पंडित नेहरू हे मूळचे काश्मिरी पंडित असलेल्या कौल या घराण्याचे वंशज.
पुढे कौल हे नाव वगळून, नेहरू हे त्यांच्या कुटुंबियांचे आडनाव बनले. ही १७०० सालची गोष्ट आहे.
पुढे काळाच्या ओघात हे घराणे अलाहाबादेत वास्तव्यास आले. इंदिराचे नाव बालपणापासून ‘प्रियदर्शिनी इंदिरा’ होते.
घरात मात्र तिला सगळे इंदूच म्हणायचे. इंदिरा भारताच्या स्वातंत्र्य चळवळी दरम्यान मोठी झाली आणि तिला राजकीय घडामोडींची चांगली जाणीव होती.
बालपणापासुन ती होती अबोल, एकाकी. आईची आर्त व्याकुळता आणि पित्याची तेजस्वी भव्यता यांचा नाद तिच्या मनात घुमत राहिला.
स्वत:च्या घरी देशाचा घडत असलेला इतिहास ती लहानपणापासून पहात होती. वयाच्या ११ व्या वर्षी तिने आपल्या वडिलांच्या पावलावर पाउल ठेवले आणि वडिलांबरोबर ब्रिटीशांविरुद्धच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतला.
स्वातंत्र्योतर काळात भारताच्या राजकारणावर समाजकारणावर प्रभाव टाकणारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करून देणारी महिला म्हणजे इंदिरा गांधी.
मोतीलाला नेहरू यांच्या नातीला आणि भारतातील सर्वांत लोकप्रिय पुढारी असलेल्या जवाहरलाल नेहरू यांच्या लाडक्या कन्येला तिच्या पूर्वायुष्यातसुद्धा इतक्या समर प्रसंगांचा सामना करावा लागला असेल, याची अनेकांना कल्पनाही नसेल.
आपल्या नंतरच्या आयुष्यात पोलादी मन असलेली स्त्री असा लौकिक कमाविलेल्या इंदिराजी लहानपणी आणि तरुणपणी किती हळव्या होत्या हे काळाच्या ओघात धूसरंच राहून गेलं.
प्रियदर्शिनी इंदिराचे नाव गांधी असे झाले यामागे बरेच तर्क-वितर्क लावले जातात. यामागे बरेच राजकीय हेतू असतात, हे यात ओघाने आलेच.
खरं पाहिलं तर इंदिरा आपल्या आईसोबत जेव्हा भोवालीला गेली तेव्हा फिरोज पहिल्यांदा तिच्या आयुष्यात आला. काळ होता साधारण १९४०-४१ चा….
देश काहीसा स्वातंत्र मिळवण्याच्या उंबरठ्यावर होता. एव्हाना फिरोजने किमान दोनदा तरी तिला लग्नाची मागणी घातली होती. आनंदभवनात सर्वत्र सहजतेने वावरणारा आणि आता भोवालीला कमलेबरोबर सोबत म्हणून आलेला हा फिरोज गांधी होता तरी कोण?
१२ सप्टेंबर १९१२ ला मुंबईमध्ये जन्मलेला फिरोज मूळचा गुजराथी. त्याचं महात्मा गांधींशी काहीही नातं नव्हतं. तो धर्माने पारशी होता. त्याचे वडील जहांगिर हे मरीन इंजिनीयर होते.
त्याच्या आईचे नाव रत्तीबाई. जहांगीर आपल्या कुटुंबासह मुंबईत राहात होते. १९२० च्या सुमारास जहांगीर यांच्या मृत्यूनंतर रत्तीबाई आपल्या चार मुलांसह अलाहाबादेस डॉ. शिरीन कमिसारियात यांच्या घरी राहण्यास आली.
डॉ. शिरीन या फिरोजची अविवाहित आत्या. डॉ. कमिसारियात या एक निष्णात सर्जन होत्या. अलाहाबादमध्ये लेडी डफरीन हॉस्पिटलच्या अखत्यारित येणाऱ्या बावन्न जिल्ह्यांच्या त्या प्रमुख होत्या.
अलाहाबादच्या उच्चभ्रू वर्तुळात तिची ऊठबस होती. तीने आपल्या या तरुण भाच्याची म्हणजेच फिरोजची सर्वस्वी जबाबदारी उचलली. फिरोज हा आधी विद्या मंदिर हायस्कूलचा आणि नंतर एविंग खिश्चन कॉलेजचा विद्यार्थी.
सन १९३० मध्ये फिरोजने युवा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्याची कमला नेहेरूंबरोबर ओळख झाली.
शेतकऱ्यांच्या एका चळवळीचं नेतृत्व करतानाच्या आंदोलनात कमला नेहरूंना भोवळ आली असतांना, फिरोजने त्यांची देखभाल केल्यांनतर त्याचे नेहरूंच्या आनंदभवनात येणे जाणे सुरु झाले.
प्रॉव्हिन्समध्ये शेतकऱ्यांची शेतसारा न भरण्याची जी चळवळ सुरू होती त्यात फिरोजने सक्रिय सहभाग घेतला.
त्यानंतर १९३३ मध्ये नेहरूंनी या चळवळीत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे ब्रिटिशांनी कसे हाल चालवले आहेत याची पाहणी करण्यासाठी फिरोजला खेड्यांमध्ये पाठवले.
इकडे कमला नेहरूंची प्रकृती बरीच खालावल्याने. इंदिराचे लक्ष आईच्या सुश्रुषेत होते. फिरोजचा मृदू स्वभाव आणि त्या कठीण काळात त्याची साथ यामुळे इंदिरा आणि फिरोज यांचे संबंधी दृढ होत गेले.
इंदिरा आणि फिरोज दोघांना बागकामाची आवड होती. पुढे काही वर्षांनी अहमदनगर फोर्ट जेलमध्ये बंद असलेल्या आपल्या वडिलांना लिहिलेल्या पत्रात इंदिराने फिरोजच्या बागकामाची स्तुती केली होती.
२२ नोव्हेंबर १९४३ रोजी आनंद भवन इथून लिहिलेल्या एका पत्रात ती लिहिते,
“मी आताच बगिच्यातून येते आहे. काही महिन्याआधी इथे फक्त गवत होतं. पण आता त्यांनी बगिच्यातलं गवत कापलं आहे. फुलझाडं छान ओळीत लावली आहेत. जी अतिशय सुंदर दिसतं आहेत. हे सगळं फिरोजमुळे होतं आहे. त्यांनी जर बगिच्याची जबाबदारी घेतली नसती मला माहिती नाही मी काय केलं असतं. मला एवढं माहिती आहे की मी काही करू शकले नसते.”
इंदिरा आणि फिरोज यांच्यातली जवळीक जशी वाढली. तशी काही लोकांनी इंदिरा गांधी आणि फिरोजच्या नात्याबद्दल चर्चा करायला सुरुवात केली होती.
पण भारताच्या विकासासाठी फिरोज आणि इंदिरा यांची गरज लक्षात घेता या चर्चांना कुणी फारसं गांभीर्यानं घेतलं नाही.
पंडित नेहरू आणि कमला यांना मात्र फिरोज पारशी धर्माचा असल्याने या नात्याबद्दल चिंता होती. राजकीय जीवनात खळबळ उडण्याची भीती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.
हि चिंता महात्मा गांधींकडे त्यांनी बोलून दाखवली तेव्हा महात्मा गांधींनी फिरोजला गांधी हे उपनाम देऊन हिंदू रितीरिवाजाने लग्न करण्याचा सुझाव दिला. पुढे सण १९४२ मध्ये इंदिरा आणि फिरोझचे हिंदू रीती रिवाजाने लग्न झाले.
लेखिका पुपुल जयकर लिखित इंदिरेचे आत्मचरित्र खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.