आपण एकटेच का? विश्वाच्या ह्या पसाऱ्यात तूर्तास आपण एकटे असलो तरी तंत्रज्ञान ज्या वेगाने पुढे जात आहे. त्यातून येत्या शतकात आपल्या सारखच कोणीतरी किंवा पृथ्वी सारख कोणीतरी सापडण्याची शक्यता प्रचंड आहे.
आत्तापर्यंत मानवाला ज्ञात असलेल्या अनेक सौरमालेत आपली सौरमाला सगळ्यात मोठी आहे असच आपल्याला वाटत होत. पण हा समज आत्ता मोडीत निघाला आहे. आपल्या इतकीच ग्रह असणारी सौरमाला शोधण्यात किंवा त्यातला आणखी एक ग्रह शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आल आहे. “केपलर ९०” (Kepler-90) ह्या सौर मालेत ८ वा ग्रह शोधण्यात यश मिळाल आहे. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून अश्या ८ ग्रहांनी बनून बनलेल्या आपल्या सौरमालेला आत्ता केपलर ९० ह्या सौरमालेने संखेच्या बाबतीत गाठल आहे. “केपलर ९०” मध्ये ही ८ ग्रह हे सौरमालेती ह्या ताऱ्याच्या भोवती भ्रमण करत आहेत.
पृथ्वीपासून सुमारे २५४५ प्रकाशवर्ष लांब असणाऱ्या ह्या सौरमालेतील आठवा ग्रह “केपलर ९०-आय” हा एक गरम ग्रह असून तो त्याच्या ताऱ्याच्या भोवती १४.४ दिवसात प्रदक्षिणा घालत आहे. केपलर ही अवकाशातली एक वेधशाळा असून ती आपल्या सौरमालेच्या बाहेर ताऱ्यांभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या ग्रहांचा शोध घेत असते. ताऱ्यांच्या समोरून जाताना ग्रहांमुळे ताऱ्यांकडून आपल्या पर्यंत येणाऱ्या प्रकाशात किंचित बदल होतात. ग्रह जर समोरून जात असेल तर प्रकाश थोडावेळ झाकला जातो. हे बदल नोंदवून त्या ताऱ्याच्या भोवती ग्रहांच अस्तित्व कळून येते. तसेच ह्यातील समानता शोधून आपण ग्रहांची कक्षा आणि त्यांचा आकार ह्याचा अंदाज बांधू शकतो. केपलर ९० मध्ये कोणत्याही जीवनाची शक्यता कमीच आहे. केपलर ९० तारा ह्या सर्व ८ ग्रहांना आपल्या कुशीत अगदी जवळ घेऊन आहे. केपलर ९० च्या कक्षेतील सगळ्यात लांबचा तारा केपलर ९० एच हा पृथ्वीपेक्षा त्याच्या ताऱ्याच्या जवळ आहे. हा तारा ३३१.६ दिवसात परिक्रमा पूर्ण करत असून गुरु ग्रहा इतका मोठा आहे. नवीन शोध लागलेल्या केपलर ९० आय हा तारा पृथ्वीपेक्षा ३०% जास्ती मोठा असून त्याच्या वरील तापमान हे ८०० डिग्री फॅरेनहाईट पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.
हा तारा ज्या पद्धतीने शोधला गेला आहे त्याने मानवाच्या शोधाला एक वेगळं वळण मिळण्याची शक्यता येत्या काळात आहे. अस्ट्रोनोमर “एन्ड्रू वांडेरबर्ग” आणि गुगल आय टीम चा सदस्य “ख्रिस्तोफर श्याल्यु” ह्यांनी मिळून ह्या ग्रहाचा शोध लावला आहे. गुगल आय प्रोजेक्ट मध्ये काम करत असताना ख्रिस्तोफर ला प्रश्न पडला कि मशीन प्रचंड मोठा डेटा चा अभ्यास माणसापेक्षा जास्त चांगला आणि सूक्ष्म पद्धतीने करू शकते. आजवर प्रकाशातील बदल हे माणसांच्या डोळ्यांनी शोधले होते. ह्यासाठी खूप मोठा डेटा लक्षात ठेवण गरजेच होत. म्हणजे केपलर च्या ४ वर्षांच्या निरीक्षणावरून २ गुणिले १० चा १५ वा घात इतक्या ग्रहांच्या कक्षेची कॉम्बिनेशन होऊ शकते. इतक्या प्रचंड डेटा मधून माणसाच्या निरीक्षणातून काही गोष्टी नक्कीच सुटल्या असणार. ह्या दोघांनी मशीन ला ह्यासाठी तयार केल. निरीक्षण आणि अनुमान कस करायची त्याचा डेटा फीड केला व मशीन नी आलेली उत्तर तपासून बघितली. जेव्हा मशीन योग्य तऱ्हेने ग्रह शोधून द्यायला लागली तेव्हा ६७० स्टार सिस्टीम ज्यात आधीच ग्रह सापडलेले आहेत त्यांचा डेटा मशीन ला अभ्यासासाठी दिला गेला. मशीन ने शोधलेले ग्रह आणि त्याशिवाय अतिशय विक असे सिग्नल शोधण्याचा प्रयत्न केला आणि केपलर ९० आय चा शोध लागला. केपलर ९० आय हा एकच शोध नाही तर “केपलर ८० जी” चा हि शोध लावला आहे. केपलर ८० जी हा पृथ्वीच्या आकाराचा ग्रह आहे.
नासा ची केपलर वेधशाळा २००९ साली अवकाशात सोडण्यात आली होती. केपलर ने केलेल्या निरीक्षणाने शोधांची अनेक दालन उघडी झाली आहेत. अवकाश वैज्ञानिकांच्या मते प्रत्येक ताऱ्यामागे एक ग्रह फिरत असला पाहिजे. वैज्ञानिकांनी २१ असे ग्रह शोधले आहेत कि जे पृथ्वीप्रमाणे आपल्या ताऱ्यापासून योग्य अंतरावर आहेत जिकडे तापमान हे पृथ्वीसारख असण्याची शक्यता आहे. ह्या ठिकाणी जीवन असण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहेत. ह्याच फेब्रुवारी महिन्यात वैज्ञानिकांनी असे ३ ग्रह शोधले आहेत कि जे जीवनाला मदत करू शकतात. फक्त ३९ प्रकाशवर्ष अंतरावर हे ग्रह आहेत. गेल्याच आठवड्यात एक मोठा ऑब्जेक्ट १,९६,००० मैल प्रती तास वेगाने पृथ्वी जवळून गेला. त्याचा वेग आणि आकार एखाद्या स्पेसशिप सारखा होता. हा ऑब्जेक्ट नक्कीच मिल्की वे मधल्या दुसऱ्या सौरमालेतून आला असावा अस वैज्ञानिकांच म्हणन आहे.
आपण एकटेच का? ह्या प्रश्नाचा गुंता जसा सुटत जातो आहे. तसतस नवीन गोष्टी समोर येत आहेत. ज्याचा विचार पण आपण आजवर केला नव्हता. विश्वाच्या ह्या पसाऱ्यात तूर्तास आपण एकटे असलो तरी तंत्रज्ञान ज्या वेगाने पुढे जात आहे. त्यातून येत्या शतकात आपल्या सारखच कोणीतरी किंवा पृथ्वी सारख कोणीतरी सापडण्याची शक्यता प्रचंड आहे. तूर्तास ह्या वैज्ञानिक शोधाबद्दल दोन्ही संशोधकांचे आभार.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.