घर विकत घेणे फायदेशीर का भाड्याने घेणे जास्त फायदेशीर?
सविस्तर जाणून घ्या ह्या लेखात
अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या प्रमुख तीन गरजा आहेत. लहानपणापासून या गरजा आपल्या आई-वडिलांकडून पूर्ण केल्या जातात.
परंतु नोकरीनिमित्त जेव्हा आपल्या घरापासून लांब राहण्याची वेळ येते तेव्हा मात्र आपल्याला या गरजा आपल्या आपणच पूर्ण करायच्या असतात.
नोकरीनिमित्त जेव्हा आपल्या घरापासून लांब दुसरे घर घेऊन होण्याची वेळ येते तेव्हा हा प्रश्न समोर उभा राहतो की स्वतःचे घर घ्यावे की भाड्याच्या घरात राहावे ?
घर स्वतःचे असावे की भाड्याचे यावर अनेकांची अनेक मते असतात. आज आपण या दोन्ही प्रकारांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. स्वतःचे घर आणि भाड्याचे घर या दोन्हींचे फायदे आणि तोटे जाणून घेणार आहोत.
त्यानुसार मग प्रत्येकाला आपल्याला जे जास्त फायदेशीर तसा निर्णय घेणे शक्य होईल.
स्वतःचे घर घेण्याचे फायदे
१. स्वतःचे घर घेणे हे जवळजवळ प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यामुळे घर घेणे शक्य झाले की एक स्वप्नपूर्ती झाल्याचे समाधान मिळते. जीवनाला एक प्रकारचे स्थैर्य येते. काहीही झाले तरी आपल्याकडे स्वतःचे घर आहे या विचाराने नोकरी-व्यवसायात काही धाडसी पावले उचलण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
२. स्वतःचे घर घेण्यासाठी हल्ली बँकांकडून मोठ्या प्रमाणावर होम लोन मिळत असल्यामुळे स्वतःकडची थोडीशी रक्कम गुंतवून घर घेणे सहज शक्य होते.
बँकेचा हप्ता मात्र नियमितपणे भरून कर्जाची परतफेड करणे आवश्यक असते. हल्ली गृहकर्जाचे व्याजदर देखील कमी झाल्यामुळे नोकरदार वर्गाला स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करणे सहज शक्य होते.
३. गृहकर्जाचे हप्ते फेडताना भराव्या लागणाऱ्या व्याजावर इन्कम टॅक्स मधून सूट मिळते.
४. स्वतःचे घर गुंतवणूक म्हणून घेतले असल्यास त्यासाठी भराव्या लागणाऱ्या हप्त्यांवर देखील इन्कम टॅक्स मधून सूट मिळू शकते.
५. स्वतःचे घर घेण्याच्या बाजूने असणारे लोक असे म्हणतात की घराचे भाडे भरून घरमालकाचा फायदा करवून देण्यापेक्षा तीच रक्कम गृहकर्जाचा हप्ता म्हणून वापरून एक वास्तू स्वतःच्या नावावर करून घेणे केव्हाही जास्त फायदेशीर असते.
६. आपल्या राहत्या घराची मालकी स्वतःकडे असली की घरात आवश्यक ते बदल करून घेणे, आपल्याला हव्या त्या सुखसोयी करून घेणे, हे सर्व आपण स्वतः ठरवू शकतो. भाड्याच्या घरात राहताना मात्र या गोष्टी सहजपणे करता येत नाहीत. त्या सर्व गोष्टी घर मालकाच्या मर्जीवर अवलंबून असतात.
७. कोणत्याही कारणाने जरी आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये कमी-जास्त बदल झाले तरी देखील आपले राहते घर स्वतःचे असल्यामुळे जास्त काळजी करावी लागत नाही.
८. राहते घर स्वतःचे असल्यामुळे भाडेकरार संपला की घर बदलणे, वारंवार सामान शिफ्ट करणे या गोष्टी कराव्या लागत नाहीत.
स्वतःचे घर घेण्याचे तोटे
१. हल्लीच्या काळी तरुण मुलांचा लवकर लवकर नोकरी बदलण्याचा तसेच राहण्याचे ठिकाण बदलण्याकडे कल असतो. अशावेळी एका ठिकाणी स्वतःचे घर घेऊन ठेवले की ते वारंवार बदलणे शक्य होत नाही.
मग जर नोकरी बदलल्यामुळे नोकरीचे ठिकाण राहत्या घरापासून लांब गेले तर दररोजचा प्रवासाचा वेळ वाढतो शिवाय खर्चही वाढतो.
दुसऱ्या गावातील नोकरी स्वीकारली तर स्वतः घेतलेले घर एक तर बंद ठेवून किंवा भाड्याने देऊन दुसरीकडे जाऊन राहावे लागते.
२. घर स्वतःचे असले की त्याचा मेंटेनन्स भरण्याची, ती वास्तू व्यवस्थित ठेवण्याची अशी सर्व जबाबदारी घरमालकावर म्हणजेच पर्यायाने आपल्यावर येते.
३. गृहकर्ज घेताना भरावी लागणारी सुरुवातीची रक्कम आणि दर महिन्याला भरावा लागणारा गृहकर्जाचा हप्ता यामुळे पगारातील बराचसा भाग कापला जातो आणि भविष्यासाठी इतर गुंतवणूक करण्यासाठी पुरेसे पैसे उपलब्ध होऊ शकत नाहीत.
४. ज्यांची नोकरी कमी पगाराची आहे अथवा ज्यांना नोकरीची हमी नाही अशा लोकांना स्वतःचे घर घेतल्यास गृहकर्जाचा हप्ता भरणे अवघड होऊन बसते.
तर हे आहेत स्वतःचे घर असण्याचे फायदे आणि तोटे.
आता आपण घर भाड्याने घेतल्यास काय फायदे आणि तोटे होतात ते पाहूया.
घर भाड्याचे असण्याचे फायदे
१. भाड्याच्या घरात राहण्याचा सर्वात प्रमुख फायदा म्हणजे आपल्याला हव्या त्या एरिया मध्ये घर भाड्याने घेणे शक्य होते.
एखाद्या शाळेपासून किंवा हॉस्पिटल पासून जवळ, किंवा मुख्य बाजारपेठेच्या जवळ अशा कोणत्याही एरियामध्ये भाड्याने घर घेणे सहज शक्य असते, परंतु अशाच एरियात स्वतःचे घर घेणे मात्र घरे उपलब्ध नसल्यामुळे किंवा अतिशय महाग असल्यामुळे सहज शक्य होत नाही.
२. नोकरी किंवा व्यवसायाची जागा बदलल्यास भाड्याचे घर बदलणे सहज शक्य होते. तेच जर स्वतःचे घर असेल तर ते सहजासहजी बदलता येत नाही.
हल्लीचे तरुण-तरुणी भराभर नोकर्या बदलत असल्यामुळे स्वतःचे घर घेण्यापेक्षा भाड्याच्या घरात राहणे जास्त पसंत करतात ते याच कारणामुळे.
३. घराचे भाडे जरी भरावे लागत असले तरी गृहकर्जाची सुरुवातीची गुंतवणूक आणि दर महिन्याला मोठा हप्ता असा बोजा नसल्यामुळे घरभाडे भरून पगारातील काही रक्कम गुंतवणुकीसाठी सहज शिल्लक राहू शकते.
४. भाड्याच्या घरात राहत असताना घराच्या मेंटेनन्सची तितकीशी जबाबदारी भाडेकरूवर उरत नाही. तसेच कोणत्याही कारणामुळे भाड्याने घेतलेले घर पटले नाही तर ते सहज सोडून दुसरीकडे घर घेणे शक्य असते.
घर भाड्याने घेण्याचे तोटे
१. भाड्याच्या घरात राहण्याचा एक मोठा तोटा म्हणजे भाडेकरार संपला की ते घर बदलावे लागते. त्यामुळे जर तुम्ही एकाच जागी सेटल झाले असाल तर तिथेच राहणे सोयीस्कर असूनही केवळ ते घर भाड्याचे असल्यामुळे भाडेकरार संपला की ते सोडून नवीन ठिकाणी जाणे तुम्हाला भाग पडते.
२. कायम भाड्याच्या घरात राहिले तर स्वतःची वास्तू घेणे शक्य होत नाही. अशावेळी रिटायरमेंट नंतर एकाजागी सेटल होण्यासाठी बरेच पैसे देऊन महागडी जागा घ्यावी लागू शकते.
तेच जर सुरवातीला घरांच्या किमती कमी असताना गुंतवणूक करून जागा घेऊन ठेवली तर रिटायरमेंट नंतर सेटल होण्याची चांगली सोय होऊ शकेल.
३. भाड्याच्या घरात भाडेकरूला कोणत्याही सुखसोयी स्वतःच्या मर्जीप्रमाणे करून घेता येत नाहीत. अगदी एखादा खिळा जरी ठोकायचा झाला तरी घर मालकाची परवानगी घेणे आवश्यक बनते.
४. घरमालकाने नोटीस दिल्यास भाड्याचे घर सोडून दुसरीकडे जाण्याची तयारी सतत ठेवावी लागते. म्हणजेच एक प्रकारचे अस्थिर जीवन जगणे भाग पडते. घर जर स्वतःचे असेल तर एक प्रकारचे स्थैर्य मिळते.
तर हे आहेत भाड्याच्या घरात राहण्याचे फायदे आणि तोटे.
निष्कर्ष
यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की अगदी कमी पगार असलेल्या लोकांनी तातडीने गृहकर्जाची जबाबदारी डोक्यावर न घेता भाड्याच्या घरात काही वर्षे राहावे आणि सुस्थिर झाल्यावर स्वतःचे घर घेण्याचा विचार करावा.
चांगला आणि नियमित पगार असणाऱ्या लोकांना भाडे भरण्यापेक्षा त्याच रकमेचा गृहकर्जाचा हप्ता भरून स्वतःच्या मालकीचे घर घेणे जास्त फायदेशीर आहे.
कारण असे लोक सुरूवातीपासूनच योग्य गुंतवणूक करून घरांच्या किमती कमी असतानाच घर घेऊन ठेवू शकतात.
स्वतःचे घर घ्यायचे झाल्यास घराचे लोकेशन, सुखसोयी, घराजवळ असणाऱ्या शाळा, हॉस्पिटल ह्या सर्व बाबींचा विचार करावा, कारण सहसा घर घेण्याची गुंतवणूक एकदाच केली जाते.
याचाच अर्थ स्वतःचे घर अथवा भाड्याचे घर दोन्हीचे काही फायदे आणि काही तोटे आहेत, आपली नोकरी, नोकरीचे ठिकाण, बदली होऊ शकते अथवा नाही, आपल्यावरील आर्थिक जबाबदाऱ्या, भविष्यासाठी करायची गुंतवणूक या सर्व बाबींचा विचार करून प्रत्येकाने आपण स्वतःचे घर घ्यावे अथवा भाड्याच्या घरात राहावे हा निर्णय घ्यायचा आहे.
असा निर्णय घेताना या लेखातील मुद्यांचा तुम्हाला कसा फायदा झाला ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख जरुर शेअर करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.