ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचायचं तर असतं, पण ठरवलेल्या गोष्टी साध्य करता येतात का? त्या साध्य करण्यात कोणकोणत्या अडचणी येतात? त्या अडचणी दूर करण्यासाठी काही छोटे छोटे नियम पाळले पाहिजेत… तर ते कोणते? हे समजून घ्या या लेखात..
२०२० ची सगळी स्वप्नं धुळीस मिळाली असे कोणा कोणाला वाटते..?
सहाजिकच आहे.. ह्या कोरोना महामारीने सगळ्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली आहे..
कोणाचे नवीन नोकरी शोधण्याचे प्लॅन्स होते तर कोणाचे वर्ल्ड टूर करायचे.. कोणाला लग्न करायचे होते तर कोणाला फॅमिलीची सुरुवात..
कोणाचे नवीन घराचे बांधकाम रखडले तर कोणाचे नवीन कामधंदा करायचे योगच नाही जुळले..
अवघड म्हणजे ह्या कोरोना विषाणूमुळे आणखी काय होणार हे देखील कोणाला माहीत नाही.. त्यामुळे उर्वरित २०२० वर्षाचे काय करावे हे कळेनासे झाले आहे..
हे जग असेच बदलत असते. मात्र कधी कधी आपल्याला ते कळत नाही किंवा ते बदल अंगवळणी पडलेले असतात.
जागतिक युद्ध, जागतिक महामारी किंवा जागतिक मंदी अशा मोठ्या अडचणी जगाचे रूपच बदलून टाकतात. आपल्या आयुष्यात सुद्धा खूपच बदल घडवून आणतात..
आर्थिक, सामाजिक सगळ्याच गोष्टी बिघडतात.. आपल्या हातातच नसलेली ही परिस्थिती आपल्याला नुसती बघत बसावी लागते..
पण तरीही नुसते हात पाय गाळून बसणे योग्य नाहीच.. बरी वाईट परिस्थिती येत राहते. जग सतत बदलत राहाते..
मात्र आपल्यातले गुण बदलत नाहीत. कार्य करण्याची शक्ती संपत नाही..
कोणतेही संकट आले तरी त्यावर मात करत पुढे चालण्याची मानवजातीची प्रवृत्ती आहे.
त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीतही आपण आपले ध्येय साधू शकतो.. अर्थात नेहमीपेक्षा जास्ती वेळ लागेल पण योग्य योजना आखल्या तर नक्कीच ते पूर्ण होईल..
माणसात असलेला चिवटपणा त्याला स्वस्थ बसू देत नाही.. खरे तर चिवट स्वभावाची माणसेच आयुष्यात हवे ते मिळवू शकतात.. संकट कोणतेही असो ते आल्यावर, आपला हेका, आपले कष्ट, आपले प्रयत्न न सोडणे म्हणजे चिवटपणा.
त्यामुळे अशक्य अश्या परिस्थितीतूनही आपण तावून सुलाखून बाहेर पडतो. फक्त सुरुवात योग्य रीतीने झाली पाहिजे..
चला तर मग, ध्येय कोणतेही असो पण त्यासाठी सध्याच्या आणि भविष्यात येणाऱ्या अवघड परिस्थितीतून बाहेर पडून आपण ते कसे मिळवायचे त्यासाठी कशा रीतीने योजना बनवायला हवी ते जाणून घेऊ:
१. संपूर्ण वर्षात / एका वर्षात काय प्राप्त करायचे आहे ते ठरवा:
बाहेर काय चालले आहे त्याचा विचार सध्या बाजूला ठेवा. जे काही चालले आहे ते एक दिवस संपणार आहे ह्याची खात्री आपल्या सगळ्यांना आहे.
मग त्यानंतर आपण आपल्या ठरवलेल्या गोल्स वर लक्ष केंद्रित करणारच आहोत.. मग त्याला लागणारी कच्ची तयारी सध्या सुरू करूया.
आपल्याला एका वर्षाने काय साध्य करायचे आहे ते ठरवून ठेवा. अशक्य असे लक्ष्य नसावे. जे एक वर्षात करता येईल असे रिअलिस्टिक ध्येय ठेवा..
त्याबद्दल लिहायला सुरुवात करा. वेगवेगळ्या अंगाने रोज विचार करा. तुम्हाला साध्य करता येतील अशा भरपूर संधी दिसू लागतील.
२. रिअलिस्टिक ध्येय पक्के करा:
आपल्याला आपल्या मर्यादा माहीत असतात. आणि आपली झेप कुठे पर्यंत जाऊ शकते ह्याची ही कल्पना असते.
त्यामुळे एका वर्षात करता येईल असेच खरे होऊ शकणारे लक्ष्य ठरवा. कारण ते जर पूर्ण झाले नाही तर आपल्या पदरी निराशा पडू शकते.
आपल्याला अडीअडचणी तर येतातच पण त्यांच्याशी लढून पार झाल्यावर यश मिळणे अपेक्षित असते. जेणे करून आपल्या कष्टाचे सार्थक होईल..
त्यामुळे आपण ठरवलेल्या टाईम स्पॅन मध्येच घडू शकेल असे कार्य किंवा ध्येय प्लॅन करा..
अशक्य ध्येये ठेवू नये अशातला भाग नाही.. पण ते छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागून घ्या.. ह्या वर्षी जितके शक्य आहे तितकेच डोळ्यासमोर ठेवा..
ह्या उदाहरणाने समजणे सोप्पे जाईल..
एखादी व्यक्ती जीचे वजन १२० किलो आहे, त्या व्यक्तीने ५० ते ६० किलो वजन कमी करायचे ठरवले तेही एकाच वर्षात, तर हे अशक्य ध्येय ठरेल.
मात्र दर वर्षी १५ ते २० किलो कमी करायचे ठरवल्यास ते नक्कीच रिअलिस्टिक असेल.. म्हणजे तेवढे ध्येय तुम्ही चिकाटीने प्रयत्न केल्यास साध्य नक्कीच होईल.
३. तुमच्या योजनेची एकेक पायरी नकाशा प्रमाणे आखून ठेवू नका:
जर प्रत्येक महिन्याची, प्रत्येक दिवसाची आणि प्रत्येक तासाची क्रिया तुम्ही लिहून ठेवली असेल तर ते तसे घडेलच असे काही सांगता येत नाही..
वर्षभराची योजना ठरवली असेल तर जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा ती करत चला.. नकाशा काढल्याप्रमाणे वागत राहिलात आणि एखादी मोठी अडचण आली तर प्लॅन फिस्कटू शकतो आणि मग तुमच्यातला उत्साह सुद्धा संपू शकतो..!!
त्यापेक्षा जसे घडत जाईल तसे घडत जाऊ द्या. काही ऍडजस्टमेंट करण्यासाठी सुद्धा त्यात वेळ मिळतो.. आणि सरतेशेवटी योजना यशस्वी होईल.
४. वर्षभरातील सुद्धा फक्त पहिल्या तीन महिन्यांचा (त्रैमासिक) प्लॅन ठरवा:
१२ महिन्यांचे ४ भाग केल्यास प्रत्येक भागात ३ महिने उरतात.. मग आपल्या वर्षाच्या मोठ्या प्लॅन चे त्रैमासिक प्लॅन बनवणे योग्य आहे. म्हणजे ध्येय टप्प्यात येणे सोपे जाईल.
पहिल्या तीन महिन्यात काय काय करता येऊ शकते ते प्लॅन आउट करा. आपल्या ध्येयाबद्दल लेखी नोंद असुद्या.. म्हणजे त्या दृष्टीने काम करण्यास सोपे जाईल.
५. आता ध्येयाची योजना अजून नजरेच्या टप्प्यात आणा:
त्रैमासिक योजना झाली की तिला अजूनही थोडे आवाक्यात आणूया.. एका महिन्यात काय काय शक्य आहे त्याबद्दल ब्रेन स्टोर्मिंग करा.. लिस्ट बनवा.
एका महिन्यात जर १० कामांची यादी तयार होत असेल तर त्यालाही अजून सोपे करायला १५ – १५ दिवसात ते विभागून घ्या.. शक्य झाल्यास एका आठवड्याचा आराखडा बनवा..
असे मोठे काम लहान लहान तुकड्यात विभागून घेतले तर उद्या काय करायचे आहे त्याचा प्लॅन आजच तयार असेल.
समजा आज काही अडचण आली तरी आठवड्यातील करावयाच्या यादीमध्ये एखादा दिवस बफर मिळतोच. म्हणून नकाशा किंवा मॅप बनवून काम करायचे नाही.. ते फसण्याची शक्यता असते.
आपल्या वेळे प्रमाणे आणि कुवती प्रमाणे योजना ठरवली तर आपल्यावर कामाचे प्रेशर येत नाही.. एकेका आठवड्याच्या, महिन्याच्या चढत्या आलेखामुळे आपल्याला नवीन जोश नवीन दिशा देखील मिळते..
तुम्ही अशा रीतीने काम करत राहिलात तर त्रैमासिक प्लॅन, ठरवलेल्या काळाच्या आधीच संपेल. पुढच्या त्रैमासिक योजनेतील काही बाबींवर तुम्ही काम करायला सुरुवातही करू शकाल.. आणि हळू हळू हा प्लॅन वर्षभराच्या आत देखील यशस्वी करू शकाल..
अश्या वर्गीकरणाचे अजूनही फायदे आहेत. आपले रुटीन सेट होते. कामाचे प्रेशर, मेंटल प्रेशर संतुलित राहते त्यामुळे झोप उडणे – भूक उडणे असे त्रासही होत नाहीत. दर दिवशी, दर आठवड्याला लहानसहान टास्क संपत गेल्या तर मानसिक स्थिती खेळी मेळीची राहते..
६. दर महिना अखेरीस कामाचा आढावा घ्या.
१२ महिन्याची योजना म्हणजे नक्कीच मोठी असते. आपण त्याची मैलाच्या दगडाप्रमाणे सुटसुटीत विभागणी केली की आपल्याला ते आत्मसात करायला सोपे जाते. मात्र एकेक मैल पुढे जात असताना मागचे काम व्यवस्थित झाले आहे ना? ह्याचा आढावा नक्की घ्या.
कामात काही त्रुटी राहिल्या असतील तर त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्यात काहीच हाशील नाही. कधी काही अडचणी आल्या तर आपला कार्यकाल सुद्धा वाढू शकतो. अशा वेळी तुम्हाला तुमच्या पुढच्या योजनेत थोडेसे बदल करावे लागतील..
कोणतेही काम थोडे फ्लेक्सिबल म्हणजेच लवचिक ठेवण्याकडे भर द्या. त्यातले बारकावे पकडा. कदाचित तुम्हाला पुन्हा सुरुवात करावी लागू शकेल त्यामुळे घाई न करता एकेका दिवसाची टास्क काळजीपूर्वक संपवा.
७. त्रैमासिक योजना यशस्वी झाल्यावर पुढच्या तिमाहीकडे वळा:
आता पर्यंत ज्या पद्धतीने कामाची वाटणी केली त्याच्या पुढच्या नवीन योजनेस हात घाला वर दिल्या प्रमाणे पुन्हा विभागणी होऊद्या.. दिवसागणिक एकेक सूत्र अलगद हलवा.. आणि त्यात प्राविण्य मिळवा. मागच्या तिमाहीपेक्षा ह्या तिमाही मध्ये तुम्हाला भरपूर बदल जाणवतील..
कामातील खाचाखोचा समजू लागतील.. आणि तुम्ही सराईतासारखे कामा हातावेगळे करत राहाल.. आपल्याला अशा पद्धतीने उरलेल्या २ त्रैमासिक योजना फत्ते करायच्या आहेत हे ध्यानात ठेवा.
हे कोविड १९ प्रकरण किंवा आणखीन अडचणी तुम्हाला कितीही मागे ओढत असल्या तरी तुम्ही खचून न जाता स्वतःच्या स्वप्नांच्या दिशेने काम सुरू करा.. कारण काळ आणि परिस्थिती सतत बदलत असते.. संधी मिळताक्षणी आपल्याला तिचे सोने करता आले पाहिजे.
मग करताय ना सुरुवात आजपासूनच..?
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Khoop chan!👍
Very nice working plan