“हे बघ उगाच जास्त मोकळेपणाने वागायला जाऊ नकोस, त्याचं वाईट इम्प्रेशन पडतं. तुझं म्हणजे अगदी बोलायला लागलास की थांबतच नाहीस”
आईने राजेशला अजून एक सूचना केली. मागचे दोन दिवस ह्या सूचना सुरूच होत्या. राजेशच्या लग्नाचं त्याच्या घरच्यांनीच जास्त टेन्शन घेतलं होत.
मागचे सहा महिने त्याच्यासाठी मुली बघायच्या मागे त्याचे जवळपास सगळे नातेवाईक लागलेले होते पण काही ना काही अडचणी येतंच होत्या. कधी मुलीला ह्याचा फोटो आवडायचा नाही, कधी ह्याला मुलीचा फोटो आवडायचा नाही, कधी पत्रिका तर कधी रक्तगट काही ना काही अडचण यायचीच.
पण ह्यावेळी मात्र राजेशला पल्लवीचा फोटो बघून ती खूप आवडली आणि बाकी सगळ्या गोष्टी सुद्धा नीट जुळल्यामुळे शेवटी बघण्याचा कार्यक्रम ठरला.
ह्या कार्यक्रमात जास्तं लोक असले तर मोकळेपणाने बोलता येत नाही म्हणून फक्त राजेश आणि त्याचे आई-बाबा तिकडे जाणार होते.
“या या, घर शोधायला काही त्रास झाला नाही ना ?”
पल्लवीचे बाबा दरवाजा उघडताना हसतमुखाने बोलले.
राजेशने आजूबाजूला नजर फिरवली तर घरात दोन बायका आणि दोन पुरुष होते पण पल्लवी त्याला कुठे दिसली नाही.
खायचे पदार्थ तिने केलेले आहेत असं वाटावं म्हणून ती किचनमध्ये थांबली असणार असा विचार करून तो हलकेच हसला.
इकडच्या तिकडच्या गप्पा होईपर्यंत पल्लवी पोह्यांचा ट्रे घेऊन आली.
पोह्यांची डीश घेताना राजेशची आणि तिची नजरानजर झाली आणि दोघे कुणालाही दिसणार नाही असे हसले.
“मुलाचा वेगळा फ्लॅट असता तर जरा बरं झालं असतं, म्हणजे आमच्या पल्लूची तशी इच्छा होती, कधी भाड्याच्या घरात राहिली नाहीये ती”
पल्लवीच्या मावशीने पदराशी चाळा करत करत विषय काढला.
“हो त्याचे प्रयत्न सुरु आहेतच हो पुण्यात फ्लॅट घ्यायचे, म्हणजे गावी आमचा बंगला आहे त्यामुळे अजून कधी हा प्रश्न आला नव्हता, पण हा पुण्यात नोकरीला आहे त्यामुळे आता घेईल फ्लॅट तो लवकरच”
राजेशचे बाबा स्प्ष्टीकरण देत बोलले. राजेश मात्र पोहे खाण्यात गुंग झालेला होता.
सुरवातीला पल्लवीने राजेशचा पगार थोडा कमी आहे ह्यावरून थोड्या शंका काढल्या होत्या असं मध्यस्थाने त्यांना सांगितलं होतचं, त्यामुळे हे स्थळ सुद्धा गेलं असा विचार करत राजेशची आई चहाचे घोट घेत होती.
“तुम्हाला काही विचारायचं आहे का राजेशराव?”
पल्लवीच्या बाबांच्या प्रश्नाने राजेशने एकदम चमकून वर बघितलं आणि हातातली संपलेली पोह्यांची डिश खाली ठेवत तो बोलला
“हो ना, पल्लवीला पगार किती आहे?”
राजेशचा हा प्रश्न कुणालाच अपेक्षित नव्हता त्यामुळे सगळेच चमकून त्याच्याकडे बघायला लागले.
“त्याचं काय आहे न आमची पल्लू चांगल्या नोकरीला लागलेली मुंबईला पण तिला मुंबई मानवेना सारखी आजारी पडायला लागली, मग मीच म्हणले मरो ती नोकरी तू ये घरी.
आता इथेच एका लहानशा कंपनीमध्ये जाते ती कामाला, लग्नानंतर पुण्यात मिळेलच ना चांगली नोकरी तिला”
पल्लवीच्या आईने आपल्या लेकीची बाजू सांभाळून घेत उत्तर दिल.
“आणि तिचा फ्लॅट आहे ना स्वतःचा?”
राजेशची आई त्याच्याकडे डोळे वटारून त्याला गप्प राहायला सांगत होती आणि पल्लवीचे आई–बाबा काय उत्तर द्यावं ह्याचा विचार करत होते.
“नाही हो, तिला कशाला हवं वेगळ घर, हे सगळं तिचंच तर आहे ना” पल्लवीचे बाबा थोड्या नाराजीच्या स्वरात बोलले.
“नाही म्हणजे मी २३ व्या वर्षी शिक्षण पूर्ण करून २६ व्या वर्षी स्वतःचा फ्लॅट घ्यावा अशी जिची इच्छा आहे तिनेसुद्धा २३ व्या वर्षी शिक्षण पूर्ण करून २५ व्या वर्षापर्यंत फ्लॅट घेतला असेल असं मला वाटलं, म्हणून विचारलं फक्त बाकी काही नाही…. काकू पोहे अप्रतिम केलेत हं तुम्ही आवडले मला.”…… राजेश
गाडीत बसल्या बसल्या राजेशची आई वैतागून बोलली “काय गरज होती तुला त्यांना असं विचारायची?”
“सोड ना तसं पण त्या पोरीला माझा पगार, माझं घर माझे पैसे ह्यातंच इंटरेस्ट आहे. सो ती नाही म्हणणार होतीच, मग म्हटलं नकार येणार आहेच तर खरं बोलून टाकू” एवढं बोलून राजेश मोबाईलमध्ये गेम खेळण्यात गुंग झाला आणि त्याची आई त्याच्या लग्नाच्या चिंतेत.
जेवून बेडवर पडणार तेवढ्यात राजेशला मोबाईलवर मेसेज टोन ऐकू आली.
नंबर तर त्याच्याकडे सेव्ह नव्हता, एवढ्या रात्री कुणी मेसेज केला म्हणून त्याने मेसेज उघडला,
“मी पल्लवी, सॉरी असा दुसऱ्याकडून नंबर मिळवून मेसेज करतेय. पण तुला काही गोष्टी सांगायच्या होत्या. ती पगार आणि फ्लॅटची अट माझ्या आई आणि मावशीची होती, माझ्यासाठी मुलगा आणि त्याचा स्वभाव जास्तं महत्वाचं आहे. आणि मला तू आवडला आहेस उद्या माझ्या घरून तुला तसा निरोप मिळेलच. फक्त तुझा गैरसमज दूर करावा म्हणून मेसेज केला. आणि हो ते पोहे मी केलेले आईने नाही समजलं ना!”
गालातल्या गालात हसत राजेश मेसेज टाईप करायला लागला.
लेखन – सचिन अनिल मणेरीकर
याही कथा तुम्हाला खूप आवडतील ….🎁🎁
भेटली ती पुन्हा……
अनुबंध
ट्रायल सब्जेक्ट्स
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.