्स एजंट कडून आपण पॉलिसी घेणार असून त्यांची संपूर्ण माहिती आपल्याकडे लिहून ठेवलेली असावी.
पॉलिसी क्लेम करण्याच्या वेळी जर काही अडचण आली तर आपल्या इन्शुरन्स एजंटला संपर्क करावा. त्याचप्रमाणे विमा कंपनीच्या मुख्य ऑफिसमध्ये देखील संपर्क करता येऊ शकेल.
तर मित्र-मैत्रिणींनो आज आपण जाणून घेतले की आपला वैद्यकीय विमा रिजेक्ट होऊ नये म्हणून काय करणे आवश्यक आहे. तुम्ही वैद्यकीय विमा पॉलिसी अवश्य खरेदी करा कारण आजारपण सांगून येत नाही अशा वेळी विम्याच्या रकमेचा मोठा आधार होऊ शकतो.
मात्र नवीन वैद्यकीय विमा पॉलिसी घेताना लेखात सांगितलेल्या सर्व मुद्द्यांचा जरूर विचार करा आणि मगच पॉलिसी खरेदी करा. तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख शेयर करायला विसरू नका आणि या बाबतीतले तुमचे अनुभव आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.