खोकण्याच्या प्रकारावरुन कोणता आजार झाला आहे हे समजू शकते का? सविस्तर जाणून घ्या या लेखात
खोकला कोरडा असो वा कफयुक्त, तात्पुरता असो किंवा जुनाट तो कोणत्यातरी आजाराशी निगडीत नक्की असतो. खोकण्याच्या प्रकारावरून तो नक्की कोणत्या आजारामुळे येत आहे हे जाणून घेता येते. कसे ते पाहूया.
खोकला झाला की आपल्या दैनंदिन कामावर त्याचा परिणाम नक्कीच होतो. खोकल्यामुळे रुग्ण अगदी त्रासून जातो. साधी साधी कामे करणे देखील शक्य होत नाही.
पल्मोनोलॉजिस्ट म्हणजेच श्वसनविकार तज्ञ असणारे डॉक्टर असे सांगतात की श्वसन यंत्रणेतील संसर्गामुळे खोकला येतो. खोकल्याच्या प्रकारावरून त्यावर उपचार करणे शक्य होते. काही वेळा उपचार लागू पडत नसतील तर खोकल्याचा प्रकार नक्की कोणता आहे ही माहिती अतिशय महत्त्वाची ठरते.
तात्पुरत्या आजारांमुळे येणारा तीव्र खोकला
सर्दी, ताप किंवा एखादे वायरल इन्फेक्शन अशासारख्या तात्पुरत्या आजारांमुळे तीव्र खोकला येऊ शकतो. असा खोकला आजार बरा झाला की बरा होतो परंतु काही लोकांमध्ये तो आठ आठवड्यांपर्यंत देखील राहू शकतो.
घरगुती औषधे घेऊन एक ते दोन आठवड्यात खोकला बरा झाला नाही तर डॉक्टरांना दाखवणे आवश्यक आहे. अशा वेळी डॉक्टर त्या खोकल्याचे नेमके कारण शोधून काढून त्यानुसार औषधे देतात आणि खोकला बरा होतो.
डांग्या खोकला किंवा न्युमोनिया हे आजार देखील खोकल्याला कारणीभूत ठरतात.
पल्मोनोलॉजिस्ट या आजारांबाबत माहिती देताना खोकल्याचा प्रकार, त्याचा आवाज आणि त्यावर आवश्यक असणारे उपचार सांगतात.
१. डांग्या खोकला
डांग्या खोकला इतका तीव्र स्वरूपाचा असतो की जास्त वेळ खोकला येऊन रुग्णाला कदाचित उलटी देखील होऊ शकते. खरेतर ह्या खोकल्यावर यस उपलब्ध आहे परंतु ती घेणे कटाक्षाने पाळले जात नाही.
डांग्या खोकला झाल्यावर कसा आवाज येतो?
खूप तीव्र स्वरूपाचा खोकण्याचा आवाज येतो. घशातून विचित्र प्रकारचा आवाज येतो. प्रत्येक श्वास घेण्याबरोबर असा आवाज येतो.
उपचार – यावर अँटिबायोटिक औषधे घेणे अतिशय आवश्यक आहे.
२. न्युमोनिया
हा आजार फुप्फुसांना होतो. इन्फेक्शनमुळे फुफ्फुसांच्या छिद्रांमध्ये पाणी भरले जाते आणि श्वासोच्छ्वास करणे अवघड होते. अशावेळी खोकला येऊ लागतो.
न्यूमोनियाच्या खोकल्याचा आवाज कसा येतो?
सुरूवातीला कोरडा खोकला येतो. परंतु आजार बळावल्यावर पिवळा, हिरवा आणि लाल रंगाचा कफ पडू लागतो. कफयुक्त खोकला होतो.
उपचार – बॅक्टेरियल इन्फेक्शनवर अँटिबायोटिक्स, व्हायरल इन्फेक्शनवर कप सिरप आणि एकूण प्रकृतीसाठी आराम करणे अशा उपचारांची न्यूमोनिया झाल्यावर आवश्यकता असते.
प्रकृतीत असणाऱ्या मूळ आजार किंवा दोषांमुळे होणारा जुनाट खोकला
आठ आठवडे किंवा त्यापेक्षाही अधिक काळ बरा न होणारा खोकला म्हणजे जुनाट खोकला होय. असा खोकला होण्याची अनेक कारणे आहेत. खोकल्याचे स्वरूप रुग्णाच्या प्रकृतीतील दोषांवर आणि आजारांवर अवलंबून असते.
१. क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज
या आजारांमध्ये फुफ्फुसांना संसर्ग होतो आणि त्यामुळे श्वासोच्छ्वास करणे अवघड होते. खूप काळापर्यंत धूम्रपान करण्यामुळे हा आजार होऊ शकतो.
ह्या खोकल्याचा आवाज कसा येतो?
अशा प्रकारचा खोकला तीव्र स्वरूपाचा असून तो सकाळच्या वेळी जास्त प्रमाणात येतो. काही प्रमाणात कफही पडतो.
उपचार – अँटिबायोटिक, स्टेरॉईड, ऑक्सिजन थेरपी आणि धूम्रपान सोडून देणे हे यावरील उपाय आहेत.
२. गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लक्स डिसीज
अन्नपचनासाठी मदत करणारी पोटात असणारी ॲसिडस् जेव्हा उसळून वर श्वासनलिकेत येतात तेव्हा अशा प्रकारचा खोकला होतो. असा खोकला होण्याचे प्रमाण जगभरात सगळीकडेच जास्त असून जवळजवळ चाळीस टक्के केसेस ह्या प्रकारच्या खोकल्याच्या असतात.
ह्या खोकल्याचा आवाज कसा येतो?
हा खोकला कोरडा असून बहुतेक वेळा आडवे पडून झोपल्यानंतर येतो. उठून बसल्यावर अथवा डोक्याखाली उंच उशी घेतल्यावर खोकला येणे कमी होते.
उपचार – ऍसिडिटी वर मिळणारी औषधे आणि घरगुती उपाय या आजारावर उपयोगी पडतात. तसेच खाण्या-पिण्याच्या वेळा सांभाळणे देखील उपयुक्त आहे.
३. नाकात होणारा अंतर्गत स्त्राव
नाकाच्या आतील भागात मागच्या बाजूला ठिपकत ठिपकत होणारा स्त्राव देखील खोकला उत्पन्न करू शकतो. एलर्जी, सर्दी किंवा सायनसमुळे हा त्रास होऊ शकतो.
ह्या खोकल्याचा आवाज कसा असतो?
हा खोकला कोरडा किंवा कफयुक्त असू शकतो. रात्रीच्या वेळी जास्त प्रमाणात येतो.
उपचार – एलर्जी वर असणारी औषधे ह्या खोकल्याच्या बाबतीत गुणकारी ठरतात. परंतु एक आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला तसाच राहिला तर त्वरित डॉक्टरांना दाखवून उपचार घ्यावेत.
४. दमा
दमा हा एक जुनाट आजार आहे. यामध्ये श्वासनलिकेला संसर्ग होणे, तिला सूज येणे आणि घशात किंवा छातीत कफ तयार होणे अशी लक्षणे दिसतात. दमा झालेल्या रुग्णाला श्वासोच्छवास करण्यास त्रास होतो.
ह्या खोकल्याचा आवाज कसा असतो?
कोरडा किंवा कफयुक्त खोकला येऊन शेवटी शिट्टी वाजल्यासारखा आवाज येतो. रात्रीच्या वेळी किंवा खूप दम लागल्यावर हा आजार बळावतो.
उपचार – विशिष्ट पद्धतीची इन्हेलर वापरल्यामुळे हा त्रास कमी होतो. परंतु हे उपचार डॉक्टरांच्या सल्ल्याने करणे आवश्यक आहे.
५. औषधांच्या साईड इफेक्टमुळे येणारा खोकला
कोणतेही औषध नियमित स्वरूपात घेणे सुरू केल्यानंतर काही दिवसात सुरु होणारा खोकला म्हणजे अशा प्रकारचा खोकला होय. उच्च रक्तदाब किंवा तत्सम आजारावरील गोळ्यांचा साईड इफेक्ट म्हणून अशा प्रकारचा खोकला येऊ शकतो.
ह्या खोकल्याचा आवाज कसा असतो?
कोरडा खोकला
उपचार – तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करून औषधे बदलून घेणे शक्य असेल तर तसे करता येते. तसेच औषधे बंद झाल्यावर खोकला आपोआप बरा होतो.
याव्यतिरिक्त आणखी एक खोकला रुग्णासाठी त्रासदायक असतो आणि तो म्हणजे कोणत्याही उपायांना दाद न देता आठ आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहणारा खोकला. अशा खोकल्यामध्ये घशात सतत काहीतरी अडकले आहे अशी भावना रुग्णाच्या मनात असते.
ह्या खोकल्याचा आवाज कसा असतो?
अशा पद्धतीचा खोकला एकदा सुरू झाला की तो लवकर थांबवता येत नाही. खूप जास्त वेळासाठी मोठ्या आवाजात खोकला येत राहतो.
उपचार – अशा प्रकारच्या खोकल्यावर रुग्णाच्या प्रकृतीचा नेमका अभ्यास करून खोकल्याचे कारण शोधून काढून त्यावर उपचार करणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे आठवड्यांपेक्षा अधिक काळ सुरू असणारा खोकला असेल तर दुर्लक्ष न करता त्वरित तज्ञ डॉक्टरांना दाखवावे. ते योग्य प्रकारे उपचार करून असा खोकला बरा करू शकतात.
तर अशाप्रकारे खोकल्याच्या प्रकारावरून आणि आवाजावरून आपण कोणता आजार झाला आहे हे ओळखू शकतो. अशाप्रकारे आजाराचे निदान करून त्वरित तज्ञ डॉक्टरांना दाखवून उपचार करून घेणे आवश्यक आहे नाहीतर साधा खोकला देखील गंभीर आजारात परावर्तित होऊ शकतो.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.