यूपीए सरकारच्या १० वर्षांच्या काळात जनता भ्रष्टाचार आणि महागाईने त्रस्त झालेली असतानाच ‘बस हुई महंगाई की मार, अबकी बार मोदी सरकार’ असा नारा देत नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व पुढे आले. विदेशातून काळा पैसा भारतात आणू आणि प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५-१५ लाख रुपये टाकू, दरवर्षी दोन करोड रोजगार निर्माण करू, अशा आश्वासनांच्या खैरातीने लोक कमालीचे भारावून गेले. आता खरोखरच अच्छे दिन येणार या आशेपायी भारतीय जनता पार्टीला लोकांनी भरभरून मतदान करून केंद्रात सत्तेवर बसवले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत न भुतो न भविष्यती असे विक्रमी मतदान घेऊन नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर विराजमान झाले.
आता लोकसभा निवडणुकीचे बिगूल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. नवी दिल्लीसह संपुर्ण देशातील राजकीय घडमोडींना यामुळे चांगलाच वेग आला आहे. सद्यस्थितीत मोदी लाट बर्यापैकी कमी झालेली दिसत आहे. नुकत्याच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणुकीत भाजपला ३ राज्ये गमावावी लागली. आगामी निवडणुकीत वाट बिकट असल्याची जाणीव झाल्यामुळेच काही दिवसांपासून लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडण्यास मोदी सरकारने सुरुवात केली आहे. फसलेली नोटबंदी. जीएसटीमुळे लोकांची ओढवलेली नाराजी. वाढलेली बेरोजगारी आणि वाढलेल्या शेतकरी आत्महत्या या सगळ्यांवर फुंकर मारण्याचा प्रयत्न म्हणून सवर्ण आरक्षण, जीएसटीत कपात आदी निर्णय तडकाफडकी घेण्यात आले.
‘अबकी बार मोदी सरकार’ या लोकप्रिय घोषणेच्या मदतीने २०१४ मध्ये आलेल्या मोदी लाटेत काँग्रेससह अनेक पक्ष भुईसपाट झाले होते. याची पुनरावृत्ती करण्यासाठी २०१९ साठी ‘फिर एक बार मोदी सरकार’ ही घोषणा भाजपाने दिली आहे. यासोबतच ‘अबकी बार ४०० के पार’ ही नवी घोषणाही तयार केली आहे. यावेळी भाजपा हा आकडा सहज पार करेल, असा विश्वासही भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला.
दुसरीकडे विरोधीपक्षांनीही मोदींना हटवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मोदींना पराभूत करण्यासाठी काँग्रेसने आणि इतर भाजप विरोधी पक्षांनी महाआघाडीची तयारी सुरू केली आहे. महाआघाडी झाली तर भाजप विरुद्ध इतर पक्ष असा सामना पाहायला मिळू शकतो. परंतू पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? यावरुन आघाडी स्थापन होण्याआधीच त्याची बिघाडीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. ही निवडणूक काँग्रेसच्या अस्तित्वाची मानली जात आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्ष झाल्यानंतर काही ठिकाणी काँग्रेसला उभारी देण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांना आघाडीतील इतर पक्षाचा पंतप्रधानपदासाठी पाठिंबा नसल्याने त्यांच्या समोर हे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पाच राज्यांतील पराभवामुळे भाजपाचे कार्यकर्ते खचलेल्या मानसिकतेत असतान मित्रपक्षांची वाटाघाटी करण्याची ताकदही वाढली आहे. मात्र तीन राज्यांतील विजयाने गलितगात्र झालेल्या काँग्रेसला संजीवनी मिळाल्याचे चित्र आहे.
असे असले तरीही २०१९ च्या निवडणुकीत लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पंतप्रधानपदासाठी पसंती दाखवल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. एबीपी आणि सी-व्होटरने केलेल्या सर्वेक्षणानुसार २०१९ मध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे. मात्र २०१४ च्या तुलनेत जागा कमी होतील, असेही या सर्वेत नमूद करण्यात आले आहे. सद्यस्थितीत एनडीएला २७६ जागांवर विजय मिळेल. तर युपीएला 112 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. स्वतंत्र लढणारे पक्ष आणि अपक्ष असे ११५ उमेदवार निवडून येतील, असाही अंदाज या सर्वेतून व्यक्त करण्यात आला आहे.
या गोळाबेरजेच्या राजकारणामुळे राजकीय पक्षांमधील चुरस वाढली आहे. आतापासूनच एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. फेसबूक, ट्विटर आणि व्हॉट्सअप सारख्या सोशलमीडियाच्या माध्यमातून निवडणुकीचे रंग आतापासूनच भरायला लागले आहेत. निवडणुकीच्या या काळात जनतेला आश्वासन द्यायला पैसे लागत नाहीत. त्यामुळे वाट्टेल तशी आश्वासने राजकीय पक्ष आतापासूनच देताना दिसत आहेत. गेल्या काही निवडणुकांत तरी हेच चित्र पहायला मिळाले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीचेच उदाहरण द्यायचे झाले तर भाजपाने वारेमाप आश्वासनांची खैरात लोकांना दिली होती. त्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शाह यांनीच एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासने जुमले असतात असे कबुल केले होते. केेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तर जाहीर सभेत ‘अच्छे दिन’ गले की हड्डी बन गयी है, अशी कबुली दिली होती. भारतीय जनता पार्टीने भारतीय राजकारणात ‘जुमला’ या नव्या शब्दाची यानिमित्ताने भर घातली आहे. या पायंड्यानंतर आता तर कुठलीही भीडभाड न ठेवता राजकीय पक्षाचे नेते जनतेला भूलथापा देताना दिसत आहेत. कारण निवडणुका झाल्यांतनर तो एक जुमला होता असे म्हणायलाही ते आता मोकळे आहेत.
आश्वासनांच्या घोडदौडीत सर्वच पक्ष आघाडीवर आहेत. नुकतेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास प्रत्येक गरीबाला किमान वेतन देण्याचे नवे आश्वासन दिले. छत्तीसगढ येथील अटलनगरमध्ये राहुल गांधी यांनी ही घोषणा केली. प्रत्येक गरीबाच्या खात्यात दर महिन्याला किमान वेतन जमा केले जाईल. ज्याआधारे तो गरीब माणूस आणि त्याचे कुटुंब उपाशी झोपणार नाही, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ही घोषणा वरकणी ऐकायला खूप छान वाटत असली तरी प्रत्यक्षात उतरवण्यात तेवढ्याच अडचणीची ठरणार आहे, असे जाणकारांचे मत आहे. भारतासारख्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात अशी योजना राबवणे कठीण काम आहे. त्यातच एवढा पैसा आणायचा कुठुन हा सवालही उपस्थित होतोच. याचे उत्तर कोणीच देत नाही. मात्र घोषणा करून राजकीय नेते मोकळे होतात. मतदारांना आकर्षित करून अशा घोषणांनी निवडणुका जिंकता येतात. मात्र नंतर जेव्हा अमलबजावणी करण्याची वेळ येते तेव्हा तो जुमला ठरतो. मोदी सरकारने १५ लाखांचा जुमला सप्रमाण सिद्ध करून दाखवलाच आहे.
असे म्हणतात, प्रत्येकाचा एक दिवस येतो. पाच वर्षांतून का होईना मतदारांचाही दिवस येतोच. मतदारांच्या उत्सवाचा तो दिवस फार जवळ येऊन ठेपला आहे. राहुल गांधी यांनी जाळे फेकायला सुरूवात केली आहे. यापुढे तर आश्वासनांचा पाऊस पडणार आहे. यात चिंब भिजून न जाता या पावसाकडे जरा तटस्थ होऊन बघायला आता मतदार राजाने शिकले पाहिजे. या भंपक राजकारण्यांची आश्वासने जर पुढे जुमले ठरत असतील तर अशांना घरी बसवणे हेच मतदार राजाचे कर्तव्य आहे. तेव्हा आपली सदसदविवेकबुद्धी वापरून सुज्ञ मतदार आपले कर्तव्य चोखपणे बजावतील आणि एक चांगले सरकार दिल्लीच्या तख्तावर बसवतील अशी अपेक्षा करूया.
इंदिरा गांधी यांनी ७० च्या दशकात अशीच एक लोकप्रिय घोषणा केली होती.‘वो कहते है इंदिरा हटाओ, और हम कहते है की गरिबी हटाओ’ या घोषणेवर विश्वास ठेवून जनतेने त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून दिले होते. यानंतर चार वर्षांनी त्यांनी २० सूत्रीय कार्यक्रम सादर करून गरीबी निर्मुलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र आजची काँग्रेस या मुद्यावरून पुर्णपणे भरकटलेली दिसत आहे. एकीकडे गरीबांना किमान वेतन देण्याची भाषा होत असताना इंदिराजींच्या गरीबी हटाओच्या घोषणेचं काय? याचं उत्तर राहुल गांधी यांच्याकडे आहे काय?
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.