कौटुंबिक सोहळ्यात किंवा प्रोफेशनल लाईफ मध्ये संकोची वृत्ती असल्यामुळे तुमची सर्वांदेखत गोची होते का?
म्हणजे बघा मस्त पंगत सजली आहे, भरभरून आग्रह होतो आहे, पण तुम्हाला आवडलेला पदार्थ मागवण्याचा संकोच तुमच्या मनात असल्यामुळे तुम्ही मनसोक्त जेवण करत नाही आणि मनाला रुखरुख लागून राहते.
प्रोफेशनल लाईफ मध्ये ही एखादं काम पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे एखादी भन्नाट आयडिया असते.
मात्र ती कशी सांगावी असा विचार करत तुमच्या मनातच राहून जाते. हजार वेळा ती कल्पना आता सांगावी असं वाटतं, पण तुम्ही गप्प बसता स्वभावातील संकोचामुळे तुमचे गुण सगळ्यांसमोर प्रकट होत नाहीत.
स्वभावातील संकोचामुळे तुम्ही आज पर्यंत बरंच नुकसान सोसलं असेल पण आता मात्र यातून बाहेर पडण्याचा मार्ग स्वीकारा.
प्रत्येक प्रसंगात आड येणारा हा संकोच दूर कसा करायचा?
1) सगळ्यात पहिल्यांदा शांत बसून विचार करा तुम्हाला कोणत्या गोष्टीचा संकोच वाटतो?
2) हा संकोच ही भीती उगाचच आहे हे तुमच्या मनाला नीट समजावून द्या.
3) छोट्या छोट्या प्रसंगातून संकोच दूर करण्याचा प्रयत्न करत राहा.
4) तुम्ही तुम्हालाच एक वेळ ठरवून द्या या नंतर मी मोकळेपणानं माझं मत मांडणार, संकोच दूर घालवणारच.
5) ठाम निर्णय घ्या.
6) ज्या गोष्टी करायला भीती वाटते त्या गोष्टी आवर्जून करण्याचा प्रयत्न करा नवीन काहीतरी शिका.
7) सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही यातून बाहेर पडणार आहात यावर ठाम विश्वास ठेवा.
सुरुवातीला हा संकोच सोडताना गडबडायला होईल, निराश वाटेल, पण खरंच आयुष्यात या संकोचाला डच्चू द्यायचा असेल तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करा.
संकट दूर करण्यासाठी या गोष्टी आवर्जून करा.
1) ध्येय निश्चित करा.
आयुष्यात मोकळेपणाने जगण्यासाठी, तुमच्या हुशारीची इतरांवर छाप पाडण्यासाठी, तुमच्या मनातला संकोच दूर व्हायलाच हवा.
त्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करायला पाहिजे.
एकदा का कशाचा संकोच वाटतो हे तुमच्या लक्षात आलं की त्याला हळूहळू तुम्ही त्याला सुरुंग लावू शकता.
फिटनेस साठी पळायला लागल्या नंतर एका दिवसात 20 कि मी. जाल का? नाही ना?
एका किलोमीटर ने सुरुवात करत हळूहळू अंतर वाढवत जाल.
तसंच संकोच दूर करताना एका दिवसात चमत्कार होऊन तुम्ही एकदम प्रभावी भाषण करणार नाही.
त्यासाठी रोज थोडा थोडा प्रयत्न करत ध्येय गाठायचं आहे हे कायम लक्षात ठेवा.
2) ध्येय गाठण्यासाठी कृती करा.
सगळ्यांसमोर भाषण करण्याचा किंवा आपला मुद्दा मांडण्याचा संकोच तुमच्या मनात असेल तर पहिल्यांदा थोडक्यात काहीतरी सांगायचा प्रयत्न करा.
अगदी एक दोन मिनिटाची माहिती किंवा तुमचा मुद्दा मांडा.
कधीतरी एखादा जोक चारचौघांसमोर शेअर करा.
तुमची भीती हळूहळू मोडेल.
तुम्ही आत्मविश्वासाने तुमचे मुद्दे मांडू शकाल.
हळूहळू तुमचा विषय मांडताना पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सारख्या गोष्टींची मदत घ्या ,पण आपलं मत मांडायला शिका.
तुमचे विचार मांडताना एखाद्या उत्तम कथेचा आधार घ्या, एखादा छान उदाहरण सांगून तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ते सांगण्याचा प्रयत्न करा.
3) ध्येय ठरवताना तुमचा आवाका लक्षात घ्या.
आज तुम्हाला बंद खोलीतल्या 4 जणांसमोर बोलताना भीती वाटते, आणि समजा तुम्ही ठरवलं कि 6 महिन्यात 10 हजारांच्या जमावासमोर 2 तास आरामात बोलेन तर ते ध्येय थोडसं अवघड आहे ना?
आता समजा दहा हजार पायऱ्यांचा एखादा गड एका दमात चढायचा आहे तर त्याच्यासाठी रोज 50/100 पायऱ्या चढण्याचा सराव काही महिने तरी करायला पाहिजे, तरच तो गड तुम्ही एका दमात चढू शकाल बरोबर की नाही?
तर तुमच्या मनातला संकोच दूर करताना सुद्धा आपल्याला काय झेपणार आहे त्याच्यासाठी आपल्याला किती काळ लागणार आहे याचा अंदाज घ्या आणि मगच ध्येय फायनल करा.
4) ध्येयाच्या परिणामांचाही विचार करा.
आपली मतं न घाबरता, न संकोच करता मांडण्याचे ध्येय ठरवताना जेंव्हा हे ध्येय प्रत्यक्षात येईल तेंव्हा त्याचे काय परिणाम होतील हे लक्षात घ्या.
तुम्हाला प्रमोशन मिळेल, तुमच्या कामाची दखल घेतली जाईल, असा विचार करा,त्यामुळं तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य राहील, तुम्हाला प्रोत्साहन मिळेल.
5) वेळ निश्चित करा.
समजा तुम्हाला 12 किलो वजन कमी करायचं आहे तर आठवड्याला 2 किलो या रेटनं वजन कमी होत गेलं तर सहा आठवडे नक्की लागतील.
त्या पद्धतीने संकोची वृत्तीतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला ठराविक आठवडे किंवा महिन्यांचा वेळ द्या आणि क्रमाक्रमानं या वृत्तीवर ती मात करा.
6) ध्येय साध्य करण्यासाठी छोटी छोटी पावले उचला.
तुम्हांला सगळ्यांसमोर बोलण्याची भीती वाटते?
रोज एखादा पॅराग्राफ मोठ्यानं वाचा.
आरशासमोर बोलण्याची प्रॅक्टीस करा.
अशा छोट्या छोट्या गोष्टी तुमचा आत्मविश्वास वाढवतील आणि ध्येय गाठण्याचा रस्ता सोपा करतील.
7) अडचणींना घाबरू नका.
प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येकाची वृत्ती वेगवेगळी असते.
प्रत्येकाचे गुण वेगवेगळे असतात.
काही गोष्टी आपल्याकडे जन्मतः नसतात त्या प्रयत्नानं मिळवाव्या लागतात, ते मिळवताना कष्ट ही करावे लागतातच.
आयुष्यात प्रत्येक गोष्टीत अडथळे येतातच.
काही वेळेला घाबरगुंडी उडते. पण त्यावर तुम्ही मात करू शकता.
आज मनातल्या मनात प्रचंड भीती वाटली, यापेक्षा मागच्यावेळीपेक्षा जरा चांगलं बोलता आलं, पुढच्या वेळेला आणखीन चांगलं बोलेन ही वृत्ती तुमचं ध्येय गाठायला तुम्हाला मदत करेल.
मोकळ्या मनाची माणसं सगळ्यांनाच आवडतात.
संकोच मनात धरला तर आयुष्यातला बराच आनंद तुमच्या हातातून निसटू शकतो.
त्यामुळे तुम्ही स्वतःशी पक्कं ठरवा या संकोची वृत्तीतून बाहेर पडायचं आहे आणि तुम्ही ते नक्की करू शकता.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.