विचारसरणी आणि त्यातील वाद हा काही नवीन नाही. माणसाची भांडणे हि कदाचित माणसाइतकीच पुरातन असतील! सध्याही विचारसरणीचा हा संघर्ष उफाळून वर आला आहे. नालासोपारा, पुणे, सोलापूर, मुंबई आदी ठिकाणी घातपात, दहशतवादी कृत्ये करणार असल्याच्या संशयावरून काही उजव्या विचारसरणीच्या लोकांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांचे धागेदोरे डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, एम. एस. कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्येपर्यंत पोहचत असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती आल्याने देशभरात खळबळ उडाली. याच दरम्यान नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून डाव्या बुद्धिवंत वर्गातील काही जणांना अटक करण्यात आली.
कोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराचा पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेशी संबंध आहे. तसेच, या हिंसाचारामागे नक्षलवाद्यांशी संबंध असलेल्या कार्यकर्त्यांचा हात असल्याच्या संशयावरून हि कारवाई करण्यात आल्याचे पोलीस सांगत आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणीच्या संशयितांना पोलीस कोठडीत ठेवण्याची मागणी फेटाळून लावत नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला. खरेतर या दोंन्ही पोलीस कारवाया असल्याने त्यावर भाष्य, किंवा त्याची तुलना करणे गैर आहे. परंतु उजव्या विचारांशी संबधीत लोकांवर कारवाया सुरु असतानाच डाव्या विचारवंतांवरील कारवाईची टायमिंग साधल्या गेल्याने त्यावर अनेक प्रश्न उपस्थित केल्या जात आहेत. व त्यातुन डाव्या व उजव्या विचारांमधील टोकाचा संघर्ष चर्चेत आला आहे. त्यामुळे तपास यंत्रणांची जबाबदारी वाढली असून, या दोन्ही प्रकरणात न्यायाची बूज राखून पारदर्शक कारवाई करण्याची गरज आहे. या दोन्ही कारवायांवर डाव्या आणि उजव्या विचारांच्या पलीकडे असणाऱ्या सर्व सामान्य जनतेचा विश्वास बसणे सामाजिक स्वास्थ्यासाठी जरुरीचे आहे.
गेल्या जानेवारीत कोरेगाव भीमा युद्धाला दोनशे वर्षे पूर्ण होत असताना पुण्यात पुरोगामी संघटनांनी एल्गार परिषदेचे आयोजन केले होते. त्यानंतर एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा याठिकाणी असलेल्या स्मृतिस्तंभाजवळ मोठी दंगल भडकली आणि हिंसाचार झाला होता. या हिंसाचाराचा कट माओवादी गटांनी रचला असून त्याचा संबंध एल्गार परिषेदेशी असल्याचा संशय पुणे पोलिसांना आहे. त्यावरून पोलिसांनी मुंबई, दिल्ली, रांची, गोवा आणि हैदराबादेत डाव्या विचारसरणीच्या काही लोकांच्या घरावर छापे टाकले. या छाप्यांमध्ये सुधा भारद्वाज, वरवरा राव, वर्नोन गोन्साल्वीस, अरुण परेरा व गौतम नवलखा याना नक्षलींशी संबंध असल्याच्या आरोपात अटक करण्यात आली. त्यांच्या घरातून लॅपटॉप, मोबाईल आणि काही वैयक्तिक कागदपत्रे देखील जप्त करण्यात आली आहेत. यात अधिक गंभीर बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचे पुरावेही या तपासात समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणें आहे. त्यामुळे निश्चितच हे प्रकरण आता नुसते भीमा कोरेगावपुरते मर्यादित राहिले नसून ते राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने देखील महत्वाचे बनले आहे.
परंतु डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी व पत्रकार गौरी लंकेश या विचारवंतांच्या हत्याप्रकरणात हिंदुत्ववादी संघटनांशी संबंध असलेल्या काहींना अलीकडेच अटक झाली होती. तत्पूर्वी त्यांच्यावरील छाप्यांमध्ये स्फोटके, बाँब, शस्त्रे सापडल्याने डाव्या विचारवंतांवरील कारवाईच्या टायमिंगवर प्रश्नचिन्ह लावल्या जात आहे. सदर कारवाई सूडबुद्धीची, दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी केली जात असल्याचा आरोप केला जातोय. अर्थात, यात तथ्य किती? यावर भाष्य करणे संयुक्तिक ठरणार नाही. परंतु, या आरोपांमुळे जे संशयाचे ढग निर्माण होऊ लागले आहेत, ते मात्र दूर केल्या जायला हवेत. कारण अशा प्रकारची आजवरची प्रकरणे आणि तपास यंत्रणांची भूमिका बघितली तर हा संशय बिनबुडाचा आहे, असे म्हणायला मन धजावत नाही.
मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणात दहशतवादविरोधी पथकाच्या तपासावरच नंतर राष्ट्रीय तपास संस्थेने फेरलेले पाणी, आणि सरकारी वकिलांनी केंद्र सरकारच्या दबावाबाबत केलेला जाहीर खुलासा. इतरही प्रकरणातील तपास यंत्रणांची भूमिका आदी बाबींमुळे असा संशय निर्माण होणे सहाजिक आहे. त्यामुळे, कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी माओवाद्यांचा तपास होत असेल, तर त्यात चुकीचे काही नाही; परंतु त्याचवेळी संभाजी भिडे आणि अन्यांचीही नावे या प्रकरणाशी जोडली असताना त्याची दखल घेतली जात नसल्याने, संशय घ्यायला जागा राहते. ज्या एफआयआरच्या आधारे कारवाई केली, त्यात या ५ जणांची नावे नसल्याचे समोर आले आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने या विचारवंतांच्या पोलीस कोठडीला विरोध दर्शविल्याने पोलिसांकडे खरंच सबळ पुरावे आहेत का? असाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय. त्यामुळे हा संशय दूर होणे गरजेचे आहे.
हिंसाचार वा कट्टरतावाद, मग तो डावा असो कि उजवा; हा देश व समाज यासाठी घातकच. त्याचाबंदोबस्त केलाचा गेला पाहिजे. परंतु सध्याच्या काळात कडवेपणाचे समर्थन करण्याचा चुकीचा पायंडा सुरु झाला आहे. डाव्याना अटक झाली, की दडपशाहीचा आरोप केला जातो. आणि उजव्यांना पकडले कि, हिंदूंच्या विरोधातील कट असल्याची ओरड केली जाते. आतातर या समर्थनाचा कहर च केला जातोय. शस्त्रसाठा बाळगल्याच्या गंभीर प्रकरणात आरोपी असणाऱ्या वैभव राऊतच्या समर्थनासाठी नालासोपाऱ्यात मोर्चा काढून त्याचे समर्थन करण्यात आले. आरोपी देशविरोधी, समाजात तेढ निर्माण करणारी कृत्ये करण्याच्या तयारीत होते, असं पोलिस सांगत असताना त्यांचं समर्थन करायला लोक पुढे येतातच कसे ? हा कोणत्याही न्यायप्रिय व्यक्तीला बेचैन करणारा सवाल आहे. अशा प्राश्वभूमीवर नागरिकांनी सावध राहिले पाहिजे. देशभरातील अनेक शहरात डाव्या- उजव्या विचारसरणीचे जे लोक पकडल्या गेले, त्यांच्यावर जे आरोप केल्या गेले ते जर सत्य असतील, तर या देशाला सगळ्यात जास्त धोका कट्टरवादापासून असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे ना ‘डावे’, ना ‘उजवे’, फक्त समाजाच्या हितासाठी झटणारे ‘काजवे’ आज आपल्याला हवे आहेत. आणि त्यांच्याच पाठीमागे समाजाने उभे राहिले पाहिजे. तद्वतच तपास यंत्रणा आणि सरकारने सामाजिक स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घेऊन या दोन्ही प्रकरणातील संशय दूर करावा, इतकीच अपेक्षा..!!
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.