पीप….
गाडीच्या हॉर्नच्या आवाजाने माईला जाग आली.
“अहो बाळू आलासा दिसतो, उठा आणि अंगात आधी गंजीफ्राक घाला.. बघुया, सुनबाईस नाही आवडत तुम्ही उघडे फिरता ते”
नानांवर तोंडाचा पट्टा सोडता सोडतच माईने वळकटी गुंडाळून आतल्या फडताळात नेऊन ठेवली. नाना सुद्धा आपल्या बाजेवरून उतरले आणि चहुबाजूने लोंबणारी मच्छरदाणी त्यांनी वर अडकवली.
“अरे हळू संचित, पडशील”
सुषमाचे हे शब्द वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या संचितच्या कानात घुसलेच नाहीत. त्याने धावत अंगण ओलांडलं आणि २ पायऱ्या एका उडीत मागे घालून तो सरळ ओसरीवर आला.
“आज्जी!!!! भूक!!!! ”
मागच्या पडवीत चुल फुंकणाऱ्या माईच्या कानात हे शब्द गेले आणि तिच्या चेहऱ्यावर एक छान हसू पसरलं.
“मी काय उपाशी ठेवते काय रे तुला कायम? आल्याआल्या हपापल्या सारखा खा खा करतोस ते?”
सुषमाचं बोलण ऐकून दुखणाऱ्या गुढघ्यावर हात टेकत माई चुलीसमोरून उठली. तुपाचा डबा शोधताना तोंडाचा पट्टा सुरूच होता.
“मेलं एक काम होत नाई ह्याच्याने, नुसता खायस काळ आणि भुईस भार झालाय बाबल्या. एक लाकूड सुकं आणलेलं असेल तर शपत…. मेल्या माणसास जाळायस गेले ह्याने तर तो सुद्धा परत जिता होईल. आणि आमचे हे म्हणजे त्याच्या फुडले….”
नेमकं कानावरचं जानवं काढून पायावर पाणी ओतणाऱ्या नानांना हे ऐकू गेल. “काय केलं आता आमच्या ह्यांनी…. कायय झाले कुठेय तरी त्याच्यात तुमच्या ह्यांचेच काय तरी चुकते नाय काय गो ”
“हवे ते बरोबर ऐकायस येते ह्यांस. बाकी कायम कानपुरात हरताळ ”
घरच्या गाईच्या तुपात केलेला गोड शिरा बश्यात भरताना सुद्धा तोंड मात्र बंद नव्हतच.
“स्वयंपाकघरात यायस सुद्धा आमंत्रण लागते महाराणीस म्हटले. माझेच चुकले, नारळ –पत्रिका घेऊन जायस हवे होते मीच आमंत्रण द्यायला की ये बाय घरात ये जरा काय तरी हातबोट लाव कामास, म्हातारी सासू करते ते नुसतं बाहेर तरी आणून दे”
“आई काही करायचं आहे का?”
माजघराच्या दारात उभे राहून सुषमाने विचारले.
“नको”…. एवढेच उत्तर आले.
“पाय कसे आहेत बाबा तुमचे? खूप दुखतात का आता? औषध घेताय ना वेळेवर?”
माई डोळ्याच्या कोपऱ्यातून सुषमा आणि नानांना बोलताना बघत होती.
“प्याय ब्यारे आहेत न्या…. झाली साखरपेरणी सुरु आणि हे विरघळणार त्यात. रात्री सांगतील मज सुनबाईस काळजी आहे हो माझी, विचारपूस केलीन माझी, तशी मनाची प्रेमळ आहे गो ती…. हिस काय कधीतरी दोन दिवस येऊन विचारायस प्याय ब्यारे आहेत न्या काय…. इकडे दिवसातून ४ वेळा शेकायस पाणी गरम करून मज द्यायचे लागते. प्याय ब्यारे आहेत काय म्हणे….हुssss ”
“आजी रात्री खतखतं कर ना प्लिज. आईला नाही येत अजिबात”
संजयच्या खाणाखुणांकडे दुर्लक्ष करून संचितने आपली मागणी पुढे केली. सुषमाचा रागाने लाल झालेला चेहरा बघून संजयला घरी गेल्यावर होणारं महाभारत स्पष्ट दिसायला लागलं होतं. तरी माईच्या हातचं खतखतं खाण्यासाठी एवढे कष्ट त्याला चालले असते.
“अरे नको रे काही पण सांगूस. आजीचे पाय दुखतात त्यात किती त्या भाज्या चिरायच्या, साली तासायच्या. नकोच ते. आई तुम्ही साधंसं काहीतरी करा हो. ह्याचं नका मनावर घेऊ ”
“करते खतखतं”…. बोलून माई स्वयंपाकघरात जायला निघाली.
“सुषमा तू पण बघ ना आई कसं करते ते म्हणजे तुला पण करता येईल घरी गेल्यावर ”
संजय नकळत बोलून तर गेला पण ह्यावर सुषमाने फेकलेला कटाक्ष बघून त्याला धरतीमाता पोटात घेईल तर बरं असं वाटायला लागलं. सुषमा पाय आपटत स्वयंपाकघरात गेली.
“असंच तर करते मी, काहीच वेगळ नाही करत. काय माहित माझं का वेगळं होतं”
चुलीवर शिजणाऱ्या टोपाकडे बघणाऱ्या माईच्या चेहऱ्यावर खट्याळ हसू आलं.
“तू जा गो आता भायेर, शिजले की मी काढते पातेले चुलीवरून.” पडत्या फळाची आज्ञा घेऊन सुषमा रुमालाला तोंड पुसत बाहेर येऊन बसली.
फडताळातल्या पितळीच्या लहान डब्यातला दोन चमचे मसाला खतखत्यात घालताना माईच्या चेहऱ्यावर परत तेच खट्याळ हसू आलं.
“ह्या जन्मात काय तुज् जमायचे नाय माझ्यासारखे खतखते… मी तुज् माझा मसाला द्यायंस हवा काय नको माझ्यासारखे करायंस?? कर आता पचपचीत खतखते आणि खा एकटीच!!”
खुदुखुदू हसत माई ओसरीवर आली….
“कसलं भारी झालंय आजी, अजून थोडं दे ना ”
“अरे किती खाशील, उद्या पोट बिघडेल”…. संचितवर डोळे मोठे करत सुषमा ओरडली.
“परत कधी खायला मिळणार काय माहित आजीच्या हातचं. खाऊ दे ना आज हवं तेवढं”
खुश होऊन माई अजून खतखतं आणायला स्वयंपाकघरात आली आणि तेवढ्यात तिच्या छातीत पुन्हा कळ आली.
“हे छातीत दुखायचे रोजचेच झाले आता. तो मेला डॉक्टर येऊन नुसते पैशे घेऊन जातो आणि नको ते काय काय ह्यांच्या डोक्यात भरवून जातो नुसता. आपरेशन करायला लागणार म्हणे…. हु SSS. ह्यास काय समजते, त्यापेक्षा आमचे पाटील वैद्य बरे. त्याच्या काढ्यानं गुण तरी येतो. ”
टोपातलं खतखतं वाटीत वाढत असताना अचानक तिचे डोळे भरून आले.
“परत खायला मिळेल का नाय आजीच्या हाताचे काय माहित रे नातवा. तू परत येईपर्यंत आजी असेल का नाही देव जाणे. आजी गेली तर दहाव्याला करतीलंच म्हणा खतखते आजीच्या आवडीचे म्हणून पण आजीच्या हाताची चव नसणार त्यास”…. माई बडबडत फडताळाकडे गेल्या.
“घे, पूर्ण शिजत आले की २ लहान चमचे घाल आणि झाकून ठेव”
लहानसा पितळीचा डबा माईने सुषमाच्या हातावर ठेवला.
“आजपर्यंत कोणास दिला नाही हा मसाला मी. माझ्या आईनं मज शिकवलेला तो आता मी तुज देतेय त्या तुझ्या सगळ्या साळकाया मायकाया जमवून वाटून नको टाकुस, पोरास करून घाल त्यास हवं तेवा. उद्या तुज शिकवते कसा करायचा मसाला ते”
लेखन: सचिन अनिल मणेरीकर
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
अप्रतिम