आजचा दिवस किती मस्त आहे. सगळे काही छान जुळून येतय. पोराची परीक्षा संपल्यामुळे त्याची लुडबुड चालू नाही त्यामुळे आरामात आवरता आले. चला म्हणजे आज नेहमीची ट्रेन मिळणार हे नक्की. जाताजाता केबिनमधल्या गणपतीसाठी हारही घेता येईल.
आज महिन्याचा शेवटचा दिवस आहे. या महिन्यात तसे दोन लेट झालेत पण आज वेळेवर निघालोय म्हणजे वेळेवर पोचेनच. निघताना बायको छान हसली म्हणजे आज दिवस नक्कीच चांगला जाईल. बाकी काहीही म्हणा हो…. तिच्या हास्यावरच आपण फिदा आहोत. फारच कमी वेळा बिचारीला हसायची संधी मिळते. पण हसते तेव्हा दिल खुश होतो. नाही…..नाही …ती रागीट नाही किंवा गंभीर चेहऱ्याचीही नाही हो…. आहो कामाच्या रगाड्यात आणि आमच्या कटकटीतून तिला वेळ कुठे मिळतो हसायला. चला आज लिफ्ट पण आपल्यासाठी थांबली आहे.
अरे वा …..!! आज दीक्षित बाईही जास्तच सुंदर दिसतेय. ऑफिसमध्ये प्रोग्रॅम असेल. गुड मॉर्निंग बोलतानाही जरा जास्तच हसली. आज ट्रेनही चक्क वेळेवर आहेत. जाऊदे ही ट्रेन ..आपली नेहमीचीच ट्रेन पकडू. ही दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाते आणि तिकडून परत बाहेर पडेपर्यंत मागची लोकल आलेली असत. ती बरी पडते डायरेक्ट स्टेशन बाहेर जाता येते.
चला नेहमीची ट्रेन आली. देशपांडेला आज विंडोसीट मिळाली वाटतं. म्हणजे दोन स्टेशननंतर आपल्याला मिळेल. च्यायला…. हे काय …?? इथे कसा सिग्नल मिळाला हिला?? पुढचे स्टेशन तर जवळ आलंय आणि बाजूच्या फास्ट ट्रॅकवर शताब्दीही थांबलेली दिसते…. अरे बापरे …!! हे काय सगळी माणसे ट्रॅकवरून चालत जातायत. लफडं झाले वाटतं ….बोंबला ….सत्यानाश …माझ्याच ट्रेनच्या नशिबात हे यावे. बघूया तर काय चालले आहे.
दरवाज्यावर किती गर्दी…?? लोकंपण खुप हौशी. दरवाजावर गर्दी करून उभे आणि काय झाले ते ही सांगत नाही. ती बाई बघा… एक तर पुरुषांच्या डब्यात चढली आणि आता त्या दरवाजाच्या गर्दीत घुसून काय झाले ते बघतेय. तो मागचा तरुण सोडणार आहे का तिला… . बघा त्याचा हात कुठे कुठे फिरतोय. तो गेला की दुसरा आहेच नंबर लावून. आणि तिला तर बाहेरचे बघण्यात इंटरेस्ट…माझी नजर पाहून बघा कसा चपापला. साले हे असले लोक अशी परिस्थिती पाहतच असतात आणि संधी घेतात. पण तिला समजायला नको?
काय ….???? आंदोलन चालू आहे ..??? रेल रोको.. ?? देवा संपले सगळे. आता दोन तीन तास तरी काही घडत नाही. साली कंपनीही लांब. बस टॅक्सीने वेळ लागणार .टॅक्सीसाठी पैसे कोणाकडे आहेत. आजही लेट. तिसरा लेट. म्हणजे एक कॅज्युअल गेली. वर्षात दोन रजा रेल्वेला द्याव्या लागतातच. बसा आता गूपचूप….
काय आजी..??? खाली उतरायचे आहे का.. ? चालत परत मागे जाणार का ..?? तीन तास तरी हलणार नाही ट्रेन. थांबा उतरवतो तुम्हाला .. सावकाश हळू उतारा. ए भाऊ… आजीला सोड स्टेशनला. हळू हळू सगळे उतरले. चला विंडो सीट पकडून पुस्तक तरी वाचू. ऑफिसला जावेच लागेल. महिना संपतोय. सगळे रिपोर्ट्स बनवायचे आहेत. पुढचे प्लॅनिंग करायचे आहे. सायबाला या सबबी चालणार नाहीत. तो काय चोवीस तास ड्युटीवर. अरे पण प्रत्येकाला आंदोलन करायला रेल्वेच सापडते का ?? आमचेही प्रॉब्लेम आहेत. आम्ही कुठे जायचे..?? आज कोणाचा इंटरव्ह्यू असेल. कोणाच्या नातेवाईकांचे ऑपरेशन असेल. कोणाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जायचे असेल तर कोणाची परीक्षा असेल. कितीतरी महत्वाची कामे आज अडली गेलीत. सांगून तरी आंदोलन करा आम्ही ऍडजस्ट करू काहीतरी!!
काय झाले काका… ??? बापरे… आता इथे कशी करणार तुम्ही. दरवाजात उभे राहून करणार का ..??हो बाहेर गर्दी आहेच. मग काय करायचे ??? थांबा माझ्याकडे पाण्याची बाटली आहे. अर्धी बाटली पाणी आहे. पिऊन टाकूया मग यात मोकळे व्हा. कसले उपकार हो…. बाटल्या आहेत घरात भरपूर. रोज पोराला कोल्ड ड्रिंक पिण्यावरून शिव्या देतो पण आज तीच बाटली कामाला आली. ठेवा बाटली बाजूला अजून कोणाला तरी उपयोगी पडेल. होईल पाण्याची सोय कुठूनही. बघा त्या मुलाने दिली बाटली पाण्याची. काका ही मुंबई आहे… अश्यावेळी सर्वच एकत्र येतात. ही बघा बिस्किटे पण आली. आता बसा आरामात. मलाही फ़ोन आलाय ऑफिस मधून.. आरामात ये. घरीही सांगितले आहे सुखरूप आहे ट्रेनमध्ये. करा आता पाहिजे तितका वेळ आंदोलन. मी माझे पुस्तक वाचून संपवितो.
वाचण्यासारखे आणखी काही…..
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.