पोटात उजव्या बाजूला खाली अगदी तीव्र वेदना होतात त्याला अपेंडिक्स असे म्हणतात.
अपेंडिक्स (म्हणजेच आंत्रपुच्छ) ला आलेल्या सूजेमुळे हा त्रास होतो.
अपेंडिक्स ही एक मेडिकल एमर्जन्सि असणारी परिस्थिति आहे.
त्वरित लक्षणे ओळखून उपचार केले नाहीत, दुर्लक्ष झाले तर अत्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात.
जीवाला देखील धोका असतो. अपेंडिक्सचे हे दुखणे अचानक उद्भवलेले (अक्यूट) किंवा आधीपासून त्रास असलेले (क्रॉनिक) असू शकते.
अपेंडिक्स चे अगदी नक्की कारण डॉक्टरांना नीटसे कळलेले नाही.
आज आपण अपेंडीसायटीस बद्दल अधिक शास्त्रीय माहीती जाणून घेऊया आणि ह्या धोक्यापासुन आपला आणि आपल्या प्रियजनांचा जीव वाचवू या.
अपेंडिक्स आहे हे कसे ओळखावे?
अपेंडिक्सची अगदी निश्चित लक्षणे नाहीत त्यामुळे खाली दिलेल्या लक्षणांमधील काही लक्षणे आढळल्यास त्वरित तज्ञ डॉक्टरांना भेटावे.
१. पोटात उजवीकडे खालच्या बाजूला दुखणे.
२. हे दुखणे काही तासात अगदी तीव्र होत जाणे.
३. बेंबीपासून पोटाच्या उजव्या बाजूपर्यंत तीव्र वेदना होत राहणे.
४. भूक न लागणे
५. मळमळणे आणि पोटदुखी सुरू झाल्यावर उलटी होणे.
६. पोटात सूज येणे.
७. ताप येणे
८. पोटात गॅसेस होऊन ते अडकून बसणे.
अपेंडिक्स वर कोणते उपचार करावेत?
अपेंडीसायटीस ही एक एमर्जन्सि असणारी परिस्थिति असते.
त्यावर वेळीच उपचार होणे आवश्यक असते. त्याकरिता वर दिलेली सर्व लक्षणे एकत्र आढळल्यास आपल्याला अपेंडिक्सचा त्रास होत असण्याची शक्यता आहे हे ओळखून तज्ञ डॉक्टरांना भेटावे.
बहुतेक वेळ अपेंडिक्स वर शस्त्रक्रिया करून अपेंडिक्स चा सूज आलेला भाग काढून टाकावा लागतो.
हाच ह्यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. परंतु काही वेळा जर अपेंडिक्स ची सुरुवात असेल, दुखण्याची तीव्रता जास्त नसेल तर अँटी बायोटिक्स देऊनही उपचार होऊ शकतो.
ह्यासाठी तज्ञ डॉक्टरांचे मत घेणे आवश्यक आहे.
अपेंडिक्सवर कोणते नैसर्गिक घरगुती उपाय करता येतील?
खरंतर अपेंडिक्स हा दुर्लक्ष करण्याचा किंवा घरगुती उपाय करून बरे होण्याचा आजार नाही.
त्यावर त्वरित वैद्यकीय सल्ल्याची आवश्यकता असते. परंतु डॉक्टरांची भेट होईपर्यंत वेदना कमी व्हाव्यात म्हणून, तसेच एकूणच हा त्रास उद्भवू नये म्हणून खालील घरगुती उपाय करता येतात.
१. मेथीदाणे
मेथीदाणे अपेंडिक्सच्या सूज आलेल्या ठिकाणी पू होण्यापासून रोखतात, त्यामुळे पोटात होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत होते.
दोन चमचे मेथीदाणे एक लीटर पाण्यात अर्धा तास उकळून मग ते पाणी गाळून घ्यावे. दिवसातून दोन वेळा ते पाणी प्यावे.
२. पुदिना
पुदिना अपेंडिक्स मुळे होणाऱ्या उलट्या आणि मळमळ कमी करण्यास मदत करतो.
पुदिन्याची काही पाने पाण्यात उकळून काढा तयार करावा. हा काढा दिवसातून ३ वेळा सेवन करावा.
३. ताक
ताक हे अन्नपचन करण्यास मदत करते. तसेच ताकात असणाऱ्या प्रो बायोटिक्स मुळे कोणत्याही इन्फेक्शन ची वाढ रोखण्यास मदत होते.
दिवसभरात आपल्या आवडीप्रमाणे मीठ, कोथिंबीर इत्यादी घालून अथवा नुसतेच ताक प्यावे.
४. हिरवे मूग
आख्खे हिरवे मूग हे अतिशय पौष्टिक आणि कोणत्याही इन्फेक्शन अथवा सुजेला रोखण्याचे काम करणारे आहेत.
रात्रभर भिजत घातलेले मूग दुसऱ्या दिवशी सकाळी, कच्चे, वाफवून किंवा शिजवून खावेत.
पोटाच्या कोणत्याही आजारावर हे गुणकारी आहेत.
५. लसूण
लसूण अनेक आजारांवर गुणकारी आहे. लसूण सूज कमी करणे, इन्फेक्शन कमी करणे ह्यासाठी उपयुक्त आहे.
लसणाच्या काही पाकळ्या ठेचून त्या पाण्याबरोबर सेवन कराव्यात.
तसेच लसणाचे गुण असणाऱ्या आयुर्वेदिक गोळ्या देखील घेता येतात.
लसूण नेहेमी रिकाम्या पोटी सेवन करावा.
तर हे आहेत अपेंडिक्स वर करता येण्याजोगे काही घरगुती उपाय.
पण ह्या दुखण्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे लक्षात घ्यावे.
अपेंडिक्स नक्की का होतो? अपेंडिक्स म्हणजे काय
अपेंडिक्स ह्या शरीराच्या भागाकडे होणारा रक्तप्रवाह जर काही कारणामुळे ब्लॉक झाला तर तेथे सूज येऊ लागते त्याला अपेंडीसायटीस असे म्हणतात.
रक्तप्रवाह पोटातील जंत, एखादा ट्यूमर अथवा गाठ, एखादी इजा ह्यापैकी कशाही मुळे अडवला जाऊ शकतो.
त्यामुळे होणारे इन्फेक्शन वाढत जाऊन तेथे सूज येते, पू तयार होतो आणि पोटात तीव्र स्वरूपाच्या वेदना होतात.
ह्या दुखण्याकडे दुर्लक्ष झाल्यास किंवा हा त्रास नक्की कशामुळे होतो आहे हे न समजून उपाय न केल्यास अपेंडिक्स फुटणे किंवा पू पोटात पसरणे ह्या सारखे गंभीर परिणाम होऊ शकतात.
रुग्णाच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अपेंडिक्स वर वेळेवर उपचार होणे अत्यंत आवश्यक आहे.
अपेंडिक्स वर गुणकारी आहार दिनचर्या
अपेंडीसायटीसचा त्रास असेल तर डॉक्टर शक्यतो द्रवरूप आहार घेण्यास सांगतात.
त्याशिवाय त्यांच्या सल्ल्याने खालील पदार्थांचे सेवन करता येते.
१. ताजी फळे आणि भाज्या यांचे सूप अथवा जूस
२. वाफवलेल्या भाज्या
३. मोड आलेली कडधान्ये
४. दूध
५. अधिक प्रमाणात फायबर असणारा आहार
अपेंडिक्सचा त्रास असेल तर काय खाऊ नये
अपेंडीसायटीस चा त्रास असेल किंवा त्याची शस्त्रक्रिया झाली असेल तर खालील पदार्थ मुळीच खाऊ नयेत.
१. जास्त प्रमाणात साखर असणारे पदार्थ
२. कोल्डड्रिंक्स
३. प्रक्रिया केलेले अन्न
४. बेकरी प्रोडक्टस
५. तेलकट मसालेदार खाणे
६. कोणत्याही प्रकारचे मद्य
७. अशा भाज्या व कडधान्ये ज्यामुळे गॅसेस होऊ शकतात.
८. चहा, कॉफी
अपेंडिक्स चा त्रास कोणाला होऊ शकतो?
तसा तर अपेंडीसायटीस चा त्रास कोणालाही होऊ शकतो. परंतु काही लोकांना हा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. ते कोण ते पाहूया
१. अपेंडीसायटीस ची फॅमिलि हिस्ट्री असणारे लोक
२. वय वर्षे १५ ते ३० मध्ये हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.
३. पुरुषांना हा आजार होण्याची शक्यता स्त्रियांपेक्षा जास्त असते.
अपेंडिक्स त्रास होऊच नये म्हणून काय करावे?
अपेंडीसायटीस होणे संपूर्णपणे रोखणे शक्य नाही. परंतु काही उपाय केल्यामुळे हा आजार होण्याची शक्यता कमी करता येऊ शकते. खालील जीवनशैली असणाऱ्या लोकांना हा आजार होण्याची शक्यता कमी असते.
१. आहारात जास्त प्रमाणात फायबर असणे
२. दिवसभरात १० ते १२ ग्लास पाणी पिणे
३. दही, ताक यांचे योग्य प्रमाणात सेवन करणे
४. नियमित व्यायाम करणे
तर अशा प्रकारे आज आपण अपेंडीसायटीस ची संपूर्ण शास्त्रीय माहिती समजून घेतली.
हा त्रास होऊ नये ह्याची पूर्ण खबरदारी घ्या आणि जर हा त्रास उद्भवलाच तर त्वरित डॉक्टरांना भेटा.
स्वस्थ रहा आनंदी रहा.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.