“गप्प बस रे, किती प्रश्न विचारतोस!” ज्या घरात लहान मुले आहेत त्या घरातून अगदी सहज आणि सतत ऐकू येणारे हे वाक्य..
लहान मुलांना आजूबाजूच्या वातावरणाविषयी खूप कुतूहल असते आणि त्यामुळे ते सतत प्रश्न विचारत राहतात.
खरं म्हणजे आपल्या सर्वांमध्येच जिज्ञासा असतेच. पण जसजसे आपण मोठे होत जातो तसतसे आपण प्रश्न विचारेनासे होतो, आजूबाजूच्या वातावरणाला बुजतो आणि आपल्या मनातले कुतूहल दाबून ठेवतो.
पण खरेतर जिज्ञासू असणे हे यशस्वी होण्यासाठी फार आवश्यक असते.
आज आपण जिज्ञासू लोकांच्या १० सवयी जाणून घेऊया
१. ऐकून घेण्याआधी निष्कर्ष न काढणे
जिज्ञासू व्यक्ती आधी समोरच्याचे म्हणणे संपूर्णपणे ऐकून घेतात. आधीच घाईने निष्कर्षावर येत नाहीत.
तसेच एखाद्या व्यक्तीचे मत ऐकून त्याच्याबद्दल चांगले किंवा वाईट मत बनवत नाहीत. प्राप्त परिस्थितीवर विचार करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात.
२. निष्कर्ष किंवा तोडगा निघेपर्यंत प्रश्न विचारत राहणे
जिज्ञासू लोक प्राप्त परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी का, कुठे, कसे, कधी असे प्रश्न विचारत राहतात.
काही ना काही तोडगा किंवा निष्कर्ष निघेपर्यंत ते स्वस्थ बसत नाहीत. प्रश्न पडणे आणि त्या प्रश्नांची उत्तरे मिळवणे हे जिज्ञासू असण्याचे प्रमुख लक्षण आहे.
३. कधीही कंटाळा न करणे
जेव्हा एखादी व्यक्ती मुळातच जिज्ञासू असते तेव्हा त्या व्यक्तीला कधीही कशाचा कंटाळा येत नाही. काहीतरी नवीन शोधणे, वाचन, नवीन काम करून पाहणे, छंद जोपासणे असे सगळे ती व्यक्ती न कंटाळता करत असते. जिज्ञासू लोकांच्या प्रमुख सवयींपैकी ही एक आहे.
४. माझंच बरोबर आहे हा अट्टहास सतत न करणे
जिज्ञासू व्यक्तींना इतरांचे मत जाणून घेण्यात रस असतो. त्यासाठी प्रसंगी स्वतःकडे कमीपणा घेण्यास ते कचरत नाहीत.
आपलंच बरोबर आहे हा हेका ते चालवत नाहीत. इतरांची मते जाणून घेऊन प्रश्न सोडवण्याकडे त्यांचा कल असतो. आपलाच मुद्दा पुढे रेटून प्रश्न अनुत्तरित ठेवण्यात त्यांना रस नसतो.
५. नेहेमी सहानुभूतीने वागणे
सर्वांशी सहानुभूतीने वागत असल्यामुळे जिज्ञासू व्यक्तींना त्यांच्याशी कनेक्ट होणे सोपे जाते.
आपल्याआधी इतरांचा विचार करणे, त्यांची परिस्थिति समजून घेणे ही जिज्ञासू लोकांची खासियत आहे.
ते कोणत्याही निष्कर्षावर येण्याआधी समोरच्याच्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघतात. त्यामुळे आपोआप ते इतरांशी जोडले जातात.
६. एकाग्रचित्ताने काम करणे
जिज्ञासू लोक धरसोड वृत्तीने न वागता हातात घेतलेले काम एकाग्र चित्ताने पूर्ण करतात. त्यासाठी ते आपले संपूर्ण लक्ष त्या कामावर केंद्रित करतात.
त्यामुळे ते एखादे काम अगदी व्यवस्थितरीत्या सर्व बरकाव्यांसह पूर्ण करू शकतात.
७. एखादी गोष्ट माहीत नाही हे सांगायला कधीही न कचरणे
जिज्ञासू लोकांना बडेजाव मिरवण्याची कुठलीही हौस नसते. एखादी गोष्ट आपल्याला माहीत नसतानाही ती माहीत आहे असे भासवून समोरच्यावर खोटा प्रभाव टाकण्यापेक्षा ती गोष्ट जाणून घेण्यात जास्त रस असतो.
त्यामुळे अशी व्यक्ति सरळ आपल्याला हे माहीत नाही असे सांगून ते माहीत करून घ्यायचा प्रयत्न करते. आपले ज्ञान वाढवण्यात त्यांना रस असतो.
८. सतत कुतूहल जागे ठेवणे, त्यासाठी स्वतःला प्रश्न विचारणे
जिज्ञासू लोक आपले कुतूहल सतत जागृत ठेवतात. ते प्रसंगी स्वतःलाही प्रश्न विचारतात.
आपण नक्की काय करतोय, पुढच्या दृष्टीने आपण काय प्रयत्न करतोय, भविष्याच्या बाबतीत आपला काय विचार आहे असे प्रश्न ते स्वतःलाच विचारतात.
त्यामुळे त्यांची वाटचाल निश्चितपणे प्रगतीकडे होते.
९. स्वतःच स्वतःला प्रोत्साहन देणे
ही जिज्ञासू लोकांची मोठी खासियत आहे. ते कधीच कुठलेही काम करण्यासाठी इतरांनी प्रोत्साहन देण्याची वाट बघत बसत नाहीत.
ते स्वतःच स्वतःला मोटीव्हेट करून नवनवीन कामे करत असतात. ह्याचा देखील प्रगतीसाठी खूप उपयोग होतो.
१०. सतत शिकण्याची उमेद
जिज्ञासू लोक आयुष्यभर विद्यार्थी बनून रहायला तयार असतात. सतत नवीन काहीतरी शिकायची त्यांना इच्छा असते.
नवीन पुस्तके वाचणे, वेगवेगळे क्लास लावून नव्या गोष्टी शिकणे हे ते सतत करत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे सतत काहीतरी नवे असते जे इतरांना शिकण्यासारखे असते.
तर अशा ह्या जिज्ञासू लोकांच्या सवयी. एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्यांच्यातील कुतूहल सतत जागे असते.
ते नवनवीन प्रश्न विचारून आणि सतत नवीन काम करून स्वतःला अपटुडेट ठेवतात.
आपणही असे व्हायचा प्रयत्न करूया. त्यासाठी भोवतालच्या जगाकडे कुतुहलाने पहायला हवे. नवीन काय दिसतेय ते समजून घ्यायला हवे. मुख्य म्हणजे स्वतःमधले लहान मूल सतत जागे ठेवायला हवे.
तर मग मित्रांनो, सांगा बघू ह्यातल्या कोणकोणत्या सवयी तुम्हाला आधीच आहेत आणि कोणकोणत्या सवयी तुम्ही आता स्वतःला लावून घेणार?
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.