भारताच्या बाल शास्त्रज्ञांनी लावलेले ११ अनोखे शोध – IGNITE

आपल्या देशात शास्त्रज्ञांची कमी आहे असे बऱ्याचवेळा म्हटले जाते मात्र ह्या स्पर्धेत ह्या लहान लहान मुलांनी लावलेले शोध बघता आपल्याकडे लवकरच शास्त्रज्ञांची फौज तयार होणार आहे असा विश्वास वाटतो. आपली ही ‘नेक्स्ट जनरेशन’ उज्ज्वल भविष्याची पताका घेऊन सज्ज आहे हे दाखवणारे ११ शोध वाचा या लेखात.

आपण शाळेत शिकताना अनेक लोकांनी लावलेले शोध बघितलेले असतात, त्यांचा अभ्यास केलेला असतो. शाळेतील शिक्षणात असे इतरांनी लावलेले शोध पाठ करणे हेच प्रमुख लक्ष्य असते.

मात्र आताच्या नव्या पिढीचे विद्यार्थी मात्र फक्त एवढ्यावर समाधान मानणारे नाही आहेत. त्यांना नवनवीन प्रश्न पडतात, नवनवीन शंका येतात आणि ह्यातून त्यांना नवीन गोष्टी लक्षात येतात.

ह्या पिढीचे विद्यार्थी स्वतः लहान का होईना पण नवीन शोध लावण्याचा प्रयत्न करतात. भारतात भरणाऱ्या IGNITE ह्या स्पर्धेत अशाच बालशास्त्रज्ञांना संधी दिली जाते.

पाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या ह्या स्पर्धेत, सुरवातीला पहिल्या वर्षी हजार पेक्षा सुद्धा कमी जणांनी भाग घेतला होता. मात्र ह्या वर्षी देशभरातील 301 जिल्ह्यातून वीस हजार विद्यार्थ्यांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला आहे.

आज आपण ह्या वर्षीच्या स्पर्धेत आलेल्या काही आकर्षक शोधांबद्दल बोलू.

१) दोन बल्ब असणारा टॉर्च – मोहमद अलिशर, बारावी, केएसएस कॉलेज

आपल्याला जवळपास रोज लागणारी वस्तू म्हणजे टॉर्च. बाजारात अनेक प्रकारच्या, अनेक आकारांच्या टॉर्च असतात.

काही टॉर्चचा प्रकाशझोत थोडाच लांब जातो, तर काही टॉर्चचा प्रकाशझोत खूप लांब पर्यंत जातो.

पण ह्या विद्यार्थ्याने वेगळी शक्कल लढवून ह्याच साध्या टॉर्चमध्ये एक बल्ब वाढवला.

टॉर्चचा बल्ब समोरच्या दिशेने केंद्रीत असतो त्यामुळे त्याचा पूर्ण प्रकाश समोरच्या दिशेने जाणारा असतो.

पण अलिशरने एक दुसरा बल्ब अशा प्रकारे बसवला की त्याचा प्रकाश टॉर्च वापरणाऱ्या व्यक्तीच्या पायाखाली पडतो.

त्यामुळे पायाच्या अगदी खाली असणारा अडथळा सुद्धा स्पष्ट दिसतो.

मोहमद अलिशरला हा शोध लागण्याचे कारण सुद्धा वेगळे आहे. तो एकदा आपल्या आजीला टॉर्च दाखवत होता तेव्हा त्याला आपल्या पायाखाली असलेला खड्डा दिसला नाही आणि त्यात तो पडला. ह्यातून त्याला ह्या शोधाची युक्ती सुचली.

torch IGNITE

२) कुबड्या कम व्हीलचेयर- एस. रामकीशोर, संजय श्रीनिवास, तामिळ सेलवन, दहावी, महारीशी इंटरनॅशनल स्कुल, चेन्नई , तामिळनाडू

पायाचे व्यंग असलेल्या लोकांना सगळ्यात अवघड जर कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे जिन्यांवरून चढ-उतर करणे.

आपल्या इथे बऱ्याच ठिकाणी व्हीलचेअरने वरच्या मजल्यावर जाण्यासाठी रॅम्प बांधलेला नसतो. त्यामुळे साध्या रस्त्यावरून व्हीलचेयर आरामात जाऊ शकते पण एक-दोन जरी जिने वाटेत आले तरी अडचण येते. यावरूनच या तीन विद्यार्थ्यांना ही अनोखी कल्पना सुचली.

हे तीन मित्र एकदा त्यांच्या एका मित्राच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका अनाथआश्रमात गेले होते. तिथे अपंग मुलांचे हाल पाहून त्यांनी ही युक्ती लढवली.

wheelchair IGNITE

३. एकाग्रता मोजणारे पेन- रुद्र प्रसाद गोस्वामी, अकरावी, डीएव्ही पब्लिक स्कुल, रांची, बिहार

एकदा रुद्र फिजिक्स या किचकट विषयाचा अभ्यास करत बसला होता पण त्याच्या लक्षात आले की काही केल्या त्याचे अभ्यासात लक्ष लागत नाहीये आणि सारखे त्याचे लक्ष विचलित होत आहे.

यातूनच त्याने अशा पेनाचा शोध लावला ज्यात त्याने प्रेशर सेन्सरचा वापर करून मनाची एकाग्रता मोजण्याची सोय केली.

पेनवरची ग्रीप सैल होणे हे या पेनात इंडिकेटर म्हणून वापरले आहेत.

त्यामुळे जर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची एकाग्रता कमी झाली तर ते पेन लगेच तशी सूचना त्याला देते आणि तो परत अभ्यासात लक्ष देऊ शकतो.

penpressure IGNITE

४. लाईट बल्ब काढण्याचे यंत्र- गौतम प्रवीण ए. अकरावी, एसजेएसएसजीजे, तामिळनाडू. श्वेता शर्मा, अकरावी, पोलीस डीएव्ही स्कुल, जालंदर, पंजाब

घरात एखादा बल्ब गेला आणि घरात पुरेशी उंची असलेला एखादा माणूस नसला की पंचाईत होते.

मग आयत्या वेळेस शिडीची शोधाशोध सुरू होते. गौतमला त्याच्या बाबांनी घरात बरेच बल्ब बदलायला लावल्यावर त्याला ही कल्पना सुचली आणि त्याने एका मोठ्या रॉडच्या एका टोकाला क्लच आणि ग्रीप लावली तर दुसऱ्या टोकाला बल्ब पकडण्यासाठी होल्डर लावला आणि कोणालाही अगदी सहज गेलेला बल्ब बदलता यावा याची सोय केली.

bulbchanger IGNITE

५. विविधरंगी हेडफोन – श्वेतलीना झेनिथ , अकरावी , आर्मी पब्लिक स्कूल , अलाहाबाद , उत्तर प्रदेश

मुलींची बुद्धी ही कल्पकता आणि सुंदरता याकडे झुकणारी असते.

आपल्या हेडफोनच्या वायर्सचा गुंता होणे हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे.

हा गुंता सोडवण्यात फार वेळ जातो आणि बऱ्याचवेळा ह्यामुळे हेडफोन खराब सुद्धा होतात.

श्वेतलीनाने प्रॉब्लेमवर एक अत्यंत सोपा पण रामबाण उपाय शोधून काढला आहे.

तिने हेडफोनच्या वायर्स वेगवेगळ्या रंगात रंगवल्या ज्यामुळे त्या सोडवणे अगदी सोपे होऊन गेले आणि त्यामुळे हेडफोन खराब होणे सुद्धा कमी झाले.

coloredheadphone IGNITE

६. ऍडजस्ट करता येणारा एक्सटेन्शन बोर्ड- तेनिथ आदित्य, अकरावी, हिंदू हायर सेकंडरी स्कूल, तामिळनाडू.

आपल्याला वेगवेगळी उपकरणे लावायला इलेक्ट्रिक पॉईंट्स लागतात मात्र त्यांची संख्या प्रत्येक घरात कमीच असते. अशावेळी आपण ऍक्शटेन्शन बोर्ड वापरून जास्त उपकरणे एकाच पॉईंटला लावतो. मात्र ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या आकाराच्या पिन साठी वेगवेगळ्या प्रकारचे एक्सटेन्शन बोर्ड लागतात.

मात्र तेनिथ ह्याने, अशा एक्सटेन्शन बोर्डचा शोध लावला आहे ज्यात सगळ्या प्रकारच्या केबल लावल्या जाऊ शकतात आणि कोणतेही उपकरण त्याला जोडून सुरू केले जाऊ शकते.

तेनिथला अशा बोर्डची गरज आपल्या इतर वेगवेगळ्या प्रयोगांसाठी लागत होती त्यातून त्याला ही कल्पना आली आणि त्याने अशा प्रकारचा बोर्ड बनवला.

adjustable electricity board

७. बंद केल्यावर आपोआप खाली येणाऱ्या ब्लेड असणारा पंखा- अतिर्थ चंद्रन, अकरावी, थिरुमाला, केरळ

घराची साफसफाई करताना सगळ्यात जास्त त्रास देणारी वस्तू म्हणजे सिलिंग फॅन.

फॅनची ब्लेड धुळीने पूर्ण माखलेली असतात आणि त्यांना साफ करण्यासाठी आपल्याला वर चढून फार कष्ट करावे लागतात.

ह्यावर उपाय शोधला आहे तो केरळच्या अतिर्थने.

त्याने एका अशा पंख्याचा शोध लावला आहे जो बंद असताना त्याचे ब्लेडस खालच्या बाजूला लोंबकळत असतात आणि ते सहज साफ करता येतात मात्र जेव्हा तो पंखा सुरू होतो तेव्हा ते ब्लेड बाकी पंख्या सारखे वर जातात आणि हवा देतात.

fan cleaner IGNITE

८. कारसाठी ऑक्सिजन – कार्बन डाय ऑक्साईड इंडिकेटर- एस. आर. वलवा, बारावी, DAE टाऊनशिप, तमिळनाडू
आणि प्रत्युश कुमार साहू – विकास कुमार मलिक, दहावी, खुरडा, ओडिसा

बंद कारमध्ये लहान मुले अडकून त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी आपण बऱ्याचवेळा वाचली असेल पण ह्याच बातमीने काही मुलांना एक नवीन शोध लावण्यासाठी प्रोत्साहित केले.

हा इंडिकेटर कारमध्ये असलेल्या ऑक्सिजन आणि कार्बन डाय ऑक्साईड ह्याचे प्रमाण कार चालवणाऱ्या माणसाला दाखवतो त्यामुळे जर ऑक्सिजन कमी झाला असेल किंवा कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढले असेल तर कारच्या काचा उघडून योग्य ती खबरदारी घेतली जाऊ शकते.

Oxygen carbon IGNITE

९. चोरीची सूचना देणारी पर्स – फामन्या कोन्याक, नववी, मोन, नागालँड

पाकीट किंवा पर्स चोरी होणे ही बऱ्याच वेळा घडणारी घटना आहे. बऱ्याचवेळा चोर एवढ्या शिताफीने चोरी करतात की चोरी झाली हेच आपल्याला समजत नाही

आणि आपल्याला जेव्हा समजते तेव्हा चोर दूर गेलेले असतात.

पण नागालँड मधील फामन्या हिने ह्यावर उपाय शोधून काढला आहे.

तिने एक पासवर्ड असणारी पर्स बनवली आहे जी उघडण्यासाठी पासवर्ड लागेल आणि त्याच बरोबर तिला कनेक्ट असलेलं एक घड्याळ त्या पर्सच्या मालकिणीच्या हातात असते.

जेव्हा पर्स तिच्यापासून दूर जाते तेव्हा ते घड्याळ तिला त्याची लगेच सूचना देते.

ह्यामुळे आपली पर्स चोर घेऊन गेला आहे हे लगेच समजते आणि चोराचा पाठलाग करणे शक्य होते.

Electronic purse IGNITE

 

१०. पायऱ्यांवर माणसे असताना सुरू न होणारी बस- आर. संतोष, अकरावी, जे. राजशेखर , दहावी ए. निवासिनी, दहावी, के. रथना , दहावी गव्हर्नमेंट गर्ल्स स्कूल, तिरुवरूर. तमिळनाडू

खचाखच भरलेल्या बसने प्रवास करणे हे तर आपल्या कुणाला नवीन नाही. बसच्या पायऱ्यांपर्यंत माणसे उभी असतात.

ह्यातून बऱ्याचवेळा अपघात सुद्धा होतात. ह्यावर तमिळनाडूच्या मुलींनी एक उपाय शोधून काढला आहे.

त्यांनी बसला बसवण्याचे एक असे उपकरण शोधून काढले आहे की ज्यामुळे जोपर्यंत बसच्या पायरीवर एक सुद्धा माणूस आहे तोपर्यंत बस आपल्या जाग्यावरून पुढे जाणार नाही.

ह्याचा वापर करून अपघाताचे प्रमाण कमी केले जाऊ शकते.

Bus Step lock system IGNITE

११. बंद लँड लाईन फोन दर्शवणारा सेन्सर- निधी गुप्ता, दहावी, अहमदाबाद, गुजरात

घरी असणारे लँड लाईन फोन नेमके कामाच्या वेळी बंद असणे हे सगळ्यांनीच अनुभवलेले असते.

जो पर्यंत आपण तो रिसिव्हर कानाला लावून डायल टोन ऐकत नाही तोपर्यंत आपल्याला फोन सुरू आहे की नाही हे समजत नाही.

निधी गुप्ता हिने ह्यावर उपाय शोधून काढला आहे. तिने एक असे उपकरण बनवले आहे जे फोनला जोडून ठेवले की जर फोन बंद असेल तर आपल्याला तशी लाईट इंडिकेशन दिसतात आणि आपण लगेच फोन सुरू करून घेण्यासाठी प्रयत्न करू शकतो.

ह्यामुळे फोन दुरुस्तीला लागणारा वेळ कमी होतो आणि ऐनवेळी होणारी धावपळ सुद्धा कमी होते.

dead phone IGNITE

आपल्या देशात शास्त्रज्ञांची कमी आहे असे बऱ्याचवेळा म्हटले जाते मात्र ह्या स्पर्धेत ह्या लहान लहान मुलांनी लावलेले शोध बघता आपल्याकडे लवकरच शास्त्रज्ञांची फौज तयार होणार आहे असा विश्वास वाटतो.

आपली ही ‘नेक्स्ट जनरेशन’ उज्ज्वल भविष्याची पताका घेऊन सज्ज आहे, बरोबर ना!!

Image Credit: thebetterindia

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।