आयुष्याच्या शाळेत शिकून मात्र खूप मोठे तेच होतात जे बहाण्यांच्या मागे दडून बसत नाहीत.. ‘बहाणे बनवण्याची’ म्हणजेच ‘एक्सक्युजेस देण्याची‘ सवय असेल तर ती घालवण्यासाठी काय करावे ते वाचा या लेखात.
‘अगबाई अरेच्चा’ सिनेमा पाहताना त्यातल्या हिरोला कायम त्याची बॉस रागावत असते..
रोज ऑफिसला उशिरा येण्यावरून तर कधी मंत्रालयात जाऊन न झालेल्या कामावरून..
तो हिरो सुरुवातीला ‘तत् पप्’ करत कारणे देताना दिसतो. मात्र नंतर अगदी सराईत माणसाप्रमाणे वेगवेगळे बहाणे सांगायला लागतो.. आणि एकच धमाल उडते.. हस्यांचे फवारे उडतात..
सिनेमात त्यांची मजेशीर जुगलबंदी बघायला खूपच मजा येते.. हो ना..??
पण सिनेमा, सिरीयलमध्ये दाखवले जाणारे असे किस्से सुचतात कसे..??
अर्थातच आपल्याच रोजच्या जीवनातून कथा लेखकाला असे मजेदार शॉट लिहायला सुचतात..
ते पडद्यावर आले की आपल्या मनाला भिडतात.. आणि खूप हासायलाही येते.. कारण असे की आपणही बऱ्याच वेळा असे काही तरी केलेले असते..
बहाणे बनवणे हे कित्येकांच्या अंगवळणी पडलेले असते.. कोणतेही काम न झाल्यामुळे आपल्याला बॉस कडून, आई कडून, बाबांकडून, बायको कडून, नवऱ्याकडून किंवा मुलांकडून ‘कारणे दाखवा नोटीस’ मिळते..
मग काय त्यांना पटवून देण्यासाठी काहींच्या सुपीक डोक्यातून मजेदार बहाणे जन्म घेतात.. आणि आला प्रसंग टाळण्यात आपण यशस्वी होतो..
हे बहाणे योग्य प्रसंगात वापरल्यास हानिकारक नाहीत.. ते बडे बुजुर्ग म्हणतात ना कोणाचे भले होणार असेल तर थोडेसे खोटे बोललेले चालते..
तसेच कोणाचे काही नुकसान होणार नसेल तर कधी कधी हार्मलेस बहाणे चालून सुद्धा जातात.. पण काहींना प्रत्येक गोष्टीत कारणे सांगायची इतकी सवय होते की काम टाळण्यासाठी फक्त ‘बहाणे’ शोधण्याचे काम ते करतात..
जसे आईने गाद्या उन्हं द्यायला ठेवून ये सांगितले तर मला धुळीची ऍलर्जी आहे म्हणून काम टाळणे.
बाहेरून समान आणून द्यायला कोणी सांगितले तर अभ्यासाच्या नावाखाली स्वतःच्या खोलीत बसून गुपचूप गेम खेळत बसणे.
काहींच्या बटव्यात घरातली घराबाहेरची, ऑफिसची कामे टाळणे ह्यासाठी बहाण्यांसारखं जालीम औषध नसतं..!!
म्हणजे काम घरातील असो वा ऑफिस मधील ते टाळण्यासाठी वाटेल त्या थापा मारायला लोक तयार असतात..
काम करायचा आळस म्हणा हवा तर.. पण तो इतका अंगात भरलेला असतो सरळ एखादे खोटे नाटे कारण सांगून कामाची टाळाटाळ करणारे कमी नाहीत..
दुसरे म्हणजे ते काम जमत नसेल तर ‘जमत नाही’ सांगणे म्हणजे केवळ इगो दुखावला जाण्याची शक्यता असते..
म्हणूनही असंख्य कारणे शोधून काढणे हा ‘खेळ बहाण्यांचा’ खूप जण खेळतात..
ह्याची सवय लहानपणापासून नकळत जडत जाते आणि मोठेपणी आपण ‘काम टाळण्याचे १००० बहाणे’ असे पुस्तक लिहू शकू इतके अगाध ज्ञानी होऊन जातो..
मात्र अशी माणसे कितीही चतुर असली तरी कर्तव्यपूर्ती मध्ये शून्यच असतात.. कोणतीही जबाबदारी घेणे ते टाळतात..
आणि कालपरत्वे भावतालचे माणसेदेखील त्यांना कोणत्याही जबाबदाऱ्या सोपवण्यामध्ये कचरतात..
हळू हळू अशा ‘बहाणेबाज’ माणसांचा नाते किंवा मित्रपरिवार सुद्धा त्यांच्या पासून दुरावतो.. हे सगळ्यांनाच नकोसे होतात..
त्यामुळे ‘बहाणे बनवणे’ हे अंगवळणी पडू देणे बऱ्यापैकी धोक्याचे आहे..
कोणतेही काम असो ते न करणारे हे लोक ‘कसं टाळू’ आणि ‘कष्ट टाळू’ ह्या प्रकारात मोडतात…
अशा मुलखाच्या बेजबाबदार लोकांच्या मदतीला कोणीही येत नाही.. आयुष्यात एकलकोंडे होण्याची वेळ येते.. आयुष्यात काहीही करण्यास आपण लायक ठरत नाही..
हे असे आयुष्य नको असल्यास आपल्याला आपली ही सवय घालवायला पाहिजे ना..??
बहाणेबाज स्वभावामुळे आपले ऑफ ट्रॅक झालेले आयुष्य पुन्हा पटरीवर आणायला, आयुष्याची बिघडलेली गणिते ठीक करायला काय काय करावे लागेल ते पाहू.
१. जबाबदारी स्वीकारा:
जबाबदारी घ्यायला शिकणे हा खरा तर संस्कार आहे.. आपण कित्येक गोष्टी करू शकतो त्याची.. आणि आपण चुकलो त्याचीही जबाबदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे..
आपल्याला आयुष्यात काय मिळवायचे आहे त्या दृष्टीने काम करायला लागल्यावर जबाबदारीने वागा..
घरातील जबाबदाऱ्या टाळू नका. आपल्या हातून काही चूक घडली असल्यास तिला मान्य करणे हे देखील धडाडीचे काम आहे..
आपली चूक मान्य करणे मनाचे मोठेपण आहे..!! जो चूक मान्य करतो तोच तिला सुधारून पुढे जाऊ शकतो..
चूक झाल्यावर दुसऱ्या कोणावर ढकलून बहाणे बनवून वेळ मारून नेऊ नका.. त्यापेक्षा चुकीची जबाबदारी स्वीकारा, त्यात सुधारणा करा आणि वाहवा मिळवा..
कारण जबाबदारी घेतल्याशिवाय आपण काहीही शिकू शकत नाही.. आणि शिकल्याशिवाज त्यात तरबेज होऊ शकत नाही..
त्यामुळे आयुष्याची घडी नीट बसवण्याकरता आव्हानं स्वीकारा.. त्यावर जबाबदारीने काम करा.. बहाणे बनवून जबाबदारी टाळणे म्हणजे स्वतःच्याच शक्तीला/ कार्यक्षमतेला कमी लेखणे होय..!!
२. महत्वाच्या कामाकडे लक्ष द्या:
हे सगळ्यांसाठीच खूप उपयुक्त आहे.. ह्याचे एक उदाहरण समोर ठेवते. बघा तुम्हाला लगेच पटेल..
कोणाचे एखादे काम अडले असेल तर सहसा त्याबद्दल माहिती काढायला आपण गूगल करतो..
गूगल करायला मोबाईल हातात घेतला की समोरच फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हाट्सअप दिसते.. त्यावर मेसेजेस आले असल्याचे नोटिफिकेशनही दिसते..
बरं ‘पटकन’ हे बघून मग गूगल उघडू.. काय सांगावं कोणाचा महत्वाचा मेसेज असेल (तसे कोणताच महत्वाचा मेसेज नसतो हे ठाम माहीत असते, तरीही) ह्या बहाण्याने आपण एकेक ऍप बघायला लागतो..
त्यात बराच वेळ मोडतो.. शेवटी महत्वाचं गूगल काय करायचं होतं तेही विसरून जातो..
म्हणजे बहाणे काढायला सुरुवात झाली तर महत्वाचे कामही आपण विसरून जातो.. नसत्या गोष्टींचे पाल्हाळ लावत बसतो..
आणि ‘आता काही जमणार नाही’ असे दिसल्यावर हात वर करतो. कामातून अंग चोरून घेतो.. त्यावर कडी म्हणून अजून एक बहाणा जन्माला घालतो..
हे दुष्टचक्र आहे मित्रांनो.. त्यामुळे हे टाळण्यासाठी आपल्याला नक्की काय करायचे आहे ह्यावर फोकस करणे जरुरीचे आहे.. आणि सध्या फक्त त्यावरच काम करणेही..!!
३. आयुष्य ही सुद्धा एक शाळाच समजा:
सहसा बहाणे बनवायची ‘तलफ’ तेव्हाच येते जेव्हा हाती घेतलेले काम आपल्याला जमत नसते.. कोणतेही काम कोणालाही सुरुवातीला जमतच नसते.. एखाद्या क्षेत्रातील एक्स्पर्ट हा जन्मतः एक्सपर्ट नसतो हे लक्षात घ्या..
कोणत्याही कामात प्राविण्य मिळवायचे असेल तर ते शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकून घेतले पाहिजे.. हल्ली इन्स्टंटच्या जमान्यात आपण पेशन्स विसरलोच आहोत..
कितीही चांगली क्रिकेट येत असली तरी टी-ट्वेन्टी पेक्षा खरा कस कसोटी सामन्यांतच लागतो हे माहीत आहे ना..??
त्यामुळे जे खेळाडू फक्त झटपट पैशांसाठी आणि प्रसिद्धीसाठी फास्ट क्रिकेट खेळलायच्या नादाला लागतात आणि कसोटी क्रिकेट खेळायचे कष्ट टाळतात ते काळाच्या ओघात हरवूनही जातात..
मित्रांनो त्यामुळे आयुष्यात कष्टांना पर्याय नाही.. सगळेच काही तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला येत नाही..
आयुष्याच्या शाळेत शिकून मात्र खूप मोठे तेच होतात जे बहाण्यांच्या मागे दडून बसत नाहीत..
त्यामुळे आयुष्यात कितीही चॅलेंजेस आली तरी बहाण्याच्या मागे कशाला लपायचे..?? आयुष्य कोणाचे परफेक्ट असते..??
आयुष्य ही एक शाळाच आहे.. अनुभव येत राहतात आणि आपण शिकत मोठे होतो.. नाही जमलं एखादं काम तर हरकत नाही..
त्यावरचा अभ्यास वाढवा आणि प्रयत्न वाढवा.. नुसते हातावर हात देऊन बसले की कोणतेही कोडे सुटत नाही.. उतरा मैदानात आणि बहाण्यांना टाका कुलुपात..!!
४. भविष्याचा विचार करा:
जसे वर म्हटले की इन्स्टंट च्या नादाला लागून आपण कृतीवार, तपशीलवार काम करायलाच विसरलो आहे..
आयुष्यात मोठे ध्येय असेल तर त्यासाठी खूप कष्ट घ्यायची तयारी हवी.. म्हणजे मोठेपणी डॉक्टर बनायचं म्हणायचे आणि सायन्स अवघड जातंय ह्या बहाण्याने तसंतास व्हीडीओ गेम खेळत बसायचं.. मग कसे होणार डॉक्टर..??
आयुष्यात जे मिळवायचे आहे ते टप्प्या टप्प्याने मिळवायचे. अवघड गोष्टी एकत्रित सोडवायला घेतल्यावर अर्थातच आपल्याला झेपणार नाहीत..
आणि झेपल्या नाहीत की आहेच ‘सुटसुटीत कारणे द्या कार्यक्रम’..!!
सतत पण, किंतु, परंतु असे म्हटल्याशिवाय आपले समाधानच होत नाही… अमुक करायचे आहे पण.. असे म्हणून जर तुमचे वाक्य संपत असेल तर तुम्ही कळत नकळत बहाण्यांच्या आहारी जात आहात..
त्यामुळे हळूहळू प्रयत्नपूर्वक आपल्या लाईफ-गोलवर लक्ष केंद्रित करावे.. बहाणे बनवायच्या तीव्र इच्छेवर ताबा मिळवायचा. आणि आपले काम साधून घ्यायचे..
५. चॅलेंज स्वीकारा:
बहाणेबाज बनायचं नसेल तर सगळ्यात आधी स्वतःला कॉम्पिटीटीव्ह बनवा.. आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला सामोरे जायची तयारी ठेवा..
ऑफिसच्या अन्युअल फ़ंक्शन मध्ये अचानक कोणी स्टेज वर जाऊन बोलायला सांगितले तर घाम फुटतो..
अशा वेळी कोणी स्टेज वर जायला सांगूच नये म्हणून आपण वॉशरूम मध्ये जाऊन टाईम पास करतो.. जेणे करून आपले हसे होणार नाही..
अहो पण तुम्ही स्टेज वर जाऊन २ शब्द बोलल्यावर मिळणारे कौतुकाचे बोल हे बहाण्यापेक्षा अनमोल नाहीत का..??
ती सॉफ्ट ड्रिंक ची जाहिरात माहीत आहे ना..??
डर सबको लगता है.. गला सबका सुखता है.. लेकिन डर के आगे…??? जीत है..
बहाणा हा ‘डर’ ची आणि डरपोक असण्याची निशाणी आहे.. त्यापेक्षा हिम्मत वाढवा.. आव्हानं स्वीकारा..
एकदा चॅलेंज स्वीकारून जिंकायची सवय लागली तर बहाणा हा शब्द सुद्धा तुमच्या डिक्शनरीतुन नाहीसा होईल..
तिथे शब्द उरतील ते फक्त आत्मविश्वास, कार्यक्षमता आणि यश..!!
तर मंडळी बहाणेबाज नाही तर धमाकेदार बनायचा प्रयत्न करूया.. ह्या प्रक्रियेत आपल्या मित्रमंडळीतील अट्टल बहानणेबाजांना सुद्धा स्वतःपासून दूर ठेवा.. वाण नाही पण गुण लागतोच हो की नाही..??
विचार करा, आपल्याला आपल्या लक्षापासून दूर करेल तो बहाणा कितीही सोयीस्कर असला तरी काय कामाचा..??
बहाणे नाही आपली मदत करत.. ते तात्पुरते सोल्युशन असते.. जे भविष्यात मोठी अडचण बनून आपल्यासमोर येऊन उभे ठाकतात..
आणि त्या अडचणींना सोडवता सोडवता आपल्या नाकी नऊ येतात.. त्यामुळे सोडा ते बहाणे आणि सुरू करा आत्मविश्वासाने पुढे चालणे..
हा लेख आवडल्यास आवर्जून कॉमेंट करा आणि शेअर करायला ‘विसरण्याचा बहाणा’ सांगू नका हं..!! 🤗😀
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Perfect 👍