घामाची दुर्गंधी कमी करण्याचे १० घरगुती उपाय

आपल्याला घाम का येतो आणि तो नैसर्गिक रित्त्या, घरच्या घरी कमी कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

उन्हाळ्यात वैतागायला अनेक कारणं असतात आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे घाम आणि चिकचिक.

एप्रिल महिन्यात हा त्रास होतोच. पण आत्ताच सुरु झालेल्या ऑक्टोबर महिन्यात सुद्धा ऑक्टोबर हीटमुळे खूप जणांना उष्णता, घाम असे त्रास होतात.

खास करून ज्यांना बाहेर उन्हात फिरावं लागतं त्यांना.

आम्ही नेहमी वेगवेगळ्या समस्यांवर घरगुती उपाय आणि त्याबद्दलची थोडी माहिती विविध लेखांतून देत असतो.

तशीच आज या लेखात आम्ही घाम का येतो हे सांगून तो कमी करायचे घरगुती उपाय सांगणार आहोत.

आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित राहावं या मुख्य कारणासाठी आपल्याला घाम येतो.

घामात पाण्याचे प्रमाण जास्त असते पण त्याचबरोबर त्यात क्षार (सोडियम, पोटॅशिअम) सुद्धा असतात.

घाम येण्याच्या क्रियेला ‘पर्स्पिरेशन’ असं म्हणतात.

यामुळे बाहेरच्या तापमानानुसार आपल्या शरीराचं तापमान नियंत्रणात राहतं.

आपल्या शरीरावर घामाच्या ग्रंथी असतात ज्यामधून घाम शरीराच्या बाहेर पडतो. या ग्रंथी दोन प्रकारच्या असतात.

१. एक्रीन ग्लॅण्डस

या ग्लॅण्डस आपल्या त्वचेवर, पूर्ण शरीरभर असतात. यामधून बाहेर पडणाऱ्या घामाला कुठलाही वास नसतो.

२.अपोक्रिन ग्लॅण्डस

या ग्लॅण्डस शरीरातल्या अशा भागांवर असतात जिथे हेयर फॉलिकल्स आहेत. जसं की काखेत, डोक्यावर, दोन मांड्यांच्या मध्ये.

या ग्रंथींमधून येणाऱ्या घामाला एक प्रकारचा वास असतो.

घाम येणं ही अत्यंत नैसर्गिक क्रिया आहे.

घाम सगळ्यांनाच येतो फक्त त्याचं प्रमाण कमीजास्त असू शकतं.

घाम यायची कारणं सुद्धा वेगवेगळी असू शकतात.

बाहेरची उष्णत वाढल्यावर, उन्हात फिरल्यावर, व्यायाम केल्यानंतर, भीती वाटल्यामुळे किंवा टेन्शन आल्यावर, काही औषधांचा परिणाम म्हणून, स्त्रियांना मेनोपॉजच्या काळात किंवा अगदी तिखट खाल्ल्यावर सुद्धा घाम येतो.

कारण काहीही असो, घामामुळे शरीराला दुर्गंध येतो आणि त्याचबरोबर त्वचा सतत ओलसर राहिल्याने त्यात जिवाणूंची वाढ होऊन इन्फेक्शनचा धोका सुद्धा असतो.

म्हणूनच घामाचं प्रमाण नैसर्गिक रित्या नियंत्रणात आणण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.

घामाची दुर्गंधी कमी करण्याचे काही घरगुती उपाय बघूया

१. लिंबाचा रस

लिंबातल्या सायट्रिक ऍसिडमुळे त्वचेवरचे बॅक्टेरीया नष्ट होतात आणि त्यामुळे घामामुळे येणारी दुर्गंधी नियंत्रणात राहते.

अंघोळीच्या अर्धा तास आधी काखेत, मानेवर किंवा आपल्याला ज्या भागात घाम जास्त येतो त्या भागात अर्ध लिंबू चोळून लावल्याने फायदा होतो.

२. लिंबू आणि बेकिंग सोडा पेस्ट

शरीराच्या ज्या भागांवर घाम जास्त प्रमाणात येतो त्या भागात एक चमचा बेकिंग पावडर आणि लिंबाच्या रसाची पेस्ट करून लावावी.

व अर्ध्या तासाने ती जागा कापसाच्या ओल्या बोळ्याने पुसून घेऊन कोरडी करावी. यामुळे घाम येण्याचं प्रमाण कमी होते.

३. भरपूर पाणी प्यावं

घामामुळे शरीरातलं पाणी बाहेर पडून डीहायड्रेशन होण्याचा धोका असतो.

म्हणूनच ज्यांना खूप जास्त प्रमाणात घाम येतो त्यांनी पाण्याचं प्रमाण सुद्धा वाढवलं पाहिजे.

दिवसातून किमान ८ ते १० ग्लास पाणी प्यायलं पाहिजे.

उन्हाळा वाढला किंवा उन्हात फिरण्याचं प्रमाण जास्त असेल अशांनी दिवसभरात लिंबाचं किंवा कोकमचं सरबत, नारळ पाणी असं ही प्यायलं पाहिजे.

४. टोमॅटोचा रस

टोमॅटो घाम कमी करण्यासाठी फायदेशीर असतो. दिवसभरात एकदा कधीही एक ग्लास भरून टोमॅटोचा ज्युस प्यायला तर घाम कमी होण्यासाठी मदत होते.

५. कॉटनचे सैलसर कपडे वापरावेत

कॉटन हा नैसर्गिक धागा असल्यामुळे त्याला घाम टिपला जातो.

कॉटनचे कपडे वापरल्यामुळे घाम अशाप्रकारे शोषला जाऊन त्वचा कोरडी राहते.

हेच जर आपण कृत्रिम धाग्याचे म्हणजेच सिंथेटिक कपडे वापरले तर घाम टिपला न जाऊन त्वचा ओलसर राहते ज्यामुळे बॅक्टेरीअल किंवा फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते.

सैलसर कपडे घातले तर हवा खेळती राहून आलेला घाम वळण्यासाठी मदत होते.

म्हणून जास्त घाम येणाऱ्या लोकांनी खासकरून उन्हाळ्यात सैल कॉटनचेच कपडे वापरण्यास प्राध्यान्य दिलं पाहिजे.

६. अंघोळीनंतर अंग पूर्ण कोरडं करावं

जे लोकं गरम आणि दमट वातावरणात राहतात त्यांनी अंघोळ झाल्यावर अंग पूर्णपणे कोरडं करूनच कपडे घातले पाहिजेत.

यामुळे अंघोळीनंतर येणाऱ्या घामाचं प्रमाण कमी होतं. अंग अर्धवट कोरडं करून कपडे घातले तर काखेत, पोटरीत, मानेवर घाम जास्त यायची शक्यता असते.

७. शरीरावरचे केस नियमितपणे काढणे

वर आपण बघितलंच आहे की घामाच्या ग्रंथी, म्हणजेच ग्लॅण्डस या दोन प्रकारच्या असतात.

अपोक्रिन ग्लॅण्डस, ज्या हेअर फॉलिकल्स म्हणजे केसांच्या मुळाशी असतात त्यातून येण्याऱ्या घामाला दुर्गंधी असते.

म्हणूनच अंगावरचे नको असलेले केस काढले तर घामाचं आणि त्यामुळे येणाऱ्या दुर्गंधीचं प्रमाण कमी होतं.

८. आहारात बदल करा

काही खाद्यपदार्थांमुळे घामाचं प्रमाण वाढतं. फॅट जास्त असलेलं आणि फायबर कमी असलेलं अन्न, प्रोसेस्ड फूड खाल्लं तर घाम यायचं प्रमाण वाढत.

लसूण, कांदा, दारू, कॉफी, खूप गरम आणि तिखट मसालेदार पदार्थ खाल्ल्याने सुद्धा घाम यायचं प्रमाण वाढतं.

म्हणून ज्या लोकांना घाम जास्त येतो त्यांनी खासकरून उन्हाळ्यात किंवा उन्हात फिरताना हे पदार्थ टाळले पाहिजेत.

ज्याप्रकारे काही पदार्थांमुळे घाम यायचं प्रमाण वाढतं त्याचप्रमाणे काही पदार्थांमुळे ते कमी सुद्धा होतं.

वर आपण पाण्याचं महत्व बघितलंच आहे त्याचबरोबर पचायला हलके असे पदार्थ खाल्ले तर घाम यायचं प्रमाण कमी होतं.

पाण्याचं प्रमाण जास्त असलेली फळं आणि भाज्या जसं की कलिंगड, काकडी, टोमॅटो, द्राक्ष, कोबी सुद्धा फायदेशीर असतात.

ग्रीन टीच्या नियमित सेवनाने सुद्धा फायदा होतो.

९. धुम्रपान करू नका

सिगारेटमधलं निकोटीन हे आपल्या शरीराचं तापमान वाढवतं आणि ते कमी करण्यासाठी आपल्याला घाम येतो.

सिगारेट ओढणाऱ्या लोकांना याच कारणामुळे जास्त घाम येतो त्यामुळे घाम कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर ही सवय सोडणं महत्वाचं आहे.

१०. व्यवस्थित अंघोळ करून स्वच्छता ठेवा

ज्यांना सतत घामाचा त्रास होत असतो त्यांनी घाम येऊन गेल्यावर अंघोळ करून स्वच्छता ठेवणं फार गरजेचं आहे.

कारण घामामध्ये वाढणाऱ्या बॅक्टेरीयामुळे त्वचेच्या तक्रारी उत्भवतात.

व्यायाम जास्त असेल, उन्हात फिरणं असेल तर घाम येणाऱ्या जागा व्यवस्थित साबणाने साफ केल्या पाहिजेत.

या लेखात आपण घाम का येतो, तो येण्यामागची कारणं बघितली.

घामाची दुर्गंधी कमी होऊन त्यामुळे होणारा त्रास कमी व्हावा यासाठी करायचे घरगुती उपाय सुद्धा बघितले.

हे घरगुती उपाय अत्यंत सोपे आहेत आणि यामुळे काहीच अपाय सुद्धा नाही त्यामुळे आपण ते सहज करून बघू शकतो.

पण सतत जर घामाचा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे.

जर घामाबरोबर श्वास घ्यायला त्रास होत असेल, छातीत दुखत असेल तर ती हार्ट अटॅकची लक्षणं असू शकतात.

याचबरोबर रात्री झोपेत खूप घाम येणं, घाम येऊन दमल्यासारखं होणं, वजन खूप कमी होणं किंवा वाढणं, ताप येणं अशा काही गोष्टी होत असतील तर त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणंच अपेक्षित आहे.

काखेमध्ये घामाच्या ठिकाणी घाम शोषणारे काही पॅचेस बाजारात मिळतात. ते बघण्यासाठी यावर क्लिक करा.SlickFix Underarm Sweat Pads Pack of

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।