जाणून घ्या घरच्या घरी नैसर्गिक लीप बाम तयार करण्याची कृती

घातक रसायने वापरून बनवलेल्या कृत्रिम लीप बाम आणि लिपस्टिकपासून स्वतःचा बचाव करा.

हल्ली माफक प्रमाणात मेकअप करणे ही महिलांची गरज झाली आहे. योग्य प्रमाणात केलेला मेकअप महिलांना सुंदर तर बनवतोच पण त्याचबरोबर आत्मविश्वास देखील देतो.

अशा मेकअपच्या सामानातील महत्त्वाची वस्तू असते ती म्हणजे लिपस्टीक. महिलांकडे निरनिराळ्या रंगांच्या लिपस्टिकच्या शेड असतात.

त्यांचा योग्य पद्धतीने वापर केला तर त्या खुलूनही दिसतात. परंतु कितीही चांगल्या दर्जाची लिपस्टीक असली तरी त्यात काही प्रमाणात कृत्रिम रसायने मिसळलेली असतात.

त्यामुळे वारंवार अशा लिपस्टिकचा वापर केल्यावर ओठ काळे पडणे, कोरडे पडणे, ओठांना भेगा पडणे अशा समस्या उद्भवतात. काहीवेळा लिपस्टिक मध्ये असलेल्या पॅराबेन, ट्राईक्लोसॅन आणि सोडियम सल्फेट या घटकांची एखादीला ऍलर्जी असू शकते.

त्यामुळे देखील ओठ खराब होऊ शकतात. तसेच थंडीच्या दिवसात देखील ओठांना भेगा पडणे, ते कोरडे पडणे, त्यातून रक्त येणे असा त्रास होऊ शकतो.

या सर्व समस्यांवरचा अगदी सोपा उपाय म्हणजे चांगल्या प्रतीचा लीप बाम वापरणे. बाजारात अनेक प्रकारचे तयार लीप बाम मिळतात.

परंतु ते अतिशय महाग तर असतातच शिवाय त्यात कोणकोणते घटक वापरले आहेत याची आपल्याला नीट माहिती नसते. त्यापेक्षा आपण घरच्या घरी उत्तम प्रतीचे लीप बाम तयार करून ते सहजपणे वापरू शकतो. असे करण्यामुळे पैसे तर वाचतीलच शिवाय उत्तम दर्जाचे, सुरक्षित आणि स्वतः बनवलेले लीप बाम वापरण्याचे समाधान देखील मिळेल.

आज आपण घरच्या घरी सहजपणे तयार करता येऊ शकणारे लीप बाम कोणते ते पाहणार आहोत. या लीप बाम मध्ये कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह वापरलेले नाहीत. त्यामुळे हे लीप बाम तयार करून साधारण आठ दिवस वापरता येतील.

१. डाळिंबाचा लीप बाम 

साहित्य – पाव कप डाळींबाचे दाणे, एक चमचा खोबरेल तेल

कृती – डाळिंबाचे दाणे एका वाटीत घेऊन त्यावर चमच्याने दाब देऊन त्यांचा रस काढावा. त्या रसात एक चमचा वितळवलेले खोबरेल तेल मिसळून ती वाटी फ्रीजमध्ये ठेवून द्यावी. हे मिश्रण घट्ट झाल्यानंतर लीप बाम म्हणून वापरण्यासाठी तयार आहे.
डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. शिवाय डाळिंबामुळे ओठांना नैसर्गिक लाल रंग मिळतो. तसेच नारळाच्या तेलातील चरबीमुळे ओठ मऊ राहण्यास मदत होते.

२. बीटरुटचा लीप बाम 

साहित्य – अर्धा कप बीटरूटचा कीस, एक चमचा तूप

कृती – बीटरूटचा कीस घट्ट पिळून त्याचा रस काढून घ्यावा. त्या रसात एक चमचा तूप मिसळून हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवावे. घट्ट झाल्यानंतर लीप बाम तयार आहे.
बीटरूटमध्ये बिटॅनिन हे पिगमेंट असते. त्यामुळे ओठांचा नैसर्गिक रंग तसाच राहण्यास मदत होते. तसेच तुपामुळे ओठ मऊ व चमकदार होतात.

३. दालचिनीचा लीप बाम 

साहित्य – दालचिनीच्या तेलाचे २,३ थेंब आणि १ चमचा कोको बटर

कृती – दालचिनीच्या तेलात कोको बटर मिसळून नीट मिक्स करावे. हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवावे. घट्ट झाल्यावर दालचिनीचा लीप बाम तयार आहे.

दालचिनी मध्ये भरपूर प्रमाणात एंटीऑक्सीडंट्स असतात आणि कोको बटरमुळे ओठ मऊ आणि चमकदार राहण्यास मदत होते. ह्या लीप बाम मुळे ओठांच्या त्वचेचे पोषण होते.

४. स्ट्रॉबेरी लीप बाम 

साहित्य – १ चांगली पिकलेली स्ट्रॉबेरी, ३ चमचे नारळाचे तेल

कृती – स्ट्रॉबेरी चांगल्या पद्धतीने वाटून त्याची पेस्ट बनवून घ्यावी. त्या पेस्टमध्ये नारळाचे तेल मिसळून ते मिश्रण फ्रीजमध्ये ठेवावे. मिश्रण घट्ट झाल्यावर स्ट्रॉबेरी लीप बाम वापरण्यासाठी तयार आहे.

स्ट्रॉबेरी मध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी असते. तसेच स्ट्रॉबेरी हे नैसर्गिक एक्सफोलीएटर आहे ज्यामुळे ओठांना पडलेल्या भेगा लवकर भरून येतात. तसेच ओठांवरील मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते. स्ट्रॉबेरी मुळे ओठांचा मूळचा रंग टिकून राहण्यास देखील मदत होते. तसेच नारळाच्या तेलामुळे ओठांना पोषण मिळून ते मऊ व चमकदार होतात.

५. विटामिन ई लीप बाम 

साहित्य – विटामिन ई च्या ३ कॅप्सूल, २ चमचे नारळाचे तेल, १ चमचा कोको बटर, १ चमचा ग्रीन टी पावडर, दोन-तीन थेंब इसेन्शियल ऑईल

कृती – मंद आचेवर नारळाचे तेल वितळवून त्यात ग्रीन टी पावडर मिसळावी. मंद आचेवर हे मिश्रण काही काळ तसेच ठेवावे. थंड होऊन ग्रीन टी पावडर खाली बसल्यावर मलमलच्या कपड्याने ते तेल गाळून घ्यावे. नंतर त्या तेलात विटामिन ई च्या कॅप्सूल उघडून त्यातील औषध मिसळावे. नंतर त्यात कोको बटर आणि इसेन्शियल ओईल मिसळावे. हे मिश्रण तीन तास फ्रीजमध्ये ठेवावे. लीप बाम तयार आहे.

विटामिन ई मध्ये नवीन पेशी तयार करण्याची क्षमता असते. त्यामुळे ओठांना पडलेल्या भेगा लवकर जुळून येतात. ग्रीन टी मध्ये भरपूर प्रमाणात एंटीऑक्सीडंट्स असतात आणि तेले आणि कोको बटर मुळे ओठ मऊ व चमकदार राहतात.

तर हे आहेत अगदी घरच्या घरी सहजपणे तयार करण्याजोगे लीप बाम. या लीप बाम मध्ये कोणतीही घातक आणि कृत्रिम रसायने वापरलेली नसल्यामुळे ते वापरण्यास अगदी सुरक्षित आहेत. त्याशिवाय घरात सहजपणे उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून ते बनवता येणे सहज शक्य आहे. बाजारातून महागडे लीप बाम आणण्यापेक्षा असे घरगुती, उत्तम प्रतीचे लीप बाम वापरणे केव्हाही चांगले.

तर मित्र-मैत्रिणींनो हे लीप बाम तुम्ही देखील घरी तयार करून पहा आणि तुमचा अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।