किडनी म्हणजेच मूत्रपिंड आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्याचे महत्त्वाचे काम करत असतात. शरीर स्वच्छ आणि निरोगी राहण्यासाठी हे काम अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे, अर्थातच किडनी निकामी झाल्या तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
किडनी आपल्या शरीरात फिल्टरचे काम करतात. शरीरातील टॉक्सिक पदार्थ बाहेर टाकून देण्यासाठी किडनी महत्वपूर्ण काम करते. त्यामुळे आपल्या किडनीचे कार्य कायम योग्य प्रकारे होत राहील हे पाहणे आपल्या साठी आवश्यक आहे. आज आपण अशा अकरा सोप्या टिप्स जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपल्याला किडनी संबंधी चा त्रास कधीही होणार नाही. किडनी फेल्यूअर टाळता येईल.
१. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा
डायबिटीस किंवा मधुमेह हा आजार जेव्हा एखाद्या व्यक्तीला जास्त काळासाठी होतो तेव्हा त्या व्यक्तीच्या मूत्रपिंडांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागतो. त्यामुळे मधुमेह झालेल्या व्यक्तीने सुरुवातीपासूनच आपल्या रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे भविष्यात मूत्रपिंडांवर म्हणजेच किडनीवर होणारे परिणाम टाळता येऊ शकतील.
डायबिटीस म्हणजेच मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठीचे ऍक्युप्रेशर पॉईंट्स
२. रक्तदाब नियंत्रणात ठेवा
डायबिटीस प्रमाणेच उच्च रक्तदाब देखील जास्त काळासाठी असेल तर त्याचा विपरीत परिणाम मूत्रपिंडांवर होऊ लागतो. हळू हळू मूत्रपिंडांचे कार्य बिघडू लागते. ज्याचे पर्यवसान किडनी फेल्युअर मध्ये होते. हे टाळण्यासाठी सुरुवातीपासून योग्य ती औषधे घेऊन आणि व्यायाम करून रक्तदाब नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. उच्च रक्तदाब किडनी फेल्युअर बरोबरच हृदयासाठी हानीकारक असतो.
ब्लडप्रेशर वाढतंय? मग आहारात हे बदल करून बघा
३. वजन आटोक्यात ठेवा
स्थूलता हे अनेक आजारांचे मूळ कारण आहे. वजन आटोक्यात असलेल्या व्यक्तींच्या तुलनेने जास्त वजन असणाऱ्या व्यक्ती गंभीर आजारांना जास्त प्रमाणात बळी पडतात. खूप दीर्घ काळ पर्यंत स्थूल असणाऱ्या व्यक्तींमध्ये म्हातारपणी मूत्रपिंडे निकामी होण्याची समस्या आढळून येण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे प्रत्येकाने सुरुवातीपासूनच आपले वजन उंचीच्या प्रमाणात योग्य आहे ना याची काळजी घ्यावी.
वजन कमी करण्यासाठी म्हणजेच वेट लॉस करण्यासाठी पाच साधे सोपे उपाय
४. योग्य आणि पोषक आहार घ्या
मूत्रपिंडांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी योग्य आणि पोषक आहार घेणे आवश्यक आहे. साखरेचे आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असणारा तसेच फायबरचे प्रमाण जास्त असणारा आहार प्रत्येकाने घ्यावा. भरपूर प्रमाणात भाज्या आणि फळे तसेच चांगल्या प्रतीची धान्य आणि कडधान्य आपल्या आहारात असावीत. त्यामुळे मधुमेह आणि हृदयरोग तर आटोक्यात राहतोच शिवाय वजन कमी होण्यास देखील मदत होते. त्यामुळे अर्थातच मूत्रपिंडांचे आरोग्य चांगले राहते.
५. आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवा
जास्त प्रमाणात मीठ खाणे हे हृदय आणि मूत्रपिंडांना हानिकारक आहे. त्यामुळे आहारात मिठाचे प्रमाण कमीत कमी असावे. खारवलेले पदार्थ आणि प्रोसेस्ड फूड खाऊ नये.
६. भरपूर प्रमाणात पाणी प्यावे
भरपूर प्रमाणात पाणी पिणे मूत्रपिंडांच्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहे. डीहायड्रेशन म्हणजेच शरीरातील पाणी कमी होणे असे झाल्यास मूत्रपिंडांना होणारा रक्तपुरवठा कमी होऊन त्यांचे कार्य बिघडू शकते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने त्याच्या शरीराला आवश्यक असणाऱ्या प्रमाणात नियमितपणे पाणी पिणे अतिशय आवश्यक आहे. भरपूर प्रमाणात पाणी पिण्यामुळे लघवीचे प्रमाण वाढून शरीरातील हानीकारक पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.
७. नियंत्रित प्रमाणात मद्यपान करा, शक्यतो करूच नका
चांगल्या आरोग्यासाठी शक्यतो मद्यपान करूच नये. परंतु करायचे झाल्यास ते नियंत्रित प्रमाणात करावे. अतिरिक्त प्रमाणात मद्यपान केल्यास त्याचा लिव्हर आणि किडनी वर विपरीत परिणाम होतो. शरीरातील टॉक्सिन्स वाढतात आणि ते बाहेर टाकण्यासाठी मूत्रपिंडांना अतिरिक्त प्रमाणात काम करावे लागते. तसेच अति मद्यपान करण्यामुळे रक्तदाब वाढणे आणि वजन वाढणे हे धोके देखील असतात. हृदयविकाराचा धोका देखील वाढतो.
८. धूम्रपान करू नका
धुम्रपान करण्यामुळे मूत्रपिंडांना होणारा रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे मूत्रपिंडांना आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. सातत्याने धुम्रपान करणाऱ्या लोकांमध्ये मूत्रपिंडाची संबंधित आजार होण्याचे प्रमाण अतिशय जास्त आहे. धुम्रपान करणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय हानीकारक असून त्याचा सगळ्याच अवयवांवर विपरीत परिणाम होतो.
९. विनाकारण पेन किलर घेणे टाळा
बऱ्याच लोकांना सहज मिळणाऱ्या डोकेदुखी अंगदुखी वरच्या पेन-किलर्स घेण्याची सवय असते. मेडिकल दुकानात सहज मिळणाऱ्या या गोळ्या थोडासा त्रास असताना देखील लोक सहजपणे घेतात. परंतु ह्या गोळ्यांचा मूत्रपिंडांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. अशा पेन-किलर्स मुळे मूत्रपिंडांना होणारा रक्त पुरवठा विस्कळीत होतो आणि त्यांचे कार्य बिघडते. विनाकारण वारंवार पेन किलर घेतल्यास पुढे जाऊन किडनी फेल होण्याची शक्यता बळावते. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच अशा गोळ्यांचे सेवन करावे.
१०. चिंता आणि ताणतणाव दूर ठेवा
सतत चिंता करणे, स्ट्रेस घेणे, तणावात असणे शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने घातक असते. चिंता आणि ताणतणाव प्रयत्नपूर्वक दूर ठेवा. त्यामुळे आपोआपच शरीरातील सर्व अवयवांचे कार्य सुरळीत सुरू राहील आणि मानसिक दृष्ट्या देखील तुम्ही निरोगी आणि सशक्त राहू शकाल. चिंता ाणी ताणतणाव कमी करण्यासाठी नियमित व्यायाम आणि मेडिटेशन करणे उपयुक्त ठरते.
११. नियमित व्यायाम करा
शरीराच्या भरपूर हालचाली होतील अशा पद्धतीचा कोणताही व्यायाम नियमितपणे करणे निरोगी राहण्यासाठी आवश्यक आहे. भरभर चालणे, पळणे, पोहणे, सायकलिंग यापैकी कोणताही व्यायाम नियमित केल्यामुळे वजन आटोक्यात राहणे, चिंता ताण तणाव दूर होणे, डायबिटीस आणि रक्तदाब नियंत्रणात राहणे आणि मूत्रपिंडांचे कार्य सुधारणे हे फायदे होतात. यासाठी प्रत्येकाने दररोज नियमितपणे व्यायाम करणे अतिशय आवश्यक आहे.
तर हे आहेत अगदी सोपे ११ उपाय जे केल्यामुळे आपण आपल्या मूत्रपिंडांचे कार्य सुरळीत ठेवू शकतो. तसेच भविष्यात मूत्रपिंडे निकामी होण्याच्या धोक्यापासून स्वतःला वाचवू शकतो.
तर मित्रांनो, या उपायांचा जरूर वापर करा आणि आपल्या किडनीचे आरोग्य चांगले ठेवा. जर तुम्हाला आपल्याला किडनी संबंधी आजार आहे अशी शंका येत असेल तर ताबडतोब तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. कारण जर किडनी संबंधी विकार लवकर लक्षात आला तर त्यावर योग्य ते उपचार करून आजार बळावणे कमी करता येऊ शकते. प्रदीर्घ आजार देखील लवकर उपचार करून आटोक्यात ठेवता येतात. तसेच किडनी निकामी होण्यापासून वाचवता येते. म्हणून स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वरील उपायांचा अवलंब आणि नियमित तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी जरूर करा. स्वस्थ राहा आनंदी राहा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.