एक गृहिणी, आई आनंदी राहून तिच्या महत्वाकांक्षा कशा पूर्ण करू शकते?

प्रश्न – मी एक गृहीणी आहे, काही मजबुरीमुळे अवघ्या विसाव्या वर्षी माझे लग्न झाले, माझे माझ्या नवर्‍यावर खुप प्रेम आहे, इतके की आम्ही एकमेकंचे नवराबायको कमी आणि मित्रमैत्रीणच जास्त आहोत. तरीही आमच्या दोघांच्या स्वभावामध्ये खुप खुप फरक आहे, त्याचा माझ्यावर आणि आमच्या नात्यावर परीणाम होत आहे.

  • मी कलेच्या प्रातांत रमणारी, आणि त्यांचा मात्र कुठल्याही कलेशी दुरदुरपर्यंत संबंध नाही,
  • मला पर्यटनाची आवड, नवनवीन ठिकाणी फिरावं वाटतं, त्यांना ह्या सगळ्याची अजिबात आवड नाही!
  • मी महत्वकांक्षी, मला नेहमी नवनवीन क्षेत्रात काही जाणुन घेण्याचा, काही करुन दाखवण्याचा, ध्यास असतो, यशप्राप्तीचं वेड असतं, आणि आमचे हे मात्र आहे त्यात एकदम समाधानी असतात, एकदम अल्पसंतुष्ट!
  • मला खुप सुंदर, वेल फर्निश्ड, मोठ्या यशस्वी, हौशी, हुशार लोकांच्या सहवासात घर हवं आहे, आत्ता जिथे राहते तिथे मध्यमवर्गीय, सतत निगेटीव्ह बोलणारी, कुरकुर करणारी, मागास विचारांची माणसं अवतीभवती आहेत.
  • मला लहान मुलगा आहे, घरकाम करणं मला आवडत नाही, कधी कधी हे सगळं खुप फ्रस्ट्रेटींग वाटतं, मला फ्रेंड सर्कलही नाही, माझी आतुन खुप इच्छा असते पण घर सोडुन बाहेर पडताही येत नाही.
  • मला खुप पैसे कमवायचे आहेत, पण त्यासाठी नेमकं काय करु हेच मला मुळी समजत नाही. अनेक कल्पना मनात येतात, पण स्वभाव आळस, टाळाटाळ आणि चालढकल करण्याचा बनला आहे, त्यामुळे अजिबात प्रगती होत नाही.
  • मला लोकांची सेवा आणि मदत करता करता, त्यांना प्रोत्साहन देत देत, असं काहीतरी करायचं आहे की जिथे मला माझे छंद जोपासता येतील, आणि सुखद फायनान्शिअल लाईफ जगता येईल.

मार्ग सुचवा!

मॅडम, अभिनंदन! आपण कसलाही आडपडदा न ठेवता, अत्यंत परखडपणे आपला प्रश्न मांडलात, मला वाटतं, हा एका स्त्रीचा प्रश्न नसुन, ही ‘कहाणी घर घर की’ आहे.

वरील एकाच प्रश्नात, आपण वेगवेगळ्या स्वभावाच्या जोडीदरांशी सामंजस्य, मागास विचारांच्या माणसांची नको असलेली संगत, करीअर कशात करावे हा प्रश्न आणि चालढकल आणि आळस यांच्यावर मात कशी करावी? न आवडणारे घरकाम, असे अनेक सारे प्रश्न विचारलेत.

आपण एकेक प्रश्नावर उत्तर शोधुया!

१) जोडीदाराच्या आणि माझ्या आवडीनिवडी वेगवेगळ्या आहेत.

तुम्हाला काय वाटते? आपण जर सर्व्हे केला तर किती जोडपी एकमेकांसाठी परफेक्ट मॅच असतील?

बहुतांश लग्न झालेले लोकं खरं खरं बोलायला लावलं तर असं सांगतील की आमचे स्वभाव खुप परस्परविरोधी आहेत, भांडण, चिडचीड आणि वादविवाद सोडुन आमच्यात कधीच लवकर एकमत होत नाही. असे का व्हावे?

अहो! दोन भिन्न माणसं आयुष्याभरासाठी एकत्र आले की असं होणारचं! ही तर त्या विधात्याची किमया आहे, की प्रत्येक माणुस एकदुसऱ्यापेक्षा वेगळा बनवला आहे.

सगळ्या माणसांचे स्वभाव आवडीनिवडी सगळे, एकदम, तंतोतंत एकसारखे मिळतेजुळते असले असते, तर आपलं सगळ्यांचं जगणं एकदम, एकसुरी, बोअरींग झालं नसतं का?

ह्या जगात साडेसहा अब्ज लोकं राहतात आणि प्रत्येक जण एकदुसऱ्यापासुन वेगळा आहे, आणि ह्या जगातला प्रत्येक माणुस एकमेवद्वितीय आहे, प्रत्येक जण अनोखा आहे, प्रत्येक जण असाधारण आहे.

दोन वेगवेगळ्या भिन्न स्वभावाची माणसं एकत्र येऊन जेव्हा जीवनभराची गाठ बांधतात, तेव्हा ते परस्परविरोधी राहत नाहीत, परस्परांना पुरक होवुन जगण्याची प्रतिज्ञा करतात.

म्हणुन तर लग्न केल्यावर जगण्याची लज्जत वाढते.

जे आपल्याकडे आहे, त्याची जोडीदाराला आवड लावावी, आणि त्याला जे आवडतं, त्यात आपणही समरसुन आनंद घ्यावा!

हातात हात घट्ट पकडल्याने अवघड वाट सोपी होते, मनाने एकटं एकटं राहीलं की क्षुल्लक प्रश्नही अक्राळविक्राळ रुप धारण करतात. जोडीदारामध्ये मन गुंतलेलं असलं की जगायला हुरुप येतो.

देणं आणि घेणं, ह्या कृतींनीच आयुष्याला नवा अर्थ प्राप्त होते, नाही का?

हवं तर तुमच्या आजुबाजुच्या लग्न न झालेल्या मुलामुलींचं निरीक्षण करा, त्यांच्या आयुष्यात एकटेपणा, अस्वस्थता, पोकळी जाणवते की नाही बघा!

मनापासुन प्रयत्न केले तर एक स्त्री आपल्या वागण्या-बोलण्याने, आपल्या नवऱ्याला जिंकुन घेऊ शकते, त्याच्या मनावर राज्य करु शकते, इतकेच नाही तर त्याला अंतर्बाह्य बदलवु शकते.

प्रश्न एवढाच उरतो की, आपण त्यासाठी, न कंटाळता, दररोज, किती प्रमाणात योगदान देण्यास तयार असतो?

तेव्हा तुमचा जोडीदार जसा आहे तसा त्याचा स्वीकार करा, उत्साहाने रोज त्याला एका नव्या रुपात भेटा, कळत नकळत तुमच्या जगण्याविषयीच्या कल्पना त्यांच्यासमोर आकर्षक रुपात मांडत रहा!

प्रामाणिकपणे त्याच्यावर प्रेम करा, शक्य तिथे सेवा करा, तुमच्या सर्व इच्छा पुर्ण होतील.

२) नको असलेली संगत

तुम्हाला तुमच्या आजुबाजुची नकारात्मक विचारांची काही माणसं आवडत नाहीत, हे योग्यच आहे.

पण हा काही प्रॉब्लेम नाहीच आहे!

आपल्याला हवे ते मित्र मैत्रीण बनवण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. नकारात्मक लोकांपासुन परीश्रमपुर्वक चार हात लांब रहा. त्यांच्याशी कामापुरता संवाद करा.

पुस्तकं आणि व्हिडीओ ह्या मार्गांनी अनेक दिग्गज लोक तुमचे जिवलग मित्र बनु शकतात.

३) करिअर कशात करु? खुप सारे पैसे कसे मिळतील?

वरवर गहन, कठिण आणि जटील वाटणारा हा प्रश्नही तसा सोपा आहे. करीअर त्या क्षेत्रात करा, असं काम जे तुम्हाला तहानभुक विसरुन, त्या कामामध्ये तुम्हाला हरवुन जायला आवडतं.

तुमचं पॅशन आणि तुमची तीव्र इच्छा, तुमच्याकडुन, नकळतपणे, तुमची सारी स्वप्ने झपाट्याने पुर्ण करवुन घेतील.

  • लिहायला आवडतं, तर रायटर व्हा.
  • बोलायला आवडतं तर टीचर व्हा.
  • लोकांना मदत करायला आवडतं तर कन्सल्टन्सी उघडा.
  • नवनव्या एंटीक वस्तुंचा छंद असेल तर ऑनलाईन बिजनेस करा.
  • डिझाईनचा सेन्स असेल तर त्याच्याशी संबंधित व्यवसाय निवडा.
  • आर्थिक साक्षरतेबद्द्ल इंट्रेस्ट असेल तर म्युचल फंड, शेअर मार्केट, इन्शुरंसचे क्षेत्र निवडा.
  • खाण्यापिण्याच्या हौशी असाल तर मस्त हॉटेल सुरु करा, आणि लोकांना चवदार पदार्थ उपलब्ध करुन द्या.

खुप काही आहे करण्यासारखे!

तुम्ही म्हणालात की तुम्हाला ध्यानधारणा, आर्थिक स्वातंत्र्यता, पास्ट लाईफ रिअलायजेशन, एस्ट्रॉलॉजी, न्युमरालॉजी, रेकी या आणि अशा कित्येक विविध क्षेत्रातले ज्ञान आहे.

आतापर्यंत तुमच्या मनाच्या लॉकरमध्ये बंद पडुन, सुप्त अवस्थेत असलेले हे बहुमुल्य ज्ञान लोकांच्या भल्यासाठी तुम्हाला वापरायची इच्छा होते आहे, हे तुम्हीच शोधलेले उत्तर नाही का?

कुठल्याही व्यवसायाची ऑनलाईन पब्लिसीटी करणं, आजकाल किती सोपं झालं आहे?

टॅंलेंट असेल तर तात्काळ त्याचं सोनं होण्याचा, कमी वेळात खुप काही गाठण्याचा, काळ आहे सध्याचा!

४) चालढकल, अनिर्णय, आळस आणि टाळाटाळ

आयुष्यात अशी सुस्ती केव्हा येते माहीतीये?

एकतर जेव्हा आपली सारी स्वप्ने पुर्ण झालेली असतात, तेव्हा! किंवा आपल्या डोळ्यासमोर स्पष्ट ध्येय नसतात तेव्हा!

साधारणतः आपल्या सर्वांसाठी दुसऱ्या कारणाची शक्यता आधिक असते, म्हणुन आळस अंगात घुसतो.

  • तुमचं एक वर्षांनंतरचं ड्रिम लाईफ तंतोतंत कागदावर उतरवुन काढा.
  • येणारे एकवीस दिवस रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री जेव्हा आठवेल तेव्हा त्याचं मोठ्याने वाचन करा.
  • अंतरमनात एकदा ध्येय रुजलं की अंतर्मन तुमच्याकडे हजारो नव्या कल्पना पाठवेल.
  • त्यावर तात्काळ अंमल करा.

फिजीकली एक्टीव्ह राहीलं की आळस आपल्या वाटेला येत नाही.

जिम, एरोबिक्स, झुंबा ह्यापैकी ज्यात रस असेल ते करा, काहीही नसेल तर रोज नित्यनेमाने एक तास वॉकींगला जा.

निग्रहाने मनाला ताब्यात ठेवुन लावलेली एक सवय तुमचं आयुष्य बदलुन जाईल.

आळसाला जीवनातुन हद्द्पार करा आणि तुम्ही स्वप्नांच्या दिशेने अनेक पावलं पुढे गेल्याचा अनुभव घ्या.

५) घरकाम तुम्हाला आवडत नाही!

तुमच्या ह्या म्हणण्याशी मी शंभर टक्के सहमत आहे.

भांडी, धुणी आणि स्वयंपाक करायला, आणि कामवाली बाई बनुन इतरांची सेवा करायला, तुमचा जन्म झालेला नाही.

जसंजसा तुमचा व्यवसाय पाळेमुळे धरेल तसंतसं तुम्ही मेड, हेल्पर यांच्या मदतीने तुमचा वेळ तुम्हाला आनंद वाटणाऱ्या गोष्टींमध्ये व्यतीत करु शकता.

छंद, पार्टी, पर्यटन, वाचन, लेखण अशा गोष्टींना वेळ देऊ शकता.

पण तोपर्यंतही करावं लागणारं काम शिक्षा समजुन का करावं?

कोणतंही काम रुक्षपणे केलं की त्यातला रस संपतो, मग ते घरकाम असो वा ऑफीसचं काम!

आपला नवरा, आपला मुलगा यांची घरातली काम करणं, हसत खेळत एंज्यॉय करणं, इतके अवघडही नाहीये!

आपली माणसं, आणि त्यांच्यावर असलेलं आपलं जीवापाड प्रेम, आपल्याला त्यांच्यासाठी अजुन काम करायला उर्जा देतं!

  • अनावश्यक विचारांचं बॅगेज फेकुन द्या, रोज नित्यनेमाने अर्धा-पाऊण तास ध्यान करा.
  • नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही एक सुपर मॉम आहात, स्पेशल आहात, अगदी तसंच ह्या जगातली प्रत्येक व्यक्ती स्पेशल आहे, प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेचा आदर करा.
  • चांगली कर्म, आणि अंतःकरणातुन केलेली सेवा तुम्हाला चक्रवाढ व्याजाने सुख, संतोष, समाधान देऊन जाईल.

नव्या उमेदीने आयुष्याला सामोरे जाण्यासाठी खुप खुप शुभेच्छा!

धन्यवाद!

वाचण्यासारखे आणखी काही…

प्रासंगिक
पालकत्व
प्रेरणादायी/MOTIVATIONAL

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।