मनाचेTalks ला मेसेजमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ‘त्रासदायक लोकांना सामोरं कसं जायचं?’ आज या लेखात आपण त्याबद्दलच बोलणार आहोत.
आपल्याला अगदी रोजच बऱ्याच त्रासदायक लोकांना सामोरे जावे लागते असे जर म्हटले तर ते सगळ्यांनाच पटेल.
आयुष्यभर कोणत्यातरी कारणाने, कोणत्यातरी कामासाठी आपला त्रासदायक लोकांशी संबंध येतोच.
ऑफिसचीच गोष्ट घ्या, कधी आपल्याच डिपार्टमेंटमेंटचा एखादा सहकारी आपल्यासाठी त्रासदायक असू शकतो तर काही वेळा आपल्या डिपार्टमेंटची व्यक्ती नसली तरी काही कारणारे संपर्क होतच असतो आणि ही व्यक्ती आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकते.
कधी कधी घरातली मंडळी सुद्धा त्रासदायक असू शकते. आपल्याला सहकार्य न करणे, येता-जाता टोमणे मारणे वगैरे गोष्टी हे लोक नित्य-नियमाने करत असतात.
बऱ्याचदा यात काही वेळा लांबचा मित्रपरिवार सुद्धा सामील असतो.
त्रासदायक लोकांबद्दल बोलताना मोबाईल फोनच्या कंपन्या किंवा क्रेडीट कार्ड कंपनीमधून येणारे फोन यांचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही.
याशिवाय देखील आपल्या आयुष्यात अनेक त्रासदायक लोक असतात. आपल्या घरात काही सुतारकाम करायला काढले असेल आणि कामासाठी येणारा माणूस हलगर्जी असेल, काम वेळेवर न करणारा असेल तर तो सुद्धा आपल्यासाठी त्रासदायकच असतो.
मग आपल्यालाच त्याचा पाठपुरावा करावा लागतो. दहा वेळेला त्याला फोन करा, तो येण्याच्या वेळा सांभाळा असे अनेक सोपस्कार करावे लागतात.
या अशा त्रासदायक लोकांना सामोरे जाणे आपल्याला एवढे अवघड का जाते?
या प्रश्नाचे उत्तर निश्चितच सोपे नाही. प्रत्येक त्रासदायक माणसाच्या वागण्याच्या आणि त्याला सामोरे जायच्या आपल्या पद्धतीत फार फरक असतो.
एकच नियम सगळ्यांना लागू होत नाही असे म्हणतात, या बाबतीत सुद्धा तेच म्हणता येईल.
पण, लोकांच्या वागण्यामागची कारणे किंवा त्यांच्या त्रासदायकपणाबद्दल काही तर्क लावत बसण्यापेक्षा आपण हे बघूया की आपण काय करू शकतो.
ह्या सगळ्यात आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपण आपल्या प्रतिक्रियेवर ताबा ठेऊ शकतो. या लेखात आपण असेच १० खात्रीशीर मार्ग बघणार आहोत जेणेकरून त्रासदायक लोकांचा आल्याला कमीतकमी त्रास होईल.
१. चांगुलपणा दाखवा:
बऱ्याचदा ‘जशाच तसे’ हे आपले तत्व असते म्हणजे आपल्याशी कोणी वाईट वागत असेल तर आपण सुद्धा त्याच्याशी तसेच वागले पाहिजे असे आपल्याला वाटते. यात काही गैर नाही.
ही अत्यंत स्वाभाविक मानवी प्रतिक्रिया आहे. जर कोणी आपल्यावर काही शाब्दिक हल्ला करत असेल तर सर्वप्रथम आपली प्रतिक्रिया स्वतःला सुरक्षित करणे हीच असते. काही अपवाद सोडले तर बहुतेक जण हेच करत असतात.
पण या त्रासदायक परिस्थितीत आपण सुद्धा समोरच्याशी तशाच पद्धतीने वागलो तर ते ताणून धरल्यासारखे होते आणि त्रास आपल्यालाच होतो आणि त्यातून निष्पन्न तर काहीच होत नाही.
त्यामुळे समोरचा जर एखाद्या गोष्टीसाठी अडून बसला असेल, आपला मुद्दा सोडायलाच तयार नसेल, काही कारणाने आडमुठेपणा करत असेल तर आपण चांगुलपणा दाखवून, चातुर्याने आपल्याला हवे ते मिळवायची युक्ती लढवली पाहिजे.
अशाने वादविवाद तर होणार नाहीतच शिवाय आपल्या चांगुलपणाने आपल्याला हवी असलेली गोष्ट आपण मिळवू शकू.
२. दयाळूपणा दाखवा:
आपल्याला आपलीच समस्या फार मोठी वाटत असते पण जेव्हा आपण आपल्यापेक्षा सुद्धा वाईट परिस्थितीत असणाऱ्या एखाद्या माणसाची समस्या ऐकतो तेव्हा आपल्याला आपली समस्या बरी वाटायला लागते.
मुद्द्याची गोष्ट ही आहे की बहुतेक वेळेला आपल्या आजूबाजूची लोक कोणत्या परिस्थितीचा सामना करत असतात याची आपल्याला अजिबात कल्पना नसते.
आपल्याला एखादी व्यक्ती त्रासदायक वाटत असेल तर त्यामागचे कारण काही वेगळे असू शकते. असे असू शकते की ती व्यक्ती आपल्याच काही समस्यांशी दोन हात करण्यात व्यस्त असेल.
आपल्याच आयुष्यात गांजून गेल्यामुळे त्या व्यक्तीच्या हे गावी सुद्धा नसेल की तो आपल्यासाठी त्रासदायक ठरत आहे. अशावेळेस आपण काय करू शकतो? दयाळूपणा दाखवून समोरच्याची समस्या समजून घेऊ शकतो.
आणि सहसा त्रासदायक लोक हे इतरांचे काही वाईट करू शकतील असे शक्तिशाली सुद्धा नसतात. त्यामुळे दयाळूपणा दाखवला तर समोरची व्यक्ती आपले नुकसान करू शकेल हि भीती फोल ठरते.
३. दोघांमधला समान धागा शोधण्याचा प्रयत्न करा:
एखाद्या अनोळखी व्यक्तीशी पहिल्यांदा बोलताना जर तुमच्या दोघांच्या आवडीचा विषय एकच आहे हे लक्षात आल्यावर त्या व्यक्तीशी सूर जुळणे सोपे होऊन जाते, हो ना?
आपल्याच कॉलेजमधली व्यक्ती भेटणे किंवा आपल्याच शहरातली व्यक्ती भेटणे ही गोष्ट फार आनंददायी असते.
जर आपल्यासाठी त्रासदायक असलेल्या व्यक्तीमध्ये आणि आपल्यामध्ये असाच एखादा समान धागा सापडला तर? निश्चितच आपल्या दृष्टीकोनात फरक पडेल आणि ती व्यक्ती आपल्यासाठी कमी त्रासदायक ठरू शकेल.
४. शांत राहा:
ऑफिसमध्ये आपल्या एखाद्या त्रासदायक सहकाऱ्याची एखादी इमेल आल्यावर बऱ्याचदा आपली तळपायातली आग मस्तकात जाते आणि त्याच रागात आपण सुद्धा उत्तर लिहितो.
अशाने परिस्थिती सुधारत तर नाहीच पण अजून बिघडते. कामाच्या ठिकाणी ताणतणाव आले की ते आपल्या वैयक्तिक आयुष्यावर सुद्धा ठसे उमटवतात.
पण आपण हे टाळू शकतो. अशा परिस्थितीत शांत राहणे हा एक उत्तम तोडगा आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
असेही असू शकते की समोरचा माणूस मुद्दाम तुम्हाला भडकवायचा प्रयत्न करत असेल. अशावेळेस तुम्ही चिडलात तर त्या माणसाचा हेतू साध्यच होतो. त्यामुळे अशा परिस्थितीत शांत राहून, काही ठरविक काळ जायची वाट बघून आपण प्रतिक्रिया दिली तर परिस्थिती सुधारू शकते.
५. आपली बाजू मांडा:
काही वेळेला आपल्याकडे पर्याय नसतो. आपल्या एखाद्या कामासाठी म्हणा किंवा आपल्या जवळच्या माणसाच्या कामासाठी आपल्याला एखाद्या त्रासदायक माणसाची मनधरणी करावी लागते शिवाय जर काही त्रासदायक माणसे ही आपल्या घरातलीच असतील तर आपल्याला दिवसातून खूपदा त्यांच्याशी बोलावेच लागते, त्यांना टाळून चालत नाही.
अशा वेळेस काय करायचे? सोपे आहे, अशावेळेस संवाद साधायचा. समोरच्याला आपली बाजू व्यवस्थित सांगायचा प्रयत्न करायचा.
आपण आपले काम होण्यासाठी कोणते प्रयत्न केले आहेत हे सुद्धा त्यांना मोकळेपणाने सांगायचे. आपली बाजू स्वच्छपणे मांडली तर समोरचा सुद्धा ती समजून घेऊ शकतो यावर विश्वास ठेवला पाहिजे, शेवट समोरचा सुद्धा माणूसच आहे ना?
६. समोरच्याला आदर द्या:
एकमेकांशी आदराने वागले तर कोणाला आवडणार नाही? असा एकही माणूस नसेल ज्याला आपला अपमान करून घ्यायला आवडत असेल.
त्रासदायक लोकांना सामोरे जाताना सुद्धा ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आपण जर समोरच्याला हीन दर्जाची वागणूक देत असू, त्याला कोणतेच काम जमत नाही असे दाखवून द्यायचा प्रयत्न करत असू किंवा स्वतःला त्याच्यापेक्षा वरचढ दाखवून द्यायचा आटापिटा करत असू तर परिस्थिती अवघड होऊन बसते. आपल्या हाती काहीच लागत नाही.
त्यामुळे आपल्याला एखाद्याकडून जशी वागणूक अपेक्षित असते तशीच वागणूक आपण सुद्धा सगळ्यांना दिली पाहिजे.
७. दुर्लक्ष करा:
आपल्याला शक्य असेल तेव्हा अशा त्रासदायक लोकांपासून चार हात लांब राहिलेले केव्हाही चांगलेच.
त्रासदायक लोकांच्या संपर्कात येऊन त्यांच्या नकारात्मक उर्जेला आपल्यात यायची परवानगी देण्यापेक्षा शक्य असेल तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा सोपा उपाय वापरा.
त्रासदायक लोकांच्या वाटेलाच गेलो नाही तर त्रास होणारच नाही, नाही का? उलट अशा लोकांशी संवाद साधायला आपली जी उर्जा वाया जाते, ती वाचवून आपण ती आपल्या आवडीच्या, सकारात्मक लोकांशी संवाद साधण्यासाठी वापरू शकतो.
८. जे आपल्या हातात आहे ते थांबवा:
आयुष्यात आपल्या हातात काही गोष्टी असतात तर काही नसतात. ज्या आपल्या हातातच नसतात त्याबद्दल आपण काहीच करू शकत नाही त्यामुळे आपण आपले लक्ष आपल्या हातात असणाऱ्या गोष्टींवर केंद्रित केले पाहिजे.
हाच नियम त्रासदायक लोकांना सामोरे जाताना वापरला तर आपल्याला फायदा होऊ शकतो. असेही असू शकते की कोणत्या त्रासदायक व्यक्तीची काही मदत न लागता किंवा त्याच्याशी काही संपर्क न करता आपण आपले काम करू शकतो. आपल्याला एखाद्या कामासाठी एखादीच व्यक्ती योग्य आहे असे वाटू शकते, पण असा एकांगी विचार घातक ठरू शकतो. त्यामुळे आपण सर्व शक्यता पडताळून बघायला हव्यात.
९. स्वतःकडे बघा:
असे तर नाही ना की तुमचेच काहीतरी चुकते आहे? कदाचित तुमच्याच वागण्या-बोलण्यामध्ये काहीतरी खोट आहे आणि अनवधानाने तुमच्याच वागणुकीमुळे समोरच्या व्यक्तीशी काही बोलणे अवघड होऊन बसले आहे?
असे असेल तर अशी नेमकी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला बदलायला हवी आहे याचा विचार करणे गरजेचे आहे.
असेही असू शकते की बऱ्याचदा आपल्या मूडचा परिणाम आपल्या वागण्या-बोलण्यावर आपल्याही नकळत होत असतो. आपण जर कधी वाईट मूडमध्ये असू तर आपण क्वचित आत्मकेंद्रित आहोत की काय अशी शक्यता समोर येते.
अशावेळेस समोरच्याशी बोलण्याच्या ऐवजी आपण आपल्याच तंद्रीत असतो आणि याचा समोरच्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्वतःकडे लक्ष देऊन, आपल्या दोषांना ओळखून त्याच्यावर काम करणे हे सुद्धा फार महत्वाचे आहे.
१०. मतभेदांना घाबरू नका:
त्रासदायक लोकांना सामोरे जाण्यासाठी हा एक उपयुक्त मार्ग आहे. बऱ्याचदा आपल्याला मतभेद किंवा वादविवादाची भीती वाटत असते आणि ते टाळण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो पण या भीतीवर आपण मात करायला शिकायला हवे.
त्रासदायक लोकांना सामोरे जाणे हे मुळातच एक त्रासदायक काम आहे पण अशा लोकांसमोर तुम्ही तुमची बाजू मांडून काही मर्यादा आखल्या नाहीत तर समोरच्याच्या वागण्याला काहीच तारतम्य उरत नाही.
सगळ्यांना आदर देणे जसे महत्वाचे आहे तसेच आपला अनादर होऊ न देणे हे सुद्धा महत्वाचे आहे आणि आपल्या नकळत सुद्धा आपल्याकडून तसे घडता कामा नये.
या भीतीवर मात करा याचा अर्थ असा नाही की मतभेद उकरून काढा, याचा अर्थ हाच आहे की मतभेद होईल अशी भीती बाळगून आपले मत व्यक्त न करायची चूक करू नका.
याचबरोबर हे सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे की मतभेद काही नेहमीच वाईट नसतात, काही वेळा मतभेदातून एखादी नवीन कल्पना आपल्याला सुचू शकते आणि काहीतरी चांगले निष्पन्न होऊ शकते.
यासगळ्यातून महत्वाची गोष्ट काय? तर त्रासदायक लोक आपल्या आजूबाजूला असतातच.
ते आपल्याशी कसे वागतील हे आपल्या हातात नसते पण आपल्या वागण्याचे नियंत्रण मात्र आपल्याच हातात असते आणि हे दहा उपाय वापरून आपण आपले वागणे बदलून आपले जगणे नक्कीच सुकर करू शकू.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Khup Sundar ridge sangitle ahet.