सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: जुळी बाळं हवी असल्यास उपाय । जुळ्या बाळांची गर्भधारणा होण्यासाठी काय करावे? । जुळी मुले होण्याची कारणे । जुळी मुले कशी होतात
बऱ्याच स्त्रियांना आपल्या पोटी जुळी मुलं जन्माला यावीत असं वाटतं. गर्भधारणा होताना जुळी अपत्यं होणं हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते.
जुळी मुलं नैसर्गिकरीत्त्या जन्माला येतात. त्यासाठी काही खास इलाज किंवा उपचार घेण्याची गरज नसते.
आई किंवा वडील यापैकी कोणी एक व्यक्ती जुळी मुले होण्यासाठी जबाबदार नसते. या विषयाबाबत बरेच गैरसमज समाजात आढळून येतात. म्हणून याची शास्त्रीय माहिती आमच्या वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत.
या लेखातून तुम्हाला जुळी मुले होण्याची कारणे, लक्षणे आणि जुळ्यांचे प्रकार याची संपूर्ण माहिती मिळणार आहे.
यालाच ट्विन प्रेग्नंसी असे इंग्रजी नाव आहे.
जुळ्या संततीचे प्रकार
साधारणपणे असा एक समज असतो की जुळी भावंडे म्हणजे एकमेकांच्या जणू प्रतिकृतीच!!! पण प्रत्यक्षात मात्र असे अजिबातच नाहीय.
एकूण जुळ्या संतती पैकी फक्त एक तृतीयांश एकमेकांसारखे दिसतात. उरलेले दोन तृतीयांश हे अगदी वेगवेगळे रुपरंग असणारे असतात.
आता जुळ्या संततीचे प्रकार पाहूया.
१. एकसारखे दिसणारे (Monozygotic )
स्त्रीबीज व पुरुष शुक्राणू यांच्या संयोगातून गर्भ तयार होतो. जेव्हा एक स्त्री बीज व एक शुक्राणू एकत्र फलित होतात व काही काळानंतर त्यांचे विभाजन होऊन दोन गर्भ तयार होतात त्यावेळी ही दोन्ही मुले एकसारखी दिसणारी असतात. कारण यांची आनुवंशिक संरचना एकसारखी असते. हे दोन्ही गर्भ मुलगे असू शकतात किंवा दोन्ही मुली असू शकतात. पण यातील एक मुलगा आणि एक मुलगी असे होऊ शकत नाही.
२. वेगवेगळे दिसणारे (Dizygotic)
जर दोन वेगवेगळ्या स्त्रीबीजांपासून गर्भधारणा झाली तर अशी भिन्न दिसणारी संतती जन्माला येते. याचे कारण म्हणजे त्यांची आनुवंशिक संरचना एकमेकांपेक्षा वेगळी असते.
यातील एक मुलगा आणि एक मुलगी असू शकतात. हे अन्य कोणत्याही भावंडांप्रमाणेच दिसायला वेगळे असतात.
गर्भात जुळी मुले असल्याची लक्षणे.
अनेक प्रकारच्या तपासण्या करून हे ठरवता येते.
आता याची अधिक माहिती जाणून घेऊया.
१. हार्ट बीट तपासणी
गर्भावस्थेचे पहिले तीन महिने झाले की डॉप्लर टेस्ट करुन गर्भाशयात जुळी मुले आहेत का हे पहाता येते.
डॉप्लर हे गर्भाच्या हृदयाचे ठोके दाखवणारे यंत्र आहे. अनुभवी डॉक्टर या टेस्ट द्वारे जुळे आहे की नाही हे सांगू शकतात.
पण काही तज्ञ डॉक्टर ही पद्धत विश्वासार्ह नाही असे सांगतात. त्यांच्या मतानुसार आईच्या पोटावर कोणत्याही भागात डॉप्लर लावले तर एकाच मुलाच्या हृदयाचे ठोके ऐकू येतात.
२. वाढलेली HCG ची पातळी
HCG हा एक हार्मोन आहे. Human Chorionic Gonadotropin असे याचे पूर्ण नाव आहे. गर्भधारणा झाली की प्लासेंटा मधून या हार्मोनची निर्मिती केली जाते.
गर्भाशयाचे आतील आवरण जाड गादीसारखे करण्यासाठी याचा उपयोग होतो. या जाड आवरणामुळे गर्भ सुरक्षित रहातो. जर या हार्मोनची पातळी खूप जास्त वाढलेली असली तर जुळी मुले असल्याची शक्यता लक्षात येते.
पण ही देखील संपूर्ण खात्रीशीर टेस्ट नाही. इतर काही तपासण्या करून नंतरच याबाबत अनुमान काढणे शक्य आहे.
३. AFP Test
अल्फा फिटोप्रोटीन (Alpha fetoprotein ) या टेस्टला मातृ सीरम स्क्रिनिंग असे म्हटले जाते. दुसऱ्या तिमाही दरम्यान हे परीक्षण केले जाते. गर्भामध्ये काही जन्मजात दोष आहेत का हे या टेस्ट मधून समजते.
गर्भाच्या यकृतामधील प्रोटीनचा स्त्राव तपासून पाहिला जातो. ट्विन प्रेग्नंसी आहे का हे पाहण्यासाठी या टेस्ट चा उपयोग होतो.
याचे नॉर्मल पेक्षा जास्त रिडिंग दिसत असेल तर जुळी मुले असण्याची शक्यता असते.
४. गर्भाशय ताणले जाणे
गरोदरपणातील तपासणी करताना स्त्रीचे गर्भाशय आणि पोटाचा खालचा भाग यातील अंतर तपासले जाते. यावरुन गर्भ साधारणपणे किती आठवड्यांचा आहे याचा अंदाज बांधता येतो.
ज्या गर्भवती स्त्रीयांना पोटात खेचल्यासारखे किंवा ताण जाणवतो तसेच पोटाचा आकार मोठा दिसतो, अशा महिलांना जुळी संतती असण्याची शक्यता असते.
परंतु अशी लक्षणे दिसण्याची इतरही काही कारणे असू शकतात.
५. वजन वाढणे
गर्भधारणा झाल्यावर आहार काळजीपूर्वक घेतला पाहिजे. खाण्यापिण्याच्या सवयी चुकीच्या असतील तर अनावश्यक वजनवाढ होते. वजन जास्त वाढण्याची इतर कारणे सुद्धा आहेत. स्त्रीची उंची, शारीरिक ठेवण आणि प्रेग्नंट रहाण्यापूर्वी असलेले वजन हे महत्त्वाचे घटक आहेत.
यावरून गरोदरपणात वजन किती असले पाहिजे हे समजते. सामान्य स्त्री च्या तुलनेत जुळा गर्भ असेल तर त्या स्त्रीचे वजन जवळपास 4.5 kg एवढे जास्त भरते.
६. गरोदरपणात जास्त प्रमाणात मळमळणे ( Morning Sickness)
गरोदरपणात उलटी किंवा मळमळ होणे हे अगदी स्वाभाविक आहे. जवळपास सर्वच महिलांना कमीजास्त प्रमाणात हा त्रास होतो. परंतु जुळे असेल तर मळमळणे खूपच जास्त प्रमाणात जाणवते. पण काही स्त्रियांना असा त्रास होत नाही.
त्यामुळे या एकाच लक्षणावरून निश्चित असे अनुमान काढणे शक्य नाही.
७. गर्भाची हालचाल लवकर सुरू होणे आणि जास्त प्रमाणात जाणवणे
नॉर्मल प्रेग्नंसी मधे जेवढी हालचाल जाणवते त्यापेक्षा गर्भाची हालचाल जास्त जाणवत असेल तर जुळे असू शकते. पण याला काही शास्त्रीय आधार नाही.
८. अतिशय थकवा जाणवणे
गर्भावस्थेत ताण, कामाचे टेन्शन आणि इतर जबाबदारी यामुळे थकवा जाणवतो. पण जर खूपच जास्त प्रमाणात असे जाणवले तर जुळी मुले असण्याची शक्यता असते. एकाच वेळी दोन गर्भांना पोषण द्यावे लागल्यामुळे आईच्या शरीरावर ताण येऊन अती थकवा येऊ शकतो.
९. फॅमिली हिस्ट्री
काही स्त्रियांच्या कुटुंबात पिढ्यान् पिढ्या जुळी मुले होत असल्याचे दिसून येते. आनुवंशिकता हे सुद्धा जुळी मुले होण्यामागचे महत्त्वाचे कारण आहे.
गर्भात एकापेक्षा जास्त मुले आहेत का हे तपासून पहाण्याची सोनोग्राफी ही सर्वात खात्रीशीर तपासणी आहे. यालाच अल्ट्रासाऊंड टेस्ट असे म्हणतात.
जुळी मुले जन्माला येण्याची कारणे कोणती?
दर २५० स्त्रियांपैकी एकीला एकसारखी दिसणारी जुळी मुले होतात. अशी मुले होण्याची शक्यता दर पिढीत असतेच असे नाही. अशाप्रकारच्या ट्विन प्रेग्नंसी मागील नक्की कारणे कोणती हे निश्चितपणे सांगता येत नाही.
पण एकमेकांपेक्षा वेगळी दिसणारी जुळी मुले जन्माला येण्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत.
काही विशिष्ट समाजात अशी जुळी मुले जन्माला येण्याचे प्रमाण जास्त आढळते. नायजेरिया मधे याचे प्रमाण सर्वाधिक तर जपान मध्ये सर्वात कमी आढळते.
जर महिलेचे वय जास्त असेल तर उशीराने गरोदर राहिलेल्या स्त्रियांच्या बाबतीत अशी जुळी संतती होण्याची शक्यता असते. यामागचे कारण जाणून घेऊया.
जसजसे महिलेचे वय वाढत जाते तसतशी ओव्हृयुलेशन होताना एका पेक्षा जास्त स्त्रीबीज निर्माण होतात.
काही महिलांमध्ये एका पेक्षा जास्त स्त्रीबीज बनण्याची आनुवंशिक प्रवृत्ती असते. त्यामुळे त्यांना जुळी मुले होण्याची शक्यता असते. अशा कुटुंबात प्रत्येक पिढीत जुळी मुले दिसतात.
IVF (In vitro fertilization) या पद्धतीने कृत्रिम गर्भधारणा झाली असेल तर जुळी मुले होण्याची शक्यता वाढते. कारण यात एकापेक्षा अधिक भृण वाढवले जातात.
जुळी मुले असतील तर कोणती काळजी घ्यावी?
जर गर्भात जुळी मुले असतील तर त्या महिलेला दरदिवशी कमीत कमी 2700 कॅलरीज घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांचा सल्ला घेऊन अधिक व्हिटॅमिन किंवा मिनरल्स घेऊ शकता.
दोन गर्भ पोसण्याचा अतिरिक्त ताण शरीरावर आल्यामुळे हिमोग्लोबिन कमी होऊन ऍनिमिया होऊ शकतो.
मुलांची वाढ योग्य रितीने होण्यासाठी डॉक्टर जास्त प्रमाणात फॉलिक ॲसिडचा डोस घेण्याचा सल्ला देतात.
वजन जास्त प्रमाणात वाढल्याने स्त्रीला अवघडल्यासारखे वाटते. तिला जास्त आरामाची गरज असते. पुरेशी विश्रांती घेतल्यामुळे पाय दुखणे आणि पावलांवर सूज येणे यापासून सुटका मिळते.
ट्विन प्रेग्नंसी मधे होणारे इतर त्रास खालीलप्रमाणे
अपुऱ्या दिवसांची प्रसूती
- Premature rupture of membrane अर्थात पाण्याची पिशवी अकाली फुटणे.
- दोन्ही मुलांची वाढ एकसारखी न होणे.
- गरोदरपणात रक्तदाब वाढणे.
- प्री एक्लेम्पशिया हा गंभीर आजार होऊ शकतो.
- गरोदरपणातील डायबिटीस
या सर्व गोष्टींसाठी डॉक्टर नियमितपणे तपासणी करतात.
जुळी मुले असतील तर सिझेरीन होण्याची शक्यता असते. नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते पण मुलांचे वजन, आईची शारीरिक स्थिती, मुलांची एकंदर वाढ कशी झाली आहे हे सर्व लक्षात घेऊन त्यानुसार निर्णय घेण्यात येतो.
प्रसूती वेदना सुद्धा जास्त प्रमाणात जाणवतात.
या लेखातून जुळ्या संतती बाबत सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. यामागची शास्त्रीय कारणे, कोणती काळजी घ्यायची, तपासण्या कोणत्या कराव्यात हे सर्व लक्षात आले असेल.
गरोदरपणात योग्य ती काळजी घ्यावी लागतेच पण जुळी मुले असतील तर मात्र अधिक काटेकोरपणे तब्येतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. विशेषतः पोषक आहार आणि पुरेशी विश्रांती घेतली पाहिजे. नियमितपणे तपासणी करणे तर खूपच गरजेचे आहे.
जुळ्या मुलांच्या रुपाने डबल आनंद आपल्या आयुष्यात येणार असेल तर दुप्पट काळजी पण घेतलीच पाहिजे!!!
मग या लेखातील माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करुन आम्हाला सांगा. आणि लाईक व शेअर करायला विसरू नका.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.