बिझी शेड्युलमध्ये सकारात्मकता वेचून स्वविकास करण्याचा माझा प्रयत्न

आपलं आयुष्य खरंच इतकं कंटाळवाण आहे का की अठरा तासांमध्ये पाच सुद्धा चांगल्या गोष्टी घडत नाहीत? पण एक-दोन आठवड्यांच्या सरावानेच यात बदल झाला.

मला अगदी सकाळपासूनच अमुक एक गोष्ट चांगली वाटायला लागली, आजच्या पाच गोष्टींमध्ये ही चांगली गोष्ट यायलाच हवी असं वाटायला लागलं.

“काय गं? तू काय मला फेसबुकवर ब्लॉक-ब्लिक केलं आहेस का?”

बरेच दिवस तुझी एकही पोस्ट मला दिसली नाहीये. जेवताना माझ्या नवऱ्याने अगदी सहज विचारलेल्या प्रश्नाने खूप दिवसांनी मेंदूला खाद्य पुरवलं.

माझ्या खरंच लक्षात आलं की गेले कित्येक दिवस आपण काहीच नवीन लिहिलं नाही की वाचलं सुद्धा नाही. अगदी फावल्या वेळात सुद्धा फेसबुक बघितलं नाही.

हे एका अर्थाने चांगलच होतं म्हणा, पण असं होण्यामागे काहीतरी कारण असणारंच आणि ते काय याची उत्सुकता मला होती.

काय कारण असेल? कामाचा व्याप? घर आणि ऑफिस सांभाळून फेसबुक किंवा लिखाणाकरता देऊ न शकलेला वेळ?

नक्की काही कळत नव्हतं, शेवटी शांत बसून नवऱ्याच्या साध्या, सोप्या आणि तितकाशा महत्वाच्या न वाटण्याऱ्या प्रश्नाचं उत्तर शोधलं.

फेसबुक उघडलं की नुसती नकारात्मकता ओसंडून वाहत आहे, कुठे कोणी अमुक पक्ष तमुक नेता घेऊन बसले आहेत, कुठे काही गजलकार गझलकारांशी वाद घालत आहेत, कुठे कोणी कोणतं शहर वाईट, शहर चांगलं का गाव चांगलं यावर वाद घालत बसले आहेत, मग आपापल्या शहरांची कौतुकं, इतर शहरांना टोमणे असं चालू आहे आणि अगदीच काही नाही तर उठसूठ कथा कशी लिहावी, साहित्याचा दर्जा काय असावा ह्यावर लोकं मार्गदर्शन करत आहेत.

याच सगळ्या गोष्टींचा ओव्हरडोस झाल्याने एकूण फेसबुकच नको की काय असं वाटत असताना जुन्याच पण नव्याने काही गोष्टी कळल्या त्या तुम्हाला सांगायचा हा छोटासा प्रयत्न.

वरती मी म्हटल्याप्रमाणे माझ्या यादीत म्हणा किंवा मी फॉलो केलेल्या लोकांच्यात म्हणा अशा अनेक व्यक्ती होत्या ज्यांची मतं मला पटत नव्हती, किंबहूना त्यामुळे माझ्यात नकळतपणे नकारात्मकता जोपासली जात होती.

भले ही एकेकाळी याच व्यक्तींमुळे प्रभावित होऊन मी त्यांना मैत्री विनंती पाठवली किंवा त्यांनी पाठवलेली स्विकारली पण आता परिस्थिती तशी उरली नाही.

त्यावेळी जसं विनंती पाठवायची का नाही, किंवा स्विकारायची का नाही हे माझ्या हातात होतं तसंच आत्ताही मला माझ्या फीडमध्ये कोणत्या पोस्ट दिसून हव्या आहेत हे सुद्धा माझ्याच हातात आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा माझ्या लक्षात आला.

ज्या फेसबुकमुळे नकारात्मक वाटतंय त्याचाच उपयोग सकारात्मक वाटण्यासाठी का होऊ शकत नाही?

असा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आणि मग मी फावल्या वेळात कामाला लागले, यात सुद्धा फक्त सकारात्मकतेने पुढे जायचं असं ठरवलं असल्यामुळे कोणाला अनफॉलो किंवा अनफ्रेंड करण्यापेक्षा चांगल्या आणि नवीन गोष्टींना फॉलो करायचं असं मी ठरवलं आणि यामुळे माझाच खूप फायदा झाला.

मला अनेक लोकं सापडली, त्यातली काही तुमच्या-माझ्यासारखी सामान्य माणसं होती तर काही अगदी जगप्रसिद्ध लेखक/ब्लॉगर्स.

मला हव्या त्या लोकांनी हव्या त्या गोष्टींनी माझी फीड भरू लागल्यावर पुढची पायरी चढायची वेळ आली होती. लोकं काय सांगतात किंवा काय लिहितात ते आचरणात आणून बघणे आणि त्याचप्रमाणे एका प्रसिध्द ब्लॉगर जोडीने सांगितल्याप्रमाणे मी काही रोजच्या सवयी बाळगायच्या ठरवल्या.

सुरुवातीला त्याने फरक पडेल का? पडला तर किती पडेल? आपण हे किती दिवस करू? का नेहमीप्रमाणे तेरड्याचे तीन दिवस आणि मग पुढचे पाढे पंचावन्न?

अशा अनेक प्रश्नांवर मात करून मी पुढे जायचं ठरवलं. एका वेळेला अनेक नवीन चांगल्या सवयी लागणं अवघड असतं त्यामुळे एका वेळेला एक असं म्हणून सुरुवात केली.

यातलीच पहिली सवय म्हणजे रोज, म्हणजे रोज रात्री किंवा दिवसा सुद्धा.. अगदी कधीही वेळ मिळेल तेव्हा एक यादी लिहायची- आजच्या दिवसात घडलेल्या पाच चांगल्या गोष्टी लिहायच्या.

सुरुवातीला माझ्या यादीत जेमतेम दोन तीन चांगल्या गोष्टी लिहिता येत होत्या त्यानंतर मला सगळा दिवस मनातल्या मनात आठवून बघावा लागत होता आणि मग ओढून ताणून त्यातल्या त्यात चांगल्या गोष्टी लिहाव्या लागत होत्या. कधीतरी मला स्वतःचंच आश्चर्यही वाटायचं..

आपलं आयुष्य खरंच इतकं कंटाळवाण आहे की अठरा तासांमध्ये पाच सुद्धा चांगल्या गोष्टी घडत नाहीत? पण एक-दोन आठवड्यांच्या सरावानेच यात बदल झाला.

मला अगदी सकाळपासूनच अमुक एक गोष्ट चांगली वाटायला लागली, आजच्या पाच गोष्टींमध्ये ही चांगली गोष्ट यायलाच हवी असं वाटायला लागलं.

मग ती अगदी आज झोप चांगली लागली, किंवा आज पक्षांच्या किलबिलाटाने गजराच्या आधीच जाग आली, आज ऑफिसमधला एरवी पांचट लागणारा चहा छान लागला अशा अनेक छोट्या गोष्टी येऊ लागल्या.

म्हणायला या गोष्टींच महत्व काही फार नाही, पण या बिनमहत्वाच्या वाटणाऱ्या गोष्टींची दखल घेतली की अपोआप अनेक महत्वाच्या गोष्टीही आपल्याला हव्या तशा घडायला लागतात..

किंबहुना या नव्याने आलेल्या सकारात्मकतेमुळे आपल्याकडून त्या तशा घडतात.

त्यांची अनेक रूपं असतात, सकाळी लवकर जाग आल्यावर कृतकृत्य वाटून जेवणात एखादा जास्तीचा केलेला पदार्थ असतो किंवा चांगल्या चहामुळे एरवी दोन तासात होणारं काम दीड तासात झालेलं असतं..

आपल्या व्यस्त दिवसात अवघी काही मिनिटं घेणारी ही सवय पण सकारात्मकतेबरोबरच आपल्या दिवसाला एक वळण लावायला अतिशय उपयुक्त आहे.

दिवसभरात घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे डोळसपणे बघायला तर आपण शिकतोच शिवाय रोजची यादी वाढवण्याच्या उर्मीने आपणच बऱ्याचदा आपल्याच नकळतपणे आपल्या अडचणींवर उपाय शोधतो आणि आलेली समस्या तशीच परतवून लावतो.

अजून एक आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे, एक दोन महिन्यांनंतर आपणच जेव्हा आपली जुनी यादी बघतो तेव्हा आपल्याला स्वतःलाच स्वतःत झालेला बदल जाणवतो.

असं म्हणतात कोणतीही सवय अंगवळणी पडण्यासाठी ती गोष्ट सातत्याने एकवीस दिवस करावी लागते.. मग तुम्ही सुद्धा करताय ना सुरुवात? आजच्या दिवसभरातल्या पाच चांगल्या गोष्टींची मनात नोंद करा आणि झोपायच्या आधी दोनच मिनिटात त्या लिहून काढा..

लेखन: मुग्धा शेवाळकर

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “बिझी शेड्युलमध्ये सकारात्मकता वेचून स्वविकास करण्याचा माझा प्रयत्न”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।