आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन होताना आपल्या सर्वांच्याच पोटामध्ये काही प्रमाणात गॅस तयार होत असतो.
प्रत्येकाच्या तब्येतीनुसार, खाण्या-पिण्याच्या सवयींनुसार हे गॅस तयार होण्याचे प्रमाण कमी जास्त होत असते.
काहीवेळा काही लोकांना गॅसचा त्रास असतो.
अशावेळेला पोटात तयार झालेला जास्तीचा गॅस जेव्हा बाहेर पडतो तेव्हा चारचौघांमध्ये अवघडल्यासारखे होते.
अन्नाचे पचन होताना काही प्रमाणात गॅस तयार होणे हे जरी नॉर्मल असले तरी सुद्धा हा गॅस जास्त प्रमाणात तयार होऊ नये यासाठी काळजी घेणे महत्वाचे आहे.
थोड्याफार प्रमाणात हा त्रास सगळ्यांनाच असतो पण तो हाताबाहेर जाऊ नये यासाठी तुम्ही योग्य ती काळजी घेतली पाहिजे.
या गॅसमुळे बाहेर असताना, महत्वाच्या कामासाठी गेलेलो असताना काही अडचण येऊ नये म्हणून काही पथ्य पाळणे गरजेचे आहे.
या व्यतिरिक्त अतिरिक्त गॅसेसमुळे पोट दुखणे, भूक न लागणे, पोट फुगल्यासारखे दिसणे, छातीत दुखणे हे त्रास होतात.
पोटात जर खूप प्रमाणात गॅस असेल तर ते तुमच्या तब्येतीसाठी चांगले नसते.
याचसाठी पोटात जास्तीचे गॅस होऊ नयेत यासाठी आहारात, एकूण जीवनशैलीत काही बदल गरजेचे असतात.
गॅसेस कमी होण्यासाठी काय काळजी घ्यावी ते वाचूया या लेखात.
१. सावकाश जेवा
तुम्ही जेव्हा अन्न गिळता तेव्हा अन्नाबरोबरच बऱ्याच प्रमाणात गॅस सुद्धा पोटात जातो.
गॅसेस होण्यामागे हे एक महत्वाचे कारण आहे.
अन्न गिळताना हवा गिळली जाणारच असते, त्यासाठी काही करता येत नाही पण अन्नाबरोबर गिळल्या जाणाऱ्या हवेचे प्रमाण मात्र कमी करता येऊ शकते.
जेव्हा तुम्ही घास पूर्णपणे न चावता, घाईघाईने गिळता तेव्हा पोटात अन्नाबरोबर गॅस जास्त प्रमाणात जाण्याची शक्यता असते.
पण जेव्हा तुम्ही घास हळूहळू व पूर्णपणे चावून खाता तेव्हा तुमचे पोट अधिक काळासाठी बंद राहते व तोंडात आणि पोटात जाणाऱ्या हवेचे प्रमाण कमी होते.
तुम्हाला जर घाईघाईत खायची सवय असेल तर ती बदलून तुम्ही एका ठिकाणी शांत बसून, सावकाश जेवले पाहिजे.
जेवताना प्रत्येक घास व्यवस्थित चावून खाल्ला जातोय ना याची खात्री करणे महत्वाचे आहे.
२. चुईंग गमचा वापर टाळा
तुम्ही जेव्हा चुईंग गम खात असता तेव्हा सतत चावण्याची कृती करताना तोंड उघडबंद केले जाते.
यामुळे पोटात हवा जास्त प्रमाणात जाते.
यामुळे पोटात गॅस जमा होतो. जर चुईंग गम खायची सवय असेल तर असे रोज झाल्याने पोटात बऱ्यापैकी गॅस जमा होऊन गॅसेसच्या त्रासाला सुरुवात होते.
एखाद्यावेळेला चुईंग गम खाल्ल्याने हा त्रास होत नाही.
पण जर तुम्हाला आधीपासूनच जास्त गॅसेस होत असतील तर मात्र चुईंग गम तुम्ही टाळले पाहिजे.
३. सैल कपडे वापरा
जर तुम्हाला खूप प्रमाणात गॅसेस होत असतील तर तुमचे पोट काहीवेळेला फुगल्यासारखे वाटू शकते.
अशावेळेला घट्ट कपडे घातले असतील तर अवघडल्यासारखे होते.
उठताना, बसताना त्रास होतो.
तसेच घट्ट कपडे घातले असतील तर गॅस शरीरातून बाहेर पडताना सुद्धा त्रास होतो.
गॅसेसमुळे पोट फुगल्यावर त्रास होऊ नये आणि गॅस बाहेर पडायला सोपे जावे यासाठी शक्यतो सैलसर कपडे, ज्यामध्ये तुम्हाला मोकळे वाटेल, असे वापरले पाहिजेत.
४. जेवणात बदल
काही पदार्थ असे असतात की त्यांच्या सेवनाने पोटात गॅस तयार व्हायचे प्रमाण वाढते.
ज्या पदार्थांमध्ये स्टार्च जास्त प्रमाणात असते ते सहसा जास्त प्रमाणात गॅस तयार करण्यास कारणीभूत असतात.
काही भाज्यांमुळे व फळांमुळे सुद्धा गॅसेस होतात.
हे पदार्थ आहारातून पूर्णपणे वर्ज करणे शक्य नसते, व तसे करणे सुद्धा योग्य नाही.
पण जर तुम्हाला गॅसेसचा त्रास असेल तर हे काही ठराविक पदार्थ कमी प्रमाणात घेतले पाहिजेत.
घेवडा, कोबी, कांदा, बटाटा, वांगी , मटार या वातूळ भाज्या आहेत.
जर तुम्हाला गॅसेसचा त्रास असेल तर तुमच्या आहारात या भाज्यांचे प्रमाण कमी असले पाहिजे.
दुध व दुग्धजन्य पदार्थ जास्त प्रमाणात घेतल्याने सुद्धा गॅसेस होतात.
कडधान्ये सुद्धा गॅस होण्यासाठी कारणीभूत असतात.
५. धुम्रपान करू नका
सिगारेट ओढताना तोंडावाटे पोटात जास्त प्रमाणात हवा घेतली जाते.
जर धुम्रपान करण्याचे प्रमाण जास्त असेल तर पोटात जाणाऱ्या हवेचे प्रमाण सुद्धा वाढते.
यामुळे पोटात गॅस साठले जातात. सिगारेट ही एरवी सुद्धा तब्येतीसाठी घातक असतेच.
त्यामुळे धुम्रपान सोडण्याच्या इतर अनेक फायद्यांमध्ये हा सुद्धा एक म्ह्त्वाचा फायदा आहे.
जर तुम्हाला गॅसेसचा त्रास होत असेल तर तुम्ही धुम्रपान शक्य तितके कमी आणि जमत असल्यास बंदच केले पाहिजे.
६. नियमित व्यायाम करा
तुमच्या एकूण आरोग्यासाठी नियमित व्यायाम अत्यंत गरजेचा असतो.
व्यायामामुळे तुमची पचनशक्ती सुधारते. यामुळे शरीरात अनावश्यक गॅस साठून राहत नाही.
तुम्हाला जर गॅसेसचा त्रास होणे नको असेल तर रोज नेमाने व्यायाम केला पाहिजे.
६. भरपूर पाणी प्या
योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने अन्नाचे पचन नीट होते.
यामुळे तुमच्या पचनसंस्थेतून अन्न व्यवस्थितपणे पास होते.
जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पीत नसाल तर बद्धकोष्ठतेचा त्रास होतो.
यामुळे शरीरात गॅस साठून राहतात.
दिवसभर २-३ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे.
दर जेवणानंतर, व मध्ये काहीही खाल्ल्यानंतर सुद्धा पाणी पिणे महत्वाचे आहे.
७. कोल्डड्रिंक्स टाळा
सोडा असलेले म्हणजेच कार्बोनेटेड ड्रिंक्समध्ये असणाऱ्या गॅसमुळे पोटातील गॅसमध्ये भर पडते.
जर तुम्हाला गॅस जास्त प्रमाणात होत असतील तर अशी पेय पूर्णपणे बंद करणे हिताचे आहे.
यामुळे शरीरात अनावश्यक असलेला गॅस कमी होण्यास मदत होते.
मित्रांनो, गॅस होणे हे जसे नैसर्गिक आहे तसेच तो शरीरातून बाहेर पडणे हे सुद्धा नैसर्गिक आहे.
त्याबद्दल संकोच बाळगणे गरजेचे नसते पण त्याचबरोबर बाहेर असताना शरीरातून अनवधानाने गॅस बाहेर पडून अवघड परिस्थितीत सापडू नये याची काळजी सर्वांनाच असते.
सगळ्यांच्याच शरीरातून कमी जास्त प्रमाणात गॅस बाहेर पडत असतो.
पण तुमच्याबाबतीत जर असे वारंवार होत असेल किंवा गॅसमुळे पोट फुगणे, छातीत दुखणे यासारखे त्रास होत असतील तर गॅस कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे.
त्यासाठी कोणती काळजी घ्यायची हे तुम्हाला समजले पण त्याचबरोबर या काही टिप्सचा सुद्धा तुम्हाला उपयोग होईल.
१. एका वेळेला जास्त प्रमाणात खाऊ नये, दिवसातून हर वेळा थोडे थोडे खावे.
खाताना प्रत्येक घास व्यवस्थित चावून खावा.
२. मोठे घास, व पाण्याचे मोठे घोट घेणे टाळावे.
३. सकस व चौरस आहार घ्यावा.
४. पचायला जड असणारे पदार्थ शक्यतो टाळावेत.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.