आता माझं वय झालं!!!.. असं आपण अनेकदा अनेकांच्या तोंडून ऐकतो. आयुष्याला सुरवात होऊन प्रवासात थोडं पुढे आलं की अनेक गोष्टी आपल्याला क्षमतेच्या बाहरेच्या वाटू लागतात.
अनेकदा आपला कंटाळा अथवा काहीतरी कारण काढून गोष्टींपासून लांब पळण्याची सवय ह्यासाठी आपण ‘वयाचा’ आधार घेतो. पण काही माणसांसाठी वय म्हणजे फक्त एक नंबर असतो.
आपण बघितलेल्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्याची एक जिद्द वयाच्या नंबरलाही लाजवते.
‘मन कौर’ ह्या एका भारतीय धावपटूनेही आपल्या जिद्दीने वयाला लाजवलेलं आहे. १४ मुलांची पणजी, ९ मुलांची आजी, ३ मुलांची आई असणाऱ्या ‘मन कौर’ ह्यांनी वयाच्या १०३ व्या वर्षी ‘वर्ल्ड मास्टर’ स्पर्धेत, स्पेन इथे सुवर्ण पदक मिळवलेलं आहे.
आजवर ३० पेक्षा जास्त सुवर्णपदकांची कमाई करणाऱ्या मन कौर ह्यांनी आपल्या कर्तृत्वाने सर्वांपुढेच एक आदर्श ठेवला आहे.
वयाच्या ९३ व्या वर्षी आपल्या ८० वर्ष वय असलेल्या मुलाच्या सांगण्यावरून त्यांनी धावपट्टीवर पाऊल ठेवलं. मन कौर ह्यांचे चिरंजीव गुरदेव सिंग हे सुद्धा आपल्या जीवनात एक उत्कृष्ट धावपटू आणि खेळाडू राहिलेले आहेत.
वयाची ९० वर्षा पेक्षा जास्त कालावधी जगून पण आपली आई कोणत्याही आजाराविना तंदुरुस्त आहे हे बघून त्यांनी आपल्या आईला धावण्याचा सल्ला दिला.
मन कौर ह्यांनी मग धावपट्टीला आपलंसं केलं ते कायमचं! आपल्या आईची आवड आणि जिद्द बघून त्यांनी आपल्या आईला अजून प्रोत्साहन दिलं.
एका गरीब आणि सामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असणाऱ्या ‘मन कौर’ ह्याचं पूर्ण आयुष्य आपल्या कुटुंबाला एक उज्ज्वल भविष्य देण्यात गेलं.
आपल्या आईची शारीरिक सुदृढता आणि धावपट्टी वर धावण्याची जिद्द ह्यासाठी त्यांनी आपल्या आईला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्याची संधी दिली.
क्रिकेट पलीकडे पण काही खेळ असतात हे अनेकांना ठाऊक नसल्याने अशा स्पर्धेत भाग घेण्यापासून ते तिकडे जाण्याची, येण्याची व्यवस्था करण्याची सगळी सोय ही स्वतःच्या पैशाने गुरदेव सिंग ह्यांनी केली.
त्यासाठी आपला धंदा त्यांनी विकला त्या पैशातून त्यांनी आपल्या आईला अशा स्पर्धांसाठी वेगेवगळ्या देशात पाठवले.
२०१७ साली १०० ते १०४ वर्ष गटात त्यांनी १०० मीटर धावण्यात सुवर्णपदक पटकावलं. ७४ सेकंदात हे अंतर त्यांनी पूर्ण केलं. १०० मीटर, २०० मीटर धावणं तसेच वयाच्या १०२ वर्षी चक्क भालाफेक स्पर्धेत भाग घेऊन १६ फूट लांब भाला टाकत एका जागतिक विक्रमाची नोंद केली.
भाग घेतलेल्या सगळ्या प्रकारात मन कौर सुवर्ण पदकाच्या मानकरी ठरल्या. भारताचा तिरंगा अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी डौलाने फडकावला.
ह्या नंतर मन कौर ह्यांनी आपल्या सरावावर अजून जास्त लक्ष दिलं. रोज धावपट्टीवर जाऊन त्या प्रत्येक दिवशी ३० मीटर, ५० मीटर धावतात तर एका दिवसानंतर १०० मीटर, २०० मीटर धावण्याचा सराव ही करतात.
व्यायामशाळेत जाऊन वजन उचलून आपल्या शारीरिक क्षमतेला अजून उंचीवर त्यांनी नेलं आहे. आज त्या १०० मीटरचं अंतर ७० सेकंदापेक्षा कमी वेळेत पूर्ण करतात.
वयाच्या १०३ व्या वर्षी एका सेकंदाने अंतर लवकर कापायला किती सरावाची गरज भासत असेल ह्याचा अंदाज पण आपण लावू शकत नाही.
‘मन कौर’ ह्यांनी आता २०२० साली जपान इकडे होणाऱ्या वर्ल्ड मास्टर स्पर्धेसाठी आपली तयारी सुरु केली आहे. रोज संतुलित आहार, सराव आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द हे आपल्या यशाचं गमक आहे असं सांगणाऱ्या मन कौर वयाच्या १०५व्या वर्षी आपण अजून जागतिक विक्रम स्थापन करू हे आत्मविश्वासाने सांगतात.
तरुण मुलांसाठी त्यांनी केलेला उपदेश खूपच मोलाचा आहे. आजकाल झटपट मिळणारं जंक फूड आणि इतर गोष्टी आपल्या शरीराला घातक आहेत.
त्यांच्या सेवनापासून लांब राहून नियमित सराव केला तर वय हे तुमच्यासाठी फक्त एक नंबर आहे. वयाची शंभरी पूर्ण केल्यावरही आपल्या वयाला लाजवत जागतिक स्पर्धेत भाग घेऊन आयुष्य जगलेल्या ‘मन कौर’ ह्यांना माझा साष्टांग दंडवत!
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
फारच छान