प्रेम, आपुलकी, दुख: अगदी याचसारखी राग ही सुद्धा एक भावना आहे.
पण बऱ्याचदा या रागामुळे नुकसानच होते.
या जगात एकही अशी व्यक्ती नसेल की जिला राग येत नसेल.
राग येण्याचे प्रमाण मात्र कमी जास्त असू शकते.
काही माणसे स्वभावाने शांत असतात, त्यांना सहसा राग येत नाही. पण काही माणसे मुळातच तापट असतात.
कोणी काही टोचून बोलले, ते दुखावले गेले किंवा त्यांच्या मनाविरुद्ध काही घडले, कोणीतरी त्यांना फसवले तर त्यांना राग अनावर होतो.
काही प्रमाणात हे समजण्यासारखे आहे. पण खरी समस्या सुरु होते ती जर या रागावर नियंत्रण ठेवता येत नसेल तर.
जर लहान सहान गोष्टींनी राग येत असेल, राग अनावर होत असेल तर ती चिंताजनक बाब आहे.
यामुळे वैयक्तिक व व्यावसायिक संबंध बिघडू शकतात.
रागात बोललेल्या अपशब्दांचे पडसाद दीर्घ काळासाठी, कधी कधी आयुष्यभरासाठी सुद्धा राहतात.
राग आल्यावर, चिडचिड झाल्यावर बऱ्याचदा बोलण्याचे भान राहत नाही.
सारासार विचार सुद्धा केला जात नाही.
अशावेळी रागात समोरचा दुखावला जाईल, त्याचा अपमान होईल असे बोलले जाते.
राग शांत झाल्यावर चूक लक्षात येऊन काही फायदा नसतो कारण तोंडातून एकदा बाहेर आलेले शब्द परत आत घेता येत नाहीत.
समोरच्या माणसाच्या मनावर ते शब्द घाव करतातच.
अशा रागामुळे बरेच नुकसान होऊ शकते शिवाय चिडचिड करणे, राग राग करणे हे तुमच्या मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी सुद्धा हानिकारक असते.
बऱ्याचदा चिडका स्वभाव म्हणून विषय सोडून दिला जातो.
पण अशी व्यक्ती एकाकी पडण्याची शक्यता असते.
स्वभावाला औषध नाही असे म्हणतात. पण यावर उपाय नाही असे नाही.
काही गोष्टी जाणीवपूर्वक करून तुम्ही नक्कीच रागावर नियंत्रण ठेऊ शकता.
तुम्ही जर खूप चिडक्या स्वभावाचे असाल तर या गोष्टींमुळे तुमची चिडचिड कमी व्हायला नक्की मदत होईल.
रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की तुमचा राग हा बाह्य गोष्टींवर अवलंबून असतो.
जसे की ट्राफिक, एखादी व्यक्ती, एखाद्या व्यक्तीशी झालेला संवाद, एखाद्या व्यक्तीने केलेलं दुर्लक्ष.. इत्यादी.
त्यामुळे या बाह्य गोष्टींचा तुमच्या मनावर किती परिणाम होऊ द्यायचा हे फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे.
जी काही परिस्थिती असेल त्यावर चिडायचे की शांत राहून त्या परिस्थितीवर विजय मिळवायचा हे तुम्हीच ठरवू शकता.
१. आपला राग समजून घ्या:
तुम्ही जर स्वतःच्या वागणुकीवर नीट लक्ष दिले तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला काही ठराविक गोष्टींनी राग येतो.
काही व्यक्तींचा तुम्हाला राग येतो.
त्यामुळे अशा गोष्टी, व्यक्ती तुम्ही ओळखून त्यांच्यापासून शक्य तितके दूर राहायचा जर प्रयत्न केलात तर राग येण्याचे प्रमाण कमी होईल.
काही वेळेला राग येण्या अगोदरच तुम्हाला त्याची कल्पना आलेली असते.
याला आपण वार्निंग साइन म्हणू.
रागावर नियंत्रण मिळवायचे असेल तर हा क्षण ओळखणे खूप महत्वाचे आहे.
ज्या क्षणी राग येणार असल्याची जाणीव तुम्हाला होईल त्या क्षणाला तुम्ही असाल त्या परिस्थितून बाहेर पडायचा प्रयत्न केला पाहिजे.
ही वेळ ओळखून स्वतःला शांत करणे ही रागावर नियंत्रण मिळवण्याची पहिली पायरी आहे.
२. राग येणाऱ्या विषयांचा विचार सोडून द्या:
काही वेळा एखाद्या घटनेमुळे तुमची चिडचिड होते किंवा एखाद्या व्यक्तीशी वाद झाल्यामुळे राग आलेला असतो.
अशा वेळेला ती घटना, तो वाद वारंवार आठवत बसण्याची चूक करू नये.
त्या वेळी आलेला राग तिथेच सोडवा.
नंतर त्याबद्दल विचार करून चिडचिड करून काहीच फायदा नसतो.
उलट असे भूतकाळातील वाद आठवत बसून त्यावर पुन्हा पुन्हा राग व्यक्त केल्याने तुमचा वर्तमान सुद्धा खराब होणार असतो.
यामुळे तुम्ही विनाकारण चिडचिडेपणा करण्याची शक्यता असते.
त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टींमुळे राग येतो अशा गोष्टींचा विचार न करणे हे महत्वाचे आहे.
३. रागात तोंडून अपशब्द निघणार नाही याची काळजी घ्या:
बऱ्याचदा असे होते की राग आल्यावर तुमचा तोल ढळतो.
हे अत्यंत नैसर्गिक आहे. पण यामुळे तुम्ही परिस्थितीला नकळतपणे अधिक गंभीर करत असता.
यामुळे परिस्थितीतून मार्ग तर निघत नाहीच उलट गुंता जास्त वाढतो.
याच मुळे रागात तुमच्याकडून अपशब्द उच्चारले जातात.
हे टाळता यावे, रागावर नियंत्रण मिळवून सारासार विचार करता यावा व समोरचा दुखावला जाईल असे तुमच्याकडून वागले बोलले जाणार नाही यासाठी काही ट्रिक्स आहेत.
तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी या ट्रिक्सचा नक्कीच फायदा होईल.
1) तुम्हाला राग येईल तेव्हा समोरच्यावर आरोप करणे टाळावेत. “तू नेहमीच असे करतोस/करतेस” किंवा “तू कधीच माझ्या मनाचा विचार करत नाहीस.” ही वाक्ये धोकादायक असतात.
बहुतेक वेळा त्यात तथ्य नसते. ती केवळ रागाच्या भरात बोलली जातात.
पण या वाक्यांमुळे तुम्ही परिस्थिती आहे त्या पेक्षा सुद्धा गंभीर करून ठेवत असता. यामुळे तुमच्या रागात भरच पडत असते.
तुमच्या अशा वागण्यामुळे लोक सुद्धा तुम्हाला टाळू शकतात. यामुळे तुम्ही एकाकी पडण्याची शक्यता असते.
तसे होऊ नये, यासाठी वेळेतच रागावर नियंत्रण मिळवले पाहिजे. राग नियंत्रणात राहावा यासाठी असे आरोप, अपशब्द टाळले पाहिजेत.
2) यामुळे समोरचा सुद्धा तुमच्याशी नीट बोलायचा प्रयत्न करेल व तुमचा राग कमी व्हायला मदत होईल.
तुमच्या बाबतीत एखादी वाईट गोष्ट घडली किंवा कोणी तुमच्याशी वाईट वागले की असा एक समज केला जातो की हे सगळे आपल्या बाबतीतच होत आहे. हे खरे नसते.
पण जेव्हा राग येतो तेव्हा हा विचार केला जात नाही. रागात असे वाटते कि तुमच्या विरुद्ध पूर्ण जग उभे आहे.
पण असे जेव्हा वाटेल तेव्हा स्वतःला हे आवर्जून सांगितले पाहिजे की असे नाही. ही एक वेळ आहे आणि ती निघून जाणार आहे.
राग आल्यावर तुम्ही जर शांतपणे असा विचार केलात तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
3) तुम्ही रागात बोलत असाल तर तुमची बोलण्याची पद्धत, टोन सगळेच बदलते. तुमचा आवाज काहीवेळा चढतो.
अशावेळेला समोरच्याला सुद्धा राग येण्याची शक्यता असते. एक घाव दोन तुकडे करून कोणाचाच फायदा होणार नसतो.
म्हणूनच रागावर नियंत्रण मिळवायचे असल्यास ही एक महत्वाची पायरी आहे. जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्ही तुमच्या बोलण्याच्या पद्धतीकडे लक्ष दिले पाहिजे.
तुम्ही बोलण्याची पद्धत सुधारली, आवाजाचा टोन सुधारला तर तुमचा राग कमी होऊन तुमच्या समस्येवर तोडगा निघेल.
४. दीर्घ श्वसन
राग आल्यावर करण्याची अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे दीर्घ श्वास घेणे. राग आल्यावर हे सुचणे आणि ते जमणे हे जरी अवघड असले तरी ते अत्यंत महत्वाचे आहे.
यामुळे राग कमी व्हायला मदत होते. रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा अवघड वाटत असला तरी अतिशय प्रभावी उपाय आहे.
यामुळे तुमच्या मनातील विचारांचे वादळ शांत होईल. डोळे मिटून दीर्घ श्वास घेतलात तर काही क्षणासाठी तरी तुम्ही आहे त्या परिस्थितीपासून दूर जाल.
डोळे मिटल्यावर, राग कमी व्हायला मदत व्हावी यासाठी तुम्ही तुमच्या आवडीच्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणू शकता, किंवा तुमच्या आयुष्यातील एखादी प्रिय घटना आठवू शकता.
या गोष्टी केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
५. बोलण्यापूर्वी विचार करा
वर म्हटल्याप्रमाणे राग आलेला असताना विचार न करता बोलले जाते. यामुळे बरेच न भरून येण्यासारखे नुकसान होते.
म्हणूनच रागात बोलण्यापूर्वी विचार करा. दोन मिनिटे सुद्धा खूप होतात.
पण तुम्ही जर बोलण्यापूर्वी विचार करायचे ठरवले तर तुम्ही रागावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी व्हाल.
जर समोरचा तुम्हाला राग येईल असे वारंवार बोलत असेल तर काहीवेळा हे करणे कठीण वाटू शकते. पण हीच तुमच्या परीक्षेची वेळ असते.
हवे तर तुम्ही काही वेळ घेऊ शकता. समोरच्याला नंतर बोलू असे सांगून त्याला व तुम्हाला शांत व्हायला वेळ घेऊ शकता.
मित्रांनो, हे नेहमी लक्षात ठेवा की माणसे जोडणे कठीण असते पण तोडणे सोपे. तुमच्या रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे वाक्य तुम्हाला नक्की मदत करेल.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.