सुपरमार्केट, डिपार्टमेंटल स्टोअर्स अशी पाटी मिरवणाऱ्या दुकानात मी सहसा जात नाही. फोडणीच्या भाताला मेनूकार्डावर फ्राईड राईस किंवा दहीभाताला कर्ड राईस म्हणलं, की त्याची आपुलकीची चव पार बिघडून जाते. त्यातल्या त्यात प्रोव्हिजनल स्टोअर्स हे जरा ठीक वाटतं. अरे ही ‘किराणा’ घराण्याची परंपरा पाळली गेलीच पाहिजे. अशा दुकानांची नावं कशी असायला हवीत, “किराणा व भुसार मालाचे ठोक व किरकोळ व्यापारी.” अशी भारदस्त नावं धारण करणाऱ्या दुकानात शिरलं की, मंदिराच्या गाभाऱ्यात शिरल्यासारखं पवित्र वाटायला लागतं.
भुसार म्हणजे नक्की काय हे मला अजूनपर्यंत समजलेलं नाही. समजून घ्यायची ईच्छाही नाही. किराणा व भुसार ऐकायलाच कसं मस्त वाटतं. जसा तबल्याबरोबर डग्गा असतो, हवा शब्दाबरोबर पाणी येतं, तसं किराणा व भुसार जोडीनंच वावरत असावेत… सदैव. भुसारचा भुसावळशी संबंध नसावा बहुधा. “वाण्याचं दुकान” असं आमची आजी म्हणायची. हा वाणी मात्र मलईदार बासुंदीपेक्षा सुद्धा गोड, अशा मिठास वाणीचा असायचा. असल्या दुकानातला माल अस्सल, ठोक वाजवून घ्यावा असा असेलच, असं काही नाही.
आमच्या नगरला जवळपास सगळी किराण्याची दुकानं मारवाड्यांची नाहीतर सिंधी लोकांची. आम्ही चितळे रोडवरच्या, मामा कोठारींच्या दुकानातून वाणसामान घ्यायचो. सुरेश प्रोव्हिजिनल स्टोअर्समधून. आता ते दुकान बंद होऊन सुद्धा बरीच वर्षे झाली. पण अजूनही माझ्या आठवणींच्या अल्बममध्ये, मला त्या दुकानाचा फोटो स्पष्ट दिसतो.
बाबांबरोबर स्कूटरवरून आम्ही दुकानात जायचो. दुकान चांगलंच मोठं होतं. ऐल शेपमध्ये काऊंटर होता. छोट्या काऊंटरच्या पहिल्या बैठकीवर मामाजी बसायचे. स्वच्छ पांढरी चादर घातलेली बैठक. मागे स्वच्छ पांढरा तक्क्या. मामाजी चांगले सहा फूट ऊंच होते. साठ पासष्ट वयाचे. स्वच्छ पांढरं धोतर. त्यावर स्वच्छ पांढरा ईस्त्रीचा नेहरूशर्ट. डोक्यावर काळी मखमली टोपी. सोनेरी काड्यांचा चष्मा. कानावर एक पेन सदैव चिटकवलेला. समोर काळ्या तुकतुकीत पाॅलीशने चकाकणारे, सागवानी डेस्क. त्यावरच्या लालरंगाच्या खतावण्या. त्यात डोकं खुपसून याद्या आणि हिशोब करणारे मामाजी.
शेजारची बैठक, छोटे सेठसाठी. सेम टू सेम तसाच सरंजाम. छोटेसेठ मात्र शर्ट पँटमध्ये दिसायचे. ते पण तसेच खालमानेने खातेवहीत गुंतलेले असायचे. मग आडव्या काऊंटरवर , मालाच्या पुड्या बांधणारे पाच सहा कामगार. काऊंटरमागे लाकडी कप्प्यात खचाखच भरलेले सामान. हुकाला लोंबकळणारी दोर्याची बंडलं. त्याचं शेवटचं टोक चुकार कारट्यासारखं, कुठंतरीच हुंदडत असायचं. ही कामगार मंडळी एकजात सन्यस्त असायची. सुनील शेट्टीच्या चेहऱ्यावर एकवेळ भावना दाटून येतील, पण यांचा चेहरा सदासर्वदा निर्विकार असायचा. निरिच्छ भावनेनं ती आपली यादीप्रमाणे, कागदाच्या पुड्या करून माल भरत असायची. मध्येच मागे न वळता सुध्दा, दोऱ्याचे ते चुकार टोक खेचून, खाली न बघता पुडीभोवती गुंडाळत असत. ही मंडळी बंद डोळ्यांनी सुद्धा, सुईत दोरा ओवू शकतील अशा तयारीची असत. काउंटरमागच्या लाकडी शेल्फखाली पत्र्याच्या कोठ्या असत. तिरक्या कापलेल्या. त्यात डाळी, शेंगदाणे, गहू, तांदूळ, ज्वारी, साखर,बाजरी काहीबाही भरलेलं असायचं. या कामगारांकडे ते स्टीलचं आडवं कापलेलं हॅन्डलवालं भांडं असायचं. कोठीतल्या धान्यात ते खुपसून, तराजूच्या पारड्यात धान्य पडतानाचा आवाज मनातल्या कानात घर करून रहायचा. मागे गुळाच्या ढेपी असायच्या. शेल्फातून काड्यापेट्या, ऊदबत्त्यांची पाकिटं, चहाचे पुडे, डालडा, निरमा, कपड्याचा साबण, पेस्ट, अंगाचा साबण, बरंच काही रचलेलं असायचं. या सगळ्याचा एक सामुदायिक वास तयार व्हायचा. मधेच ऐखादा फुगीर ऊंदीर, अंगणात फिरल्यासारखा रमतगमत चाललेला दिसायचा. बहुतेक पाळलेला असावा.
दुकानाच्या पायर्या चढून वर गेलं की, मामाजी हसून स्वागत करायचे. मला ते छोटे शेठ म्हणत असत. ही शेटमंडळी गिर्हाईकाला शेट का म्हणतात कुणास ठाऊक ! मामाजींच्या शेजारी सुक्यामेव्याच्या काचेच्या बरण्या असत. त्यात काजू, बदाम, मनुका, अंजीर वगैरे मेवा भरलेला असे. मला ते त्यातनं काजू बदाम काढून देत. दुकानात जाण्याचं माझं मुख्य ऊददेश्य साध्य झालेलं असायचं.
घाबरत घाबरत मी त्यांच्या पांढऱ्या स्वच्छ बैठकीवर, त्यांच्याशेजारी लोडाला टेकून बसतो. मामाजींची मान 360 अंशातून सहज वळत असे. एकाच वेळी आमच्याकडे, खाली वहीत आणि काऊंटरवरच्या कामगाराकडे सहज बघू शकत. आमच्या घरी “मामांची वही” अशा कॅटॅगरीची एक वही असायची. किराणा मालाची यादी त्यात लिहली जाई. दुकानात जाताना ही वही घेऊन जायची. तिथे गेल्यावर मामाजी; त्या यादीप्रमाणे रकमेची नोंद करत. त्यांचं अक्षर बरंचसं मोडीच्या वळणाचं असे. प्रयत्न करून सुद्धा अक्षर लागत नसे. फक्त टोटल विचारून बाबा पैसे देत असत. भाव विचारायचा प्रश्नच नसे. विश्वास हाच एक ‘भाव मनी’ ठेवून आम्ही वाणसामान आणत असू. अर्थात मामाजींनी सुद्धा त्या विश्वासाला कधी तडा जाऊ दिला नाही.
मी अभ्यास फारसा करायचोच नाही. आमची आई म्हणायची, अशाने मामाजींच्या दुकानात पुड्या बांधाव्या लागतील. पण खरंच पुड्या बांधणं खायचं काम नाही. बरीच वर्षे प्रयत्न करून सुद्धा अजूनही मला ते जमलेलं नाही. आता तर प्लॅस्टिक पिशव्यांनी पुड्याचा पार लगदा करून टाकला आहे. मामाजी गेले आणि छोट्या सेठनी दुकान बंद करून टाकलं. सगळी मजाच निघून गेली.
बिग बाजार सारख्या मंडळींनी बाजार मोठा मांडलाय, पण “किराणा घराण्या” च्या आपुलकीचा भुसा करून टाकलाय. पॅकबंद पिशव्यातून, मला अजूनही मामाजी आठवत राहतात. आठवणीचा तोच खुराक घेवून, मी आजकाल किराणा आणतो. पोरींची तर या कुठल्याही गोष्टींशी , काहीच अटॅचमेंट नाहीये. त्यांच्यासाठी तो फक्त “किराणा”माल आहे.
मागच्या वर्षी चिपळूणात हिंडत होतो. बाजारपेठेत लेले अभ्यंकर वगैरे मंडळींची दूकाने दिसली. भरून आलं…. ठरलं तर. नक्की. रिटायरमेंटनंतर मी पण, सदाशिव पेठ पुणे येथे दुकान थाटणार. वरतीच आपला फ्लॅट असणार. नीचे दुकान ऊपर मकान.
आपण गिर्हाईकाशी त्याला डायबेटिस होईपर्यंत गोड बोलणार. दुपारी २ ते ४ सुद्धा दुकान ऊघडं ठेवणार. दुकान धो धो चालवणार. टक्कल पडणार आहे. वाढतं पोट आहे. सोनेरी काड्यांचा चष्मा पण घालू. अंतूशेट व्हायला एवढं पुरेसं आहे.
दुकान आपलंच आहे. तुम्ही या तर खरं. तुमच्या नातवंडांना काजू बदाम खायला घालीन. तुम्हाला शेट म्हणीन. खालनं घंटी वाजवली की वरनं चहाचा कप येईल.. चहा होईपर्यंत माल बांधून होईल. आताशा मला पुड्या बांधकाम चांगलं जमतं.
कुठं काय विचारता?……
‘केळकर आणि मंडळी “
प्रो. प्रा. कौस्तुभ केळकर नगरवाला.😜
किराणा व भुसार मालाचे ठोक व किरकोळ व्यापारी,
पुणे -३०
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
छान, वाचण्यात रमून गेलो.
-कंसू.