पुन्हा पुन्हा चुकून होणाऱ्या चुका टाळायच्यात, मग हे वाचलंच पाहिजे!!

मूर्खांची लक्षणे माहीत असूनही आपण का त्याच त्याच चुकांमध्ये गुंतत जातो..? त्यातून बाहेर पडायचे सोपे उपाय करून पाहिले तर..?

“अरे मी असे बोलायला हवे होते.. म्हणजे तिला गप्प बसवता आले असते..” असे एखाद्या वादा-वादी नंतर कोणाकोणाला वाटते..??

आपल्या सगळ्यांनाच.. हो की नाही..?!

मजेशीर आहे पण एखादी गोष्ट घडून गेल्यावर, त्या टाळण्यासारख्या गोष्टी असूनही ‘आपल्याला वेळेवर का नाही आठवल्या?’ ह्याचा आपण शोक करत बसतो..

बरं नंतर योग्य सोल्युशन कळल्या नंतरही कालांतराने पुन्हा अगदी तश्याच चुका सारख्या सारख्या घडत राहतात..

म्हणजे हे चक्र चालूच राहते.. चूक करणे आणि नंतर पश्चाताप करणे.. चूक करणे आणि पुनः पश्चाताप करणे.. ह्यातून आपली सुटका काही होत नाही..

ह्या गोष्टींमुळे आपले अतोनात नुकसान होत असते. आपण ह्या मध्ये सुधार करायला हवा आणि त्यासाठी स्वतःमध्ये बदल करायला हवा हे देखील आपल्याला सतत जाणवत असते..

त्या दिशेने आपण काहीच प्रयत्न करत नाही आणि मग पुन्हा घडते तीच चूक आपल्याहातून.. आपल्याला हे कळतही असते मात्र वळत काही नाही..

कधी कधी काही चुका, काही प्रॉब्लेम्सना सुधारून टाकायला आपण खूप प्रयत्न करत असतो..

दर वेळी नवीन पद्धतीने तो विषय हाताळून पाहतो..

एखादा प्रॉब्लेम, एखादी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीच्या कलांनी काम करायचं प्रयत्न करतो.

एखादी चूक रोजच्या कामातली असेल, तर तिला दुरुस्त करण्यासाठी हजारो प्रयत्नही करतो..

पण एक वेळ अशी येते की आपल्याला त्या चुकीपुढे हात टेकावे लागतात.. त्या प्रोब्लेमची पाळे मुळे खोलवर रुजलेली असल्याने तो पटकन सोडवता येत नाहीत.. आपण हतबल होतो..

आपल्याला वाटायला लागते, ‘आता सगळे संपले’ हे काम काही केल्या सरळ होत नाही आणि आपण गिव्ह अप करतोच..

असे असंख्य प्रॉब्लेम्स अडचणी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असतात.. आपण जसजसे मोठे होऊ तसतसे ते सुद्धा आपल्याच बरोबर मोठे होतात..

कारण आपण आपल्याला सतत त्यांचे निराकरण करण्यासाठी असमर्थ समजत असतो. आणि त्याचा प्रचंड त्रास, मानसिक तणाव घेऊन आपण जगात वावरत असतो.

ही जुनी दुखणी काही केल्या आपली पाठ सोडत नसतात.. काही केल्या ह्या अडचणी आयुष्यातून पळून जातच नसतात.

आणि आपण त्यात गुंतून पडतो. कुठेतरी थांबून जातो.. पुढचा मार्गही धूसर वाटतो. जगायचे म्हणून आपण आला दिवस ढकलत राहतो.. अगदी आयुष्य एखाद्या रोबो प्रमाणे बनून जाते.

खरे तर अशा अडचणी आपल्याला एखाद्या जागेवर खिळवून टाकत असतील तर आपण आपले प्रयत्न आणखी वाढवले पाहिजेत.

स्वतःला नवीन प्रश्न विचारले पाहिजेत. नव्याने उत्तरे शोधली पाहिजेत. ‘जस्ट कीप ट्राइंग’ हा मंत्र जपला पाहिजे. हे सगळे करताना काही सोप्या ट्रिक्स सुद्धा अजमावल्या पाहिजेत.

सगळ्यात पहिल्यांदा अगदी महत्वाच्या अडचणी कडे लक्ष केंद्रित करावे..

हो मित्रांनो, अनंत अडचणी असल्या तरी सगळ्यात मोठी अडचण जी आपल्या आयुष्यात एक पॉझ आणते तिच्याकडे पहिले लक्ष देणे गरजेचे आहे.

तुम्ही सगळ्याच अडचणींना एकावेळी हात घालू शकत नाही. त्यात तुमची अवस्था ‘तेल गेले, तूप ही गेले, हाती राहिले धुपाटणे’ अशी होईल बरं..

त्यामुळे अत्यंत चाणाक्षपणे महत्वाची अडचण शोधून काढा आणि तिच्यावर काम सुरू करा.

त्या अडचणीला सोपे करण्याचा प्रयत्न करा.. म्हणजे त्यात अजून काही बाधा आणू नका.. त्या अडचणींच्या टेकडी चा पर्वत करू नका..

जसे तुमच्या आयुष्याच्या जोडीदाराबरोबर जर तुमच्या काही अडचणी असतील आणि त्या काही केल्या दूर होत नसतील तर ह्याला प्राधान्य द्या.

ह्या अडचणीसाठी स्वतःमध्ये बदल करावयाचा झाल्यास तिथपासून सुरुवात करा.. समोरच्याचे म्हणणे ऐकून घ्या.

समोरच्या व्यक्तीला आपल्याकडून काय अपेक्षा आहेत आणि त्यातील कोणकोणत्या तुम्ही पूर्ण करू शकता..??

कोणत्या अवाजवी आहेत ह्या बाबत चर्चा करा. स्वतः मधल्या वाईट सवयी जसे खोटे बोलणे, आळशीपणा, घराकडे लक्ष नसणे किंवा घरकामात मदत न करणे अशा काही चुकीच्या वागण्याने नात्यात दुरावा आला असल्यास त्याला बद्दलण्याकडे तुमचा कल असुद्यात.

जोडीदाराबरोबर न पटणं हि अडचण सोडवताना मात्र दुसरी कुठली चूक तुमच्या कडून झाली तर तिला क्षमा मिळवणं कर्म कठीण होऊन जातं याचं एक उदाहरण मी इथे तुम्हाला सांगतो.

माझ्याकडे समुपदेशनासाठी आलेल्या एका जोडप्यातील नवरोबांनी बायको बरोबरच्या भांडणात तिला अद्दल घडवण्यासाठी दुसऱ्या एका सोज्वळ महिलेचा वापर केला. तिला अंधारात ठेऊ पद्धतशीर पणे फसवले. त्या दोघांच्याही दृष्टीने हि गोष्ट अगदी साधी होती पण हा कायदेशीरपणे खूप मोठा आणि अदखलपात्र गुन्हा म्हणून दाखल झाला.

सांगण्याचं कारण असं कि अशा कित्येक केस माझ्या बघण्यात आल्या. एका चुकीवर उपाय शोधण्यासाठी आपण काय करतो याकडे लक्ष देणं हे सर्वात महत्त्वाचं…

हे आणि असे असंख्य प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यावर परिणाम करत असतात.. ते एकमेकांमध्ये गुंतलेले असतात.

शरीर स्वास्थ्याच्या अडचणी, नात्यातल्या अडचणी, करिअरच्या अडचणी, शिक्षणातल्या अडचणी, पैशाच्या अडचणी, मानसिक अडचणी, धार्मिक अडचणी ह्या सगळ्याच एकमेकांवर अवलंबून असतात.

ह्यातली मुख्य अडचण सोडवली तर बऱ्याच प्रमाणात आपला भार कमी होत असतो.

म्हणजे बघा ना जर शरीर स्वास्थ्याच्या अडचणी सोडवल्या तर शैक्षणिक किंवा पैशाच्या अडचणी सोडवण्यासाठी तुमच्याकडे कॉन्फिडन्स येतो.

पैशाच्या अडचणी सुटल्या तर मानसिक किंवा नात्यातील अडचणी दूर करण्यास मदत होऊ शकते. फक्त इतकेच की एका वेळी एका प्रश्नाकडे कडे लक्ष केंद्रित करावे.

कारण काहीही केले तरी सगळे जग एका रात्रीत पादाक्रांत करता येत नसते…!!

चांगल्या सवयी लावून घेणे हे सुद्धा सोप्पे काम नसते.

मात्र त्या दिशेने योग्य पाऊल टाकल्यास ते बघता बघता सोपे होऊन जाते. जसे तुम्ही हेल्थ काँशिअस नसलात तर तुम्हाला बीपी, शुगर आशा अडचणींचा सामना करावा लागत असेल.

मग त्यासाठी शिस्तबद्ध आहार आणि व्यायाम घेतलाच गेला पाहिजे. बघा तुमच्या शारीरिक अडचणींवर तुम्ही नक्कीच मात करू शकाल.

अर्थात कोणत्याही चुका दूर करताना त्याला खुपसा वेळ द्यावा लागतो, खूप प्रयत्न करावे लागतात आणि खूप चिकाटी अंगीकारावी लागते.

हे सगळे करताना नकळत आपण स्वतःचा व्यक्तिमत्व विकास देखील करत असतो.

अडचणींचा डोंगर पार करून शिखरावर जाण्याकरता एक एक पायरी लक्षपूर्वक पार करावी लागते..

एकेक गोष्ट तुम्हाला सैरभर करू शकते, थांबवू शकते पण तुम्ही चालत राहणे ह्यातच भलाई असते आणि ह्यातून आपण असंख्य धडे ही शिकत जातो.

आपण सतत जुनीच गोष्टी चघळत बसतो… त्यामुळे एकाच ठिकाणी अडकून पडतो. बदल स्वीकारणे सगळ्यांनाच अवघड वाटते.

त्यात अथक परिश्रम, भरपूर पैसा किंवा वेळ लागणार असतो म्हणून नवीन बदलांकडे आपण पाठ फिरवतो. मग आपल्याकडे राहतो तोचतोचपणा..

आपल्याला भव्यदिव्य काही हवे असेल, जुन्या चूका अडचणींमधून बाहेर पडायचे असेल तर थोडी डेअरिंग दाखवावीच लागेल. नवनवीन उपक्रम हाती घ्यावेच लागतील. तेही अपयशाला न घाबरता..!!!

स्वतःमध्ये बदल घडवताना स्वतःचाच नकार आपल्याला पचवावा लागेल. स्वतःमधली नकारात्मकता रेटून, भीती आणि अपयशाला जिंकून आपण स्वतःच्या सीमांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे..

१० वर्षांपूर्वीचे आपण आत्ताचे आपण ह्यात जर काहीच बदल झाला नसेल तर आपण नक्कीच स्वतःला कुठेतरी मागे खेचून ठेवले आहे.

आपल्या असंख्य चुका उराशी कवटाळून आपण अजूनही तिथेच राहिलो आहोत. अशा अवस्थेत आपली प्रगती होणारच नाही तर सतत अधोगतीला आपण पात्र ठरणार असतो.

त्यामुळे १० वर्षांच्या काळात स्वतःला जगाबरोबर अपडेटेड ठेवणे खूप गरजेचे असते.. कित्येक अडचणी तुम्ही मिळवलेल्या ज्ञानातून, अनुभवातून पार करू शकता ह्याची जाणीव तुमची तुम्हाला लगेच होईल.

काही जुन्या अनावश्यक सवयी, माणसे, वस्तू, रीती, परंपरा ह्यांच्या पासून दुरावा आणणे स्वतःच्या हिताचे असते.

जगाने आपल्यासाठी बदलणे हे खूप अवघड असते मात्र बदलत्या जगाबरोबर आपण बदलणे बऱ्यापैकी सोप्पे असते..!

जुन्या रीती परंपरा बदलल्यावर आपण लगेच धर्मभ्रष्ट होत नाही.. आत्ताच्या काळात त्याच परंपरा एक नव्या ढंगात आपण नक्कीच करू शकतो..

आपल्यात येणाऱ्या बदलांचे सुद्धा असेच असते. आपल्यात नवीन बदल झाले म्हणजे आपण ‘आपण’ राहणार नाही ह्या भीतीने आपण पुढे वाटचाल करण्याचे थांबवतो. अडचणींना कवटाळत बसतो, नशिबाला बोल लावतो पण स्वतः च स्वतःला गर्तेतून बाहेर काढले पाहिजे ह्याचा विचार करत नाही.

शेकडो अडचणींपैकी काही आपण नक्कीच दूर करून आयुष्याला नवीन कलाटणी देऊ शकतो. हळू हळू एकेक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून थांबलेल्या आयुष्याला गती देऊ शकतो.

मात्र संयम आणि प्रयत्नांची कास सोडता कामा नये. कारण शेवटी ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हे तुम्ही ऐकलेच असेल..!! 😊

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।