मित्रांनो, आपल्यापैकी बहुतांश जणांना कमाई वाढवायची असते, रोजच्या आयुष्यात समृद्धी असावी असे वाटते. कमाई वाढवण्यासाठी ह्या टिप्स तुम्हाला नक्की फायदेशीर ठरतील.
प्रश्न १- सर, मी एक डॉक्टर आहे, वय वर्ष ३४ वर्ष, सात वर्षांपासुन जवळील खेडे गावात जनरल प्रॅक्टीस करतो, पण तेव्हापासुन माझी आर्थिक परिस्थिती ‘जैसे थे’ आहे, महीन्याला वीस ते पंचवीस हजार रुपये कमवतो, मागील काही महिन्यांपासुन स्वभाव खुप चिडचिडा बनला आहे, त्याचे पडसाद म्हणुन, कधीकधी पत्नीसोबत वाद होतात,
मला हवं तसं आयुष्य जगायला भेटत नाहीये, जीवनात कसलीही इंथुजिएझम नाही, उत्साह नाही, सातत्य नाही, माझे माझ्या पत्नीवर आणि मुलीवर खुप प्रेम आहे, त्यांच्यासाठी खुप काही करायचे आहे, खुप छान, मनासारखे आयुष्य जगायचे आहे. पुढे जायचे आहे, मार्ग सांगा!…
नमस्कार XXXXजी, सर्वप्रथम तुम्ही तुमच्या आयुष्याचा जीवनपट आपलेपणाने, खुल्या दिलाने मांडलातं, याबद्दल मनःपुर्वक आभार.
तुमच्या आयुष्यात प्रचंड मेहनत घेऊन तुम्ही डॉक्टर झालात, याबद्द्ल अभिनंदन! आणि खेडेगावात जाऊन तुम्ही समाजाची सेवा करता याबद्द्ल विशेष अभिनंदन! आज प्रत्येक जण जेव्हा शहराकडे धावतो आहे, तेव्ह अशा काळात तुम्ही खरचं खुप पुण्याचं काम करत आहात.
माणसाने एखादे नवे काम हाती घेतले की त्या कामात सुरुवातीला त्याला प्रचंड उत्साह वाटत असतो, कामाच्या सुरुवातीला एक थ्रिल असते, एन्जॉयमेंट असते, काहीतरी करुन दाखवण्याची खुमखुमी असते, मग काही वर्ष सातत्याने तेच ते करत राहीलं की त्या गोष्टीतलं अप्रुप संपतं, एकसुरी जगण्याचा कंटाळा येतो, तरीही लोक, नशिबाचे भोग समजुन, तेच तेच अळणी आयुष्य जगत राहतात, खुपच कमी लोकांना बदल घडवावा वाटतो, आणि माझे आयुष्य बदलायचे आहे, हा विचार पक्का करणं, हिच जीवन-बदलाची खरी सुरुवात आहे.
आयुष्यात जेव्हा मुबलक पैसा उपलब्ध होऊ लागतो, समृद्धी येते तेव्हा कसल्याही बर्या वाईट प्रसंगाना माणुस आत्मविश्वासाने सामोरा जातो, साहजिकच तो स्वतःवर प्रेम करु लागतो आणि दिवसातला बहुतांश वेळ आनंदी असतो.
त्याउलट, जेव्हा पैशाची टंचाई भासते तेव्हा, पतीपत्नीत, कुटूंबियांमध्ये क्षुल्लक कारणांमुळे खटके उडु लागतात, त्याचा ताण मनावर येतो, त्याचा परीणाम नौकरी व्यवसायावर होतो, कमाई क्षमतेपेक्षा कमी होते, आणि आपण मागे राहीलो, बाकीचे पुढे गेले, मी मात्र अपयशी ठरतोय, अशी निराशा येते.
पैसे मिळवण्यासाठी, समृद्धी येण्यासाठी काय काय करता येईल?
तुम्ही डॉक्टर आहात, एवढ्या वर्षात तुम्ही अनुभवलं की, तुमचं वैद्यकिय क्षेत्रातलं, ज्ञानच तुम्हाला पैसे मिळवुन देतं.
अगदी तसंच प्रत्येक क्षेत्रातलं ज्ञान तुम्ही वाढवत न्या, आपोआप तुमचे इन्कम वाढत जाईल.
कमाई वाढवण्याच्या मार्गावर ह्या काही पायर्या…
१) मी ‘श्रीमंत’ आहे, हा निर्णय घ्या.
तुम्हाला येत्या तीन वर्षात किती रक्कम हवी आहे, हे जाहीर करा. त्याची एक नोट बनवा, त्याचा एक चेक बनवा आणि ते पैसे तुम्हाला ऑलरेडी मिळालेत, अशी कल्पना करा. श्रीमंत असल्याच्या थाटात रहा. तितकेच समृद्ध, उत्साही, समाधानी आणि आनंदी रहा.
आता तुम्ही पुर्वीचे व्यक्ती नाहीत, आता तुम्ही पैसे खेचुन घेणारे चुंबक आहात.
२) श्रीमंतीचं, समृद्धी चं गणित समजुन घ्या.
समजा, तुम्ही येत्या एक वर्षात दहा लाख रुपये कमाईचे ध्येय ठेवले तर, ते फार अवघड नाही,
येत्या तिनशे पासष्ट दिवसात तुम्हाला फक्त एक हजार वेळा एक हजार रुपये कमवायचे आहेत, ते तुम्ही सहज प्राप्त करु शकता, हा विश्वास बाळगा, आणि ते प्रत्यक्षात येईल.
३) कमाई वाढवा.
स्वतःचे स्किल्स वाढवा, काम करण्याची क्षमता वाढवा, स्वतःची आवड ओळखा. आणि मग आवडणार्या कामात स्वतःला झोकुन द्या. आपल्याला कस्टमरची गरज आहे, तितकीच कस्टमरलाही आपली गरज असण्यासाठी, जितके श्रम-परिश्रम आवश्यक आहेत, ते आनंदाने घेत रहा. ह्या जगात फुकट काही मिळत नसतं, कशाच्या तरी बदल्यात काहीतरी असं साधं गणित असतं!
इथे स्वतःला काही प्रश्न विचारुन तुम्ही आत्मनिरीक्षण करु शकता!
- मागच्या सहा सात वर्षात, तुमच्या व्यवसायात कामाला येतील, असे कोणकोणते नवीन तंत्र तुम्ही शिकले का?
- पेशंट्स वाढावेत किंवा आपली फिस वाढावी यासाठी तुम्ही कोणकोणत्या योजना राबवल्या?
- आक्रमकपणे स्वतःची जाहिरात केली का?
- स्वतःच्या नावाचा एक दबदबा तयार केला का? स्वतःच्या क्षेत्रात, स्वतःच्या परिसरात दर्जेदार सेवा देऊन टॉपला पोहचण्यात यशस्वी झालात का?
- ऑनलाईन तंत्रज्ञानाचा वापर करुन आपला व्यवसाय अधिकाधिक उत्पन्न कसे देईल, याचाही विचार करा.
- कोणाच्या अडीअडचणीला धावुन जाता का? आपल्यावर भरभरुन प्रेम करणारी माणसं जोडण्यात तुम्ही किती यशस्वी झाला आहात?
४) तुम्हाला पैसे देणार्याला शोधा आणि त्याला भरभरुन सेवा द्या!
तुमचा ग्राहक शोधा, आपल्या परीने, संपुर्ण शंभर टक्के योगदान देऊन त्याला संतुष्ट करा, तो तुमच्या उद्याची सोय करेल.
५) आलेल्या पैशाला कामाला लावा!
श्रीमंत होण्याचा मुलमंत्र म्हणजे, पैशासाठी काम करु नका, पैशाला कामाला लावा, प्रत्येक रुपया शक्तिशाली आहे, ते बीज आहे, त्याला गुंतवणुकीच्या शेतात पेरा, नियमितपणे सेव्हिंगचं पाणी घाला, काही वर्षात त्याचं भलंमोठं टोलेजंग झाड बनेल, पैशाचं झाड!.. समृद्धी … समृद्धी …
हेच पैशाचं झाड तुमच्यासाठी आर्थिक स्वातंत्र घेऊन येईल. खिशात गरजेपेक्षा जास्त पैसा खुळखुळु लागला की माणुस थंड पडतो, म्हणुन दरमहा वीस तीस टक्के रक्कम योग्य ठिकाणी बचत करा.
रिकामा खिसा अजुन काम करण्यासाठी प्रेरणा देतं. पण आता तुम्हाला माहीत असतं की तुम्ही गरीब नाही, म्हणुन आता तुम्ही परिस्थितीसमोर आगतिक होत नाही, उलट हसत खेळत, कमाई वाढवण्याच्या, नवनवीन कल्पना अंमलात आणता.
६) बचतीकरता बचत नको, गुंतवणुकीसाठी बचत करा.
नुसता पैसा वाचवणे महत्वाचे नाही, त्यापासुन अजुन पैसा मिळवणेही तितकेच आवश्यक आहे, म्युचल फंड माझे फेव्हरेट गुंतवणुकीचे साधन आहेत. एकदम सुरक्षित असलेले डिव्हीडंड फंड वार्षिक बारा ते अठरा टक्के उत्पन्न देतात. थोडेसे एग्रेसीव्ह असलेले ग्रोथ फंड वार्षिक वीस तीस टक्क्यापर्यंत संपत्ती निर्माण करतात.
आज केलेली, दर महीन्याची, पाच ते दहा हजारांची एसआयपी, वयाच्या चाळीशीपर्यंत तुम्हाला आर्थिक स्वातंत्र बनवु शकते.
७) एकापेक्षा अधिक उत्पन्नाचे स्त्रोत उभे करा. – पहिला स्त्रोत पक्का तयार करा.
बिजनेस एकमेकांशी संबंधित असले तर जास्त चांगले.
एका ठिकाणाहुन आलेल्या शंभर रुपायापेक्षा, शंभर ठिकाणाहुन आलेला एकेक रुपया केव्हाही चांगला! ज्ञान, पैसा, वस्तु किंवा सेवा ह्या चार गोष्टी इतरांना देऊन आपण पैसा कमवु शकतो! श्रीमंत होण्याच्या नव्या संधी तुमच्या आजुबाजुला दडलेल्या आहेत, बारकाईने विचार करा. पैसे कमवण्यासाठी, कित्येक कल्पना यापुर्वी तुमच्या मनात घोळुन गेल्या असतील, त्यावर अंमल करा.
तुमचे रोल मॉडेल्स कशा पद्धतीने श्रीमंत झाले, याचा अभ्यास करा आणि त्यांच्या फुटस्टेप्स फॉलो करा.
८) आवश्यकता असल्यास, आजुबाजुचं वातावरण बदला.
जे लोक तुमच्या यशाच्या मार्गात बाधा आहेत, अशा लोकांना टाळा, त्यांच्याशी कमी संपर्क ठेवा, जे लोक तुम्हाला प्रोत्साहन देतात, अशा लोकांशी सहवास वाढवा.
पती पत्नीमध्ये थोडा रुसवाफुगवा असावा, पण पराकोटीची कटुता, द्वेष आणि घृणा नसावी, ती दोघांसाठीही हानिकारक ठरते, थोडी मिश्कीली, थोडं चिडवणं, थोडी छेडछाड आणि खुप सारं घट्ट प्रेम हेच सुखी संसारासाठी इंधन आहे.
शारिरीक जवळीक आणि प्रेमाचा उबदार स्पर्श, कितीही आणि कसल्याही मोठ्या भांडणाला विरघळुन टाकतात. दोघांनीही आपल्याला एकमेकांशिवाय कोणीही नाही, याची खुणगाठ बांधुन प्रत्येक वादविवादानंतर एकमेकांना मोठ्या मनाने माफ करुन पुढे पडावे.
इगो बाळगल्याने चांगले काहीच होत नाही, वाटोळेच होते.
तूमची सारी स्वप्ने पुर्ण होवो, अशी मनापासुन ईश्वरचरणी प्रार्थना!..
शुभरात्री आणि मनःपुर्वक आभार!
वाचण्यासारखे आणखी काही…
गुंतागुंतीचे प्रश्न पण उत्तरं मात्र साधी…. (प्रेरणादायी लेख)
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.