स्वतःवर होणारी टीका सकारात्मक रीतीने स्वीकारून आयुष्यात यश कसे मिळवाल? वाचूया ह्या लेखात.
माणूस जन्माला आला की त्याच्या आयुष्याला कौतुक आणि टीका दोन्ही चिकटते. लहानपणी फक्त कौतुक वाट्याला येते.
मात्र जसजसे कळण्या – सवरण्याचे वय होऊ लागते तसतसे हळू हळू ‘टीका’ नामक घटना घडू लागतात..
आई, वडील, बहीण भावंड, मित्र मैत्रिणी, शिक्षक सगळेच आपल्याला चुका दाखवतात आणि आपल्या चुकीच्या गोष्टींवर टीका करतात..
आणि पुढे मोठे झाल्यावर आपल्यावर चोहोबाजूने टीका होत असते. टीका हा आयुष्याचा जणू अविभाज्य भागच बनते.
पण.. जसे कौतुक सगळ्यांना हवे हवेसे असते तशी टीका कोणालाच आवडत नाही. सहाजिकच आहे.
स्वतःबद्दल वाईट ऐकून घेणे कोणाला रुचत नाही. काही जणांना जरासे दोष दाखवून दिले तर ते खूप रागावतात, अबोला धरतात.
काहींना टीका सहनच होत नाही, अगदी स्वतःचे बरे वाईट देखील करून घ्यायला ते धजावतात.
पण अशीही मंडळी समाजात आहेत.. जी टीकेला, गेंड्याची कातडी पांघरून सामोरे जातात.
कितीही काहीही बोला, त्यांना काडीचाही फरक पडत नाही. टीकेला ते जरूर स्वीकारतात पण कामात त्याचा अडथळा येऊ देत नाहीत.
ते त्यांच्या कामात प्रामाणिकपणा ठेवतात आणि जगाला आपले कर्तृत्व गाजवून दाखवतातच.
उदाहरणार्थ, सांगायचे झालेच तर सचिन तेंडुलकर किंवा अमिताभ बच्चन यांसारखे यशस्वी लोक टीकेला सकारात्मकतेने स्वीकारतात आणि आयुष्यात कायम यशस्वी होतात.
आयुष्यात टीका आणि टीकाकार असलेच पाहिजेत. ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ अशी म्हणच आहे..
कारण आपल्यातले दुर्गुण आपल्याला चटकन दिसत नाहीत, मात्र कोणी दाखवल्यास त्यात सुधारणा करणे आपले कर्तव्य आहे.
असे केल्याने आपण माणूस म्हणून खूप प्रगती करतो. आपल्यातील कमजोर बाबींवर आपण काम केल्यास आपला आत्मविश्वास वाढतो, योग्य तऱ्हेने काम करण्याची क्षमता वाढते.
पण अशा सकारात्मक पद्धतीने आपल्यावरील निंदा आपल्याला स्वीकारणे सहज शक्य आहे का? नक्कीच आहे.
कशी ते जाणून घेऊया.
१. कोणत्याही टीकेला उत्तर देण्याआधी थोडा विचार करा:
उथळ स्वभावाची माणसं अतिशय अधीर असतात. झटक्यात प्रतिक्रिया देऊन मोकळे होतात.
पण ही अशी इम्पेशंट रिऍक्शन देऊन आपण काय साध्य करतो? आपल्यावर ज्या विषयाची टीका होत असेल त्या विषयात आपण कुठे कमी पडत असू तर अशा अधीर उत्तरांमुळे आपण त्या टीकांना खरे ठरवतो आणि आपले हसे करून घेतो.
त्या पेक्षा जी टीका होतेय त्यावर शांतपणे विचार करा.
समोरच्याने काहीतरी म्हटलेय म्हणजे ते आपल्याला लागू होतेच असा अर्थ काढू नका.
जरा समोरच्याचे मत जाणून घ्या. विचार करा आणि शांतपणे आपले उत्तर द्या, आपले म्हणणे मांडा. ह्यातून तुम्हाला त्रास कमी होणार हे नक्की.
२. सकारात्मक टीका आणि नकारात्मक टीका ह्यातला फरक जाणून घ्या:
काहीजण आपले हितचिंतक असतात. त्यांनी केलेली टीका ही आपल्यामध्ये सुधारणा व्हाव्यात अशा शुद्ध हेतूने केलेली असते.
त्या उडवून लावल्यास आपलेच नुकसान. अशा सकारात्मक टिकांवर जरूर विचार करावा.
शक्य असल्यास त्यावर मंथन करून त्यांना कसे सुधारता येईल ह्यावर भर द्यावा. लक्षात ठेवा आपले हितचिंतक टीकाकार आपल्यात होणाऱ्या सुधारणांमुळे आपले कौतुक करण्यासही मागे पुढे पहात नाहीत.
मात्र डाळीत काही खडे असतातच. काही विघ्नसंतोषी माणसे तुम्हाला जिव्हारी लागेल अशी टीका त्यांना स्वतःला आनंद मिळावा म्हणून करत असतात..
अशा टीकेने तुम्ही खचून गेलात आणि मागे पडलात तर त्यांना आनंदच असतो. किंबहुना तुमचे पाय मागे ओढायललाच ते तुम्हाला डिवचू पाहत असतात.
अशा माणसांना समोरच्याच्या भावनांबद्दल काहीही घेणे देणे नसते.
सध्या तर सोशल मीडियावर होणारे ट्रोलिंग हे सुद्धा ह्याच नकारात्मक टीकेचा भाग आहे असे म्हणायला हरकत नाही.
असे ट्रोलर्स, असे नकारात्मक टीकाकार दुसऱ्यांना आयुष्यातून उठवायचा आपला मनसुबा पूर्ण करून घेत असतात.
आपल्याला ह्या नकारात्मक टीकेपासून नक्कीच लांब राहायचे आहे. त्यामुळे सकारात्मक आणि नकारात्मक टीकेतला फरक जाणून घ्या.
आणि स्वतःवर कशाचा परिणाम होऊन द्यायचा किंवा न होऊन द्यायचा हे ठरवा.
३. नकारात्मक टीकाकारांकडे थेट दुर्लक्ष करा:
ट्रोलर्स आपले कोणीही सगेसोयरे नसतात. आपल्याला त्यांच्या असण्या नसण्याचा कोणताही फायदा नसतो, ना तोटा.
त्यामुळे ह्यांचे हृदयाला दुःख देणारे विचार आपण ऐकून घ्यायची गरजच नसते. अशांना सरळ फाट्यावर मारणेच योग्य असते.
ते जे काही तुमच्या बद्दल बोलतात ते तुमचे प्रतिबिंब किंवा रिफ्लेक्शन नाहीच असेच समजा आणि पुढे चला. नकारात्मक टीकाकारांना दुर्लक्ष करून त्यांना त्यांचा रस्ता दाखवा.
४. सकारात्मक टीका सुद्धा हुशारीने स्वीकारा:
टीका किंवा टीकाकार सकारात्मक असला तरी सध्याच्या घडीला त्या टीकेवर लक्ष देऊन आपल्यात सुधारणा करणे योग्य आहे का नाही ते ठरवता आले पाहिजे.
कारण काही जणांचे अनुभव विसाव्या शतकातील असतात त्यामुळे एकविसाव्या शतकात ते चपखल बसतीलच असे सांगता येत नाही.. मग त्यांच्या टीकेचे मुद्दे सुद्धा कालबाह्य असू शकतात.
त्यामुळे अगदी जवळच्या व्यक्तीने टीका केल्या म्हणणे जरूर ऐकून घ्या आणि तुमचा मुद्दा कसा योग्य ठरतोय हे समजावून जरून सांगा.
५. स्वतःवर विश्वास ठेवा:
आपल्यावर झालेली टीका, आपल्या काढल्या गेलेल्या चुका जरी योग्य असल्या तरी त्यामुळे खचून जाऊ नका.
त्यामुळे आपल्यातला आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. कारण चुका कळल्यावर त्यात सुधारणा करण्यासाठी आपल्याला आपल्याच आत्मिक शक्तीची गरज असते. नकारात्मक मनस्थितीत आपण कोणतेच कार्य यशस्वीपणे सध्य करू शकणार नाही.
टीकेची मदत करून घ्या. टीकेमुळे खचून कधीच जाऊ नका.
६. टीकेवर तोडगा काढण्यास सुरुवात करा:
एव्हाना आता तुम्हाला टीका कोण करतंय, का करतंय, ती नकारात्मक आहे की सकारात्मक ह्या बद्दल बरेच समजले आहे.. मग झालेल्या निंदेकडे वळूया.
ती जर अगदीच कुचकामी आणि विनाकारण केलेली असल्यास तिला दुर्लक्षित करा. मात्र एखादी टीका, चूक दुरुस्त केल्यास आपल्याला खूप फायदा मिळणार असेल तर तिचे सोल्युशन शोधायला घ्या.
एखादा दुर्गुण ज्यावर वारंवार टीका होते तो पूर्णतः सुधारल्यास, ज्याने आपल्याला तो दुर्गुण दाखवला ती व्यक्ती भविष्यातही आपल्याला मित्रत्वाच्या नात्याने सल्ले देते, मार्गदर्शन करते आणि कायम आपले हीत चिंतते.
ह्याचा अनुभव तुम्हालाही नक्कीच येईल.
७. टीकेतून धडा घ्या:
जर आपल्याला टीका सहन करणे शक्य नसेल तर आपण स्वतः सुद्धा दुसऱ्यावर टीका करण्यास अपात्र ठरतो हा अलिखित नियमच आहे जणू.
त्यामुळे आपल्यावर होणाऱ्या टीकेतून आपण काही शिकलो, सुधारलो तर दुसऱ्यांसाठी आपण एक सुयोग्य उदाहरण ठरतो.
आणि आपणही आपल्या जवळच्या लोकांना त्यांच्या चुका दाखवण्यास त्यांना मार्गदर्शन करण्यास पात्र ठरतो.
त्यामुळे आपण दुसऱ्यावर टीका करताना सुद्धा शांत संयमित भूमिका घेतो जी आपल्यावर टीका होताना दुसऱ्यांकडून आपल्याला अपेक्षित असते.
ह्यातून आपण सुद्धा एक जबाबदार आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व म्हणून विकसित होतो.
तर मंडळी आपल्याला दुसऱ्यांसाठी नव्हे तर स्वतःसाठी बदलणे गरजेचे आहे. एक उत्तम व्यक्तिमत्व बनण्यासाठी हे महत्वाचे आहे. त्यामुळे आयुष्याच्या शाळेत टीका होणे हा अविभाज्य भाग असणारच.
त्याचा स्वतःवर कसा आणि किती परिणाम करून घ्यायचा हे आपल्याला कळलेच पाहिजे. टीकेमुळे सगळे कार्य थांबता कामा नये. आणि कामात उदासीनता सुद्धा यायला नको.
टीकेमुळे आपण स्वतःचीच सुधारित आवृत्ती बनुयात.. त्यामुळे निंदकांना दूर करू नका.
प्रेमळ निंदक तुम्हाला उत्तम माणूस बनवतील आणि दुष्ट निंदक काहीही करू नाही शकले तरी तुमची करमणूक नक्कीच करतील…!!
तो डटे रहो और चलते रहो..!! यश तुमचेच असेल…
https://manachetalks.com/9256/tikela-samor-ks-jaych-marathi-prernadayi-lekh-manachetalks/
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.