गेल्या आठवड्यात दोन घटनांनी माझ्या मनात घर केलं. ह्या दोन्ही घटना विलक्षण होत्या. मनात कुठेतरी खोलवर ह्या घटनांचा परिणाम झाला. प्रत्येक माणूस मोठं होण्यासाठी आयुष्यभर झटत असतो. समाजातली आपली उंची आणि मोठेपण दिसावं म्हणून अनेक गोष्टी तो करत असतो. समाजातली उंची मोजण्याची एककं प्रत्येकाची वेगळी असली तरी काही माणसांची व्यक्तिमत्व इतकी मोठी असतात की त्यांना जोडणाऱ्या प्रत्येक वस्तूचे मूल्य आपोआप वाढत जाते. पण ही माणसं मोठी असूनही इतकी जमिनीवर असतात की त्यांच्या प्रत्येक कृतीतून काहीतरी शिकण्यासारखं असते. अश्याच दोन मोठ्या माणसांच्या सामान्य कृतीने मी अक्षरशः निशब्द झालो.
गेल्या आठवड्यात एक फोटो फेसबुक आणि इतर सोशल मिडिया मध्ये फिरत होता. हा फोटो होता रतन टाटा ह्यांचा. फोटो बघताना मी तिकडेच थबकलो कारण ही तसेच होतं. रतन टाटा ह्या फोटोत आपल्या तरुण अभियंत्यांसोबत अगदी आपल्या गुडघ्यावर बसले होते. रतन टाटा भारतातील अग्रगण्य समूहाचे अध्यक्ष होते. ज्याला १५० वर्षांची परंपरा आहे. ज्याचं उत्पन्न १०० बिलियन अमेरिकन डॉलर पेक्षा जास्त आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ६ लाखापेक्षा जास्त लोक काम करतात. अश्या प्रचंड मोठ्या समूहाची धुरा ज्यांनी १९६१ पासून सांभाळली आणि त्याला जागतिक स्तरावरील एक नावाजलेला समूह बनवण्यात त्यांनी आपलं आयुष्य वेचलं. सगळी सुखं, अमाप पैसा असताना सुद्धा मोठेपणाचा कुठलाही लवलेश आपल्या व्यक्तिमत्वाला त्यांनी ह्या पूर्ण वाटचालीत लागू दिला नाही. गेल्या आठवड्यात त्या फोटोतून मनाला भिडला तो त्यांचा मोठेपणा. फोटोत कोणताही माज, गर्व याचा लवलेश दिसत नाही. भारतातील सर्वोच्च असे दोन नागरी पुरस्कार पद्मभुषण (२००० साली) पद्मविभुषण (२००८ साली) आणि इतक्या मोठ्या समुहाचे सर्वेसर्वा असून पण आपल्या तरुण अभियंत्यानसोबत अगदी खाली झुकून फोटो काढताना त्यांना कोणताच कमीपणा वाटला नाही हाच त्यांचा साधेपणा त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळं मोठेपण देतो.
दुसरी घटना होती कौन बनेगा करोडपती च्या एका भागाची. ह्यात डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे ह्यांना बोलावण्यात आलं होतं. आमटे कुटुंबियांच्या सामाजिक कार्याबद्दल कितीही लिहिलं तरी ते कमीच आहे. १९७३ पासून डॉक्टर प्रकाश आमटे ह्यांनी लोक बिरादरी प्रकल्पाला वाहून घेतलं ते आजतागायत. बाबा आमटे ह्यांच्याकडून मिळालेला सामाजिक कार्याचा वसा स्वतः आणि आपल्या पुढल्या पिढीसोबत आजही पुढे नेत आहेत. ज्यांच्या सामाजिक कार्याची दखल म्हणून त्यांना पद्मश्री ( २००२ साली) तर २००८ साली मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. अस असूनसुद्धा मोठेपणा, गर्व, माज किंवा एकूणच भौतिक सुखांचा लवलेश लांब लांब नसलेलं हे दांपत्य जेव्हा के.बी.सी. मध्ये आलं तेव्हा त्या कार्यक्रमाचा चा दर्जा एका वेगळ्या पातळीवर गेला.
ह्या भागात डॉक्टर प्रकाश आमटे यांची एक व्हिडिओ टेप दाखवली गेली. ती बघणं म्हणजे संसार काय असतो ह्याचं आदर्श उदाहरण. डॉक्टर प्रकाश आमटे यांनी आपला आदर्श म्हणून डॉक्टर मंदाकिनी आमटे ह्याचं नाव सांगताना इतक्या वर्षाच्या संसारात एक साधी साडी नाही घेऊ शकलो ही खंत जेव्हा सांगितली तेव्हा मला वाटते माझ्यासोबत तो कार्यक्रम बघणाऱ्या सर्वांच्या डोळ्यांच्या कड्या आपसूक ओल्या झाल्या असतील. आपण उंची कपड्यांचा त्याग केला तर तिने कधी स्वेटर घातला नाही. ५-६ डिग्री सेल्सिअस तपमान असताना सुद्धा तिने स्वेटर घातला नाही हे सांगताना डॉक्टर प्रकाश आमटेंचा जड झालेला आवाज खूप काही सांगून जात होता. आज आपण जे कोणी आहोत ते डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या मुळे अन्यथा एक सर्वसामान्य आयुष्य आपल्या वाट्याला आलं असतं हे सांगताना डॉक्टर मंदाकिनी आमटेंचा आवाज आयुष्याची एक खूप मोठी शिकवण देऊन गेला. तो व्हिडीओ संपल्यावर अमिताभ बच्चन सारख्या मिलेनियम सुपरस्टार ला कॅमेरा समोर आपल्या भावना लपवता आल्या नाहीत आणि आपल्या जागेवर उभे राहून तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. हा क्षण माझ्यामते त्या कार्यक्रमाचा सर्वोच्च क्षण होता.
आपण आयुष्यात आदर्श, हिरो किंवा ज्यांच्याकडून आपण काही शिकतो अशी व्यक्तिमत्व निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याला असते. कोणी काय निवडावं हा ज्याचा त्याचा प्रश्न मात्र काही व्यक्तिमत्व आपल्या साध्या वागण्यातूनपण आयुष्याची तत्व सांगून जातात. नुसती सांगून जात नाही तर त्यांनी ती स्वतःच्या आयुष्यात जगलेली असतात. म्हणून त्यांचं साध असणं त्यांना असामान्य बनवते. अशी व्यक्तिमत्व खूप कमी आहेत. समाजात अतिशय उंचीवर असूनसुद्धा भपकेबाजपणा, मोठेपणा, गर्व, श्रीमंती अश्या सगळ्या दिखाऊ गोष्टींपासून लांब असलेली ही व्यक्तिमत्व माझ्यासाठी नेहमीच आदर्श राहिली आहेत. त्यांचं साध असणंच त्यांना मोठं बनवतं. त्यांच्या इतकं मोठं नाही बनता आलं तरी साधं राहण्याचा प्रयत्न तरी मी नक्कीच करणार आहे.
डॉ. प्रकाश आमटे यांचे ‘प्रकाशवाटा’ हे पुस्तक
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.