चेहऱ्यावरील अनावश्यक केस घालवायचे असतील तर हे घरगुती उपाय नक्की करून बघा…
डोक्यावरचे काळेभोर, दाट, लांबसडक केस म्हणजे मानवी सौंदर्याचं एक लक्षण मानलं जातं.
डोक्यावर असे सुंदर केस असणं म्हणजे दैवी देणगीच वाटते. स्त्री असो किंवा पुरूष प्रत्येकालाच असे केस हवेहवेसे वाटतात.
केस अकाली गळायला लागले, पांढरे पडले तर वाईट वाटतं. शरीराच्या इतर भागांवरही केस येतात. पुरुषांच्या चेहऱ्यावर केस असतील तर दाढी मिशी म्हणून ते त्यांना शोभतही.
पण बायकांना असे केस आले तर त्यामुळे केवळ नैराश्य येतं. चेहऱ्याचं सौंदर्य कमी झाल्यासारखं वाटतं.
असे केस घालवण्यासाठी मग घरगुती उपाय आणि पार्लरची वारी अशी घाईच सुरू होते. सध्याच्या कोरोना संकटात तरी सारखं पार्लरला जाणंही शक्य नाही. मग काही घरगुती उपाय करून बघायला काय हरकत आहे.
चेहऱ्यावरचे अनावश्यक केस म्हणजे काय??
साधारणपणे सगळ्याच बायकांच्या शरीरावर केस असतात. पण ते प्रमाणापेक्षा जास्त असतील तर त्याला ‘हर्सुटिझम’ म्हणतात.
बायकांच्या शरीरातील टेस्टेस्टेरॉन आणि एण्डरोजन हार्मोनचं संतुलन बिघडलं तर असे केस येऊ लागतात. यालाच अनावश्यक केस म्हणतात.
अनावश्यक केस येण्याची कारणं :
चेहऱ्यावर अनावश्यक केस येण्याची वेगवेगळी कारणं आहेत. त्यापैकी अनुवांशिकता, हार्मोन्सचं असंतुलन ही मुख्य कारणं आहेत. बघुया आणखी कोणकोणती कारणं आहेत…
१. अनुवंशिकता :
घरात आई, आजी, आत्या, मावशी, बहिणी यापैकी कोणाला चेहऱ्यावर अनावश्यक केस असण्याची समस्या असेल तर पुढच्या पिढीत ही समस्या आणखी कोणाला उद्भवू शकते.
२. हार्मोन्सचं असंतुलन :
शरीरातील हार्मोन्सचं प्रमाण बिघडलं तर चेहऱ्यावर केस येऊ शकतात. याशिवाय PCOD ची समस्या, अधिवृक्क ग्रंथीचा
कर्करोग, काही जन्मजात दोष यामुळे अनावश्यक केसांची समस्या उद्भवू शकते.
A. एण्डरोजन हार्मोन्सचं प्रमाण : (Androgen Harmon)
स्त्रियांच्या शरीरातील एण्डरोजन नावाचं पुरूष हार्मोन्सचं प्रमाण वाढलं तर शरीरावर अनावश्यक केस येऊ शकतात. त्वचेवरील छिद्रं संवेदनशील असतील तर हार्मोन असंतुलामुळे शरीरावर केस येतात.
B. पी सी ओ एस् :
पी. सी. ओ. एस्. मुळे स्त्रियांची मासिक पाळी अनियमित होऊन चेहऱ्यावर अनावश्यक केस येऊ लागतात. यामुळे स्त्रियांची प्रजनन क्षमता कमकुवत होते, वजन खूप वाढतं, लवकर थकवा येतो, नैराश्य जाणवतं.
C. अधिवृक्क ग्रंथीचा विकार :
ताणतणावाच्या स्थितीत हार्मोन्सचं संतुलन राखणं हे अधिवृक्क ग्रंथीचं मुख्य कार्य आहे. ही ग्रंथी शरीरातील सोडियमचं प्रमाण नियंत्रित करण्यासाठी एल्डोस्टिरॉन नावाचं हार्मोन तयार करते.
या ग्रंथीने तयार केलेलं एपिनेफ्राइन नावाचं हार्मोन हृदयावर परिणाम करतं. या ग्रंथी जेव्हा जास्त हार्मोन्स तयार करतात तेव्हा स्त्रियांना चेहऱ्यावर केस येतात.
उच्च रक्तदाब, मधुमेह, डोकेदुखी ही अधिवृक्क ग्रंथी कमकुवत झाल्याची लक्षणं आहेत.
हार्मोन्स असंतुलित होण्याची कारणं :
काही औषधांच्या सततच्या सेवनाने हार्मोन्स संतुलन बिघडतं. अभ्यासातील एकाग्रता वाढवणारी औषधं, उंची वाढवणारी औषधं, सततच्या झोपेच्या गोळ्या यामुळे हार्मोन्सचं संतुलन बिघडतं.
मिनॉक्सिडील हे औषध केस वाढवण्यासाठी घेतलं जातं. त्यामुळे अनावश्यक केससुद्धा वाढायला लागतात.
टेस्टेस्टेरॉन हार्मोन्सच्या औषधांच्या सेवनानेही अनावश्यक केस वाढतात. एनाबॉलिक स्टेरॉईडसारखी औषधंसुद्धा यासाठी कारणीभूत आहेत.
अंगप्रत्यारोपणापूर्वी वापरलं जाणारं औषध सायक्लोस्पोरीन हार्मोन्स असंतुलित करतं.
चेहऱ्यावरील अनावश्यक केस घालवण्याचे काही घरगुती उपाय :
चेहऱ्यावरचे केस स्त्रियांना भुवयांपुरते शोभून दिसतात. इतर केस घालवण्यासाठी आता सारखं पार्लरला जाण्याची गरज नाही. काही घरगुती उपाय करूनही ही समस्या दूर करता येईल.
१. पपईचा उपयोग :
पपईमध्ये पपैन एन्झाईम असतं. त्याचा उपयोग केल्यास चेहऱ्यावरच्या केसांची वाढ कमी करता येते.
यासाठी १-२ चमचे पपईचा गर घेऊन समप्रमाणात हळद त्यात घालायची. ही पेस्ट १५ मिनीटं चेहऱ्यावर लावायची.
थोड्या वेळाने चेहरा स्वच्छ धुवायचा. आठवड्यातून दोन वेळा असं केल्यास चांगला परिणाम दिसतो.
२. कोरफड आणि मोहरीच्या तेलाचा उपयोग :
पाव चमचा बेसन, चार चमचे कोरफडीचा गर, दोन चमचे मोहरीचं तेल व्यवस्थित एकत्र करायचं.
अनावश्यक केस असलेल्या ठिकाणी ही पेस्ट केसांच्या वाढीच्या विरूद्ध दिशेने लावायची. १५ मिनिटांनी कोरड्या कापडाने पेस्ट ज्या दिशेने लावली त्या दिशेने काढून टाकयची.
नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवायचा. मग ऑलिव्ह ऑइल माॅइश्चरायजरने मसाज करायचा. आठवड्यातून तीन वेळा तीन महिने असं केल्यास नक्की चांगला परिणाम होतो.
३. हळदीचा उपयोग :
१-२ चमचे हळद घेऊन त्यात दूध किंवा पाणी घालून चांगली पेस्ट बनवावी. ती १५ मिनीटं चेहऱ्यावर लावायची. नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवायचा.
४. बेसन आणि ओट्सचा उपयोग :
बेसन किंवा ओट्सच्या पिठात दूध घालून चांगली पेस्ट बनवायची. ती चेहऱ्यावर लावल्याने अनावश्यक केस नक्की कमी होतात.
५. मक्याचा उपयोग :
अर्धा कप मक्याचं पीठ, अर्धा कप दूध, एक चमचा हळद, एक चमचा साय एकत्र करून चांगली पेस्ट बनवावी. त्वचा तेलकट असल्यास साय घालू नये.
चेहऱ्यावर मसाज करत पेस्ट अनावश्यक केस असलेल्या ठिकाणी नीट लावून घ्यावी. अर्धा तासाने वाळल्यावर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.
६. लिंबू आणि साखरेचा उपयोग :
दोन चमचे साखर, दोन चमचे लिंबाचा रस आणि पाच चमचे पाणी एकत्र करून घ्यायचं.
त्यातील साखर पूर्ण विरघळल्यावर १५ मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवायचं. मग हलक्या हाताने हा थर काढून टाकावा. आठवड्यातून दोन तीन वेळा केल्याने चांगला परिणाम दिसतो.
७. अश्वगंधा चूर्णाचा उपयोग :
अश्वगंधा हे ताणतणाव, थकवा, हार्मोन्स असंतुलन यासाठी एक उत्तम आयुर्वेदिक औषध आहे.
पाच ग्रॅम अश्वगंधा चूर्ण दुधाबरोबर घेतल्याने त्याचा चांगला फायदा होतो.
८. तुळशीच्या पानांचा उपयोग :
शरीरातील कोर्टिसोल नियंत्रित करण्यासाठी तुळस उपयुक्त आहे. कोर्टिसोलचं प्रमाण वाढलं तर हार्मोन्स असंतुलित होतात. त्यामुळे अनावश्यक केसांची समस्या निर्माण होते.
तुळशीची पानं रोज चघळल्याने ही समस्या नाहीशी होते.
अनावश्यक केसांची समस्या असल्यास आहार पथ्य :
हार्मोन्स असंतुलन हे अनावश्यक केसांच्या वाढीचं मुख्य कारण आहे. हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी पौष्टिक आहार महत्वाचा असतो.
१. पुरेसं पाणी प्यायल्याने शरीराची आर्द्रता चांगली टिकवली जाते. त्यामुळे ताणतणावाची स्थिति नियंत्रित होऊन हार्मोन्स संतुलित ठेवता येतात.
२. रोजच्या आहारात सुकामेवा जरूर समाविष्ट करावा. कारण त्यामध्ये ऑरगॅनिक ऍसिड, अमिनो ऍसिड, ओमेगा थ्री फॅटी ऍसिड, मॅग्नेशियम, झिंक, फॉस्फरस, फायबर, प्रोटिन्स, खनिजं यांचं प्रमाण मुबलक असतं.
ओमेगा थ्री ऍसिडमुळे शरीरावरील सूज कमी होऊन रक्तप्रवाह सुरळीत राहतो. त्यामुळे डोक्यापर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा होऊन हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी मदत होते.
३. हिरव्या पालेभाज्यांमध्ये कार्बोहायड्रेट आणि फायबर मुबलक प्रमाणात असतं.
त्यामुळे हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी मदत होते. म्हणून रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश जरूर करावा.
अनावश्यक केस घालवण्यासाठी जीवनशैलीत बदल :
चेहऱ्यावरचे अनावश्यक केस घालवायचे असतील तर आहाराबरोबर जीवनशैलीतही योग्य बदल करावा.
१. रात्री ७-८ तास शांत झोप होत असेल तर त्यामुळे ताणतणाव कमी होऊन हार्मोन्स संतुलित ठेवता येतात.
२. मन आणि शरीर शांत, तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज पुरेसा व्यायाम करावा. त्यामुळेही हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी मदत होते.
अनावश्यक केस का येतात?
शरीरातील वात, पित्त, कफ हे दोष असंतुलित झाले तर त्याचा वाईट परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे हार्मोन्स असंतुलित होऊन शरीरावर अनावश्यक केस येऊ लागतात. चेहरा आणि शरीराच्या इतर भागातही असे केस वाढायला लागतात.
शरीरावरील अनावश्यक केस जर खूप वाढायला लागले त्याचबरोबर स्थूलपणा वाढला आणि मासिक पाळी अनियमित झाली तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आपल्यालाही अनावश्यक केसांची समस्या जाणवत असेल तर वरील उपाय नक्की करून बघा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
एका तव्यात साखर, मध आणि लिंबूचा रस मिक्स करून गरम करावे व हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे. हा उपाय फार प्रभावी आहे. Thank you
thank you