तुमच्या आयुष्यात एखाद्या समारंभामध्ये, ऑफिसमध्ये, बिजनेसमध्ये तुमच्याविषयी आदर निर्माण व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर हा आदर तुम्हांला कमवावा लागतो.
त्यासाठी या 16 गोष्टींकडे लक्ष द्या.
1) वाद टाळा.
एका शिल्पाकाराचं उदाहरण वाचा. एका शिल्पकाराला एका श्रीमंत व्यक्तीने एक मूर्ती तयार करायला सांगितली.
शिल्पकारांनं वेळेत मूर्ती तयार केली श्रीमंत व्यक्तीनं मूर्ती बघून सांगितलं की “मला या मूर्तीचे नाक थोडं मोठं वाटतं” शिल्पकार म्हणाला “बरं! जर कमी करतो”
हातात माती घेऊन शिल्पकारांनं हातोड्याने मूर्तीचे नाक कमी केल्याचा अभिनय केला.
मग श्रीमंत व्यक्तीला जर लांब उभं केलं आणि विचारलं, “आता नाक बरोबर वाटते ना?”
श्रीमंत व्यक्ती खुश झाली.
ती श्रीमंत व्यक्ती जिथून मूर्ती पहात होती तिथून ते नाक मोठं वाटत होतं.
पण शिल्पकाराला आपल्या ज्ञानावरती विश्वास होता. त्यामुळे त्यांनं त्या व्यक्तीशी अजिबात वाद घातला नाही, तर त्याचं म्हणणं ऐकून घेतलं आणि स्वतःच्या ज्ञानाचा वापर करुन स्वतः विषयी आदर निर्माण केला.
त्यामुळे मित्रांनो कुठेही वाद घालणं टाळा.
2) लक्षात ठेवा दुर्मिळ वस्तूंची किंमत जास्त असते.
चार्ली चॅप्लीन यांना एका जाणकार व्यक्तीने सांगितलं होतं की “तू स्वतः प्रेक्षकांना प्रत्यक्ष भेटत राहिला तर तुझी किंमत कमी होईल,तुझे चित्रपट चालणार नाहीत, पण जर तू त्यांच्यापासून दूर राहिलास तर तुझी एक झलक पाहण्यासाठी, तुझ्या चित्रपटांसाठी लोक गर्दी करतील”
आणि खरंच चार्ली चॅप्लीन यांना आयुष्यात हा सल्ला फार मोलाचा ठरला.
मित्रांनो हाच नियम तुमच्यासाठी सुद्धा आहे. तुम्ही सगळ्यांना कधीही अव्हेलेबल असाल तर तुमची किंमत काहीच उरत नाही.
पण जशी दुर्मिळ वस्तूंना मोठी किंमत मिळते तशी तुमच्या सहवासाला मोठी किंमत तुम्ही मिळवू शकता.
सतत भेटीगाठी घेऊन स्वतःची किंमत कमी करून घेऊ नका.
3) उत्कृष्ट कथाकथन
जी व्यक्ती घटना रंगवून सांगते ,जिच्याकडं नवंनवं सांगण्यासारखं असतं ती व्यक्ती समारंभाची शान असते.
तुम्हाला जर गर्दीमध्ये आपल्या स्वतःचं अस्तित्व दाखवून द्यायचं असेल तर चांगल्या पद्धतीने गोष्ट रंगवायला शिका.
नर्मविनोद, तपशील सांगत उत्सुकता वाढवत नेणारी गोष्ट सगळ्यांना हवीहवीशी वाटते.
कुठल्याही क्षेत्रात चांगल्या पद्धतीने तुम्ही बोलू शकलात, संवाद साधू शकला तर तुमच्याकडे सगळ्यांचं लक्ष जातं.
समारंभात लोक तुमची वाट पाहतात.
तुम्ही नोकरी करत असाल तर उत्तम संवाद साधत चांगली संधी मिळवू शकता.
तुमच्या बोलण्याचा प्रभाव पाडत तुम्ही चांगला बिजनेस करू शकता.
4) तुमच्या व्यक्तिमत्वाचा दबदबा तयार करा.
स्वराज्याचे सरसेनापती धनाजी आणि संताजी यांची चाहूल जरी लागली तरी शत्रूची घोडी पाणी प्यायला सुद्धा घाबरायची एवढा त्यांचा दबदबा होता म्हणे.
आजच्या काळात तुम्हाला कोणती लढाई वगैरे करायची नाहीये.
फक्त तुमच्या व्यक्तिमत्वाचा असा दबदबा निर्माण करायचा आहे की जरी तुम्ही एखाद्या ठिकाणी उपस्थित नसला तरी तुमची कमी तिथं जाणवावी आणि तुमची आठवण निघावी.
5) आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
तुम्ही काय विचार करता हे आयुष्यात फार महत्त्वाचं असतं.
तुम्ही जर असा विचार करत असाल की मला इतक्या अडचणी आहेत की भव्यदिव्य काही करणं मला काही जमणार नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्यात भव्यदिव्य सोडा पण चांगला ही फारसं काही करू शकणार नाही.
तुमची नकारात्मकता तुमचं व्यक्तिमत्त्व पुसून टाकेल.
याउलट या अडचणी मागची संधी जर तुम्ही पाहिलीत तर मात्र तुमचं व्यक्तिमत्त्व खुलून तुमच्याविषयी बऱ्याच जणांच्या मनात आदर निर्माण होईल
6) अधिकारी व्हा.
डॉक्टर, वकील, पोलिस, आर्मी यांचे युनिफॉर्म बघून तुम्ही त्यांचा अधिकार मान्य करता आणि त्यांचं म्हणणं गुपचुप ऐकता.
तुमचंही म्हणणं इतरांनी असं ऐकावं असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या क्षेत्रातील अधिकारी व्हा.
त्यासाठी एमपीएससी किंवा यूपीएससी द्यायला पाहिजे असं नाही तर तुम्ही ज्या क्षेत्रात आहात या क्षेत्रांमध्ये अभ्यास करून असा एक टप्पा गाठा जिथं तुम्हाला बरीचशी माहिती असेल,तुमचा त्या क्षेत्रामध्ये अधिकार निर्माण होईल.
काही वेळा कल्पकता वापरा. एक छोटसं उदाहरण.
जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या एका छोट्याशा कंपनीच्या मालकाने एक रिसेप्शनिस्ट अपॉईंट केली.
कुठलीही चौकशी झाली की ती रिसेप्शनिस्ट म्हणायची “मला याच्या विषयी जास्त माहिती नाही, पण तुम्ही विनय सरांना भेटू शकता त्यांचा या क्षेत्रामध्ये पंधरा वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे, ते तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करतील.
ग्राहकाच्या मनात आपोआप विश्वास उत्पन्न व्हायचा आणि ही चौकशी व्यवहारात लवकरच बदलायची.
तर मित्रांनो तुम्हाला ही असाच फायदा होऊ शकतो.
त्यामुळे तुमच्या क्षेत्रामध्ये अधिकारवाणीने बोलण्याचा टप्पा मेहनतीने आणि जिद्दीने पार करा.
7) उत्तम निवाडा करा.
तुमच्या आजूबाजूला परिवारात बरेच छोटे मोठे वाद झडत असतात.
अशा वेळेला वाद घालणाऱ्या व्यक्तीची देहबोली पहा.
वाद जिंकला तर कोणाला फायदा होईल? याचा विचार करा.
जेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी नीट लक्षात येतील तेंव्हा असा एखादा पर्याय सुचवा की ज्यामुळे वादविवाद पूर्णपणे बंद होईल.
एकाच बाळावर हक्क सांगणार्या दोन मातांची कहाणी तुम्हाला माहिती असेलच.
बाळाचे तुकडे करायचे ठरल्यानंतर खरी आई कळवळून आपल्या बाळाच्या सुरक्षिततेसाठी त्याचा त्याग करायला तयार झाली.
तसं घरगुती वादात किंवा ऑफिसमध्ये वाद चालू असताना काही गैरसमज आहेत का किंवा काही कुरबुरी आहेत काही समजून घेऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न केलात तर तुमची एक आदराचं स्थान म्हणून ओळख निर्माण होईल.
8) जी गोष्ट माहित नाही त्याविषयी कबुली द्या.
कितीतरी वेळा आपण बघतो एखादी बोलबच्चन व्यक्ती चुकीची माहिती आत्मविश्वासाने सांगत असते.
पण मग अशा व्यक्ती विषयी कुणाच्याही मनात आदर उरत नाही.
त्या व्यक्तीच्या पाठीमागं त्याचं हसू होतं, चेष्टा होते.
त्यामुळे मित्रांनो तुमच्या विषयीचा आदर टिकवायचा असेल तर ज्या विषयाची तुम्हाला पक्की माहिती आहे त्या विषयावरच बोला.
ज्या विषयात तुम्हाला अजिबात गती नाही त्याविषयी मुळात बोलणंच टाळा किंवा सरळ सरळ सांगा “मला खरंच याविषयी नेमकी माहिती नाही”.
तुमचा प्रामाणिकपणामुळे तुमच्या विषयीचा आदर दुपटीने वाढेल.
9) दुसऱ्यांच्या मतांचा आदर करा.
प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या वातावरणात वाढलेली असते.
त्यामुळे प्रत्येकाची एकाच गोष्टीविषयी वेगवेगळी मतं असू शकतात.
मी म्हणेन ती पूर्व दिशा असा जर तुम्ही वागत असाल, दुसऱ्यांचे मत खोडून काढायला लागलात तर ते तुम्हाला महागात पडेल.
कुठल्याही व्यक्तीचे मत चुकीचे ठरवायला लागलात तर तुम्ही त्या व्यक्तीला दुखावता
त्यामुळे ती व्यक्ती तुमचा प्रतिकार करायला लागेल, द्वेष करायला लागेल.
तिच्या आणि इतरांच्या मनात तुमची किंमत शून्य होईल. त्यामुळे दुसर्याच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा, मतांचा आदर करा.
आज खाद्यपदार्थांची विक्री करणारी व्यक्ती उद्या जर तुमच्याकडे कपडे विकायला आली किंवा परवा तिच्या हातात क्लिनिंग मटेरियल दिसलं तर त्या व्यक्तीविषयी तुमच्या मनात काय येतं?
तुम्ही म्हणाल “किती हा चंचलपणा एक नेमकं काम करायचं ना?”
तुम्ही पण हेच लक्षात ठेवा एकच क्षेत्र निवडून त्याच्यामध्ये इतकी मेहनत करा की समोरच्या व्यक्तीला ते काम तुम्ही आनंदाने, सहजतेने करत आहात असं वाटलं पाहिजे.
यासाठी त्या कामाची सतत प्रॅक्टिस तुम्ही केली पाहिजे. त्यावर प्रभुत्व मिळवायला पाहिजे.
जितकं कठीण काम तुम्ही सहजतेनं करून दाखवाल तितका तुमच्या विषयीचा आदर वाढायला मदत होईल.
11) स्वतःचे गोडवे कधीच गाऊ नका.
एखादं छोटसं यश मिळाल्यानंतर कितीतरी लोक मी कसं हे यश मिळवलं, हे प्रत्येकाला सांगत सुटतात.
किंवा मी अमुक करणार आहे, तमुक करणार आहे अशा अनेक अशक्यप्राय गोष्टी प्रत्येकाला सांगतात.
त्यामुळे काय होतं? तुमच्या मागे तुमची चेष्टा केली जाते.
तुमचे ध्येय कितीही कठीण असलं किंवा कितीही सोपं असलं तरी ते तुमच्या मनात ठेवूनच प्रयत्न करा, आणि त्यासाठी मेहनत इतकी गुपचूप करा की तुमचं यश स्वतःचं डंका वाजवेल.
12) सामाजिक शिक्का महत्वाचा.
ऑनलाइन शॉपिंग आजकाल सगळे करतात. आज त्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत.
पण एक वस्तू दोन साइटवर एकाच किमतीत उपलब्ध असली तर तुम्ही काय करता?
तुम्ही लोकांची प्रतिक्रिया बघता. ज्या साईटला जास्त लोकांनी चांगला म्हटलेलं आहे तो पर्याय तुम्ही निवडता.
तर मित्रांनो तुमच्या जीवनात सुद्धा अशी सामाजिक प्रतिक्रिया एक सामाजिक शिक्का महत्त्वाचा ठरतो.
लघुउद्योगाला मिळालेली दाद तुम्ही सोशल मीडियावर शेअर करू शकता.
नोकरीसाठी एखादा व्यक्ती ने तुमच्या विषयी दिलेली खात्री तुमच्या व्यक्तिमत्वाचं वजन वाढवायला मदत करतात.
13) व्यक्तिमत्वाचा नीटनेटकेपणा.
मागे एकदा सोशल मीडियावर सोनू निगमचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला तुम्ही पाहिलात का?
फाटके कपडे घालून चेहऱ्याची ओळख लपवून एक तोडक्या-मोडक्या पेटीसह रस्तावर गाणाऱ्या सोनूकडं कुणाचं फारसं लक्षच नव्हतं.
पण सोनू निगमच्या एका कार्यक्रमाचं तिकीट किती महाग असते हे तुम्हाला माहिती आहे ना?
शरीरापेक्षा मनाची पारख करा असं कितीही सांगितलं तरी नकळत तुमच्या दिसण्याचं वागण्याचं निरीक्षण केलं जातं.
त्यामुळं नीटनेटक्या व्यक्तिमत्वचा समोरच्या मनावर नक्की चांगला प्रभाव पडतो यामध्ये शंका नाही.
14) समानता
जेव्हा तुम्ही एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येता, तेव्हा त्यांच्यात आणि तुमच्यातला एक समान धागा शोधा.
म्हणजे तुमचं एकमेकांशी लगेच पटू शकते, तुम्हाला बोलायला विषय मिळू शकतात.
तुमचा बिझनेस यशस्वी होऊ शकतो, नोकरीमध्ये तुम्हाला पुढे चांगली संधी मिळू शकते.
खरतर निसर्गात प्रत्येक सजीवाची एकसमान किंमत आहे, आपण मात्र सामाजिक आणि आर्थिक स्तर तयार करून त्यात ढवळाढवळ करतो.
“माणसाने माणसाशी माणसासम वागणे” हेच सूत्र झाली महत्त्वाचं असल्यामुळे दोन माणसात काय समानता आहे हे ओळखून त्याप्रमाणे संवाद साधणे महत्त्वाचे ठरतं.
15) कौतुक करा.
समोरच्या व्यक्तीमधली छोट्यातील छोटी चांगली गोष्ट शोधून काढा, आणि त्याचं कौतुक करा.
चांगले लेखन, चांगला ड्रेस, गालावरची खळी, पर्स ,अशा कितीतरी गोष्टींचं तुम्ही मनापासून कौतुक करू शकता.
कारण प्रत्येकाला स्वतःचं कौतुक ऐकून घेणं आवडतं.
त्यामुळे चांगल्या गोष्टींचं कौतुक करण्याची संधी कधीही सोडू नका.
16) संपर्कक्षेत्र वाढवा.
एखाद्या बँकेमध्ये तुमचं काम आहे आणि ते काम काही कारणांनी खोळंबलं आहे.
दुसऱ्या एका बँकेमध्ये असणारा मित्रांची तुम्हाला आठवण येते.
त्याला फोन केल्यावर तुमचं काम चुटकीसरशी होतं.कारण त्या मित्राचं त्याच्या क्षेत्रातलं संपर्क क्षेत्र भलं मोठं आहे.
तर मग अशा वेळेला त्या मित्राविषयी तुमच्या मनात आदर दाटणारच ना?
तर मग तुम्ही जितक्या लोकांशी संपर्क कराल त्यांना मदत कराल तितकी तुमची किंमतही वाढत जाणार.
मित्रांनो आयुष्यामध्ये सगळ्यांनी तुमचा आदर करावा असं तुम्हाला वाटत असेल तर अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक बघणं फार गरजेचे ठरतं.
तुम्हांला मिळणारा आदर हा तुमच्या कोणत्या गुणांमुळे येतो हे आम्हाला कमेंंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.