दरवाज्यावर थाप पडली आणि मी खडबडून जागा झालो. घड्याळात लक्ष टाकले तर पहाटेचे चार वाजले होते.थोड्या काळजीने दरवाजा उघडला तर समोर बंड्या उभा “भाऊ चला…..जनाआजी सिरीयस आहे. घेऊन जाऊ हॉस्पिटलला. त्याच्या स्वरात काळजी होती.
मी कपडे चढविले. मनात म्हटले म्हातारी आज गेली तर वांधे होतील. नेमके आजच महत्वाचे ऑडिट आहे. नाही गेलो तर साहेबांच्या शिव्या खाव्या लागणार.
जनाआजी म्हणजे आमच्या बिल्डिंगमधील राहुल पवारची आई. राहुल माझ्याच वयाचा. माझा मित्रच……. आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. राहुलने काकांना फोन लावला तेव्हा उत्तर आले “काही घडले नाही ना…. ?? आणि तिथे आता येऊन काय करू… ?? येतो सकाळी….. मग आतेला…तर उत्तर, “आले असते रे आता…पण नातवाला डबा करून द्यायचा आहे. त्याचे आईवडील ऑफिसच्या पिकनिकला गेले आहेत ना”…….
राहुल काही न बोलता शांतपणे माझ्या बाजूला बसला. त्याच्या मनातली खळबळ स्पष्ट दिसत होती. इतक्यात गावावरून फोन आला “अरे कशी आहे तब्बेत …?? काही होईल का …?? अरे बाजूच्या मनोजचे लग्न आहे.काही घडले तर जाता येणार नाही आणि आता काही घडले तरी माझी वाट पाहू नका यायला जमणार नाही ताबडतोब”. राहुल होय म्हणाला.
कॅनडामध्ये स्थायिक झालेल्या आपल्या बहिणीला त्याने फोन केला तेव्हा तीही म्हणाली “अरे असे कसे अचानक झाले ….?? तुला आधी कळवता येत नाही का…. ?? लक्ष कुठे असते तुझे आईकडे ..?? काहीतरी लक्षणे आधी दिसत असतील ना ..?? मला किती त्रास होईल आता येताना. काही घडले तर माझ्यासाठी खोळंबून राहू नका ह्यांच्या मीटिंग आहेत, आणि मलाही सुट्टी मिळणार नाही. आम्ही आताच सुट्टी घेऊन अमेरिका फिरून आलो. काळजी घे आईची “, असे म्हणून फोन ठेवला.
आता तर राहुल हताश झाला शांतपणे डोळे मिटून बसला. मी बंड्याला विचारले “अरे तू हैद्राबादला जाणार आहेस ना सेमिनारला ….?? आजच फ्लाईट आहे तुझी”..
तो म्हणाला “भाऊ …मी कॅन्सल केले हैदराबादचे . आताच फ़ोन करून कळविले आज जमणार नाही. घरी प्रोब्लम आहे”
मी आश्चर्यचकित झालो “अरे… किती महत्वाचे आहे हे सेमिनार तुझ्यासाठी. किती मेहनतीने प्रेझेंटेशन बनविले होतेस. तू टीम लीडर आहेस ना…. ? तुझ्या करियरवर फरक पडेल जा तू …”
तो शांतपणे म्हणाला “भाऊ ह्या आजीने मला लहानाचे मोठे केलेय. तिच्या बटव्यातुन हळूच चणे शेंगदाणे काढून माझ्या हाती द्यायची. मनीला आणि मला कुशीत घेऊन गोष्टी सांगायची. तिची कळ काढली कि धपाटेहि मारायची. आज ती आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आहे आणि मला माहित असूनही मी थांबायचे नाही ?? मग कशासाठी आणि कोणासाठी करायची नोकरी ?? आजीने कधीच आमच्यात भेदभाव केला नाही. घरात लाडू बनविले तरी प्रत्येकाला एक लाडू मिळेल याची काळजी घेतली तिने. आम्ही आजारी पडलो कि दर तासानी चौकशी करायची, घरगुती काढा चाटण बनवून प्रेमाने भरावयाची.आहो आम्ही तर शेजारी मग घरच्यांची किती काळजी घेत असेल …??
आज तिला आपली गरज आहे आणि आपण पळ काढायचा… ?? का …? तर ती म्हातारी झालीय आयुष्य उपभोगले आहे तिने… काय गरज आहे आता जास्त जगायची…??. असे बोलायचे का.. ?? आपले आयुष्य…आपला संसार….. आपले करियर या नादात ज्यांनी आपल्याला घडवलेय त्यांचा उत्तरार्ध असा घालवू द्यायचा का त्यांना.. ??
मी विचारात पडलो… भावनिक दृष्टीने विचार केला तर बंड्या कुठेच चुकत नव्हता “भाऊ… आज जर मी सेमिनारला गेलो तर आयुष्यात कधीही सुखाने झोपू शकणार नाही आणि सेमिनारमध्ये हि लक्ष लागणार नाही. आणि संधी परत हि मिळेल. पण हि वेळ परत येणार नाही. त्यापेक्षा भाऊ तुम्ही जा कामावर मी थांबतो इथे काही झाले तर कळवेन तर या मग ताबडतोब”..
मी होय म्हटले प्रॅक्टीकॅली बंड्या बरोबर होता. मी कामावरून अर्ध्या तासात येऊ शकत होतो आणि इथे राहुल आणि बंड्या शिवाय इतर दोघे होतेच. ICU बाहेर बसून वाट पाहण्याशिवाय काही हातात नव्हते.
मी निघणार तितक्यात राहुलचे हुंदके ऐकू आले. ते पाहून मी खिशातून मोबाईल बाहेर काढला आणि ऑफिसला येणार नसल्याचा मेसेज पाठवून राहुलच्या शेजारी जाऊन बसलो.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.