असं होतं ना कधी, कि बरंच काही घडून जातं आणि घडतही असतं आणि तुम्हाला वाटतं कि, ‘त्या वेळी मी असं केलं असतं तर बरं झालं असतं, त्या वेळी मी तसं केलं असतं तर बरं झालं असतं!!’ पण आपल्याकडे कोणी डोरेमॉन नसतो ना ‘टाइम मशीन’ द्यायला… म्हणूनच खूप महत्त्वाची असते ती ‘एक पाऊल मागे घेण्याची कला’ त्याच बद्दल सविस्तर वाचा या लेखात.
आपल्या आयुष्यात एखादी चुकीची घटना घडते त्यावेळी आपल्या डोक्यात ताबडतोब कोणता विचार येतो?
त्या चुकीच्या घटनेवर लगेच ऍक्शन घ्यायची आणि सडेतोड उत्तर द्यायचं, आणि त्याचा सोक्षमोक्ष लावायचा.
जशास तसं उत्तर देऊन आपण आपलं समाधान करून घेतो. खरं आहे का नाही????
कामाच्या ठिकाणी तुमच्याच हातून एखादी चूक झाली तर लगेच तुम्ही टेबलवर हात आपटून प्रतिक्रिया देता.
तुम्हाला कधी कोणी वाकडं बोललं तर तुम्ही पण त्याला जास्त वाकडं बोलून त्याचं तोंड बंद करता. ड्रायव्हिंग करताना एखादा स्कूटरवाला तुम्हाला आडवा आला तर तुम्ही खिडकीतून तोंड बाहेर काढून त्याला तुमचा मराठी बाणा दाखवता.
ह्या सगळ्या क्रिया एका क्षणात तुमच्याकडून अगदी सहज घडतात. ह्याला आपण प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतो.
उत्तरासारखं प्रत्युत्तर दिलं जातं. तो ‘आरे’ म्हणाला की तुमचा ‘कारे’ लगेच तोंडातून बाहेर येतो… तो पण अगदी सहज.
म्हणजे आपल्या नकळत सुद्धा अशी प्रतिक्रिया आपण देत असतो.
आयुष्यात हे असं वेगवेगळ्या घटना आपल्या बाबतीत घडण्याचं चक्र चालूच असतं, आणि नकळत आपण सारखं त्यावर रिऍक्ट होत असतो.
कधी कधी असलं रिऍक्ट होणं तितकं चांगलं नसतं. अशावेळी काहीच प्रतिक्रिया न देणं हे योग्य उत्तर असतं.
विशेष म्हणजे ज्यावेळी खूप गरमा गर्मीचं वातावरण तयार झालं असेल त्यावेळी. म्हणजेच आपल्या पेक्षा समोरचा जास्त खमक्या असतो, चार लोक त्याच्या बाजूने उभे असतात त्यावेळी आपण काहीच प्रतिक्रिया न देणंच योग्य ठरतं.
अगदी ‘एक पाऊल मागे घेणं’ हेच योग्य असतं. त्यामुळे आपल्याला नक्की आता काय निर्णय घ्यायचा हा विचार करायला थोडा वेळ मिळतो.
आणि तो पर्यंत त्या गरमा गर्मीतून उडालेली धूळ खाली बसते, वातावरण थोडं निवळतं. आणि निर्णय घेणं सोपं होतं.
सध्याच्या समाजातच आपल्याला हे झटपट काही मिळवायचंय, किंवा प्रतिक्रिया द्यायचीय, त्याचं E ट्रेनिंग मिळतंय.
म्हणजे आपल्याला पाहिजे ते, आणि जेंव्हा पाहिजे तेंव्हा एखादी गोष्ट मिळवायची असेल तर ऑनलाइन ताबडतोब मिळायला लागली आहे.
तुम्हाला आवडलेलं एखादं गाणं तुम्ही काही सेकंदात तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करू शकता. काहीही खायची इच्छा झाली तर ऑनलाइन मागवून त्याचा आस्वाद घेऊ शकता.
ह्या सगळ्या गोष्टी ताबडतोब मिळवायची आपल्याला चटक लागली आहे असं म्हटलं तर चूक ठरणार नाही.
पण ह्या चटकदार जगात आपण एक गोष्ट पार विसरूनच गेलोय असं वाटतंय, ती गोष्ट म्हणजे आपलं आयुष्य बदलून टाकणारी “एक पाऊल मागे घेण्याची कला”
काय आहे, कशी आहे ही ‘एक पाऊल मागे घेण्याची कला’? चला तर मग बघूयात……
एक पाऊल मागे घेणं म्हणजे, तडकाफडकी एखाद्या गोष्टीबद्दल प्रतिक्रिया न देता, योग्य निर्णय घ्यायला थोडा वेळ देणं आणि संयम ठेवणं.
म्हणजे घेतलेला निर्णय चुकीचा ठरणार नाही. इतका साधा अर्थ आहे.
मग आपण आता बघू की “एक पाऊल मागे” घेण्यामागची कारणं आणि त्यातला गाभा काय आहे आणि ती कारणं कशी पॉवरफुल ठरतात ते.
“एक पाऊल मागे” हे नेहमी आपल्या तीव्र झालेल्या भावनांचा आवेग कमी करतं. म्हणजेच तुम्ही जर रागाच्या भरात एखाद्याला इजा करायच्या तयारीत असाल तर ती तुमची तीव्र भावना एक पाऊल मागे घेतले तर ती कमी होईल. तुम्ही थोडे शांत व्हाल.
आपल्या मेंदूमध्ये “भावना” ह्या आपल्या “विचारां” पेक्षा जास्त जलद तयार होत असतात हे तुम्ही जाणून घ्या.
साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या प्रसंगामुळे आपलं डोकं आधी तापतं, आणि विचार नंतर डोक्यात येतात.
म्हणून आपण आधी राग व्यक्त करतो, समोरच्या व्यक्तीच्या अंगावर धावून जातो. त्यावेळी आपल्या डोक्यात रागाची भावना आधी तयार झालेली असते म्हणून आपण राग आधी व्यक्त करतो.
तो राग शांत झाल्याशिवाय विचार डोक्यात येत नाहीत. म्हणून रागात आपण काहीतरी उपद्व्याप करून बसतो आणि नंतर विचार करत बसतो की हे असं कसं झालं? आपण असं करायला नको होतं.
आपल्या प्रत्येकामध्ये “Jekyll and Hyde” सारखी दोन व्यक्तिमत्व दडलेली असतात, तुमच्यातल्या कोणत्या भावना जास्त तीव्र होऊन उफाळून वर येतात त्या प्रमाणे तुम्ही इतर लोकांबरोबर वागता.
“एक पाऊल मागे घेण्याची ही कला जर तुम्ही चुकीच्या रस्त्यावरून जात असाल तर तुम्हाला परत योग्य मार्ग दाखवते.”
कल्पना करा की तुम्ही एखाद्या घनदाट जंगलातून मार्ग काढत तुमच्या ठरलेल्या ठिकाणी जाताय.
आणि खूप लांब चालून गेल्यावर तुम्हाला कळतं की तुम्ही रस्ता चुकलात. तुम्ही भलत्याच दिशेला लांब चालत आलात.
हे कळल्यावर तुमच्या अंगावर काटाच येईल ना? कारण तुम्ही खूप दमलेले असताना तुम्हाला नाईलाज म्हणून परत उलट दिशेनी आलो तेवढं अंतर चालत जायचंय.
तुम्हाला हे अगदी कष्टाचं वाटणार…. बरोबर??
तुम्ही एवढे थकलेले असताना तुमच्याच चुकीमुळे उलटं चालत जायला लागतंय. पण जर तुम्ही तसंच पुढं चालत गेला तर चुकीच्या ठिकाणी पोहोचाल.
आणि परत फिरलात तर योग्य मार्ग तुम्हाला परत सापडेल. आणि तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी पोहोचाल.
म्हणून कधी कधी हे असं, एक पाऊल मागे घेऊन उलट दिशेला परत फिरणं जरुरीचं असतं.
चुकीच्या मार्गाने भलतीकडं जाण्यापेक्षा एक पाऊल मागे घेऊन परत फिरणं योग्य ठरतं.
म्हणूनच एक पाऊल मागे घेण्याची कला आयुष्यात जी वाटचाल तुम्ही करत असाल त्यात कधी भरकटला तर परत त्या मार्गावर यायला तुम्हाला मदत करते. हे लक्षात ठेवा.
मग ती वाटचाल तुमच्या करिअरची असो किंवा आरोग्यासंबंधी असो, नातेसंबंधाची असो, तुमच्या सवयी बद्दलची असो किंवा तुमच्या मोठ्या ध्येयाची वाटचाल असो.
ही एक पाऊल मागे घेण्याची जी क्षमता आपल्यात तयार होते ना ती क्षमता खरं तर आपल्याला एक प्रकारचं स्वातंत्र्य देते.
म्हणजे आपल्या सध्याच्या आवडी निवडींमध्ये आपण जखडून रहात नाही, तर आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या आवडी निवडीत आपण चांगले बदल करू शकतो, त्यांना आणखी महत्व देऊ शकतो.
नुसतं डोळे झाकून एखाद्या मार्गावर चालत राहण्यापेक्षा एक पाऊल मागे घेऊन, आपल्या आयुष्यातल्या महत्वाच्या आणि आयुष्यभर साथ देणाऱ्या आवडी निवडींवर काम करून त्या मार्गावर चालायचं का जुन्याच मार्गाला चिकटून राहायचं, हे ठरवून एक पाऊल मागे घेणं जास्त महत्वाचं ठरतं.
हे तुम्हाला पटतंय का बघा. पटलं तर विचार करा ह्या कलेचा, आणि आत्मसात करा ही एक वेगळी कला.
एक पाऊल मागे घेण्याची तुमची ही ताकद तुमची पुढे जाण्याची गती थोडी कमी करेल, पण तुम्ही तुमच्या पुढच्या प्रगतीचं चित्र मस्तपैकी रेखाटून तुमचं स्वप्न एन्जॉय करू शकाल, कारण तुमचा पुढं जाण्याचा मार्ग तुम्ही उत्तम आणि तुमच्या इच्छेप्रमाणे निवडलेला असेल.
म्हणूनच ही एक पाऊल मागे घेण्याची कला आत्मसात करणं जरुरीचं आहे, त्यातून तुम्हाला पुढे आनंद मिळणार आहे आणि सगळं काही तुमच्या मनाप्रमाणे घडणार आहे हे लक्षात ठेवा.
मग ज्यावेळी तुम्ही असंच सतत पुढे पुढेच जात रहाल त्यावेळी तुम्ही तुम्हाला पुढची कोणती गोष्ट मिळवायची आहे ह्याच्यावरच तुमचं लक्ष ठेऊन असाल.
त्यावेळी मात्र तुम्हाला जरा सुद्धा रिलॅक्स होता येणार नाही कारण वेळच नाही मिळणार तुम्हाला.
क्षणभर थांबून जे काही तुम्हाला मिळालं त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा आणि पुढे चला. यशाच्या शिखराकडे तुमची वाटचाल असेल.
कधी कधी तुम्हाला वाटेल की तुम्हाला जरा रिलॅक्स होऊन पुन्हा तुमच्या चांगल्या दिवसांचं, आवडत्या गोष्टींचं स्वप्न पहायचंय, जरूर पुन्हा ते चित्र पहा, तुमच्या वाटेत मिळालेल्या सगळ्या चांगल्या अनुभवांचं चित्र पुन्हा पहा.
तुमच्या वाटचालीत अनुभवलेल्या सगळ्या सकारात्मक घटना आठवा, त्या घटनांचं मनापासून कौतुक करा. आजूबाजूचा निसर्ग अनुभवा. तुम्हाला खूप आनंद होईल.
आपलं आयुष्य झटपट पुढेच जात असतं, आपल्या समोर काय चांगलं आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका.
एक पाऊल मागे घेणे आपल्याला नेहमी आनंदी ठेवेल, आणि रिलॅक्स करेल यात शंका नाही.
म्हणून तुमची प्रगतीची पुढची वाटचाल आणि एक पाऊल मागे घेण्याची कला ह्यात चांगलं नातं राहु द्या.
हे नातं सतत तुमच्या उपयोगी पडणार आहे. तुम्हाला ह्या दोघांच्या नात्यामुळे भरपूर आनंद आणि समाधान मिळेल.
हे सगळं तुमचं तुम्हीच मिळवणार आहात. मग वाट कशाला बघायची करा की सुरुवात. कोण अडवणार आहे तुम्हाला?
उलट, तुमचा मार्ग अगदी स्वछ होईल. घ्या एकच पाऊल मागे, करा विचार आणि चला बिनधास्त.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Nice
एक पाऊल मागे घेण्याची माहिती, त्याचे फायदे खुप सुरेख पद्धतीने सांगितले आहेत त्या बध्दल मनपूर्वक धन्यवाद.
मला वाटते एक पाऊल मागे घेण्याची कला आहे त्या अगोदरची एक पायरी म्हणजे स्वतःच्या मनावर ताबा मिळवणे, नियंत्रण ठेवणे ह्या बध्दल थोडी माहिती पुढील लेखात द्यावी अशी नम्र विनंती करतो.
Ghari,partayacha,marag,mahit,asala,pahigai