वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला होणे ही सध्याची अगदी कॉमन समस्या आहे. खोकला काही वेळेला कफ झाल्यामुळे झालेला असू शकतो तर काही वेळा नुसताच कोरडा खोकला होतो. कोरडा खोकला होण्याचे प्रमुख कारण घशात किंवा फुफ्फुसांमध्ये होणारे इन्फेक्शन हे असते.
फुफ्फुसांमधून हवा जोराने बाहेर ढकलली जात असताना होणारा आवाज म्हणजे खोकला. घशातून तोंडाद्वारे ही हवा जोराने बाहेर फेकली जाते आणि कोरडा खोकला येतो. कोरड्या खोकल्यामुळे घशाला आणि तोंडाला इरिटेशन होते. घशात खवखव होते तसेच घशाला सूज येते.
सर्दी किंवा फ्लूमुळे कोरडा खोकला होऊ शकतो. यावर वेळीच उपाय केला नाही तर ही समस्या गंभीर स्वरूप धरण करू शकते.
आज आपण कोरड्या खोकल्यावर करण्याचे घरगुती उपाय जाणून घेऊया
१. मध
मध हा कोरड्या खोकल्यावरील सर्वोत्तम उपाय आहे. मधामध्ये अँटी बॅक्टेरियल तत्त्वे असतात ज्यामुळे कोरडा खोकला निर्माण करणारे बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होते. त्याच प्रमाणे मधामध्ये एंटीऑक्सीडेंट तत्वे असतात ज्यामुळे घशाची सूज कमी होणे आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढणे हे फायदे होतात.
कोरड्या खोकल्यासाठी मध कशाप्रकारे वापरावा?
साहित्य
- मध – १ चमचा
- आल्याचा रस – १ चमचा
- डाळिंबाचा रस – १ चमचा
कृती
वरील तीनही गोष्टी नीट मिसळून घ्या. दिवसातून तीन वेळा एक एक चमचा हे मिश्रण सेवन करा. कोरड्या खोकल्यावर अतिशय प्रभावशाली आहे. त्याशिवाय गरम पाणी अथवा हर्बल चहा मधून मधाचे सेवन करणे देखील गुणकारी ठरते. लहान मुले तसेच प्रौढ व्यक्ती यांच्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे. परंतु दोन वर्षे वयापेक्षा लहान मुलांना मध चाटवताना काळजीपूर्वक द्यावा.
२. तुळस
तुळशीच्या पानांमध्ये देखील अँटिबॅक्टेरीयल आणि अँटिऑक्सिडंट तत्वे असतात. त्यामुळे कोरडा खोकला निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांच्या वाढीवर परिणाम होतो तसेच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढून खोकला कमी होण्यास मदत होते.
साहित्य
१. तुळशीची मूठभर पाने
कृती
- तुळशीची मूठभर पाने पाण्यात उकळवून त्या पाण्याचे सेवन करावे.
- तुळशीची पाने स्वच्छ धुऊन चावून खाल्ल्याने देखील फरक पडतो.
- तसेच तुळशीची पाने पाण्यात उकळवून त्या पाण्याची वाफ घेणे देखील फायदेशीर ठरते.
३. वाफारा घेणे
कोरडा खोकला कमी होण्यासाठी वाफारा घेणे हा सुद्धा एक फायदेशीर उपाय आहे. वाफारा घेतल्यामुळे घसा आणि श्वसन मार्गाचे इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते. घशाला सूज आलेली असेल तर ती सूज देखील कमी होते आणि घशात किंवा श्वसन मार्गात कफ अडकला असेल तर वाफारा घेण्यामुळे तो कफ मोकळा होऊन पडून जातो.
वाफारा घेण्याचे फायदे वाढवण्यासाठी वाफाऱ्याच्या पाण्यामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म वाढवणारे तेल किंवा औषध घालता येऊ शकेल. निलगिरी तेल, टी ट्री ऑइल किंवा सारखे औषध यांचा उपयोग होतो.
वाफारा कसा घ्यावा?
१. एका मोठ्या पातेल्यात पाणी भरून घेऊन ते तापण्यास ठेवावे.
२. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये औषधी तेलाचे पाच ते सात थेंब घालावेत.
३. पाणी चमच्याने नीट हलवून घ्यावे.
४. पातेले गॅसवरून उतरवून काळजीपूर्वक सुरक्षित ठिकाणी ठेवावे.
५. वाफ घेणाऱ्या व्यक्तीने आपले डोके मोठ्या टॉवेलने झाकून पातेल्यावर झूकून वाफ घ्यावी.
६. सलग सहन होईल तितपत वाफारा घ्यावा. एकूण दहा ते पंधरा मिनिटे वाफारा घ्यावा.
७. असे दिवसातून किमान तीन ते चार वेळा करावे.
८. गरम पाण्याने आंघोळ करणे देखील खोकल्यासाठी उपयोगी आहे.
४. मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे
मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे हा कोरड्या खोकल्यावरचा अगदी सोपा आणि सहज करता येण्याजोगा उपाय आहे. कोमट पाण्याने गुळण्या केल्यामुळे घसा दुखणे कमी होते, खोकून खोकून दुखावलेला घसा पूर्ववत होण्यास मदत होते तसेच घशाची खवखव कमी होते.
मिठाच्या पाण्याने गुळण्या कशा कराव्यात?
साहित्य
- एक चमचा मीठ
- एक कप कोमट पाणी
कृती
एक पाण्यात एक चमचा मीठ घालून नीट विरघळवून घ्यावे. त्यानंतर ते पाणी कोमट करून घ्यावे. अशा पाण्याने दररोज किमान तीन ते चार वेळा गुळण्या कराव्या. असे करण्यामुळे दुखणाऱ्या घशाला खूप आराम मिळून कोरडा खोकला कमी होतो.
५. आले
कोरड्या खोकल्यावर आले खूप गुणकारी आहे. आल्यामध्ये एक्सपेक्टोरंट असल्यामुळे ते श्वासनलिकेची सूज कमी करण्यास तसेच श्वासनलिका आकुंचन पावली असेल तर ती योग्य स्थितीत येण्यास मदत करते. आल्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती असल्यामुळे वारंवार येणारा खोकला कमी होण्यास मदत होते.
आल्याचे सेवन कसे करावे?
साहित्य
- आल्याचा एक इंच तुकडा
- एका भांड्यात पाणी
कृती
आल्याचा एक इंचाचा तुकडा किसून एक कप पाण्यात मिसळावा. ते पाणी अर्धा कप होईपर्यंत उकळून घ्यावे. त्यानंतर ते पाणी गाळून घेऊन थोडे गरम असतानाच प्यावे. असे दिवसातून तीन ते चार वेळा करावे. आले असताना सदर पाण्यात पुदिन्याची मूठभर पाने घातली तरी फायदेशीर होऊ शकते. पाने आधी धुऊन घ्यावीत आणि उकळलेले पाणी गाळून प्यावे.
६. जेष्ठमध
जेष्ठमध कशासाठी अत्यंत गुणकारी असून कोरड्या खोकल्यामुळे दुखणाऱ्या घशाला आराम देण्याचे काम ते करते. त्याच प्रमाणे घशाला आलेली सूज, किंवा खोकल्यामुळे घशावर आलेला ताण कमी करण्यास ज्येष्ठमधाची मदत होते. घशाची सूज, खवखव आणि जळजळ ज्येष्ठमधाच्या सेवनाने कमी होते.
ज्येष्ठमधाचे सेवन कसे करावे?
साहित्य
- ज्येष्ठमधाचा तुकडा
- एक कप गरम पाणी
कृती
ज्येष्ठमधाचा तुकडा एक कप पाण्यात घालून ते पाणी झाकण ठेवून उकळावे. पाणी उकळून अर्धा कप झाले की गाळून घेऊन त्याचे सेवन करावे. असे दिवसातून किमान दोन वेळा करावे.
ज्येष्ठमधाच्या तुकड्या ऐवजी ज्येष्ठमधाची तयार पावडर देखील वापरता येऊ शकेल. अशी पावडर गरम पाण्यात घालून तिचे सेवन करता येईल. त्याच प्रमाणे एक चमचा मधात मिसळून देखील अशा पावडरचे सेवन करता येईल. दोन्ही प्रकार सारखेच गुणकारी आहेत.
७. पुदिना
पुदिन्यामध्ये असणाऱ्याया मेंथोल या घटकामुळे पुदिन्याचे सेवन घशाला थंडावा देते. वारंवार खोकला आल्यामुळे दुखणाऱ्या घशाला पुदिन्याच्या सेवनामुळे आराम मिळतो.
पुदिन्याचे सेवन कसे करावे?
पुदिन्याचे सेवन दोन तीन प्रकारे करता येऊ शकेल.
- पुदिन्याची मूठभर पाने स्वच्छ धुऊन पाण्यात उकळवून गाळून त्या पाण्याचे सेवन करावे.
- पुदिन्याची पाने उकळलेल्या पाण्याचा वाफारा घेणे सुद्धा खोकल्यावर फायदेशीर आहे.
- वाफारा घेण्यासाठी गरम पाण्यात पुदिन्याच्या तेलाचे काही थेंब घातले तरी खूप फायदा होतो.
८. खोकला वाढवणार्या पदार्थांपासून दूर राहा
कोरडा खोकला झालेला असताना खोकला झालेल्या पदार्थांपासून दूर राहावे. खोकला जाईपर्यंत खाण्याचे पथ्य पाळावे. तेलकट किंवा मसालेदार पदार्थ खाऊ नयेत.
धूम्रपान खोकल्यास उद्युक्त करते. त्यामुळे स्वतः धूम्रपान करू नये. तसेच कोणी धुम्रपान करत असेल तर त्या ठिकाणी थांबू नये.
धुळ, धूर आणि प्रदूषण यापासून स्वतःचा बचाव करावा. वारंवार बाहेर जावे लागत असेल तर चेहरा विशेषतः नाक स्कार्फने झाकून घ्यावे.
तर हे आहेत कोरड्या खोकल्यावर अत्यंत गुणकारी ठरणारे काही घरगुती उपाय. या उपायांव्यतिरिक्त घरातील वातावरण कोरडे ठेवणे, आवश्यकता भासल्यास हळद घालून गरम दूध पिणे हे उपाय देखील करता येतात.
तर मित्र मैत्रिणींनो, लेखात सांगितलेल्या उपायांचा अवश्य वापर करा आणि तुम्हाला आलेले अनुभव आम्हाला कमेंट करून सांगा. तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा लेख शेयर करायला विसरू नका.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.