आज या लेखात ‘एकूणच मजेत जगण्यासाठी’ कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं, स्वतःमध्ये कोणते बदल घडवावे याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे.
यात तुम्हालापण तुमच्या अनुभवातून काही गोष्टी जाणवल्या असतील तर त्या मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.
मित्रांनो, विषय सुरु करण्याआधी तुमचं आयुष्य समृद्धी, आरोग्य, आणि आनंद ह्यांनी भरलेलं राहो…
संयमाची देणगी, तुमच्या सद्गुणांचं पुण्य, तुमच्या ज्ञानाचं मूल्य, तुम्हाला मिळो, आणि तुमच्या विश्वासाच्या प्रभावाने तुमची कार्यक्षमता आणि तुमची स्वप्न मोठं यश खेचून आणतील.
‘सिधी बात नो बकवास’ असं काही आम्हाला बजावणार असाल तर, एकूणच तुम्ही मजेत राहावं यासाठी “मनाचेTalks” कडून तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा.
आता ‘एकूणच मजेत’ असं का म्हंटल?
‘एकूणच मजेत’ असण्यासाठी काय लागतं??
व्यावसायिक कौशल्य, चांगलं व्यक्तिमत्त्व, चांगली शारीरिक, मानसिक परिस्थिती, चांगली कल्पनाशक्ती, चांगली निर्णयशक्ती, आत्मविश्वास, निश्चयीपणा….
आज या लेखात असंच ‘मजेत जगण्यासाठी’ कोण कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं, स्वतःमध्ये कोणते बदल घडवावे याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. यात तुम्हालापण तुमच्या अनुभवातून काही गोष्टी जाणवल्या असतील तर त्या मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.
बालपण संपलं, शिक्षण झालं पुढच्या काही गोष्टींबद्दल आता आपण बोलू!!
बाजारपेठेतल्या यशाची कौशल्ये आत्मसात करण्यासाठी काय करावं?
व्यवसाय, धंद्यात उतरताना सहसा विचार असतो कि “यात आपण जर पडणार आहे, तर यश मिळवलंच पाहिजे.”
सुरुवातीला आपण व्यवसायात कच्चा लिंबू असतो. बाजारपेठ खूप मोठी असते. आणि तिथे सतत नवीन नवीन संधी उपलब्ध होत असतात.
नवीन कामं मिळत असतात. त्यासाठी तुम्हाला सतत अपडेट असायला लागतं, आणि त्यासाठीची तयारी सुद्धा तुम्हाला करायला लागते.
तुमच्याकडे चालू वर्षात खर्च करण्यासाठी भांडवल उपलब्ध असते, आणि तो खर्च करताना पुढच्या वर्षात करायला लागणाऱ्या खर्चाची तरतूद करून ठेवायला लागते.
पुढच्या दहा वर्षात खर्च करायला त्या पुढच्या दहा वर्षाची तरतूद हा खर्च करत असतानाच करावी लागते.
नीट नियोजन करून हे सगळं केलं तर व्यापारात, व्यवसायात चांगले दिवस, घरात पैसा खेळता असल्याने समृद्धी आणि मग आनंदी जीवन हे सगळं पुढचं गणित जुळत जातं.
हे सगळं जुळवून आणण्यासाठी लागणारी कौशल्ये ही आपल्याला यशाकडे घेऊन जात असतात. पुढच्या खर्चाची संपूर्ण तरतूद, येणाऱ्या संधीसाठी सतत तयार राहायचं, त्या संधीला मिळवण्याची तयारी करायची, ही सगळी कौशल्ये वापरण्या साठी स्वतः तयार होत जायचं.
स्वतः ला तयार केलं तर तुम्ही खूप मोठी प्रगती करू शकता. म्हणून स्वतःला तयार करण्याचं महत्व खूप मोठं आहे.
मग आता स्वतःला तयार कसं करायचं?
स्वतःला तयार करण्याच्या मार्गात महत्त्वाचा ठरतो तो वैयक्तिक विकास…
वैयक्तिक विकास म्हणजे पुढे जाण्यात प्रगती. वैयक्तिक विकास म्हणजे एक प्रकारचा संघर्षच आहे. वैयक्तिक विकास म्हणजे आव्हान…
स्वतःला तयार करायचं म्हणजे जसं अगदी सोपं नाही. तसं अशक्यही नाही हे विसरू नका.
मुळात संघर्ष केल्याशिवाय आणि आव्हान पेलल्या शिवाय प्रगती कशी होणार? मित्रांनो बिना संघर्षाचा आणि बिना आव्हानांचा विजय मिळवण्यात मजाच नाही.
विकास, प्रगती ही संघर्ष करूनच होईल हे लक्षात ठेवा. त्यातून एक एक कौशल्य आपल्यात वाढत जाईल. म्हणजे एखाद्या गोष्टीतून तुम्हाला १०% जर प्रेरणा मिळाली तर त्यासाठी तुम्हाला ९०% कष्ट करून घाम गाळायला लागेल. अशी सुरुवात केली तर पुढे हळू हळू कौशल्य हीच तुमची सवय होऊन जाईल.
तुम्हाला त्यातून जाणवेल की आपल्याला आता बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या.
असा स्वतःचा विकास साधत, म्हणजेच तुमची कौशल्ये वाढवत स्वतःला सिद्ध करायचं आहे. ह्यात स्वतःचा विकास साधताना आपल्या आधीच्या सवयी बदलायला लागतील.
ते अवघड जातं, तुम्ही एका दिशेने प्रयत्न देखील सुरू करता पण सवयी बदलायला वेळ लागतो. आपण सवयीचे गुलाम कधीच झालेलो असतो आणि त्यातून बाहेर पडणे अत्यंत गरजेचे असते.
कारण स्वतःला घडवताना सगळीकडून येणारी आव्हानं वेगवेगळी असतात. शारीरिक कष्ट, मानसिक ताण, ह्यातून तुम्ही घडत जाता. म्हणजे तुम्ही खरे विजयी होत जाता. असे छोटे छोटे विजय म्हणजे तुमची प्रगती.
प्रेरणा घेणं चांगलीच गोष्ट आहे, प्रेरणा मिळाली तर त्या बरोबर स्वतःला शिस्त सुद्धा लावून घ्या.
हो हे कम्पलसरी आहे. नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आवश्यक ती भरपूर पुस्तकं वाचा, आपली कौशल्ये सतत वापरात आणा, काही कामं परत परत स्वतः करा.
आपल्याला माहीतच आहे की ‘प्रॅक्टिस मेक्स अ मॅन’ परफेक्ट..
तुम्ही इतके तयार व्हा की दुसऱ्याला सुद्धा शिकऊ शकाल. माहिती, ज्ञान मिळवण्याचं कधीही थांबवू नका. कारण ती सुद्धा छोटी मोठी आव्हानंच आहेत त्यातून तुमचा वैयक्तिक विकास होणार आहे, भरभराट होणार आहे.
ह्या वैयक्तिक विकासाचे ३ महत्वाचे भाग कोणते ते पाहुयात..
१- अध्यात्मिक:- आता अध्यात्म म्हणजे काही खूप कठीण, किचकट असं शिकायचं असा विचार करू नका. अध्यात्म म्हणजे एक विशिष्ठ लाइफस्टाइल म्हणून विचार केला, तर सगळं सोपं वाटेल.
अध्यात्म हे आपल्याला माणूस बनवते. औद्योगिक विश्वात तुमच्या वागणुकीला महत्त्व येते. तुमच्या वागणुकीवर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात.
अध्यात्मिक अभ्यासामुळे तुमच्यात नम्रता येते. जी, काही ठिकाणी तुम्हाला हमखास उपयोगी पडते. योग्य निर्णय क्षमता येते.
तुमची बाजारात चांगली, विश्वासू व्यक्ती म्हणून ओळख राहते. तुमच्या सल्ल्याला महत्व येतं.
२- शारीरिक:- तुमचा शारीरिक विकास होणं जरुरीचं आहे. तुमच्या व्यवसायातील ग्राहकांना सामोरं जाताना तुम्ही शरीराने सुदृढ असायला पाहिजे.
तुमच्यात शिस्त असली पाहिजे, तुमचा कमी स्टॅमिना आणि पेशन्स तुमच्या प्रगतीत बाधा अणू शकतात. सुदृढ असाल तर संघर्ष करताना तुम्ही विजयी वाटचाल करू शकता.
याशिवाय तुम्हाला तुम्ही लोकांसमोर सादर करताना आकर्षक दिसण्यासाठी शारीरिक विकास आवश्यक असतो. तुमच्या शरीराचा अंतरंग हा देवच बघू शकतो, पण औद्योगिक क्षेत्रात वावरताना लोक तुमच्या बाह्य रंगावर तुमची योग्या-योग्यता ठरवतात.
तुम्ही आकर्षक दिसणे सुद्धा यशासाठी आवश्यक ठरतं. लोक तुम्हाला बाहेरून पाहतात, आणि ओळखतात. सुंदर दिसणे आपल्या हातात नसले तरी आपल्या अप-टू डेट ऍपिअरन्स ने आपण समोरच्यावर छाप नक्कीच पाडू शकतो.
३- मानसिक:- तुमच्या मानसिक विकासाला संपूर्ण व्यवसायात जास्त महत्व येतं. तुम्ही मनाने सुदृढ राहण्यासाठी चिंतन, मनन, करणे जरूर आहे.
नवीन कल्पना शोधून नवीन फायदे मिळवू शकता. तुमचा मानसिक विकास हा तुमच्या कल्पना दुसऱ्यांना सहज पटवून देऊ शकतो.
तुम्ही सतत ताजे तवाने दिसण्यासाठी उत्साही दिसण्यासाठी रोज मेडिटेशन करून तुमचे मानसिक ताण तणाव हलके करू शकता.
तुमचं मानसिक आरोग्य हे तुम्ही संभाळायलाच पाहिजे. मनाला शांत ठेवा आणि आपल्या कह्यात ठेवा. म्हणजे व्ययसाय करताना मोठी आव्हानं समोर आली तर तुम्ही कधीही खचून जाणार नाही, तर त्यांचा यशस्वी सामना कराल.
वरील बदल आपल्यात हळू हळू होतील आणि त्याच बरोबर आपण आपल्या व्यवसायातल्या यशाची छोटी छोटी शिखरे पादाक्रांत करायलाही सुरुवात करू.
ह्या यशाच्या ज्या पायऱ्या आपण चढणार आहोत त्या कोणत्या बेस वर उभ्या आहेत ते आपण पाहू..
१- चांगल्या योजना:- व्यवसायाच्या सुरुवातीपासूनच चांगल्या योजना अंमलात आणल्या गेल्या तर तुमच्या व्यवसायाची इमारत भक्कम उभी राहत जाते. योजना असल्याशिवाय पुढे जाणे धोक्याचे असते.
आणि चांगल्या योजना आणून केलेली व्यवसायाची उभारणी दीर्घ काळ टिकणारी असते. नवीन नवीन योजना बदलत्या काळानुसार आणाव्या लागतात. त्यातून व्यवसायाला गती मिळते, आणि लाभ सुद्धा मिळतो.
२:- चांगल्या कल्पना:- नवीन नवीन योजना अंमलात आणताना नवीन कल्पना समोर येत जातात. त्या कल्पनांमधून योग्य बदल घडवून प्रगती साधता येते.
काही कल्पना, खर्चावर नियंत्रण आणून फायद्यात वाढ करणाऱ्या असतात. आपली कार्यक्षमता वाढवायला ह्या नवीन कल्पना उपयोगी पडतात.
त्यातून वेळेची बचत, आर्थिक बचत, कष्टाची बचत करता येते. एकूण काय तर नवीन कल्पना आपल्या प्रगतीत वाढ करतात. व्यवसायातल्या जुन्या कार्यपद्धती अवलंबताना नवीन कल्पना आणि टेक्नॉलॉजी कडेही लक्ष असुद्या.
३:- वेळ कसा खर्च करायचा:- आपल्याला आपल्याकडे असलेला वेळ कसा खर्च करायचा हे सुद्धा शिकायला लागतं. म्हणजेच टाईम मॅनेजमेंट.
ह्या वेळेचं योग्य नियोजन करायला लागतं. म्हणजे नक्की काय करायला लागतं?
आपल्याला संधीची वाट बघायला लागते. संधी येईपर्यंत धीर धरून टिकून राहावे लागते. त्यातही काही नवीन शिकण्याची संधी आली की त्या संधीचा फायदा उचलण्यासाठी तयारी करायला लागते, त्यासाठी सुद्धा वेळ द्यावा लागतो.
माहिती नसलेल्या गोष्टी शिकायला वेळ द्यावा लागतो. कधी कधी अडचणीला नैसर्गिक कारण समजून, खचून न जाता खंबीरपणे उभं राहण्याची तयारी ठेवावी लागते.
बाजारपेठेत बदल झाले तर आपल्यात बदल करायला वेळ द्यावा लागतो. वेळेत शिकायचं, स्वतःचा विकास करून घ्यायचा, कामाच्या गतीत वाढ करून घ्यायची, आणि त्यातून उत्पादन करायचं ह्या सगळ्या गोष्टी, वेळेचं नियोजन करून यशाची घोडदौड करायची.
४:- समस्या सोडवणे.. ‘यश’ म्हणजे काय ? तर आयुष्यात येणाऱ्या सगळ्या समस्या, प्रश्न सोडवणे.
आयुष्यात बऱ्याच प्रकारच्या समस्या आपल्यापुढे उभ्या राहतात. व्यवसायातल्या समस्या, कौटुंबिक समस्या, स्वतःचे काही प्रश्न, भावनिक समस्या, सामाजिक समस्या. अशा अनेक समस्या असतात.
मित्रांनो, आपल्यातल्या प्रत्येकापुढे अगदी मोठी लिस्ट तयार होईल एवढ्या समस्या असतात.
जर एखादा उपक्रम तुम्ही हाती घेतला असेल तर अशा अनेक समस्या तुमच्यापुढे येतात, आणि त्या सगळ्या समस्या सोडवत तुम्ही तो उपक्रम, कसा मजबूत, आणि समृद्ध बनवता त्याला महत्व आहे.
सुरुवाती पासून अगदी शेवटपर्यंत अशा समस्या सोडवत जायच्या असतात, त्या मधेच सोडायच्या नाहीत अगदी तुमचा उपक्रम पूर्ण होई पर्यंत सगळ्या समस्या सोडवायच्या.
हे खरं आहे की त्यातल्या काही समस्या ह्या किचकट, किंवा गुंतागुंतीच्या असतील, पण त्या सुद्धा तुम्ही शांतपणे विचार करून सोडवू शकाल.
कोणाच्या अनुभवांची मदत घ्यायला देखील तुम्ही मागे पुढे पाहु नका. कारण एखाद्या व्यावसायिक प्रोजेक्ट मधल्या समस्या जर तुम्ही सहज सोडवू शकलात तर तुमच्या व्यवसायाला तुम्ही नवीन उंचीवर नेऊ शकाल.
आणि हळू हळू तुम्ही शांत पणे असे प्रश्न सोडवण्यात ‘मास्टरही’ होऊ शकता.
कसे?? एक मस्त कल्पना आहे.. वाचा तर पुढे
आयुष्यात ज्या छोट्या मोठ्या समस्या तुमच्यापुढे उभ्या राहतात त्या वेळोवेळी कागदावर लिहून ठेवा, आणि त्याचं उत्तर सुद्धा सोडवल्यावर लिहून ठेवा. उत्तरा पर्यंत पोहोचण्यासाठी लेखात सांगितलेले बदल स्वतःमध्ये जाणीवपूर्वक करून घायचे.
म्हणजे पुढे जर आयुष्यात कधी त्या तुमच्या पुढे आल्या तर त्या सोडवायला तुमचा वेळ जाणार नाही. तुमच्याकडे त्याचं सगळं गणित तयार असेल. त्या समस्यांना उचलून तुम्ही सहज बाजूला कराल.
अशा अनेक गोष्टी जाणून घेत स्वतःला घडवायचं, व्यवसाय धंदा अगदी नोकरी करताना समोर येणारे सगळे प्रश्न सोडवत मोठं यश मिळवायचं आहे.
त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या संग्रही असुद्यात. ह्यांचा उपयोग तुमचा वेळ वाचवण्यासाठी होईल, तुमच्या वैयक्तिक विकासासाठी होईल, स्वतःला घडवण्या साठी होईल. तुमच्या यशाच्या यशस्वी घोडदौडीसाठी होईल.
मग काय? करा तयारी स्वतःला सिद्ध करायची आणि दाखवा चमक तुमच्यातल्या कौशल्याची. जबरदस्त इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाने उजळू द्या तुमचं आयुष्य.
धन्यवाद आणि शुभेच्छा…
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.