” ऐ, ऐ, ऐ रित्या…!! तुझी आयटम आली बघ.” समोरून सीमाला येताना पाहून समीरने रितेशला खुणवले.
” ए सम्या, वहीनी आहे तुझी, ईज्जत से नाम लेने का. समझा क्या..!!”
सीमा त्याच्या समोरून जात असताना रितेशने ‘बन जा तु मेरी रानी’ हे गाणं मोबाईल मधे लावलं. सीमाने त्याच्याकडे ढंकुनही पाहीलं नाही आणि तशीच ती पुढे गेली.
रितेश, त्याचा मित्र समीर आणि अजून चार-पाच टाळकी नेहमीप्रमाणे कॉलेजच्या कट्ट्यावर टाईमपास करत बसली होती.
‘रितेश..!!’ म्हणजे, ‘हवा करणारा रित्या, राडा घालणारा रित्या, आईचा लाडका डीग्या’, अशी फेसबुकवर कँप्शन असलेला Popular छावा आणि अप्पर मिडल क्लास मधला मुलगा. वडील ईरिगेशन डीपार्टमेंट मधे सिनियर ऑफिसर त्यामुळे घरावर लक्ष्मीची चांगलीच कृपा होती.
रितेश घरातला एकदम लाडात वाढलेला मुलगा. लहानपणा पासूनच त्याला हवी ती गोष्ट मिळत गेली. कशीबशी त्याने बारावी ऊरकली आणि वडीलांनी त्याला मॅनेजमेंट कोटा मधून इंजीनिअरिंग कॉलेज मधे ऍडमिशन घेऊन दिले.
शेवटी व्हायचं तेच झालं सहा वर्षे झाली तरी रितेश आत्ताशी कॉलेजच्या तिसऱ्या वर्षाला होता. कायम कट्ट्यावर बसणं, आयटमगीरी करत फिरणं, धतींग करणं, हे नित्त्याचंच झालं होतं. त्यात मधल्या काळात त्याने वडीलांच्या मागे लागून तीन महीन्यांपुर्वीच जुनी पल्सर सोडून नवी कोरी ‘Duke’ घेतली. तेव्हापासून तर साहेबांची सवारी कायम हवेतच असायची.
साधारणत: सहा महीन्यांपुर्वी रितेशने ‘सीमा’ला कॉलेजच्या फंक्शनमधे पाहीलं. पाहताच क्षणी त्याला ती जाम आवडली. त्याने मनाशीच ठरवलं, “बास, आता हीच..!!’
असं नाही की रितेशची यापुर्वी कोणी गर्लफ्रेंड वगैरे नव्हती, पण त्याचा आता हीच्यातच जीव अडकला होता आणि आता त्याला ‘ती’ लाईफ टाईम साठी हवी होती. तिला पाहील्या पासून रितेश सीमाला कंटीन्यू फोलो करू लागला. तिच्याबाबतीची सगळी इन्फॉर्मशन त्याने गोळा केली. तिच्याशी बोलण्यासाठी तो कायम तीला अप्रोच करू लागला, पण सीमा होती की त्याला आजिबात भाव देत नव्हती आणि त्याचे मित्र होते की, “भावा, ती तुलाच पाहते.” असं म्हणून त्याला चढवायचे आणि हा पण हरभऱ्याच्या झाडावर लगेच चढायचा. तसं रितेशने सीमाला २-३ वेळा प्रपोज करायचा प्रयत्न केला होता, पण त्याचे ते सगळे प्रयत्न फ्लॉप गेले होते.
‘सीमा’, वडीलांची लाडकी, सिन्सीयर, अँम्बीशियस, सर्वांना कायम मदत करणारी आणि मनमोकळ्या स्वभावाची मुलगी. दिसायला इतकी मोहक होती की कोणीही तिच्या सहज प्रेमात पडेल. पण सीमाला या गोष्टींमधे सध्या तरी काहीच इंटरेस्ट नव्हता, त्यामुळे तिला माहीती असुन सुद्धा ती प्रकर्षाणाने रितेशला अव्हॉइड करत होती, कारण तिच्या मनामधे रितेशविषयी प्रचंड चीड होती.
“बंर, वैनी तर गेल्या, आज के दिन का अजेंडा पूरा हुआ, चला आता घर गाठू” सीमा गेल्यानंतर समीर रितेशला बोलला. दोघेजण Duke वर मग हवा करत रितेशच्या घरी पोहचले.
“या राजे, स्वागत आहे आपलं” असं म्हणत रितेशची बहीण राधिकाने दार उघडलं.
‘राधिका’ रितेशची छोटी बहीण. अकरावीच्या वर्गात शिकणारी, एकदम चुनचुनीत मुलगी. डान्स चं खुप वेड असणारी वर खुप जीव लावणारी आणि कायम त्याची बाजू घेणारी.
“चूप कर पगली, अब रूलायेगी क्या!!” राधिकाच्या डोक्यावर टपली मारत रितेश आणि समीर आत शिरले.
“आई, जेवायला वाढ गं.” असं म्हणत दोघे डायनिंग टेबलवर बसले.
“डीगु, किती केस वाढवले आहेस रे तू? व्यवस्थित रहायचं. चांगला अभ्यास करून पास व्हायचं. उगीच काय वाईट मित्रांच्या संगतीत राहतोस.”
रितेशची आई समीरकडे तिरक्या डोळ्याने पाहत म्हणाली.
तसं समीर रितेशच्या कानात हळूच बोलला, “बिचाऱ्या काकू, त्यांना काय माहीती आहे, ईकडे तर गंगाधरच शक्तीमान आहे!!” त्याच्या या जोकवर दोघे हसले आणि जेवण ऊरकून बेडरूम मधे आले.
“बरं रित्या काय ठरवलं आहेस तु?”
“कशाबद्दल??”
“अरे येड्या सीमाबद्दल!!”
“ठरवायचं काय आहे त्यात…”
“उद्या प्रपोज मारून टाक की.”
“उद्या??, काय विशेष” रितेश समीरकडे चमकून पाहत बोलला.
“भावा, विसरलास लेका तु. उद्या तुझा वाढदिवस आहे की…” समीर बोलला.
“हो यार, विसरलोच की मी, पण उद्याच का प्रपोज करू मी तिला.” रितेश बोलला.
“अरे बड्डे दिवशी जरा Soft Corner मिळतो, काम बन जाता है प्यारे!!” समीर एक भुवई उडवत बोलला. दोघं मिळून मग उद्याच्या दिवसाची प्लानिंग करत बसले.
दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे रितेशने एकदम स्टाईल मधे कॉलेजच्या गेटमधून आपल्या Duke बाईकवरून एन्ट्री केली. मस्तपैकी फेशीअल केलेला चेहरा, स्पाईक हेअर स्टाईल, अंगावर लेदरचं Jacket, Fastrack चा Goggle, असा एकंदरीत गेट-अप करून रितेश कॉलेजला आला.
कट्ट्यावर त्याची Gang केक घेऊन रितेशची वाटच पाहत बसलेली होती.
“आधीच सांगतो, तोंडाला आजिबात केक नाही लावायचा. ज्याने लावला, त्याने कुत्र्यागत मार खाल्ला म्हणून समजायचं.” रितेशने एका दमात सगळं बोलून टाकलं.
रितेशच्या बोलण्यानंतर सगळेजन ‘आ’ वासून त्याच्याकडे पाहू लागले.
“अर्रे, भाईचा आज स्पेशल दिवस आहे, त्यामुळे सगळे Co-Operate करा रे” समीरने वातावरण थंड करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
सगळ्यांनी मग नंतर शिस्तीत केक कापला आणि Canteen मधे जाऊन मनसोक्त नाश्ता केला. बील अर्थातच रितेशने Pay केले.
“असं समजु नको की ही तुझ्या बड्डेची पार्टी होती म्हणून, अभी तो बस शुरवात हैं.” विलास रितेशच्या खांद्यावर हात टाकून बोलला.
“बस क्या… कर दी ना छोटी वाली बात. बघुया ना रात्री, कोण लवकर दमतंय ते.” रितेश उलटा हात विलासच्या खांद्यावर टाकुन बोलला आणि दोघे हसू लागले.
सगळे परत कॉलेजच्या कट्ट्यावर आले आणि यांच्या टिंगल टवाळ्या परत सुरू झाल्या. पण आज मात्र रितेशचं लक्ष मित्रांच्या जोक्सवर नव्हतं. कधी एकदाची कॉलेजची रिसेस होतीये आणि कधी आपण सीमाला भेटतोय असं झालं होतं त्याला. शेवटी कॉलेजचा रिसेस ब्रेक झाला आणि रितेशची घालमेल सुरू झाली. त्याची नजर भीरभीर करत सीमालाच शोधत होती. शेवटी त्याला समोरून सीमा येताना दिसली. रितेशने आपल्या Sack मधे ठेवलेला गुलाबांचा बुके काढला आणि तो सीमाच्या दिशेने चालू लागला. सीमाने त्याला आपल्या दिशेने येताना पाहीले तरी पण तिने त्याला न पाहील्या सारखे केले आणि ती चालू लागली.
“Hi..!! ” रितेश तिच्या समोर आला आणि बोलला. सीमाने त्याच्याकडे पाहूनही न पाहील्यासारखे केले आणि ती तशीच पुढे चालू लागली.
तरीपण रितेेशने तिला गाठले आणि तिचा रस्ता अडवून तिला बोलू लागला, “Hi सीमा. माझं नाव रितेश. मला तुला काहीतरी सांगायचं आहे.”
“माझा रस्ता सोड.” सीमा त्याच्याकडे न पाहताच बोलली.
“आज माझा Birthday आहे सीमा!!” रितेश बोलला.
“मग?” सीमाने त्याच्या डोळ्यात पाहून बोलली.
दोघांची नजरा नजर झाली तसा रितेश गबडला आणि स्वत:ला सावरून परत बोलला,……”मग मला विश कर ना.”
“हे बघ रितेश, मला कॉलेजला येऊन दोन वर्ष झाली आहेत, त्यामुळे मला चांगलंच माहीती आहे कोण कसं आहे ते आणि कोणाला काय बोलायचं ते. सो प्लिज तु तुझा आणि माझा टाईम वेस्ट नको करूस.” सीमा रितेशला समजवण्याच्या स्वरात बोलली आणि जावू लागली, तसं रितेशने तिचं मनगट आपल्या हाताने पकडलं, तिला किंचीतसं स्वत:कडे खेचलं आणि तिच्यासमोर बुके धरून तो बोलला, “आय रियली लाईक यू, सीमा.”
अचानक झालेल्या या प्रकाराने सीमा भांबावली. तिने आजुबाजूला पाहीले तर तिच्या मैत्रिणी व कॉलेजची इतर मुले त्यांच्याकडे पाहत होती. तिला खूप Awkward फिल झालं. तिने हात झिडकारला आणि फाड करून रितेशच्या कनशीलात वाजवली आणि, “गो टू हेल!!” असं जोरात ओरडून निघून गेली.
ईकडे रितेश सुन्न होऊन उभा होता. सगळं कॉलेज त्याला पाहत होतं. काहीजण हसत होते, काहीजण आश्चर्याने पाहत होते तर कट्ट्यावरची पोरं कावरी-बावरी होऊन त्याला पाहत होती. रितेशच्या हातातुन बुके तिथेच खाली पडला. तो तसाच मान खाली घालून बाईक सुरू करून घरी गेला आणि बेडरूम मधे जाऊन धूमसत बसला. कितीतरी वेळ त्याचा मोबाईल इनकमिंग Calls ने वाजत राहीला पण त्याने कोणाचाच फोन उचलला नाही. रात्री कोणाशीही काहीही न बोलता तो निमुटपने जेवून परत बेडरूम मधे येवून पडला अन् कधी त्याचा डोळा लागला त्याला पण समजलं नाही.
“ए दादा ऊठ ना, ए दाद्या…!!” रितेशची झोपमोड झाली. त्याने पाहीलं तर राधिका त्याला उठवत होती.
“ए राधे, झोपू दे ना…”
“दादा ऊठ ना, आज आमचं डान्सचं फुल डे Workshop आहे आणि ते तुझ्या कॉलेजच्या रोडलाच आहे. मला सोड ना तिकडे.” राधिका विनवणी करत बोलली.
कॉलेजचं नाव ऐकताच रितेशला कालचा प्रसंग आठवला. तसा तो बोलला, “माझं डोकं जाम दुखतंय राधे. आज मी नाही कॉलेजला जाणार. तु एक काम कर शेजारच्या आर्चीबरोबर जा. तिचा पण क्लास तिकडेच आहे.”
“खडूस” राधिका रागाने बोलली.
“पण माझं Workshop संपल्यानंतर मला पिक करायचं.”
“हो” रितेश कसंबसं बोलला.
“Promise?? ” राधिका बोलली.
“हो गं माझी आई.” रितेश वैतागून बोलला.
“ओके, मी Call करेन तुला सुटले की.” असं म्हणून राधिका तिच्या तयारीला लागली.
रितेश तसाच कितीतरी वेळ बेडवर लोळत पडला. शेवटी कंटाळून त्याने मोबाईल पाहीला. खूप सारे Missed calls पडले होते. त्यापैकी त्याने एका नंबरला call लावला, “सम्या, तासाभरात अड्ड्यावर ये.”
त्याने घड्याळात पाहीले तर सव्वाबारा वाजले होते, “काय योगायोग आहे, माझे पण ईकडे बाराच वाजले आहेत.” असं मनाशी बोलून तो हलकाच हसला आणि आवरू लागला.
साधारणत: दीडच्या सुमारास तो ‘शांती बिअर बार’ मधे पोचला. समीर त्याची वाटच पाहत होता. काहीच न बोलता दोघे टेबलपाशी बसले. ‘ट्युबर्ग’ची एक-एक बाटली संपेपर्यंत कोणच कोणाशी बोललं नाही. बाटलीचा शेवटचा घोट संपल्यानंतर रितेश बोलला, “सालीने ईज्जतीचा पुर्ण फालुदा केला. वर्स्ट बड्डे Of माय लाईफ.”
रितेशने ग्लास टेबलवर जोरात आपटला. आवाज ऐकून बाकीचे लोक त्यांच्याकडे पाहू लागले. पण रितेशला त्याची काही पर्वा नव्हती. रागाने त्याचे डोळे लाल झाले होते. त्याचा अवतार पाहून समीर बोलला, “भावा टेन्शन Not, मी तिचा नंबर मिळवला आहे, थांब तिला फोन करून शिव्या घलतो. साली कमीनी.”
समीर तिचा नंबर डायल करतो, पण त्या बार मधे त्याच्या सिम कार्डला रेंजच मिळत नाही. “साला रेंजच नाहीये, तुझा फोनला आहे का?” समीर रितेशला विचारतो, अन् रितेश फक्त नकारार्थी मान हलवतो.
“आररर ऐ आण्णा, कसला भिकारचोट बार आहे हा तुझा, साला रेंज पण नाहीये…!!” समीर बार मालकावर ओरडतो पण पलीकडून काही Response मिळत नाही मग तो तसाच गप्प बसतो.
संध्याकाळ होईपर्यंत दोघेजण बोटल वर बोटल रिचवतात, मनसोक्त सीमाची आई-बहीण एक करतात. तिची कशी वाट लावायची याची प्लानिंग बनवतात. पोटभर जेवण केल्यानंतर दोघे बारच्या बाहेर पडतात आणि घराच्या दिशेला कूच करतात.
दोघेजण आपल्या गप्पांमधे मग्शुल होऊन घराच्या दिशेने चाललेले असतात तोच रितेशची नजर समोर चाललेल्या Pleasure वर पडते……..”MH12 BR1556″
“ब्र… ही तर सीमाची Scooty आहे, पण ही आपल्या Route ला कशी??”
रितेशच्या आवाजाने समीरपण दचकुन पाहतो.
“हो यार, हेल्मेटपण आहे. रित्या, सीमाच आहे ती १०० टक्के.”
“थांब सालीला आता धडाच शिकवतो जन्मभराचा…!!” रितेशच्या बोलण्यात द्वेश होता. काल घडलेला सगळा प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर नाचत होता.
“रित्या दमाने जरा, मागे पण कोणीतरी बसलं आहे.” सीमाच्या मागे एक मुलगी तोंडाला स्टोल बांधून बसली होती, तिला पाहून समीर काळजीच्या स्वरात बोलला.
“व्हू केअर्स!!” असं म्हणत रितेशने Duke ची मुठ जोरात पिळली. सेकंदात गाडी १००-११० च्या स्पीडला गेली. रितेशने गाडी सीमाच्या स्कूटीच्या एकदम जवळ नेवून तिला ‘कट’ मारला आणि क्षणात तो वाऱ्यासारखा पुढे गेला. मगे काय घडलं हे त्याने मागे वळूनसुद्धा त्याने पाहीलं नाही.
रितेश समीरच्या घरापाशी पोहचतो ना पोहचतो तोच त्याला त्याच्या आईचा फोन आला आणि फोनवर आई जे काही बोलली ते ऐकून त्याच्या पाया खालची जमीनच सरकली. काही मिनीटातच तो भास्कर Hospital ला पोहचला. समोरचं द्रुश्य पाहून रितेशच्या डोळ्यासमोर अंधारीच आली आणि तो जाग्यावरच कोसळला.
******———********——–*******
(Flash back)
राधिकाचे डान्स Workshop संपले होते. घरी जाण्यासाठी तिने दादाला Call लावला तर दादाचा फोन Out of coverage लागला. तिने खूप वेळा ट्राय केला पण काही उपयोग झाला नाही. “दादा काही सुधारणार नाही.” असा मनोमन विचार करत ती बाहेर रिक्षासाठी आली, पण तिला समजलं की आज तर रिक्षाचा संप आहे.
“अरे देवा आता कसं करू मी, अंधार पण पडायला लागला आहे, बस तरी आता कधी येणार कोणास ठाऊक, शी!! काय वैताग आहे डोक्याला.” असा मनोमन विचार करत राधिका येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांकडे पाहत ऊभी राहीली.
अचानक समोरून तिला एक स्कूटी येताना दिसली, जस्ट लिफ्ट साठी राधिकाने हात पुढे केला आणि ते पाहून सीमाने स्कूटी थांबवली. “ताई, मला शनिवार चौकापर्यंत सोडशील का प्लीज.” राधिका बोलली.
“हो बैस ना, मी पण त्याच एरियामधे चालली आहे आज” असं म्हणत सीमाने राधिकाला मागे बसवलं आणि गप्पा मारत त्या दोघी पुढे जाऊ लागल्या.
सीमाला शनिवार चौकात पोहचायला काही अवकाश असतो तोच मागून अचानक एक बाईक जोराच्या स्पीडने येते आणि सीमाला एकदम जवळून ‘कट’ मारून जाते. एकदम झालेल्या या प्रकाराने सीमाचे गाडीवरचे नियंत्रण सुटते आणि गाडी जागीच स्लीप होते.
सीमाचे हात अन् पाय गंभीररित्या सोलपाटून निघतात पण हेल्मेट असल्यामुळे ती बालंबाल बचावते. अचानक तिचं लक्ष राधिका कडे जातं, पाहते तर काय राधिकाचं डोकं दगडावर आपटून तिचा कपाळमोक्ष झालेला असतो रक्ताचा सडा रस्त्यावर पसरलेला असतो आणि लोकांची गर्दी त्यांना मदत करण्यासाठी जमा झालेली असते.
(काल्पनिक विचारांवर आधारित)
वाचण्यासारखे आणखी काही…..
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.