मनाच्या जंगलातल्या ह्या प्राण्यांवर नियंत्रण मिळवायचे असेल तर एकच दोरी आहे, विचारांची बळकट दोरी… ही बहुमुल्य दोरी ज्याच्याजवळ असते तो ह्या जंगली श्वापदांना सहज कंट्रोल करतो.
माहीतीय? जंगल, अभयारण्ये ह्याबद्दल माणसाला कायमच कुतुहुल आणि आकर्षण वाटत आलयं. म्हणुणच लोक ताडोबाच्या किंवा जिम कॉर्बेट पार्क मध्ये सफारीवर जातात. जंगलामध्ये वेगवेगळे प्राणी पहायला मिळतात जसे की वाघ, सिंह, हत्ती, हरीण, घोडे, अस्वले इत्यादी. ह्या प्राण्यांचं दुरुन जरी दर्शन झालं तर सफारीचं सार्थक झालं, असं मानतात.
खरंतर, असंच एक जंगल माणसाच्या मनात पण वसत असतं. आपल्या मनात आपल्या वेगवेगळ्या भावनांचं जंगल असतं. जंगलात असतात, तसे इथेही खुप सारे प्राणी राहतात, पण प्रामुख्याने इथे चार-पाच प्राण्यांची सत्ता चालते, ते आहेत, सिंह, वाघ, लांडगा, कुत्रा आणि ससा. कधीकधी हे सगळे प्राणी मनाच्या जंगलात धुमाकुळ घालतात, हाहाकार माजवतात, आणि माणसाचं जगणं हैराण करुन सोडतात.
- वाघ – तर वाघ हा नेहमी भुकेलेला असतो, सकाळी उठल्यापासुन त्याच्या डोक्यात एकच विचार चालु होतो, आज काय खायचं? असचं आपल्या मनातल्या जंगलातला वाघही आपल्याला सारखं खा..खा.. म्हणत असतो. एकदा जर का ह्या वाघाने कुणाला गुलाम बनवलं, तर मग अशा लोकांना सतत भुक लागते. मग सकाळी उठल्यापासुन ह्यांचं ‘खाव खाव’ सुरु होतं. चहा, टोस्ट, ब्रेकफास्, कधी ज्युस, तास दोन तास होतात, तोच मग जेवणाचे वेध लागतात, साग्रसंगीत जेवण झालं, की काही तासात, दुपारच्या जेवण्याची आठवण होते. तुडुंब पोट भरलेलं असुनही, जिभेचे चोचले काही संपत नाहीत, भेळ, पाणीपुरीचे गाडे दिसले, की हा मनातल्या जंगलातला वाघ डरकाळ्या फोडायला लागतो आणि आदेश आला की हे दिसेल त्या चमचमीत पदार्थांवर तुटून पडतात. एखादी पार्टी किंवा समारंभ असेल तेव्हा हे शिकारीला गेल्याच्या आविर्भावात तो समारंभ साजरा करतात. दिसली शिकार की तुटुन पड ह्या न्यायाने, ते जेवत नाहीत, पोट दुखेपर्यंत ‘हादडतात’. अतिखाणे ही सवय एकटी येत नाही, ती सोबत स्थुलपणा, आळस, निष्क्रियता आणि बुद्धीमंदता ह्या भाऊ-बंदकीला घेऊन येते. अधुनमधुन, राग राग आणि चिड चिड ही चिल्लीपिल्ली पण विरंगुळा म्हणुन चक्कर मारतात.
- सिंह – तुम्ही कधी खराखुरा सिंह बघीतलाय? जास्त करुन तो तुम्हाला लोळतानाच दिसेल, मस्त पैकी झोपुन, आळसाने, तो आळोखेपिळोखे देत असतो. त्याच्यासाठी झोपणं, लोळणं, आळसाणे सुस्तावणं, हेच स्वर्गसुख असतं, दिवसातली खाण्याची वेळ सोडुन, उरलेला सारा वेळ, तो ढाराढुर झोपा काढतो आणि जांभया देतो. माणसाच्या मनाच्या जंगलातला सिंह जेव्हा अधिसत्ता गाजवु लागलो की तो ही त्या माणसाला असाच आळशी बनवतो, सकाळी उशीरापर्यंत लोळायचं, पुन्हा दिवसा वामकुक्षीच्या नावाखाली डुलक्या काढायच्या, आणि रात्री तर आपण झोपतोच!..सोफ्यावर लोळत टि.व्ही बघणं, मोबाईल चाळणं, हेही एक प्रकारचं ‘सुस्तासन’च आहे.
- लांडगा – मनाच्या एका कोपर्यात एक चतुर आणि धुर्त लांडगा लपलेला असतो, ह्याच्या मनात सतत कपटी विचार येत असतात, एखाद्याला कसं अडवायचं? जिरवायचं? फसवायचं? नाहीतर पटवायचं ह्याची प्लानिंग सुरु असते. जोपर्यंत हा लांडगा जागा असेल तर माणसाला सुखाची झोप येत नाही.
- कुत्रा – ‘कामातुराणां न भयं न लज्जा’ ह्या वाकप्रचाराचं जिवंत उदाहरण म्हणजे कुत्रा!..काहीकाही लोकांच्या मनातला श्वान पण असाच अनावर, अनिर्बंध होऊन वागु लागला की वासना मनाचा ताबा घेते, मग अशा लोकांना ‘त्या’ एका गोष्टीशिवाय दुसरं काहीही सुचेनासं होतं. मग हे दिसेल त्या मुलीला, स्त्रीला, जरा बरी दिसली की, बघ, भुकेल्या नजरेने, हा कार्यक्रम सुरु होतो. खरंतर हे मानसिक रोगी असतात, जसं काही मुलांसाठी कॉलेजमध्ये मुली बघणं आणि त्यांना पटवणं हा एककलमी कार्यक्रम त्यांच्या जीवनाची इतिकर्तव्यता बनतो. हा कार्यक्रम ऑनलाईनही अखंड चालुच असतो. युट्युबवर किंवा फेसबुकवर एखाद्या बर्या दिसणार्या मुलीची कमेंट आली की तिला बोलण्याची आणि मैत्री करण्याची स्पर्धा लागते. इनबॉक्स मध्ये भरघोस ‘हाय हाय’ केली जाते. मनातला कुत्रा पिसाळला की माणुस विकृत बनतो, हे फार भयंकर असतं. आणि यांच्यामुळे, नको नको त्या बातम्या पेपर आणि टी.व्हीवर येऊ लागतात.
- ससा – माणसाच्या मनाला काबुत घेणारा अजुन एक प्राणी म्हणजे ससा, ससा हे भितीचं प्रतीक आहे, लहानपणी एका गोष्टीत आभाळ कोसळणार, आभाळ कोसळणार म्हणुन तो भितीने सैरावैरा धावत सुटतो. असेच काही ससे माणसात पण लपलेले असतात. ह्यांना भ्यायला फक्त निमीत्त लागतं.
पेट्रोल, डिझेलचे भाव वाढले की यांना उद्याची भिती वाटते.
घरी यायला, नवर्याला अर्धा-एक तास उशीर झाला, की हे चिंतेने व्याकुळ होतात,
जरा बीपी खालीवर झाला की ह्यांना हर्ट-अटॅकची भिती वाटते.
ही भिती त्यांचा सर्वांत मोठा शत्रु बनते.
कधी मला सुख आणि पैसा मिळेल का नाही ही भिती,
कधी माझ्या प्रिय व्यक्तींचा मृत्यु झाला तर माझे काय होईल असली भिती…
भितीच्या जोडीला संशयही सतत यांच्या मनात वावरत असतो,
एखादी व्यक्ती चांगली वागु लागली तर नक्की यामागे काहीतरी स्वार्थ असेल असा विचार त्यांच्या मनात येतो,
दुसर्यावर घेतला जाणारा संशय पुढेपुढे स्वतःवरही घेतला जातो, स्वतःच्या कुवतीवरचा विश्वास उडुन जातो. मग कुठल्याच कामात मन लागत नाही. आयुष्याचाच बट्ट्याबोळ होवुन बसतो.
संस्कृतमध्ये ह्याच चार प्राण्यांवर एक श्लोक आहे,
आहार निद्रा भय मैथुनं च
सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम् ।
धर्मो हि तेषामधिको विशेष:
धर्मेण हीनाः पशुभिः समानाः ॥
म्हणजे
आहार, निद्रा, भय और मैथुन – ह्या माणसांत आणि प्राण्यांमध्ये एकसारख्या आहेत । मनुष्यामध्ये केवळ एकच गोष्ट आहे, ती म्हणजे धर्म, म्हणजेच ज्यांच्या आयुष्यात धर्माचे आचरण होत नाही, ते पशुतुल्य आहेत.
धर्म म्हणजे चांगले विचार!, धारयति इति धर्म, धारण केला जातो तो धर्म!..एक चांगला मुलगा/मुलगी बनुण कर्तव्ये पार पाडणं हाही धर्मच, तसंच एक चांगला पती/पत्नी बनुण जोडीदाराला खुश ठेवणं, हा पण धर्म.
एक चांगला नागरिक बनुण देशासाठी काहीतरी करणं, हा सुद्धा धर्मच आहे.
सगळ्या जगाचं भलं व्हावं, आणि त्यासोबत माझंही भलं व्हावं, सर्वेत्र सुखिनः सन्तुः असे सांगणारी आपली संस्कृती आहे. कसलाही स्वार्थ न ठेवता, इतरांवर प्रेम करणं, हा सर्वोच्च धर्म आहे.
मनाच्या जंगलातल्या ह्या प्राण्यांवर नियंत्रण मिळवायचे असेल तर एकच दोरी आहे, विचारांची बळकट दोरी… ही बहुमुल्य दोरी ज्याच्याजवळ असते तो ह्या जंगली श्वापदांना सहज कंट्रोल करतो. चांगल्या माणसांची संगत करणं, चांगली पुस्तके वाचणं, महापुरुषांच्या, त्यांच्या विचारांच्या सहवासात राहणं, चिंतन करत, मनाला उदात्त बनवणं हीच मनुष्य जीवनाची सार्थकता आहे.
वाचण्यासारखे आणखी काही…..
धीरुभाई, धीरुभाई आव्या छे!….
पुस्तकं, लायब्ररी आणि मेनु कार्ड
बहीरे व्हा, यशस्वी व्हा!…
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Khup chan lekh ahe.
Nice sie